Skip to main content

36 तासांचा दिवस - एका दिवसात16000+ किलोमीटर प्रवास

 36 तासांचा दिवस - एका दिवसात16000+ किलोमीटर प्रवास 


वर्षातला सर्वात मोठा दिवस कोणता असे विचारले तर उत्तर नक्की असेल की 21 जून..पण ह्या वर्षी आमचा सर्वात मोठा दिवस होता 26 जून..6 चे यमक जुळवत तो दिवस होता 36 तासांचा!! 


आमचे विमान होते 26 जून ला मुंबईहून पहाटे 2.20 चे. 25 जून ला म्हणजे निघायच्या आदल्या दिवशी मुंबईत 144 कलमाच्या बातम्या. शिवाय परिस्थिती आणखी रोमहर्षक करण्यासाठी म्हणून आणखी एक बातमी आली. ठाण्यात पण काहीतरी गडबड होणार अशी जोरदार हवा होती. म्हणून 25 जूनला रात्री लवकरच म्हणजे रात्री 10 वाजता घरातून निघालो. निघण्याआधीच एअरलाईनची अगदी ताजी ताजी ईमेल मिळाली होती की फ्लाईट जवळ जवळ 40 मिनिटे लेट आहे. पण प्रत्यक्षात विमानाचे पाय की पंख चाळीस मिनिटानंतरही मुंबईतून निघेच ना लवकर!अतिशय जड अंतःकरणाने विमानाने जवळपास पहाटे पावणेचार वाजता जमीन सोडली.


 विमानाने इतका वेळ मुंबईत घालवला तो मात्र सार्थकी लागला. KLM चे विमान असूनही अगदी रुचकर विगन अन्न मिळाले. सुरुवातीला कॅप्टनने अनाऊंस केले की विमान उशीर झालेला वेळ जवळ जवळ भरून काढेल, विमान नियोजित वेळेपेक्षा फार उशिरा Amsterdam ला पोचणार नाही.


खिडकीतून बाहेर पाहताना कापूस पिंजून ठेवल्या सारखे ढगांचे अनेक थर दिसत होते. त्यावरून जाताना विमानाला देखील मऊ मऊ वाटत असेल. किंवा सिनेमाचा स्पेशल इफेक्ट्सवाला एखादा सेट असावा तसे दिसत होते ढग. अधून मधून, ते कवितेत म्हणतात तसे ढगांचे अवगुंठन की काय ते बाजूला झाल्यावर खालचे दृश्य दिसत होते. 


डोंगर, हिरवळ पाहून मन तृप्त झाले. परत ढगांचा पडदा बाजूला झाला तेव्हा दिसला ब्लॅक सी. इतक्या वरून पाहताना अगदी शांत वाटत होता. नुकत्याच त्यात झालेल्या युक्रेन रशिया चकमकीचा, आगीचा काहीच मागमूस देखील त्याने दाखवला नाही. अर्थात अगदी थोडा वेळच ढग बाजूला झाले होते. 

 जेव्हा windmills दिसायला लागल्या तेव्हा आपण जवळ आलो ह्याची खात्री पटली. लांबलचक शेतांचे पट्टे, सुंदर घरे, अधून मधून दिसणारे कालवे..फारच सुंदर आणि प्रसन्न दृश्य होते ते. 






कॅप्टन ने उशीर झालेला वेळ जवळजवळ भरून काढू असे आश्वासन दिले होते खरे पण दिलेली आश्वासने पाळण्यासाठी नसतात बहुतेक! लवकर येण्याचे कितीही त्याच्या मनात असले तरी विमान चांगलेच उशिरा पोचले. तिथून आमचे पुढचे विमान होते San Francisco चे. त्यामुळे आता अगदी धावत पळत सगळे सोपस्कार पूर्ण करून ते गाठायला हवे होते.

