जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते? कोणत्या देशाच्या झेंड्यावर मंदिराची आकृती आहे? ह्याची उत्तरे सगळ्यांना माहितीच असतील. सर्वांनी ते प्रसिद्ध छायाचित्र पाहिले असेलच. इथे ह्या पोस्टमध्ये प्रस्तुत करत आहोत अंगकोरवाटची आम्ही काढलेली छायाचित्रे.
अंगकोरवाट |
जगातील सर्वात मोठे मंदिर आहे अंगकोरवाट आणि अर्थातच कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावर अंगकोरवाटची आकृती आहे.
कंबोडिया कुठे आहे? आग्नेय आशिया मध्ये थायलंड, व्हिएतनाम आणि लाओस ने वेढलेला असा हा देश आहे.
कंबोडिया केवढा आहे? अगदी लहान आहे. १८१,३०५ चौरस फूट म्हणजे महाराष्ट्राच्या निम्म्याहून थोडाच जास्त मोठा असा हा देश आहे.
किती जुना आहे? इसवीसन पूर्व ४००० वर्षे तरी इथे मानवी वस्ती असावी असे काही पुरावे पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडले आहेत.
पण आज आपण मुख्यत्वाने पाहणार आहोत ते तिसऱ्या चौथ्या शतकापासून भारतीय प्रभाव असणारे आणि भारतीय संस्कृती आजूबाजूच्या देशात नेणारे कंबोडिया.
अनेक हिंदू आणि भारतीय राजवटी इथे भरभराटीला आल्या आणि आसपासच्या प्रदेशातील सर्वात मोठी राजसत्ता म्हणून प्रस्थापित झाल्या. साहजिकच त्यांचा प्रभाव संपूर्ण आग्नेय आशियावर आपल्याला दिसून येतो.
देशाच्या सीमा त्या त्या वेळच्या राजसत्तेच्या शक्तीनुसार लहान मोठ्या होत राहिल्या. भारतीय भाषा -संस्कृत, संस्कृती, धर्म, कला, वास्तुशास्त्र ह्या सगळ्यांचा प्रभाव कंबोडियावर होता आणि आहे.
कंबोडिया नाव कसे पडले? ह्याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. कंबोज देश ह्या संस्कृत शब्दावरून कंपुचीया आणि कंबोडिया आले. पण मुळात कंबोज, कंबूज कसे आले? तर 'कंबू स्वयंभू' नावाचे भारतीय ऋषी तिथे गेले. त्यांनी तिथल्या मेरा नावाच्या राजकन्येशी विवाह केला आणि कंबूज देश वसवला असे म्हणतात. कोणी म्हणतात कौंडिण्य नावाचे ऋषी होते त्यांनी युद्धात स्थानिक राजवटीला जिंकले. तिथल्या नागकन्या राणी सोमाने त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिच्याशी विवाह करून ते तिथेच राहिले. तिथल्या एका मंदिराच्या माहितीत देखील ही कथा सांगितली जाते.
कंबुजमधील वेगवेगळ्या राजांनी मोठमोठे मंदिर समूह बांधलेले आपल्याला दिसून येतात. अंगकोरवाट बांधले गेले ते बाराव्या शतकात. राजा सूर्यवर्मन द्वितीय ह्याने यशोधरापूर ह्या आपल्या राजधानीत हे मंदिर बांधले. दिवाकरपंडित नावाचे त्यांचे मंत्री, सल्लागार किंवा गुरु. ह्यांनी राजाला इथे मंदिर बांधण्यासाठी सुचवले असे शिलालेखात उल्लेख सापडतात.
अंगकोर वाट हे नाव कसे आले?
असे म्हणतात की अंगकोर वाट हे पूर्वी होते नोकोर - नगर +वाट. त्यावरून अंगकोरवाट झाले. संस्कृतात नगर म्हणजे शहर आणि वाट म्हणजे आवार. आग्नेय आशियात वाट हा शब्द वापरला जातो मंदिराचे आवार किंवा मंदिर ह्या साठी. त्यामुळे अर्थातच अंगकोरवाटचा अर्थ होतो मंदिरांचे शहर.
अंगकोरवाटचे मूळ नाव होते 'परम विष्णुलोक'. विष्णुचे पवित्र स्थान.
त्या आधीच्या राजवटी शंकराला पुजणाऱ्या शैव होत्या. अंगकोरवाट मध्ये मात्र विष्णू हीच मुख्य देवता, विष्णूची पूजा आणि वैष्णव प्रभाव होता.
