मुख्य सामग्रीवर वगळा

अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव

 जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते? कोणत्या देशाच्या झेंड्यावर मंदिराची आकृती आहे? ह्याची उत्तरे सगळ्यांना माहितीच असतील. सर्वांनी ते प्रसिद्ध छायाचित्र पाहिले असेलच. इथे ह्या पोस्टमध्ये प्रस्तुत करत आहोत अंगकोरवाटची आम्ही काढलेली छायाचित्रे. 

अंगकोरवाट 

जगातील सर्वात मोठे मंदिर आहे अंगकोरवाट आणि अर्थातच कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावर अंगकोरवाटची आकृती आहे. 

कंबोडिया कुठे आहे? आग्नेय आशिया मध्ये थायलंड, व्हिएतनाम आणि लाओस ने वेढलेला असा हा देश आहे.

कंबोडिया केवढा आहे? अगदी लहान आहे. १८१,३०५ चौरस फूट म्हणजे महाराष्ट्राच्या निम्म्याहून थोडाच जास्त मोठा असा हा देश आहे. 

किती जुना आहे? इसवीसन पूर्व ४००० वर्षे तरी इथे मानवी वस्ती असावी असे काही पुरावे पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडले आहेत. 

पण आज आपण मुख्यत्वाने पाहणार आहोत ते तिसऱ्या चौथ्या शतकापासून भारतीय प्रभाव असणारे आणि भारतीय संस्कृती आजूबाजूच्या देशात नेणारे कंबोडिया. 

अनेक हिंदू आणि भारतीय राजवटी इथे भरभराटीला आल्या आणि आसपासच्या प्रदेशातील सर्वात मोठी राजसत्ता म्हणून प्रस्थापित झाल्या. साहजिकच त्यांचा प्रभाव संपूर्ण आग्नेय आशियावर आपल्याला दिसून येतो. 

देशाच्या सीमा त्या त्या वेळच्या राजसत्तेच्या शक्तीनुसार लहान मोठ्या होत राहिल्या. भारतीय भाषा -संस्कृत, संस्कृती, धर्म, कला, वास्तुशास्त्र ह्या सगळ्यांचा प्रभाव कंबोडियावर होता आणि आहे. 

कंबोडिया नाव कसे पडले? ह्याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. कंबोज देश ह्या संस्कृत शब्दावरून कंपुचीया आणि कंबोडिया आले. पण मुळात कंबोज, कंबूज कसे आले? तर 'कंबू स्वयंभू' नावाचे भारतीय ऋषी तिथे गेले. त्यांनी तिथल्या मेरा नावाच्या राजकन्येशी विवाह केला आणि कंबूज देश वसवला असे म्हणतात. कोणी म्हणतात कौंडिण्य नावाचे ऋषी होते त्यांनी युद्धात स्थानिक राजवटीला जिंकले. तिथल्या नागकन्या राणी सोमाने त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिच्याशी विवाह करून ते तिथेच राहिले. तिथल्या एका मंदिराच्या माहितीत देखील ही कथा सांगितली जाते. 

कंबुजमधील वेगवेगळ्या राजांनी मोठमोठे मंदिर समूह बांधलेले आपल्याला दिसून येतात. अंगकोरवाट बांधले गेले ते बाराव्या शतकात. राजा सूर्यवर्मन द्वितीय ह्याने यशोधरापूर ह्या आपल्या राजधानीत हे मंदिर बांधले. दिवाकरपंडित नावाचे त्यांचे मंत्री, सल्लागार किंवा गुरु. ह्यांनी राजाला इथे मंदिर बांधण्यासाठी सुचवले असे शिलालेखात उल्लेख सापडतात. 

अंगकोर वाट हे नाव कसे आले?

असे म्हणतात की अंगकोर वाट हे पूर्वी होते नोकोर - नगर +वाट. त्यावरून अंगकोरवाट झाले. संस्कृतात नगर म्हणजे शहर आणि वाट म्हणजे आवार. आग्नेय आशियात वाट हा शब्द वापरला जातो मंदिराचे आवार किंवा मंदिर ह्या साठी. त्यामुळे अर्थातच अंगकोरवाटचा अर्थ होतो मंदिरांचे शहर. 

अंगकोरवाटचे मूळ नाव होते 'परम विष्णुलोक'. विष्णुचे पवित्र स्थान. 

त्या आधीच्या राजवटी शंकराला पुजणाऱ्या शैव होत्या. अंगकोरवाट मध्ये मात्र विष्णू हीच मुख्य देवता, विष्णूची पूजा आणि वैष्णव प्रभाव होता. 

कंबोडिया मधील सियाम रीप ह्या शहराच्या जवळ असलेले अंगकोरवाट आज देखील जगातील सर्वात मोठे मंदिर किंवा कोणत्याही धर्माचे धर्मस्थळ तर आहेच. पण अंगकोर थोम हे शहर देखील त्या काळातले जगातील सर्वात मोठे शहर असावे असे नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तज्ज्ञ सांगत आहेत. चारशे एकरांच्याहून जास्त विस्तार असलेल्या क्षेत्रात हे भव्य मंदिर समूह उभे आहेत. 