 शिपुल चा अतिशय भव्य विमानतळ. बसायसाठी, झोपण्यासाठी जागोजाग सोफे ठेवलेले आहेत. लायब्ररी आहे, लॉकर्स आहेत. उत्तमोत्तम दुकाने आहेत. सर्व काही आहे. नाही आहे ती फक्त सुरळीत आणि वेगवान व्यवस्था. त्यात सध्या तिथे काम करणारे लोक अगदी कमी आहेत. त्यामुळे अनेक काऊंटर बंद आहेत. 

आमचे विमान उशिरा पोचले. अनेकांच्या कनेक्टिंग फ्लाईट होत्या. पण immigration आणि security वाल्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. सुमारे हजार दीड हजार लोक रांगेत उभे होते. त्यात ज्यांची कनेक्टींग फ्लाईट आहे त्यांच्यासाठी वेगळी रांग नाहीच. आमच्या सारखे अनेक जण ऑफिसर ला सांगत होते की आम्ही जर का लवकर हे सर्व सोपस्कार पार पाडले नाहीत तर आमचे विमान चुकेल. पण ते सर्व ऑफिसर नियम म्हणजे नियम ह्यावर ठाम होते. रांगेचा फायदा सर्वांना!! रांगेत उभे रहा. नंबर येईल तेव्हा येईल.. त्यातच अर्ध्याच्या वर काऊंटर बंद. चालू असलेल्या पैकी देखील अनेक काऊंटर मध्येच काही वेळ बंद झाले होते.


जे काऊंटर चालू होते तिथला कामाचा वेग तर खेडेगावात मुक्कामी S T येते तिच्या ड्रायव्हर कंडक्टर इतकाच. त्यामुळे जे काम 15/ 20 मिनिटात होणे अपेक्षित होते त्याला चार पाच पट वेळ लागत होता. आम्हा सर्वांचे वारंवार सांगून झाल्यावर, विमानांना 15 मिनिटे उरलेली असताना, ज्यांची विमाने चुकायच्या बेतात आहेत अशा लोकांना अखेर पुढच्या रांगेत जायची परवानगी दिली त्याने. 


तिथून सर्व सोपस्कार करून गेटशी पळत जाईपर्यंत अजून 10 मिनिटे गेली. कारण दोन्ही मध्ये भरपूर अंतर. विमानतळ भव्य असल्याने अंतरे खूप जास्त आहेत.

तिथे पळत जाऊन पोचलो तर विमान अजून निघायचे होते. ते दिसलेच आम्हाला काचेबाहेर उभे. हुश्श झाले अगदी. पण गेटवर तिकिटे दाखवताच शुभ समाचार मिळाला की ब्रिज काढला आहे विमानाचा नुकताच. आता तो परत लावायचा तर खूप उशीर होईल. तसे ते करू शकत नाहीत. थोडक्यात काय तर आम्हाला त्या विमानात जाता येणार नाही. 
हेचि काय फळ मम तपाला..इतके पळत आलो ते वायाच गेले म्हणायचे की! 

मग आमची वरात निघाली परत ट्रान्स्फर ऑफिस कडे. वाटले होते अर्ध्या तासात दुसऱ्या फ्लाईटचे मिळेल तिकीट आणि पुढचा प्रवास सुरू होईल. ते ऑफिस विमानतळावरच पण भरपूर लांब. पावले मोजणारे घड्याळ हातात घातले नसल्याचे फारच वाईट वाटले चालताना!! 

तिथे पोचतो तर काय आमच्यासारखे फ्लाईट चुकलेले चारपाचशे लोक होते तिथे. क्यू तिकीट घेतल्यावर प्रत्यक्ष नंबर यायचा वेळ त्यांनी दिला होता. त्यामुळे तिथे समोरच घुटमळत राहिलो. प्रत्यक्षात नंबर आला त्यानंतर तीन साडेतीन तासांनी.


