अंगकोर थम
अंगकोर थम, ख्मेर राजघराण्याची शेवटची राजधानी. राजा जयवर्मन सप्तम ह्याने वसवलेली राजधानीची नगरी. अंगकोर म्हणजे नगर ( संस्कृत ) आणि थम - मोठा, प्रचंड, महान ( ख्मेर ). राजधानीला साजेसे नाव आहे हे.
कंबोडियातील अंगकोरवाट मंदिरापासून पावणेदोन- दोन किलोमीटर अंतरावर आणि सियाम रीप पासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेली अंगकोर थम नगरी बाराव्या शतकात वसवली गेली. सोळाव्या शतकापर्यंत इथे मानवी वस्ती होती. नंतर काही शतके ती नगरी अंधारात राहिली. लोक ही नगरी का सोडून गेले ते नक्की कारण इतिहासाला ज्ञात नाही. लागोपाठ अतिवृष्टी आणि दुष्काळ, त्यामुळे झालेली वाताहत असे त्या मागचे कारण असू शकेल असे म्हणतात.
ह्या पूर्ण शहराच्या चारी बाजूना तटबंदी आहे. त्याच्या बाहेर पाण्याने भरलेले खंदक आहेत. तटबंदीला चारी दिशांना महाद्वारे आहेत. त्या प्रत्येकावर तीन चेहरे दिसतात. पूर्वी कदाचित चौथ्या बाजूला पण चेहरा असेल. हे चेहरे आहेत सुप्रसिद्ध बयोन मंदिरात असलेल्या चेहर्यांसारखे. अंगकोरवाट म्हटले की तीन फोटो डोळ्यांपुढे येतात. एक म्हणजे अंगकोरवाट मंदिराच्या शिखरांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, दुसरे म्हणजे ता प्रोह्म मंदिरातले झाड आणि तिसरे हे बयोनचे चेहरे.
पूर्वी इथे उघड बंद करता येतील असे लाकडी दरवाजे देखील होते. त्याच्या खुणा आपल्याला दिसतात. चारी दिशांच्या तटबंदीला असलेल्या चार महाद्वारांशिवाय आणखी एक महाद्वार पूर्वेला आहे. त्याचे नाव आहे विजय द्वार - व्हिक्टरी गेट.
|
Victory Gate |
समुद्रमंथन
पाण्याने भरलेले खंदक आहेत. जवळच एक नदी आहे. ते पाणी ख्मेर परंपरेनुसार क्षीरसमुद्र दर्शवते आहे. समुद्रमंथन करणारे देव आणि दानव आपल्याला महाद्वाराकडे जाणाऱ्या पुलावर दिसतात. एका बाजूला ५४ आणि दुसऱ्या बाजूला ५४. हिंदू तत्वज्ञानातील १०८ ह्या संख्येचे महत्व जाणून हे ५४/५४ पुतळे केलेले आहेत. आज मात्र ते खंडित अवस्थेत आहेत.
तटबंदीच्या काही भागावर नक्षी कोरलेली असणार. पण आज मात्र काळाने तिथे आपली पावले उमटवली आहेत. ती नक्षी फारच क्वचित दिसते आहे. साधारण १० ते १२ किलोमीटर लांबीची ही तटबंदी होती. उंची साधारण आठ नऊ मीटर. एखाद्या किल्ल्यात प्रवेश करतो आहोत असेच काहीसे ह्या दारातून आत जाताना वाटते. अंगकोरथम त्या काळची राजधानी असल्यामुळे संपूर्ण नगराला तटबंदी असणे संयुक्तिक वाटते.
अंगकोरवाट पुरातत्व संकुलातील फारच कमी ठिकाणे अशी आहेत की जी मंदिरे नाही आहेत. एक संपूर्ण नगरी असलेले तर अंगकोर थम हे एकमेव ठिकाण.