मंदिराची संरचना चारी बाजूनी खंदक आणि पाण्याचा कालवा, त्याच्या मध्यभागी मंदिर अशी आहे. पाच शिखरे आहेत, त्यातले मधले सर्वात उंच म्हणजे साधारण दोनशे फुट उंच आहे. 

तीन वेगवेगळ्या स्तरांवर बाहेरपासून आतपर्यंत मंदिराची उंची वाढत गेली आहे. बाजूचे पाणी म्हणजे क्षीरसमुद्र आणि मध्यभागी मेरू पर्वत अशी ही संकल्पना आहे. 

भारतीय खगोलशास्त्राचा एक अद्भुत नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. मार्च मध्ये एकदा आणि सप्टेंबरमध्ये एकदा अशा दोन विषुवदिनांच्या पहाटे सूर्य अंगकोरवाटच्या मधल्या कळसाच्यावर उगवतो. त्या दिवशी जगभरातील असंख्य लोक ते दृश्य पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात जमतात. 

पण अगदी रोजच भल्या पहाटे, सूर्योदयाच्या आधीपासून पर्यटक मंदिराच्या आवारात जमलेले असतात. अंगकोरवाटच्या कळसांमागून उगवणारा सूर्य आजपर्यंत करोडो फोटोंमध्ये आला असेल. 

आम्ही गेलो होतो त्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २०१२ला हवा ढगाळ होती. सूर्य बराच वर येईपर्यंत दिसला नाही. ह्या पोस्टमधील सगळे फोटो आम्ही त्या दिवशी काढलेले आहेत. 

त्या दिवशी देखील हजारो पर्यटक पहाटेच जमलेले होते. अंधारात काहीच दिसत नव्हते पण अनेक लोक जमलेले आहेत एवढेच जाणवत होते. तितक्यात बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली. तरीदेखील कोणी आपल्या धरून ठेवलेल्या जागेवरून हलले नाही. चांगला फोटो मिळण्याची आशा मोठी वाईट असते! 


थोडे उजाडल्यावर लक्षात आले की किती लोक तिथे जमलेले होते!

सर्वात पहिला फोटो -ज्यात मंदिराचे पाण्यात प्रतिबिंब दिसते आहे, त्या पाण्यात असंख्य कमळे उमलली होती. 



मंदिरात लांबलचक सज्जे आहेत ज्यात रामायण महाभारतातील दृश्ये आहेत. कित्येक किलोमीटर लांबी असलेले हे सज्जे असल्याने भिंतीवर शिल्पांसाठी खूप जागा मिळाली आहे. 



ह्या वरच्या फोटोत आपल्याला सज्जाच्या लांबी रुंदीचा, भिंतीवरील शिल्पांच्या उंचीचा आणि भव्यतेचा अंदाज येईल. 

समुद्रमंथनाचे दृश्य अंगकोर मध्ये विविध रूपांत साकारलेले दिसते. 

समुद्रमंथन 
समुद्रमंथन शिल्पात देव आणि दानवांच्या चेहरेपट्टीतला फरक, जोर लावून ओढताना त्यांनी रोवलेले पाय हे सगळे बारकावे दिसतात. परमेश्वराचा कूर्मावतार देखील आपल्याला ह्या शिल्पात पाहायला मिळतो आहे. मेरू पर्वताला आधार देण्यासाठी इथे कूर्म- कासव दाखवले आहे. समुद्रमंथनासाठी दोरी बनलेल्या वासुकी नागाचा फणा, खाली असलेले पाण्यातले मासे देखील खूप चान्गल्या प्रकारे दगडात दाखवले आहे. 

समुद्र मंथन 

शरशय्येवरील भीष्म पितामह 

राजा 

गरुडावर आरूढ विष्णू ?

नुसते त्या सज्जातील शिल्पे बारकाईने पाहायचे म्हटले तरी अनेक दिवस लागतील. 

मंदिर आवारात अनेक ठिकाणी देवता आणि अप्सरांच्या काही हजार आकृती कोरलेल्या आहेत. त्यांच्या वस्त्रांचे बारकावे, दागदागिने, केशरचना, चेहऱ्यावरील भाव ह्या सर्वात विविधता अचंबित करते. 




मंदिराच्या रचनेत अनेक स्तर आहेत. त्यामुळे साहजिकच भरपूर जिने आहेत. मधल्या मोकळया जागा आहेत. 






मंदिराच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे दृश्य देखील फार सुंदर आहे. तिथून बघताना मंदिर संरचनेची थोडी तरी कल्पना येते. 

वाचनालय 

मंदिर आवारात अशा अनेक वास्तू आहेत. त्यातील काही राजघराण्याची वाचनालये होती असे म्हणतात. 