तोपर्यंत अनेक कहाण्या ऐकायला पाहायला मिळाल्या. किती प्रकारचे गोंधळ होऊ शकतात हे दिसले. एक नव्वदीच्या युरोपियन आजी आणि त्यांची नात. एक फ्लाईट चुकल्यावर दुसरीचे तिकीट मिळाले..पण ते वेगळ्या विमानतळावर जाणारे होते, जिथला विसा त्यांच्याकडे नव्हता. मग त्यांना गेटवरून परत यावे लागले होते. खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. साहजिकच होते त्यांचे रडकुंडीला येणे. 

दुसरे एक जोडपे होते त्यांची एक फ्लाईट चुकली. आता दुसरी फ्लाईट तीन दिवसांनी. मग इथेच तीन दिवस मुक्काम करायचा किंवा मग तोच प्रवास तुकड्या तुकड्यात करून दोन दिवसांत घर गाठायचे. त्या साठी त्यांना तीन विमाने बदलायला लागणार होती. इतक्या सगळ्या गोंधळात अजून वाईट म्हणजे त्या मुलीची हिऱ्याचे पदक असणारी सोन्याची साखळी हरवली.

एक सातवा महिना लागलेली आई आणि बरोबर 4 वर्षांची लहान मुलगी. त्यांना कधीचे मिळणार होते तिकीट कोणास ठाऊक?

एक मोठा परिवार होता. त्यांना दुसरे तिकीट मिळाले ते इतक्या लगेचचे होते की सगळ्यांना गोळा करून गेटवर जाण्यासाठी त्यांना पळायला लागले. मग त्यातल्या तरुण मुलांनी पळत पुढे जायचे आणि गेटवर थांबायचे असे त्यांनी ठरवले!

अडचणींचे विविध प्रकार..त्या मानाने आपली समस्या काहीच नाही असे आमचा नंबर यायच्या आधीच मला पटले होते. 


अखेर आमचा नंबर आला. काऊंटर वरच्या ऑफिसर ने आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्याच दिवशीच्या अमेरिकेत जाणाऱ्या अजून दोन फ्लाइट्स तर इतक्या वेळात निघून गेल्या होत्या. मग त्याने आम्हाला Amsterdam ते Salt Lake City आणि Salt Lake City ते San Francisco असे तिकीट बदलून दिले. पहिले तिकीट KLM चे होते आणि दुसरे United एअरलाइन्सचे. त्याच दिवशी जाता येणार असल्याने आम्ही खुश झालो. दोन फ्लाईट्स मध्ये वेळ होता 51 मिनिटे! तरी ती फ्लाईट मिळेल तुम्हाला असे त्याने सांगितले. 

आम्ही सुटकेचा निःश्वास टाकत गेट वर पोचलो. तर ती फ्लाईट लेट असल्याची घोषणा झाली!! परत आम्ही ट्रान्स्फर डेस्कला आलो. कारण आता पुढची फ्लाईट मिळणे अवघड होणार होते. पण चौकशी कक्षातील अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की तरीही तुम्ही ही फ्लाईट घ्याच. कमीतकमी युरोपच्या तर बाहेर पडाल!!

त्याच्या बोलण्यात तथ्य होतेच. सध्या युरोपच्या अनेक विमानतळांवर विविध कारणाने असेच गोंधळ चालू आहेत.

ह्या सगळ्या गोंधळात जे कर्मचारी हजर आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतो आहे. अनेक अस्वस्थ लोकाना उत्तरे देताना त्यांच्या संयमाची कसोटी लागते आहे.

आम्ही salt Lake City चे विमान पकडले. ऐनवेळी घेतलेले तिकीट असल्याने विमानात vegan जेवण मिळण्याची शक्यता नव्हतीच. पण तरी क्रू ने मला फळे, सलाड्स, ब्रेड जाम असे दिले. संपूर्ण सफरचंद, भले मोठे अख्खे केळे असे दोन वेगवेगळ्या वेळी दिले त्यांनी. त्यामुळे 11 तासांच्या त्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीतून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या त्यांच्या वृत्तीचे फार कौतुक वाटले.


