अंगकोरवाट आणि बाकी मंदिरे पाहून झाल्यावर सियाम रीपहुन एक बोट राईड अवश्य घ्यायला हवी.
तसेही कंबोडियात सगळीकडे पाण्याच्या कालव्यांचे जाळे असल्याने सगळीकडे पाणी दिसतच राहते.
पाण्याच्या तलावात कमळे तर आहेतच!
इथल्या मुलांसाठी दुसऱ्या देशातील लोकांनी सुरु केलेल्या तरंगत्या शाळा, धर्मस्थाने देखील पाहायला मिळतात.
तिथली मुले काहीतरी स्टंट दाखवून पैसे मागत असतात. मग ते उंचावरून उड्या मारणे असेल, सापाबरोबर एका टोपलीत बसणे असेल. हे सगळे पाहून मन अस्वस्थ होते हे नक्की.
आपण गेल्या काही पोस्ट्स मधून कंबोडियातील अनेक ठिकाणे पाहिली. ह्यात नाही आले असे महत्वाचे ठिकाण म्हणजे माउंट कुलेन. तुम्ही जाल तेव्हा ते अवश्य पहा.
कुलेन हा सुंदर धबधबा. त्याचे पाणी इतके शुद्ध की कंबोडियातील पाण्याच्या बाटल्या तयार करणाऱ्या कंपनीचे तेच नाव आहे. त्या प्रवाहात अनेक कोरलेली शिवलिंगे, शेषशायी विष्णू हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे असेल. आम्ही गेलो होतो तेव्हा वेळाच्या अभावी आमचे पाहायचे राहिले ते. अंगकोरवाट पासून साधारण २५ / ३० किलोमीटर अंतरावर असलेला हा पर्वत. आता गाडी अगदी वरपर्यंत जाते म्हणतात. तरीदेखील प्रत्यक्ष जाल तेव्हा त्या वेळची परिस्थिती कशी आहे ती चौकशी करून जा. आम्ही गेलो तेव्हा काय कारण होते माहिती नाही, पण गाडी वरपर्यंत जात नव्हती.
कंबोडिया म्हणजे फक्त अंगकोरवाट? कंबोडिया म्हणजे फक्त जुनी मंदिरे? कंबोडिया म्हणजे फक्त टोनले सॅप आणि मेकाँग?
हे सर्व असूनदेखील ह्या खेरीज कंबोडिया खूप काही उरतोच.
कंबोडिया म्हणजे अप्सरा नृत्य. मोठ्या कंपन्या तर आहेत. पण गरजू लोक त्या नृत्य नाट्यातले पोशाख घालून सर्व मंदिरांच्या बाहेर उभे असतात. त्यांच्याबरोबर तुम्ही फोटो काढून घ्यावे आणि त्यांना पैसे द्यावे म्हणून.
मंदिरावर वाढणारी झाडे काढत राहणे हा बहुतेक तिथे सतत करावा लागणार उद्योग असणार. हा माणूस असाच साधारण तीस फुटांवर चढलेला आहे. कुठेही संरक्षक दोरी बांधलेली नाही.
रस्त्यावरचे दुकान |
कोविड मुळे पर्यटन बंद असताना अंगकोरवाट ची व्यवस्था पाहणाऱ्या कोणालाही कामावरून कमी केले गेले नाही ही फार आश्वासक गोष्ट वाटते. त्यांना त्या वेळात मंदिरांच्या दुरुस्त्या करता आल्या. एरवी सतत पर्यटक येतजात असल्याने त्या दुरुस्त्या करायला वेळ आणि जागा मिळत नाही. व्हील चेयर जाईल असे रस्ते करण्याचा प्रयत्न एखाददोन ठिकाणी तरी झाला आहे असे वाचले.
कंबोडियाने स्थैर्य अनुभवले तसेच अत्यंत वादळी कालखंड देखील अनुभवला. अशांतीचा कालखंड देशाच्या परिस्थितीवर खूपच वाईट परिणाम करून गेला आहे. एकेकाळची समृद्धी नाहीशी झाली आहे. परकीय आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागत आहे.
युद्धकाळातले जमिनीतले बॉम्ब अजूनही फुटत असतात. रानात चरणाऱ्या जनावरांचे, शेत नागरणाऱ्या शेतकऱ्यांचे जीव घेत असतात. इतकेच काय मेकाँग नदीत बुडवली गेलेली दारुगोळ्याने भरलेली जी जहाजे होती, त्यातील दारुगोळा वर काढण्याचे काम अजून चालू आहे. पाण्यात वर्षानुवर्षे विषारी घटक पदार्थ विरघळले गेले असण्याचे दुष्परिणाम लोक भोगत आहेत.
अशा अवचित फुटणाऱ्या बॉम्बमुळे जीव गेलेले तर असंख्य आहेतच पण अपंग झालेले देखील अनेक जण आहेत. ते मग जमतील ते वेगवेगळे उद्योग करायचा प्रयत्न करतात. पर्यटन स्थळाबाहेर वाद्यवृंद तयार करून, संगीत ऐकवून पर्यटकांकडून पैसे मिळवणे हे अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
कंबोडियात चीनची आर्थिक तसेच इतरही गुंतवणूक वाढते आहे. ह्या संपूर्ण प्रदेशातच चीनला आपले वर्चस्व स्थापित करायचे असावे. गुन्हेगारीत देखील वाढ होते आहे.
पुरातन मूर्तींची वर्षानुवर्षे झालेली तस्करी हा तर मोठाच विषय आहे. अनेक मंदिरे जंगलाने वेढली गेली असल्याने तस्करांचे फावले. तस्करांनी एका रात्रीचे १२ डॉलर असा पगार देऊन शेजारी देशातील लोकांना कामाला ठेवले. काम काय? तर कंबोडियामधील मंदिरातील मूर्ती तोडून चोरून आणणे. अशा हजारो मूर्ती अगदी आत्ता आत्तापर्यंत चोरल्या गेल्या. कंबोडियातून बाकी जगभरात पाठवल्या गेल्या. आता त्या परत कंबोडियात याव्यात ह्या साठी कंबोडियाचे प्रयत्न चालू आहेत. नुकतेच ब्रिटिश सरकारला पत्र पाठवले गेले आहे की तुमच्या म्युझियम्स मधील कंबोडियातील / ख्मेर मूर्ती अधिकृतरीत्या तिथे आल्या आहेत का हे तपासून पहा. ज्या नसतील त्या कंबोडियाला परत करा. जगभरातून काही मूर्ती परत मिळाल्या देखील. आशा आहे की बाकी मूर्तीदेखील स्वस्थळी पोचतील.
कंबोडियाला एकदा जाऊन आलात की तुम्ही विसरू शकत नाही कंबोडिया हे नक्की.
-------------------------------------------------------------
Ref
https://english.cambodiadaily.com/lifestyle/from-angkor-to-london-cambodia-tries-to-recover-its-looted-treasures-178969/
https://www.straitstimes.com/asia/asian-insider-podcast-how-chinese-money-transformed-cambodian-coastal-town-sihanoukville
https://www.phnompenhpost.com/national/efforts-ongoing-rid-kingdoms-rivers-wartime-curse
-------------------------------------------------
Comments
Post a Comment