जयवर्मन सप्तम
अंगकोरवाट मंदिर समूहांविषयी विचार करताना जयवर्मन सप्तमला विशेष महत्व आहे. त्याला ओलांडून पुढे जाणे अशक्य. अनेक महत्वाची मंदिरे त्याने बांधली. केवळ इतकेच नाही तर चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले.अनेक मोठी रुग्णालये आणि धर्मशाळा बांधल्या. दर १५ किलोमीटरवर एक रुग्णालय/ धर्मशाळा ही अत्यंत उपयुक्त संकल्पना त्याने बाराव्या शतकात प्रत्यक्षात आणली.
आज आपण पाहणार आहोत त्यानेच बांधलेली दोन मंदिरे..ठिकाणे वेगवेगळी. पण उद्देश एकच. तो हा की पालकांना मानवंदना देणे. त्याने आईच्या गौरवार्थ बांधलेले मंदिर आहे ता प्रोह्म आणि वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले मंदिर आहे प्रेह खान.
ता प्रोह्म
ता प्रोह्म मधील प्रोह्म म्हणजे ब्रम्हा. ब्रम्हदेव, सृष्टीचा निर्माता. बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिरात हिंदू आणि बौद्ध संकल्पनांचा संगम आढळतो. मंदिराचे मूळ नाव होते राजविहार. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी विहार, अभ्यासासाठी विद्यालय, वाचनालय इत्यादी असलेले असे हे मंदिर. राजाने स्वतःच्या आईच्या - राणी श्री जयराजचूडामणीच्या गौरवार्थ बांधलेले हे मंदिर. मंदिरात मुख्य मूर्ती होती बुद्धाची, ती प्रज्ञापरमिता नावाची.
ह्या मंदिराच्या अपार वैभवाचे वर्णन साहित्यात आणि शिलालेखांतून केलेले आढळते. तिथे राहणारे २०००० लोक आणि आजूबाजूच्या गावात राहणारे, ह्या मंदिराच्या व्यवस्थेत असणारे जवळपास ८०००० लोक होते. मंदिराच्या संपत्तीत ५०० किलो तर नुसते सोने होते. त्याखेरीज हिरे, मोती, अन्य मौल्यवान रत्ने, रेशीम हे वेगळेच.
कंबोडियातील सियामरीप जवळील अंगकोरवाट मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर वर ता प्रोह्म हे मंदिर आहे. आता सध्या हे मंदिर त्याचा जीर्णोद्धार करता येणार नाही अशा अवस्थेत आहे. मोठमोठ्या झाडांनी मंदिराच्या दगडात आपली मुळे अशा प्रकारे रुतवलेली आहेत की ती मुळे बाजूला करायची तर मंदिरच ढासळेल. झाडे वाढत आहेत, क्षणाक्षणाला मंदिराच्या भिंती कमकुवत करत आहेत.
काळाचा अजस्त्र पंजा मानवी निर्मितीला जखडून टाकत आहे, ताब्यात घेत आहे अशी काहीशी भावना ही झाडांची मुळे आणि खोडे पाहून मनात येते.
हा शेवटचा फोटो नीट पाहिलात की तुमच्या लक्षात येईल, आधी झाडाने भिंतीचा आधार घेतला. नंतर त्या भिंतीतच मुळे रोवली. आता ती महाकाय मुळे भिंतीचे दगड खिळखिळे करत त्यातून बाहेर येत आहेत.
झाड तोडावे तर त्याबरोबरच भिंत आणि ते मंदिर तुटणार हे नक्कीच. शेवटी तज्ज्ञांनी असा निर्णय घेतला आहे की आहे ह्या स्थितीत फार फेरफार करायचा नाही. ते अजून खराब होणार नाही एवढेच आपण करायचे. ह्या प्रकल्पात भारताचा मुख्य वाटा आहे.
एकेकाळी शेकडो मूर्ती, शेकडो खोल्या आणि प्रचंड मोठा विस्तार असणारे हे मंदिर आज झाडांनी व्यापलेले आहे. जंगल टेम्पल म्हणून ओळखले जात आहे. थोडे फार कोरीवकाम शिल्लक आहे. पण मंदिर आज मुख्यतः: ओळखले जाते आहे ते तिथल्या अजस्त्र झाडांमुळे. हॉलिवूड सिनेमे, कादंबऱ्या, म्युझिक अल्बम्स सगळ्यांनाच ह्या गूढ रौद्र सौंदर्याची भूल पडली आहे.
