रॉयल पॅलेस
अंगकोर थम च्या रॉयल स्क्वेअर मध्ये रॉयल पॅलेस आहे. ११व्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत वापरात असणाऱ्या ह्या राजवाड्यातले आज मात्र फार काही शिल्लक नाही. किंबहुना काहीच शिल्लक नाही म्हटले तरी चालेल.
त्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या वास्तू माणसांसाठी बांधलेल्या आहेत, त्या लाकूड आणि इतर नाशिवंत गोष्टी वापरून बांधायची पद्धत होती असे दिसते. जे मंदिर असेल, धार्मिक पूजा, उपासने साठी बांधलेली वास्तू असेल, तीच दगडाने बांधायची पद्धत असावी. त्यामुळे मंदिरे सगळी अजूनही टिकली आहेत तर निवासी वास्तू , स्थाने मात्र एकही दिसत नाही.
रॉयल पॅलेस मधील काही गोपुरे, एखाद दुसरे प्रवेशद्वार आणि दोन तळी आहेत अजून.
पण त्या परिसरातल्या बाकी अनेक गोष्टी, अनेक वास्तू, अनेक बांधकामे अजूनही बघायला मिळतात. अनेक शतकांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी बांधल्या गेलेल्या त्या वास्तू आज आपण बघणार आहोत.
टेरेस ऑफ लेपर किंग
टेरेस चे काय करावे बरे मराठीत भाषांतर? ती काही गच्ची नाही. चौथरा किंवा ओटा आहे. असो. टेरेसच राहू दे!
कोण हा लेपर किंग? महारोगी, कुष्ठरोगी राजा? इतिहासाला नक्की ज्ञात नाही. कोणी म्हणतात की जयवर्मन सप्तम, कोणी म्हणतात यशोवर्मन प्रथम. कोणी कोणी तर म्हणतात की कुबेराला समर्पित असलेला हा टेरेस आहे आणि कुबेर महारोगी होता. ही तर अगदी वेगळीच माहिती होती माझ्यासाठी. असा कुठे संदर्भ मिळतो आहे ह्याचा शोध घेतला. पण कुठेच कुबेराला कुष्ठरोग झाला होता असा उल्लेख सापडला नाही.
कुबेर ह्या शब्दाचा संस्कृत मध्ये एक अर्थ बेढब, बेडौल, कुरूप असा होतो हे मात्र सापडले. आता असे वाटते आहे की त्यामुळेच, ह्या अर्थामुळे झालेला कदाचित भाषांतराचा गोंधळ असावा.
कोणी म्हणतात मृत्युदेवता यमासाठीचा आहे हा टेरेस. ती मूर्ती नंतर काही कारणाने अशी खराब झाली की महारोगी माणसासारखी दिसू लागली म्हणून लेपर किंग टेरेस नाव पडले.
कारण काहीही असो ह्या जागेला लेपर - महारोगी राजाचा टेरेस म्हणतात हे नक्की.
एक कथा बयोनच्या भिंतीवरील शिल्पांत होती. एक राजा सर्पाशी युद्ध करतो आहे. सर्पाचे विष त्याच्या उघड्या हातांना लागते आहे. नंतर तो राजा एका स्त्रीकडून आपले हात तपासून घेतो आहे. त्या नंतर तो राजा अंथरुणावर आजारी पडलेला दाखवला आहे. हे महारोगी राजाचे शल्प म्हणून तिथे दाखवले जाते.
दंतकथेवरुन शिल्प कोरले गेले की शिल्पावरून दंतकथा प्रचलित झाली, माहिती नाही. मात्र त्या टेरेसवर संपूर्ण कंबोडियातील मंदिरातील शिल्पांत कुठेच दिसत नाही अशी एक मूर्ती आपल्याला दिसते. एक अनावृत्त माणूस गुडघ्यावर हात ठेवून बसलेला आहे. त्याचा उजवा हात, हाताची बोटे झडल्यासारखी दिसत आहेत. आता ती मुळातच होती की नंतर पडझड, तोडफोड झाल्याने तशी झाली माहिती नाही.
त्याच्याकडे पाहताना वाटते, मूळ मूर्तीच्या हातात काहीतरी धरलेले होते. कालांतराने ते तुटले आणि हात असा दिसू लागला.
ही मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. मूळ मूर्ती कंबोडियाचे राजधानी नॉम पेन येथे संग्रहालयात आहे.
ह्या मूर्तीची रोज पूजा होते आहे असे दिसते. आम्ही गेलो डिसेंबर २०१२ मध्ये तेव्हा मूर्तीच्या समोर कोणीतरी उदबत्त्या लावून गेले होते.
ह्या मूर्तीखेरीज बाकी संपूर्ण टेरेस जवळपास रिकामाच आहे. कोणी म्हणतात की राजघराण्यातील लोकांच्या अंतिम संस्कारांची ही जागा होती.