क्षीरसमुद्र झाला, समुद्र मंथन झाले, आता ख्मेर परंपरेनुसार मेरू पर्वत हवाच. तो ही आहे. मेरू पर्वत म्हणून बयोन मंदिरे ह्या अंगकोर थम च्या अगदी मध्यभागी, केंद्रस्थानी आहेत.
बयोन
बयोन मंदिरे ही जयवर्मन सप्तम ने बांधलेली राज मंदिरे आहेत. त्यांचे मूळ नाव होते जयगिरी किंवा ब्रह्म गिरी.
अनेक शतके जगाच्या नजरेपासून दूर राहिल्यावर जेव्हा जयगिरी लोकांना सापडले तेव्हा तिथे म्हणे वडाची झाडे वाढलेली होती. बुद्धाचा आणि banyan trees चा संबंध लावला गेला. पण स्थानिक लोक banyan trees ना बयॊन म्हणत असत म्हणून मग मंदिराचे नाव बयोन झाले अशी कथा सांगितली जाते. ती फारच ओढून ताणून नावाशी आणून जोडलेली अशी वाटते.
आता म्हणजे २०१२ च्या डिसेम्बरमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा लांबून पाहताना नुसते कसले तरी ढिगारे मध्यभागी आहेत असे दिसत होते. आधी पाहिलेल्या कोणत्याही मंदिर रचनेतील रेखीवपणा इथे दिसत नव्हता.
जसे आपण जवळ जातो तशी त्याची रचना स्पष्ट होऊ लागते. बाहेर दोन चौकोनी प्राकार आहेत. त्यांच्या आत बयोनचे सुप्रसिद्ध चेहरे असलेली गोपुरे आहेत.
बाहेरचे दोन चौकोनी प्राकार, सज्जांनी वेढलेले आहेत.
त्यांच्या भिंतीवर अनेक देखावे कोरलेले आहेत. बाहेरील सज्जामध्ये जनसामान्यांचे रोजचे जीवन प्रचंड आकाराच्या भिंतीवरील शिल्पात कोरलेले दिसते. रोज ह्या नगरात काय व्यवहार होत असतील ह्याची कल्पना येते. देव, राजे, बुद्ध, ऋषी, रामायण महाभारतातील कथा असे इतर सर्व ठिकाणी दिसत असताना, मानवी जीवनाला शिल्पांत स्थान मिळालेले केवळ इथेच आपल्याला दिसते.
दुसऱ्या एका शिल्पात युद्धासाठी निघालेल्या सैन्याचे चित्र दिसते. आतल्या भिंतीवर अनेक हिंदू पौराणिक कथा आपल्याला दिसतात. काही दारे अजूनही चांगली आहेत. त्यावरचे कोरीवकाम अजूनही आकर्षक दिसते आहे. आत आपण पाहतो तर सगळीकडे मोडलेले खांब, तुटून पडलेली शिल्पे असे दृश्य दिसते. अंगकोर मधील सगळ्या मंदिरात अशा कमीतकमी दोन तरी इमारती आढळतात. त्यांना लायब्ररीज म्हणतात.
मला फार उत्सुकता होती की नक्की ह्या इमारती कशासाठी वापरत असतील. भरपूर शोधल्यावर एक उल्लेख सापडला तो असा की इथे बसून बहुतेक मंत्रोच्चरण करत असतील. काही मंदिरातील अशा इमारतींच्या भिंतीवर संस्कृतमधील काही श्लोक सापडले आहेत.
आता बाकी सगळे झाले पाहून. आपण त्या मधल्या ढिगांकडे जातो. कसले हे ढीग? मळकट रंगाचे, काही तांबूस दगड रचून ठेवल्यासारखे? जवळ जाताच आपण थक्क होतो. एक दोन नव्हे तर तब्बल चाळीसच्या वर असे मनोरे आपल्याला दिसतात. त्यावर असतात बयोन चे सुप्रसिद्ध चेहरे. प्रत्येक मनोऱ्यावर तीन किंवा चार असे.