आम्ही पश्चिमेकडे जात असल्याने घरातून निघून चोवीस तास होत आले तरी दिवस मावळलेला नव्हताच. संपूर्ण प्रवासभर माझी विंडो सीट मी पूर्णपणे उपभोगली. कधी ढग बाजूला होतील आणि खालचे दृश्य दिसेल ते पाहण्यासाठी पूर्ण वेळ लक्ष ठेवून होते मी!

 माझी तपश्चर्या सार्थकी लागली. मला अप्रतिम दृश्ये पाहायला मिळाली. लहान लहान टेकड्या, खाली हिरवळ आणि शिखरावर बर्फ असे बराच वेळ दिसल्यावर मग बर्फ वाढत गेला. थोड्याच वेळात हिरवळ पूर्ण नाहीशी होऊन बर्फाने जमीन, पर्वत, शिखरे सगळेच व्यापून टाकले. इतका प्रचंड मोठा बर्फाच्छादित परिसर मी पहिल्यांदाच पाहिला. ते होते ग्रीनलंड आणि आईसलंड. आर्क्टिक समुद्र दिसला. पुस्तकातली पात्रे जिवंत होऊन समोर यावीत तसेच मला ही नकाशातील नावे प्रत्यक्ष बघताना वाटत होते. 




बर्फ संपला आणि पाणी दिसायला लागले. त्या पाण्यात अनेक लहान लहान वर्तुळाकार बेटे. फारच सुंदर दृश्य होते ते. कमळाची पाने तरंगत असावीत तसेच वरून पाहताना वाटत होते. समोर स्क्रीनवर मी पूर्णवेळ लाईव्ह फ्लाईट लोकेशन लावून ठेवली होती. त्यामुळे त्यातल्याच काही बेटांचे नाव कोरल आयलंड होते तेही कळले. 

घरातून निघाल्या पासून चोवीस तास झालेच होते आणि तरीही दिवस मावळला नव्हता! सतत सूर्य सोबत असणे फार आनंदाचे होते.






Salt Lake City जवळ विमान आले. आता पुढच्या विमानाला आम्हाला अर्धा तासच उरणार होता. आमचे सामान डायरेक्ट सान फ्रान्सिस्कोला येणार असल्याने त्यात वेळ जाणार नव्हता. फक्त international flight मधून डोमेस्टिक फ्लाईटला जाण्यासाठी इमिग्रेशन करून पळत सुटायचे होते. 

आम्ही तसे फ्लाईट क्रुला सांगितलेले होते. विमान थांबले, सीट बेल्ट सोडू शकता ची घोषणा झाली की लगेच दाराजवळ या असे त्यांनी सांगितले. दाराशी एक ऑफिसर असेल, तो तुम्हाला पुढच्या फ्लाईट साठी मार्गदर्शन करेल असेही सांगितले. आम्ही आश्वस्त झालो. 

पण थोड्याच वेळात कॅप्टन सांगायला आल्या की साल्ट लेक सिटी विमानतळावर आम्हाला सामान ताब्यात घ्यायला लागेल आणि मग पुढच्या विमानात परत चेक इन करायला लागेल! अर्थातच आता पुढचे विमान मिळायची शक्यता मावळत चालली होती.

तरी आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. सगळ्यांच्या आधी अगदी 'पयला माझा नंबर' च्या आवेशात विमानातून उतरलो आणि पळत सुटलो. इमिग्रशन साठी मोठी रांग. त्यात लगेच दुसरे विमान असलेल्यांसाठी काही वेगळी रांग नाही. तेव्हाच आमचे पुढचे विमान चुकले हे निश्चित कळले आम्हाला. 


