आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो. हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते. नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली. असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट...
Comments
Post a Comment