पण जे लोक एवढीच मूर्ती बघून परत जातील ते खूप मोठी चूक करतील. खरे बघण्याजोगे दृश्य तर ह्या टेरेस च्या खाली आहे.
आपण उतरलो की एकाच्या आत एक अशा दोन भिंती आहेत. बाहेरची भिंत कोरी आहे. त्यावर काही शिल्पे नाहीत. दोन भिंतीच्या मध्ये इतकी जागा आहे की आपण सहज त्यातून फिरू शकतो.
टेरेसच्या आतल्या भिंतींवर भरगच्च शिल्पे कोरलेली आपल्याला दिसतील. अनेक आकृती, अगदी ठसठशीत एकापुढे एक ओळीत कोरलेल्या आहेत.
त्यात काही कथा, काही प्रसंग कोरलेले असतीलही कदाचित. पण पाहताना तसे जाणवत नाही.
इतक्या आकृती कोरलेल्या आहेत, त्यातील काही देवता आहेत, काही दानव आहेत. काही अप्सरा आहेत. प्रत्येक आकृतीत वैविध्य आहे. चेहऱ्यावरचे भाव, अंगावरचे दागिने, बसण्याची पद्धत सर्वच वेगवेगळे आहे.
इथेच एका शिल्पात आपल्याला नऊ फण्यांचा नाग कोरलेला दिसतो. अतिशय रेखीव आहे ते शिल्प.
कंबोडियातील बाकी शिल्पांपेक्षा ही शिल्पे वेगळी वाटतात ती त्यांच्या खोलीमुळे. भिंतीपासून ते शिल्प किती पुढे आलेले आहे ते आपण पाहू शकता. असे दिसते आहे कारण त्या शिल्पांची लांबी रुंदी विशेष जास्त नसली तरी खोली मात्र जास्त आहे.
त्यानंतर अगदी जवळच असा दुसरा चौथरा आपल्याला दिसतो. त्याचे नाव आहे एलिफन्ट टेरेस.
एलिफन्ट टेरेस.
हा भव्य असा चौथरा म्हणजे एका राजेशाही सभागृहाचा पाया आहे. त्या चौथऱ्याचे पाच भाग आहेत. मधल्या भागात गरुड आणि सिंह आहेत. ती राजाची बसण्याची जागा होती. तिथे बसून राजा सैनिकांच्या विजयी मिरवणुकांचे स्वागत करायचा. विविध खेळांच्या स्पर्धा बघायचा. काही विशेष प्रसंगी तिथेच दरबार भरायचा.
उरलेल्या चार भागांवर हत्तीच्या मिरवणूका आणि विविध शिल्पे कोरलेली आहेत. मिरवणुकांमध्ये अलंकारांनी शृंगारलेले हत्ती माहुतांसकट असलेले आपल्याला दिसतात. इतर शिल्पांत जंगली हत्तीची शिकार कशी करतात ते प्रसंग दाखवलेले आहेत. ह्या सर्व हत्तीच्या शिल्पांमुळेच ह्या टेरेसचे नाव एलिफन्ट टेरेस असे पडले आहे.
इतर शिल्पांमध्ये काही अप्सरा आणि देवता देखील आपल्याला दिसतात.
प्रासात फीमेनकास
हे त्याच परिसरातले एक महत्वाचे मंदिर. इथे नावात आकास - आकाश आहे आणि अर्थ देखील स्वर्गीय मंदिर असाच आहे. रॉयल पॅलेस कंपाउंडच्या मध्यभागी हे लहानसे मंदिर आहे. दहाव्या शतकात बांधले गेलेले हे हिंदू मंदिर आहे. पायऱ्यांना उभा चढ आहे. अरुंद पायऱ्या चढून आपण वर पोचतो. इतक्या उंचावर पोचल्यावर नक्कीच आकाशात गेल्यासारखी अनुभूती येते!
तीन थरांवर पिरॅमिडसारखी रचना असलेले हे मंदिर आहे. असे म्हणतात आणि त्या काळी कंबोडियात येऊन गेलेल्या चिनी प्रवाशाने पण लिहून ठेवले आहे की ह्याचा कळस सोन्याचा होता.
ह्या मंदिराविषयी एक अनोखी आख्यायिका ऐकायला मिळाली. नागांना ह्या प्रदेशाचे मूळ रहिवासी आणि राजे मानले जाते. असे म्हणतात की त्या त्या वेळच्या ख्मेर राजाला रोज रात्री पहिल्या प्रहरात नाग अधिपतीला भेटायला ह्या मंदिरात यावेच लागत असे. नाग अधिपती एका महिलेच्या रूपात असे. त्या भेटीच्या वेळी दुसऱ्या कोणालाही तिथे यायला अनुमती नव्हती. मंत्री तर नाहीच पण राजाची राणी देखील तिथे असून चालत नसे. समजा राजाशिवाय आणखी कोणी तिथे आले किंवा जर का राजा एखादे दिवशी नाग अधिपतीच्या भेटीला गेलाच नाही तर राजासाठी मृत्यू आणि त्याच्या देशावर संकट ओढवणार हे नक्की.