 इमिग्रेशन झाल्यावर सामान येण्याची वाट पाहत आम्ही बेल्टशी उभे होतो. खूप वेळ सामान आले नाही. अनेक शक्यता होत्या. त्यात सामान विमानात भरलेच न जाणे किंवा मग सामान सान फ्रान्सिस्को ला गेले असणे ह्या फारच उत्कंठा वर्धक शक्यता होत्याच. पण आमची उत्सुकता आणि नव्या साहसाचा सामना करायची संधी आमच्याकडून हिरावून घेऊन अखेर उशिरा का होईना पण आमची एक बॅग दिसली!! आता एक आली म्हणजे यथावकाश बाकीच्या पण येतील अशी आशा निर्माण झाली. एकेक करत सगळे सामान आले. 


ज्या KLM ने आम्ही प्रवास करत होतो त्यांचे तर काऊंटर नव्हते salt Lake City ला पण त्यांची पार्टनर असलेली डेल्टा एअर लाइन्स चे होते. लगोलग आम्ही त्यांच्या काऊंटर वर गेलो. 

तिथला डेल्टाचा स्टाफ खूप चांगला होता. त्यांनी आमच्या साठी सगळे प्रयत्न केले. त्यांनाही ही व्यवस्था करायला दोन तास लागले. तोपर्यंत आम्ही काऊंटरवर वाट पाहत उभे! तिथे इतका वेळ उभे राहून तिथली व्यवस्था इतकी ओळखीची झाली की नव्या येणाऱ्यांना तुमचे काऊंटर इकडे आहे..आता तिकडे जा असे फुकटात मार्गदर्शन करायला पण मी सुरुवात केली!! 


दोन तासांनी त्यांनी आम्हाला तिकिटे दिली. आता तिकीट घेतले आम्ही Salt Lake City ते San Jose. फ्लाईट ला वेळ थोडा होता. गेट पर्यंत पोचायला तुम्हाला इथून अर्धा तास चालायला लागेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही घाईने सिक्युरिटीसाठी गेलो. डोमेस्टिक प्रवास असल्याने आता फार वेळ लागणार नव्हताच. आम्हाला फ्लाईट नक्की मिळणार होती. सिक्युरिटीसाठी इथेही मोठी रांग. पण ती पटपट पुढे सरकत होती. आमचा नंबर आला आणि आमच्या आनंदात भर पडली. तिकिटे देताना काहीतरी गोंधळ झाला होता आणि त्यामुळे आमची तिकिटे आम्हाला परत तिकीट काऊंटर वर जाऊन बदलून घ्यायला लागणार होती!!

परत आम्ही तिकीट काऊंटर वर!! बहुतेक त्यांच्याकडून आमच्या ट्रॅव्हल documents चे नंबर उलट सुलट पडले होते. ते लगोलग दुरुस्त करून, नवी तिकिटे घेऊन तो ऑफिसर स्वतः आम्हाला सोडायला आला. तो सोबत असल्याने आम्हाला पुन्हा रांगेत उभे राहावे लागले नाही. सिक्युरिटी चेक झाल्यावर आता गेट कडे जाणे इतकेच काम उरले होते. पण गेट लांब आणि बोर्डिंग टाईम झाला होता. त्या दिवशी Salt Lake City विमानतळावर पांढऱ्या केसांच्या एक बाई पळताना दिसल्या अनेकांना त्या कोण असतील हे तुम्ही ओळखलेच असेल. 

गेट वर बोर्डिंग सुरू झालेले होते पण संपले नव्हते! ना आरंभ..ना अंत.. अशा संधिवेळेला आम्ही गेटवर जाऊन पोचलो!! विमानात बसलो. 




San Jose ला पोचतानाचा हा फोटो. अजूनही २६ जून च आहे. रात्रीचे ११. ३९ झाले आहेत. पण आता अवघ्या काही मिनिटात हा दिवस आणि प्रवास दोन्ही संपणार आहे, चित्तथरारक का काय म्हणतात तसा दिवस आणि प्रवास संपणार आहे ह्या विचाराने हायसे वाटले होते.