ही झाडे नक्की कोणती आहेत? काही सिल्ककॉटन ट्रीज असावीत, काही स्ट्रँगलर फिग ट्रीज असावीत, काही टेट्रामेलिस असावीत असे म्हणतात.
अनेक एकमजली इमारती, त्यांना जोडणारे लांबलचक रस्ते, अनेक प्राकार, अनेक खोल्या असे ह्या मंदिराचे स्वरूप आहे. आत्तापर्यंत ९३ लहान लहान विहार सापडले आहेत. अजून बरेच सापडतील असा अंदाज आहे.
आता बरेचसे भाग सुरक्षेच्या कारणासाठी बंदच ठेवतात. पण तरीही हे मंदिर पाहायला जाताना, कोणत्यातरी अंधाऱ्या रस्त्याने एकटे न जाता, सतत आपण गाइडबरोबर असणे योग्य ठरते.
हे सर्व फोटोज आहेत डिसेंबर २०१२ मधील. तेव्हा बरेच काम सुरु होते ह्या मंदिरात. आता कदाचित काम पूर्ण होऊन मंदिर जरा बऱ्या स्थितीत आले असेल.
फारच थोडे कोरीवकाम आणि शिल्पे आता शिल्लक राहिली आहेत. तरीही दाराच्या चौकटीवरील नक्षीकाम गतवैभवाची साक्ष देते आहे.
प्रेह खान
आज आपण पाहणार आहोत ते दुसरे मंदिर आहे 'प्रेह खान'. राजा जयवर्मन सप्तम ह्याने आपल्या वडिलांच्या, धरणींद्रवर्मन द्वितीय ह्यांच्या स्मरणार्थ बाराव्या शतकात हे मंदिर बांधले.
कंबोडियातील सियामरीप जवळील अंगकोरवाट मंदिरापासून साधारण पाच किलोमीटर वर प्रेह खान हे मंदिर आहे. हे केवळ चार-पाचशे हिंदू देवतांच्या मूर्ती असलेले मंदिरच नव्हते. तर 'ता प्रोह्म' प्रमाणेच ते मंदिर, बौद्ध विहार, भिक्षूंना शिकण्यासाठी विद्यालय, सरकारी कार्यालये, राजवाडा असे सगळे देखील होते. साहजिकच हे आकाराने अवाढव्य असलेले शहर होते. जेव्हा राजा जयवर्मनची नवी राजधानी अंगकोर थोम तयार होत होती तेव्हा काही काळासाठी प्रेह खान हीच राजधानी देखील होती. ते अत्यंत वैभवशाली शहर होते.
ह्या शहरचे मूळ संस्कृत नाव होते 'नगर श्रीजया' किंवा 'नगर जयश्री'. परकीय आक्रमकांना राजाने इथेच धूळ चारली म्हणून ह्या शहराचे नाव झाले विजय मिळवलेले शहर - नगर श्रीजया. गेली काही शतके मात्र शहराचे नाव झाले आहे 'प्रेह खान', ज्याचा अर्थ आहे पवित्र तलवार. असे म्हणतात की जयवर्मनने आपल्या वंशजांना एक तलवार दिली होती जिचे नाव जयश्री होते.
ह्या मंदिरात बोधिसत्वाची मुख्य मूर्ती होती, जिचे नाव होते जयवर्मेश्वर. पण फक्त बुद्धाचीच ह्या मंदिरातपूजा होत होती असे नाही, तर पश्चिमेला विष्णूची आणि उत्तरेला शंकराची मूर्ती देखील होती.
हा मंदिर परिसर अवाढव्य आहे. मंदिराकडे जाताना खांबांच्या ओळी दिसतात. ह्यावर विविध प्राणी कोरलेले आहेत. कोणी म्हणतात हे दिव्याचे खांब होते, कोणी म्हणतात की ही मंदिराची हद्द होती.
|
Close up!
|
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे न म्हणता, हसत हसत शतकानुशतके वरच्या खांबाचा भार आनंदाने हसत हसत उचलणाऱ्या ह्या महाशयांचा जवळून एक फोटो तर काढायलाच हवा होता. त्याशिवाय त्यांचे दागदागिने, त्यांनी केलेला नट्टापट्टा कसा लक्षात येणार?!!