कंबोडिया मधील सियाम रीप ह्या शहराच्या जवळ असलेले अंगकोरवाट आज देखील जगातील सर्वात मोठे मंदिर किंवा कोणत्याही धर्माचे धर्मस्थळ तर आहेच. पण अंगकोर थोम हे शहर देखील त्या काळातले जगातील सर्वात मोठे शहर असावे असे नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तज्ज्ञ सांगत आहेत. चारशे एकरांच्याहून जास्त विस्तार असलेल्या क्षेत्रात हे भव्य मंदिर समूह उभे आहेत.
मंदिराची संरचना चारी बाजूनी खंदक आणि पाण्याचा कालवा, त्याच्या मध्यभागी मंदिर अशी आहे. पाच शिखरे आहेत, त्यातले मधले सर्वात उंच म्हणजे साधारण दोनशे फुट उंच आहे.
तीन वेगवेगळ्या स्तरांवर बाहेरपासून आतपर्यंत मंदिराची उंची वाढत गेली आहे. बाजूचे पाणी म्हणजे क्षीरसमुद्र आणि मध्यभागी मेरू पर्वत अशी ही संकल्पना आहे.
भारतीय खगोलशास्त्राचा एक अद्भुत नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. मार्च मध्ये एकदा आणि सप्टेंबरमध्ये एकदा अशा दोन विषुवदिनांच्या पहाटे सूर्य अंगकोरवाटच्या मधल्या कळसाच्यावर उगवतो. त्या दिवशी जगभरातील असंख्य लोक ते दृश्य पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात जमतात.
पण अगदी रोजच भल्या पहाटे, सूर्योदयाच्या आधीपासून पर्यटक मंदिराच्या आवारात जमलेले असतात. अंगकोरवाटच्या कळसांमागून उगवणारा सूर्य आजपर्यंत करोडो फोटोंमध्ये आला असेल.
आम्ही गेलो होतो त्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २०१२ला हवा ढगाळ होती. सूर्य बराच वर येईपर्यंत दिसला नाही. ह्या पोस्टमधील सगळे फोटो आम्ही त्या दिवशी काढलेले आहेत.
त्या दिवशी देखील हजारो पर्यटक पहाटेच जमलेले होते. अंधारात काहीच दिसत नव्हते पण अनेक लोक जमलेले आहेत एवढेच जाणवत होते. तितक्यात बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली. तरीदेखील कोणी आपल्या धरून ठेवलेल्या जागेवरून हलले नाही. चांगला फोटो मिळण्याची आशा मोठी वाईट असते!
थोडे उजाडल्यावर लक्षात आले की किती लोक तिथे जमलेले होते!
सर्वात पहिला फोटो -ज्यात मंदिराचे पाण्यात प्रतिबिंब दिसते आहे, त्या पाण्यात असंख्य कमळे उमलली होती.
मंदिरात लांबलचक सज्जे आहेत ज्यात रामायण महाभारतातील दृश्ये आहेत. कित्येक किलोमीटर लांबी असलेले हे सज्जे असल्याने भिंतीवर शिल्पांसाठी खूप जागा मिळाली आहे.
ह्या वरच्या फोटोत आपल्याला सज्जाच्या लांबी रुंदीचा, भिंतीवरील शिल्पांच्या उंचीचा आणि भव्यतेचा अंदाज येईल.
समुद्रमंथनाचे दृश्य अंगकोर मध्ये विविध रूपांत साकारलेले दिसते.
समुद्रमंथन |
समुद्र मंथन |
शरशय्येवरील भीष्म पितामह |
राजा |
गरुडावर आरूढ विष्णू ? |
नुसते त्या सज्जातील शिल्पे बारकाईने पाहायचे म्हटले तरी अनेक दिवस लागतील.
मंदिर आवारात अनेक ठिकाणी देवता आणि अप्सरांच्या काही हजार आकृती कोरलेल्या आहेत. त्यांच्या वस्त्रांचे बारकावे, दागदागिने, केशरचना, चेहऱ्यावरील भाव ह्या सर्वात विविधता अचंबित करते.
मंदिराच्या रचनेत अनेक स्तर आहेत. त्यामुळे साहजिकच भरपूर जिने आहेत. मधल्या मोकळया जागा आहेत.
मंदिराच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे दृश्य देखील फार सुंदर आहे. तिथून बघताना मंदिर संरचनेची थोडी तरी कल्पना येते.
वाचनालय |
मंदिर आवारात अशा अनेक वास्तू आहेत. त्यातील काही राजघराण्याची वाचनालये होती असे म्हणतात.