ह्या सगळ्या अनुभवातून खूप शिकता आले. अनेक लोकांना पाहता आले. त्यांच्या अडचणी समजल्या. स्वतः च्या मनाच्या स्थिरतेची, खंबीरतेची, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची परीक्षा करता आली. अतिशय सुंदर दृश्ये विमानातून पाहता आली. विमानतळावर अतिशय अव्यवस्था पाहिली. तसेच खूप चांगले, मदत करणारे लोकही पाहिले. 

 घरी मुलांचा मात्र पूर्ण दिवस सगळ्या एअरलाईंनना फोन करण्यात, जे फोन लागतच नव्हते ते करण्यात, तणावात गेला. आम्हाला हॉटेलवर उतरायचे असेल तर reservations कोणती करता येतील, आम्हाला connecting flights कोणत्या असतील, आम्हाला Salt Lake City हून येणारे विमान मिळाले नाही तर काय करायला लागेल असे वेगवेगळे विचार आणि योजना त्यांनी करून ठेवल्या. 


एकूणच अतिशय अविस्मरणीय प्रवास झाला. एक दिवस, एकाच दिवसातले 36 तास प्रवास, 16000 किलोमीटर, 5 फ्लाईटस, 3 उशीर झालेल्या फ्लाईटस, दोन चुकलेल्या फ्लाईटस पण शेवटी तीन विमानांनी प्रवास करून!


लक्षात ठेवण्याच्या गोष्टी 

१. केबिन बॅग मध्ये कपड्यांचा एक तरी संपूर्ण सेट हवा. फ्लाईट्स डिले, सामान आलेले नाही असे काही झाले तर उपयोगी पडतो हा केबिन बॅग मधला सेट. 

२. प्रवासाचा विमा काढताना त्यात फ्लाईट डिले, लॉस्ट बॅगेज किंवा मिस्प्लेसड बॅगेज असे सगळे समाविष्ट आहे की नाही ते अवश्य बघून घ्या. 

३. केबिन बॅग मध्ये खाण्याचे काही पदार्थ अवश्य असू द्या. 

४. ज्या देशात विमान बदलणार आहात त्या देशाची थोडी करन्सी किंवा मग अमेरिकन डॉलर्स सोबत असू द्या. 

५. फोन पूर्ण चार्ज केलेला हवा. विमानात चार्ज करायचे लक्षात ठेवा. 


# KLM Airlines # Schiphol #Amsterdam # Delta #FlightDelay # Travel 



Comments

  1. खूप सकारात्मक लिहिले आहे. अतिशय वाचनीय लेख.

    ReplyDelete
  2. Beautifully expressed and captured every moment. You made me to recall my US trip which also took 42 hours and changing of 4 flights.

    ReplyDelete
  3. खरं तर मजा आली वाचतांना....हे सगळं लिहितांना तुलाही मजाच आली असेल.............तेव्हां मात्र काय अवस्था झाली असेल, कल्पना येते. शेवटच्या टिप्स महत्वाच्या..लक्षात ठेवू.

    ReplyDelete
  4. मनातल्या मनात भयंकर धावपळ आणि दमछाक झाली वाचताना ... पण मजा आली

    ReplyDelete
  5. वृंदा कसलेही वर्णन करण्याची तुझी एक विशिष्ट शैली आहे की ती गोष्ट किंवा तो प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो....खूप छान.... विमान चुकले, पोचायला उशीर झाल्याने करायला लागणारी धावपळ, इमिग्रेशन साठी लांबच लांब रांग, त्यात पुढचे विमान चुकेल का ही धाकधुक सर्व आपणच अनुभवत आहोत, असे वाटले इतकी तुझी भाषा छान आहे !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...