मुळात अशी ५२ गोपुरे किंवा मनोरे होते म्हणतात. प्रत्येकावर चारीकडे बघणारे चार चेहरे.
इथे आपण जातो तेव्हा सगळीकडे चेहरेच चेहरे. सर्वांवर ते सुप्रसिद्ध अंगकोर स्मितहास्य.
हे गूढ, शांत स्मित अंगकोर स्मित म्हणून प्रसिद्ध झाले आहे. डोळे मिटलेले, चेहरा शांत, प्रसन्न असे हे चेहरे सर्वत्र दिसतात आणि आपल्याला वेगळीच अनुभूती देतात.
त्या स्मितहास्यात काहीतरी खास आहे नक्की. सर्वत्र भग्नावशेष पसरलेले असताना देखील ते स्मित आपल्याला आधार देत राहते. विश्वास देत राहते. कशाचा विश्वास? जगण्यावरचा? माणूसकीवरचा? प्रलयानंतर येणाऱ्या शांतीचा? उत्पत्ती-स्थिती-लय ह्या चक्राचा? माहिती नाही..नक्की कशाचा विश्वास ते. आपण विचार करत राहतो.
आता हे पुढचे दोन फोटो जवळपास एकाच ठिकाणाहून दिसणाऱ्या दोन वेगवेगळ्या दृश्यांचे आहेत. एकीकडे पाहिले तर आपल्याला दूर अंतरावर पण ह्याच मंदिरात बुद्ध मूर्ती दिसते आहे. त्याच ठिकाणाहून पाहिले तर दुसरीकडे शंकराची पिंड दिसते आहे.
तिथे दिसणारी शंकराची पिंड भारतीय मनाला शिवलिंग वाटत नाही ह्याची अनेक कारणे आहेत. पिंडीचा वेगळा आकार आणि त्याची पूजा झालेली नसणे ह्यामुळेही शंकराची पिंड वाटतच नाही.
चेहरे???
आता मूळ प्रश्न तसाच उरतो. हे इतके सगळे चेहरे करण्यामागचे कारण काय? हे कोणाचे चेहरे आहेत?
काही इतिहास तज्ज्ञ म्हणतात हे बुद्धाचे अवलोकितेश्वराचे चेहरे आहेत. जयवर्मन सप्तम ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. त्यामुळे त्याने बांधलेल्या राज मंदिरात बुद्धाचे चेहरे असणार.
काहीजण म्हणतात हे खुद्द राजाचे चेहरे आहेत. त्या काळी राजे स्वतःला देवराज म्हणजे देवाचा अवतार किंवा अंश मानत असत. त्याप्रमाणेच राजाने स्वतःला बुद्धाचा अंश मानून हे चेहरे करवले असतील.
कोणी म्हणतात देवाचे सर्वत्र लक्ष आहे हे सांगण्यासाठी चारी बाजूना पाहणारे चेहरे आहेत. कोणी म्हणतात की तेव्हाच्या राज्यातील लहान लहान प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे हे मनोरे आहेत. आमचे सगळीकडे लक्ष आहे असे शत्रूला सांगत आहेत.
त्या विषयी लिहिलेली अधिकृत नोंद सापडेपर्यंत बयोनचे चेहरे एक रहस्यच राहणार आहेत हे खरे. आज इतक्या शतकांनंतरही ते चेहरे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव.
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.ता प्रोह्म आणि प्रेह खान-अजब न्याय नियतीचा
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_16.html
४.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html
#angkorwatcambodia #angkorwat #angkorwattemple #cambodia #angkor #siemreap #angkorwatsunrise #angkortemple #angkorthom #angkorwatt #angkorwattour #angkortemples #siemreapcambodia #explorecambodia #siemreaptrip #bayontemple #taprohm #cambodiatravel #cambodiatrip #taprohmtemple #bayon #banteaysrei #angkorwattemples #siemrep #travelphotography
Comments
Post a Comment