Decorative panel |
वरील फोटोत असणाऱ्या अनेक प्रमाणबद्ध मूर्ती आपल्याला थक्क करतात. प्रत्येक मूर्तीची देहबोली वेगळी. केवळ मनुष्याकृतीच नव्हेत तर प्राणी, शस्त्रे, रथ, बाजूच्या भिंतीच्या कठड्यावरील कोरीवकाम सर्वच अप्रतिम आहे.
सुस्थितीतील अशी पॅनेल्स आता संख्येने खूपच कमी उरली आहेत. पण जेव्हा सगळी म्हणजे शेकडो पॅनेल्स आणि हे संपूर्णच मंदिरच सुस्थितीत असेल तेव्हा किती कलापूर्ण आणि त्यामुळेच वैभवशाली दिसत असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो.
प्रचंड आवार, इतकी भव्यता, अवाढव्य उंची, अनेक शतकांपूर्वी मानवाने घडवलेला वास्तुरचनेतील चमत्कार, शिल्पांचे सौंदर्य, प्रत्येक कठड्यावरील, खांबावरील नक्षीकाम हे सगळेच आपल्याला विस्मयचकित करते.
मधली काही शतके लपलेले ह्या मंदिराचे अस्तित्व, त्या आधी आणि नंतर झाली युद्धे, आधुनिक युगातील गोळीबाराच्या खुणा, वाढणारी झाडे हे सर्व मंदिराच्या दुरावस्थेला कारणीभूत होत आहेत. भंगलेल्या मूर्ती, तुटलेले कठडे, ढासळणारे चिरे, आवारात पडलेले दगड हे सगळे मन विषण्ण करते.
२०१२ मध्ये मुख्य मंदिरासाठी चढण्याचे जिने उंच आणि अरुंद पायऱ्यांचे होते. त्यामुळे तिथे जाणे हा सर्वार्थाने रोमांचक अनुभव होता. आता कदाचित पायऱ्या जास्त चांगल्या केल्या असतील.
वरून दिसणारे दृश्य |
मुख्य मंदिरात अर्थातच पूर्वी विष्णूची मूर्ती असणार. अष्टभुज अशा विष्णूमूर्तीला तिथे 'ता रिच' म्हटले जाते.
नंतर म्हणजे बाराव्या शतकाच्या शेवटाकडे जयवर्मन सप्तम ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला आणि त्यामुळे अंगकोर वर बौद्ध प्रभाव वाढला. त्यामुळे आता ही विष्णू मूर्ती मुख्य मंदिरात नाही. तिथे आता बुद्ध मूर्ती आहे.
अजून एका ठिकाणी अशा बुद्ध मूर्ती आहेत. पूजा म्हणून आपल्या डोळ्यांपुढे येणारे सर्व संस्कार होत नसतील तरी मूर्तींसमोर उदबत्त्या लावल्या जातात, त्यांना वस्त्रे घातली जातात असे लक्षात आले. आता ह्या संदर्भात परिस्थिती काही बदलली असेल तर माहिती नाही. नुकतेच जाऊन आलेले कोणी ह्यावर खुलासा करू शकेल.
राजसत्ता आणि धर्म ह्यांचे परस्पर समीकरण,आणि त्याचा संस्कृती आणि कलेवर होणारा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतो.
वरील फोटोतले शिखर आहे ते मध्य शिखर मेरू पर्वत म्हणून मंदिरातले सर्वात उंच शिखर आहे.
अंगकोरवाट पाहताना अनेक शतकांचा इतिहास आपल्या अवतीभोवती वावरत असतो. विविध भावनांचा कल्लोळ मनात होत राहतो.
विश्वाची अमूल्य ठेव असलेल्या ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक देश कंबोडियाला मदत करत आहेत. भारताचा देखील ह्यात मोलाचा सहभाग आहे.
ज्यांना ज्यांना जाणे शक्य आहे त्यांनी ह्या मंदिरांची स्थिती अजून वाईट होण्याच्या आत, लवकरात लवकर जाऊन ही मंदिरे बघायला हवीत असे नक्कीच वाटते.
#angkorwat #cambodia #siemreap #angkor #angkorwattemple #travel #khmer #siemreaptrip #travelphotography #phnompenh #angkortemples #angkorthom #cambodiatravel #asia #cambodiatrip #angkorwatcambodia #southeastasia #siemreapcambodia #temple #travelgram #beautifulcambodia #adventure #cambodian #explorecambodia #visitcambodia #taprohm #wanderlust #angkorwatsunrise #travelcambodia
खूप छान फोटो, माहिती....
ReplyDeleteमस्त🙏 नेहमी सारख लिखाण यात तुझा मंदिरांचा अभ्यासपण जाणवतो👍
ReplyDelete