हातात साप धरलेल्या गरुडाचे देखील असेच अनेक पुतळे आपल्याला मंदिराच्या बाहेर दिसतात. पण माझ्याकडे त्याचा चांगला फोटो नाही. मग एका फोटोमध्ये मागे दिसणारे, हातात साप धरलेले गरुड शोधले आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना येईल.
|
गरुड |
ह्या मूर्तीने आपल्या डाव्या हातात साप धरला आहे. सापाच्या अंगाचे डिझाईन झिजले आहे. मात्र मानेचे डिझाईन शाबूत आहे.
अंगकोर मधील सर्व मोठ्या आणि महत्वाच्या मंदिरांप्रमाणेच प्रेह खानच्या भोवती पाण्याचा कालवा असलेला खंदक आहे. पाण्यात कमळे आहेत. पाण्यावर पूल आहे. दोन्ही बाजूला विशाल आकारातले पुतळे आहेत. समुद्र मंथन करणाऱ्या देवदानवांचे बरेच पुतळे भग्नावस्थेत आहेत.
|
समुद्रमंथन |
|
समुद्रमंथन |
मंदिर परिसर अतिशयच भव्य आहे. बाराव्या शतकात त्यात लाखभर लोकांचा वावर होता, अनेक गावांचे मिळून ते बनलेले होते म्हणजे परिसर किती भव्य असेल ह्याची आपण कल्पना करू शकता. आज बऱ्याच भागात जंगल आहे.
अनेक इमारती, अनेक प्रांगणे, दोन भागांना जोडणारे आच्छादित रस्ते आहेत. तिथे हिंडायला पूर्ण दिवस तुमच्याकडे असेल तरच आपापले भटकायची जोखीम घेऊ शकाल. मर्यादित वेळात पाहायचे असेल तर आपल्या मार्गदर्शकाची साथ न सोडणे उचित होईल.
बहुतेक सर्व इमारती एक मजली आहेत. अगदी एखाद दुसरी इमारत दोन मजली आहे. त्यातली एक वाचनालय म्हणून दाखवली जाते.
|
वाचनालय |
|
गोपुर |
अशी भग्न गोपुरे अनेकदा दिसत राहतात. इमारती बाहेरून तर भग्न दिसतातच पण आतली शिल्पे देखील भग्नावस्थेत आहेत. जी आहेत त्यावरून त्यांची कलाकुसर पूर्वी कशी असावी ह्याचा अंदाज येऊ शकतो.
हा खालचा फोटो आहे ते शिल्प बहुतेक राजघराण्यातील स्त्रीचे असावे. कदाचित राजा जयवर्मनाने प्रथम पत्नी जयदेवी मृत्यू पावल्यावर जिच्याशी विवाह केला, तिचे-इंद्रदेवीचे असू शकेल. जयदेवीचे शिल्प पूर्ण अवस्थेत पाहायला मिळते अजूनही. त्याचे फोटो आपल्याला आंतरजालावर पाहायला मिळतील.
|
??? |
अप्सरा नृत्य हा कंबोडियन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पूर्वीच्या सर्व मोठ्या इमारत समूहांतून नृत्यशाळा असणे साहजिक आहे. आपल्याला अशी नृत्यमग्न अप्सरांची शिल्पे इथे, प्रेह खान मध्ये देखील आढळतात.
वरवर पाहिलेत तर पहिल्या दोन फोटोंमधील अप्सरांच्या ओळी सारख्या वाटतील. त्या ओळीतल्या अप्सरांची नृत्यावस्था सारखी वाटेल. म्हणून मुद्दाम नंतर काही क्लोज अप्स दिले आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकीच्या देहाच्या ठेवणीनुसार तिचा पाय किंचित वेगवेगळा उचलला गेला आहे. गुडघा आणि कोपर ह्या मधले अंतर बदललेले आहे. तिने बोटांत वस्त्र धरले आहे ते धरण्याची नजाकत वेगवेगळी आहे.
प्रत्येकीचे वय, वस्त्र, केशरचना, अलंकार, चेहऱ्यावरचे भाव हे सर्व वेगवेगळे आहे. अशा असंख्य अप्सरांच्या ओळी कोरताना एवढे वैविध्य कल्पनेत असणे आणि ते शिल्पात उतरवता येणे ..हे दोन्हीही जमलेल्या त्या शिल्पकारांना मनापासून प्रणाम.