रामायण महाभारत काळापासून अशा अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे ह्या कथेचे तितकेसे आश्चर्य वाटले नाही.
ह्या मंदिराची गोपुरे आता भग्नावस्थेत आहेत. त्यावरचे कोरीवकाम कधीकाळी सुंदर असेलही, पण आत्ता दिसत नाही.
View of Preah Pithu Temples from
Royal Palace Compound
ह्याच परिसरात अजून कितीतरी मंदिरे आहेत, जवळपास सगळी भग्नावस्थेत आहेत. त्यावर फार लक्षवेधक कोरीवकाम देखील नाही. त्यामुळेच कदाचित त्यांच्या जीर्णोद्धाराकडे कोणाचे लक्ष गेले नसावे.
प्रे रुप
दहाव्या शतकात बांधले गेलेले हे हिंदू मंदिर अतिशय भव्य आहे. पाच गोपुरे असलेले असे हे मंदिर आहे. मध्यभागी राजभद्रेश्वर ह्या नावाने शिवलिंग विराजमान होते. राजेंद्रवर्मन ह्या राजाचे हे राज मंदिर असल्याने त्याच्या नावाने शिवलिंग असणे त्या काळाच्या तेथील प्रथेला धरून होते. दुसऱ्या गोपुरात राजाच्या रूपात शंकर होता. तिसऱ्या मध्ये विष्णू होता. एकाच ठिकाणी शंकर आणि विष्णू असणे इतकेच ह्या मंदिराचे वैशिष्ट्य नाही तर उर्वरित दोन गोपुरांमध्ये उमा आणि लक्ष्मी देखील विराजमान होत्या.
आम्ही डिसेंबर २०१२ मध्ये ह्या मंदिरात गेलो होतो तेव्हा मात्र ह्या पाचपैकी एक देखील गोपुर आणि मंदिर उघडे नव्हते. त्यामुळे आत अजून देखील त्या मूर्ती आहेत का नाहीत ते पाहता आले नाही.
मंदिराची उंची भरपूर आहे. असे म्हणतात की वरील फोटोत जमिनीवर जीं आयताकृती दिसते आहे ते राजघराण्यातील अंत्य संस्कारांसाठी केलेली जागा आहे. काही इतिहास तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मात्र हे शंकराचे मंदिर असल्याने तिथे पूर्वी नंदी असणार. आता नंदी गेला आहे मात्र त्याचा पाया राहिला आहे.
मंदिराच्या परिसरात अनेक घुमटाकार इमारती आहेत. त्याखेरीज देखील वेगवेगळ्या आकाराच्या अनेक इमारती आहेत. अनेक शतकांत अनेक राजांनी मूळ मंदिराच्या रचनेत भर घातली. त्यामुळे सगळ्या इमारतींचे वय वेगवेगळे आहे. स्थिती मात्र एकसारखीच आहे ती म्हणजे भग्नावस्था.
बापून
अंगकोर थम परिसरातील आणखी एक आणि आजच्या ह्या पोस्टमधील शेवटचे मंदिर आहे बाफून किंवा बापून. ११ व्या शतकात बांधले गेलेले हे शिवमंदिर. ज्या ठिकाणी उभे आहे ती जमीन अस्थिर आहे असे म्हणतात. त्यामुळे ते अनेकदा डळमळले आहे. नंतर एका राजाने तिथून शंकर काढून बुद्ध मूर्ती बसवण्यासाठी अजून काही मोडतोड केली.
आता २०११ मध्ये त्याचा जीर्णोद्धार पूर्ण होऊन उदघाटन झाले. पण डिसेंबर २०१२ मध्ये आम्ही गेलो त्या दिवशी काही कारणाने ते बंद होते. त्यामुळे आतून बघता आले नाही. केवळ बाहेरून पाहून समाधान मानायला लागले. वरच्या मजल्यांवर प्राण्यांची शिल्पे आहेत असे म्हणतात. मात्र त्या साठी भरपूर पायऱ्या चढायची आणि चालायची तयारी हवी.
कंबोडियातील सियाम रीप जवळील अंगकोर थम आणि रॉयल पॅलेस कंपाउंडची फेरी आज आपण पूर्ण केली.
कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव.
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_16.html
४. बयोन चेहरे- एक रहस्य
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_19.html
५.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html
#angkorwatcambodia #angkorthom # terraceoflaperking #terraceofelephants #Prerup #angkorwat #angkorwattemple #cambodia #angkor #siemreap #angkorwatsunrise #angkortemple #angkorthom #angkorwatt #angkorwattour #angkortemples #siemreapcambodia #explorecambodia #siemreaptrip #bayontemple #taprohm #cambodiatravel #cambodiatrip #taprohmtemple #bayon #banteaysrei #angkorwattemples #siemrep #travelphotography
Comments
Post a Comment