Decorative panel

वरील फोटोत असणाऱ्या अनेक प्रमाणबद्ध मूर्ती आपल्याला थक्क करतात. प्रत्येक मूर्तीची देहबोली वेगळी. केवळ मनुष्याकृतीच नव्हेत तर प्राणी, शस्त्रे, रथ, बाजूच्या भिंतीच्या कठड्यावरील कोरीवकाम सर्वच अप्रतिम आहे. 

सुस्थितीतील अशी पॅनेल्स आता संख्येने खूपच कमी उरली आहेत. पण जेव्हा सगळी म्हणजे शेकडो पॅनेल्स आणि हे संपूर्णच मंदिरच सुस्थितीत असेल तेव्हा किती कलापूर्ण आणि त्यामुळेच वैभवशाली दिसत असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. 

प्रचंड आवार, इतकी भव्यता, अवाढव्य उंची, अनेक शतकांपूर्वी मानवाने घडवलेला वास्तुरचनेतील चमत्कार, शिल्पांचे सौंदर्य, प्रत्येक कठड्यावरील, खांबावरील नक्षीकाम हे सगळेच आपल्याला विस्मयचकित करते. 

मधली काही शतके लपलेले ह्या मंदिराचे अस्तित्व, त्या आधी आणि नंतर झाली युद्धे, आधुनिक युगातील गोळीबाराच्या खुणा, वाढणारी झाडे हे सर्व मंदिराच्या दुरावस्थेला कारणीभूत होत आहेत. भंगलेल्या मूर्ती, तुटलेले कठडे, ढासळणारे चिरे, आवारात पडलेले दगड हे सगळे मन विषण्ण करते. 

२०१२ मध्ये मुख्य मंदिरासाठी चढण्याचे जिने उंच आणि अरुंद पायऱ्यांचे होते. त्यामुळे तिथे जाणे हा सर्वार्थाने रोमांचक अनुभव होता. आता कदाचित पायऱ्या जास्त चांगल्या केल्या असतील. 


वरून दिसणारे दृश्य 

मुख्य मंदिरात अर्थातच पूर्वी विष्णूची मूर्ती असणार. अष्टभुज अशा विष्णूमूर्तीला तिथे 'ता रिच' म्हटले जाते. 


नंतर म्हणजे बाराव्या शतकाच्या शेवटाकडे जयवर्मन सप्तम ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला आणि त्यामुळे अंगकोर वर बौद्ध प्रभाव वाढला. त्यामुळे आता ही विष्णू मूर्ती मुख्य मंदिरात नाही. तिथे आता बुद्ध मूर्ती आहे.


अजून एका ठिकाणी अशा बुद्ध मूर्ती आहेत. पूजा म्हणून आपल्या डोळ्यांपुढे येणारे सर्व संस्कार होत नसतील तरी मूर्तींसमोर उदबत्त्या लावल्या जातात, त्यांना वस्त्रे घातली जातात असे लक्षात आले. आता ह्या संदर्भात परिस्थिती काही बदलली असेल तर माहिती नाही. नुकतेच जाऊन आलेले कोणी ह्यावर खुलासा करू शकेल. 

राजसत्ता आणि धर्म ह्यांचे परस्पर समीकरण,आणि त्याचा संस्कृती आणि कलेवर होणारा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतो. 

वरील फोटोतले शिखर आहे ते मध्य शिखर मेरू पर्वत म्हणून मंदिरातले सर्वात उंच शिखर आहे. 



मंदिराच्या भिंती म्हणजे मेरू पर्वताला वेढणारा वासुकी नाग असे समजले जाते. बाहेरून एका टोकाला दिसणारी शेपटी वरच्या एका फोटोत दिसते आहे. हे नागाचे मस्तक आहे ते मात्र तुटले होते, ते आता दुरुस्त करून खाली ठेवलेले आहे.

अंगकोरवाट पाहताना अनेक शतकांचा इतिहास आपल्या अवतीभोवती वावरत असतो. विविध भावनांचा कल्लोळ मनात होत राहतो. 

विश्वाची अमूल्य ठेव असलेल्या ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक देश कंबोडियाला मदत करत आहेत. भारताचा देखील ह्यात मोलाचा सहभाग आहे. 

 ज्यांना ज्यांना जाणे शक्य आहे त्यांनी ह्या मंदिरांची स्थिती अजून वाईट होण्याच्या आत, लवकरात लवकर जाऊन ही मंदिरे बघायला हवीत असे नक्कीच वाटते. 


#angkorwat #cambodia #siemreap #angkor #angkorwattemple #travel #khmer #siemreaptrip #travelphotography #phnompenh #angkortemples #angkorthom #cambodiatravel #asia #cambodiatrip #angkorwatcambodia #southeastasia #siemreapcambodia #temple #travelgram #beautifulcambodia #adventure #cambodian #explorecambodia #visitcambodia #taprohm #wanderlust #angkorwatsunrise #travelcambodia








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...