हातात त्रिशूल, गुडघ्यापर्यंतचे कटिवस्त्र, दणकट मांड्या आणि पाय, कपाळावर तिसरा उभा डोळा... इतके सगळे वर्णन ऐकल्यावर ही मूर्ती कोणाची असेल ते लहान मूल देखील सांगू शकेल. शिवमूर्ती आहे. वेगळे आहेत ते अंगावरचे इतके अलंकार आणि चेहऱ्यावरचे शांत स्मितहास्य. केवळ मूर्तिस्वरूपात नाही तर पिंडीच्या रूपात पण शंकर आहेच.
बौद्ध विहार होता हे दर्शवणारे एक स्तूप देखील ह्या मंदिरात आहे.
स्तूपाची रोज पूजा होत आहे. फुले, उदबत्ती, नैवेद्य हे सर्व पूजा विधी होत आहेत असे दिसते. अनेक शतके आधी ह्याच जागी लोकेश्वराची - बुद्धाची मूर्ती होती असे म्हणतात.
स्तूपाच्या मागे, भिंतींना जी भोके दिसतात त्यात कोणी म्हणतात पूर्वी तांब्याच्या पट्ट्या लावलेल्या होत्या सगळीकडे. त्यामुळे हे मंदिर कायम चमकत राहायचे. कोणी म्हणतात त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली होती. खरे काय ते तो बुद्धच जाणे.
|
बंद दार - सुंदर नक्षी |
|
अंतरंग |
|
आकाशाची चौकट |
|
अंतरंग |
|
कलाकुसर |
इमारतींच्या त्या जाळ्यातून तुम्ही गेलात तर काहींचे अंतरंग असे दिसेल. दारांवर अजूनही सुंदर नक्षी गतकाळाच्या वैभव खुणा मिरवते आहे. ह्या दारावरच्या नक्षीत फार सुंदर मानवाकृती आहेत. त्यातील काही नमनमुद्रेत आहेत. वेगवेगळे प्रसंग आहेत. पण फोटो पुरेसा स्पष्ट नसल्याने प्रसंग ओळखता येत नाही.
ह्या फोटोत दारासमोरची मूर्ती स्पष्ट ओळखू येते आहे! पण दारावरच्या पॅनेलवरच्या मूर्ती नीट दिसत नाहीत. त्या पॅनेलवर समोरची एक ओळ नमस्कार मुद्रेत बसलेल्या भक्तांची आहे आणि मागे भग्न मूर्ती आहे ती चतुर्भुज आहे. तेव्हा बुद्ध असू शकतो, विष्णू असू शकतो. नक्की माहिती नाही. हे दोन्ही एकाच इमारतीचे फोटोज. एक थोडा जवळून काढलेला. जरा नीट झूम करून पाहिलेत तर प्रवेशद्वाराच्या वर एक सुंदर शिल्प अजूनही पुष्कळ चांगल्या अवस्थेत आहे असे आपल्या लक्षात येईल. त्याचा अगदी जवळून फोटो असा दिसतो.
आता हे कशाचे दृश्य आहे हे तर अगदी सगळ्यांना ओळखू येईल. जोरदार युद्ध चालू आहे. पायदळ आहे. ते सैनिक खाली लढत आहेत. घोडदळ आहे. रथ आहेत. इतकेच काय, काही आकाशात उड्डाण करत युद्ध करणारे देखील सैनिक आहेत.
ह्यातील काही सैनिक उग्र चेहऱ्याचे आहेत. काहींचे चेहरे वानरासारखे आहेत. काहींना शेपटी दाखवली आहे. चित्रात अनेक इतर गोष्टी असल्या तरी नजर वेधून घेणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे रथाची चाके. मग त्या चाकांवर असलेल्या रथातून ह्या प्रसंगातील मुख्य नायक बसलेले आहेत.
डावीकडचा रथ पाहिलात तर त्यात सारथ्याशिवाय आणखी दोघे जण आहेत. एक जण दुसऱ्याला काहीतरी दाखवतो आहे, सांगतो आहे. पण तो सांगणारा सारथी नाही. इथेच मला वाटते डाव्या रथातले दोघे कोण हे स्पष्ट होते. त्या दोघांचीही देहबोली आत्मविश्वासपूर्ण आहे. डाव्या रथाचे घोडे चढाई करण्याच्या उडी मारून हवेत झेपावलेले आहेत.
