कोस्टल कर्नाटक ६ - शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक - होनावरचा अविस्मरणीय अनुभव
मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये. शरावती बॅकवॉटर बोटिंग दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास.. तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते. आम्ही गेलो त्या दिवशी,...