कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून? ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर पाहणार आहोत. दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही इथले वातावरण फार सुखद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे 'कड्यावरचा गणपती.' पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता. आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...