उजवीकडचा रथ पाहिलात की मग हे युद्ध कोणात आणि कोणाचे आहे हे नक्कीच कळते. उजव्या रथात आहे दशानन रावण. त्याची देहबोली आणि रथ बचावात्मक पवित्र्यात आहे आणि चेहरा थोडा गोंधळलेला. राम-रावण युद्धाचे अतिशय प्रत्ययकारी चित्रीकरण केलेले इथे आढळते. दगडात गती आणि हालचाल दाखवणाऱ्या ह्या शिल्पाचे कौतुक करावे तेवढे थोडे.
ह्या खेरीज कृष्ण गोवर्धन पर्वत उचलतानाचे देखील शिल्प आहे म्हणतात. शेषशायी विष्णू आहे. पण ते आम्ही पाहिले नाही. ह्या मंदिरासाठी देखील जास्त वेळ ठेवून जायला हवे.
आणि आता ज्या साठी प्रेह खान मंदिर प्रसिद्ध आहे ते फोटो.
झाडांनी इथे पण इमारतींवर आपले जाळे पसरलेले आहे. त्यातील एक ... खरे म्हणजे ही दोन झाडे एकत्र वाढत होती. त्यातील एक तुटून पडले. तुटताना ते इमारतीचे काही चिरे दगड घेऊनच खाली आले. दुसरे मात्र जिवंत आहे. जोमाने शेजारच्या भिंती छपरावर वाढते आहे.
अजून भिंतींवर वाढणारी झाडे ह्या मंदिरात अनेक ठिकाणी आहेत. किती फोटो काढणार? आम्ही गेलो २०१२ डिसेंबर मध्ये तेव्हा ह्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू होते. आता कदाचित झाली असेल दुरुस्ती पूर्ण. पण जिथे अशी झाडे सतत वाढत आहेत तिथे डागडुजीचे कामदेखील सतत चालू ठेवायला लागणार.
आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ राजा जयवर्धनाने बांधलेले हे दोन्ही विहार. शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे, सत्तेचे, संपत्तीचे, बदललेल्या धर्मनिष्ठांचे चिन्ह मिरवणाऱ्या ह्या वास्तू. संपत्तीचे सविस्तर वर्णन ह्या दोन मंदिरांच्या बाबतीत शिलालेखांत विशेषत्वाने केलेले आढळते. इतर मंदिरातून सोन्यानाण्याचे वर्णन करून ठेवलेले फारसे आढळत नाही. दैवदुर्विलास हा की आज तिथे संपत्ती तर नाहीच पण जंगली झाडे आपला विळखा घालून इमारतीदेखील नष्ट करू पाहत आहेत.
पूर्वी कदाचित जंगल साफ करून, जमीन समप्रतल करून मंदिरे बांधली असतील, आज जंगले परत ती मंदिरे गिळून टाकू पाहत आहेत.
अंगकोरवाट मंदिर समूहातील सगळीच मंदिरे मधली काही शतके दुर्लक्षित राहिली होती. जंगलाने वेढली गेली होती. पण ह्या मंदिरांइतकी दुरावस्था फारच क्वचित मंदिरांची झालेली दिसते.
वैभवाच्या अत्युच्च शिखरावरून कधीतरी खाली यायचेच आहे ह्या शिकवणीची तर ही दोन्ही मंदिरे साक्ष देत नसतील? नियतीचा न्याय अजब असतो हेच खरे.
कंबोडिया मालिकेतील ह्या आधीचे लेख वाचण्यासाठी -
१. बांते स्रेइ एक सुखद स्वप्न
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post_14.html
२. अंगकोरवाट - विश्वाची अमूल्य ठेव
https://silvervegantravels.blogspot.com/2022/07/blog-post.html
३.PhnomPenh-कंबोडियाची राजधानी
https://silvervegantravels.blogspot.com/2020/09/phnom-penh.html
#angkorwat #cambodia #siemreap #angkor #angkorwattemple #travel #khmer #siemreaptrip #travelphotography #phnompenh #angkortemples #angkorthom #cambodiatravel #asia #cambodiatrip #angkorwatcambodia #southeastasia #siemreapcambodia #taprohmtemple #travelgram #beautifulcambodia #adventure #cambodian #explorecambodia #visitcambodia #taprohm #wanderlust #angkorwatsunrise #travelcambodia #prehkhantemple
Comments
Post a Comment