1947 चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.
काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते? ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.
हिंदूंना पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते. ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.
अतिशय वैभवशाली होते हे मंदिर. गाभाऱ्यात जडवलेली रत्ने, सोन्याचांदीचे दरवाजे आणि कळस तर होतेच पण मंदिरात टांगलेली घंटा होती ती देखील सोन्याची होती. आसपासच्या गावात भरभराटीला आलेली बाजारपेठ होती. देशातील तसेच विदेशातील व्यापारी तिथे व्यापारासाठी येत असत. समुद्र जवळच असल्याने समुद्रमार्गे मालाची वाहतूक करणे सोपे होते.
ह्या वैभवाच्या लोभाने तसेच हिंदू अस्मितेवर घाव घालण्यासाठी सोमनाथावर अनेकदा मुस्लिम आक्रमणे झाली.
गझनीच्या महंमदने १०२६/२७ मध्ये स्वारी करून संपत्ती लुटून नेली, मंदिर उद्ध्वस्त केले. ह्या त्याच्या “ कर्तृत्वामुळे” गझनीचा महंमद हा मुस्लिम इतिहासात वीरपुरुष, शूर योद्धा म्हणून मान्यता पावला. ह्या घटनेचा गौरवपूर्ण उल्लेख अनेक मुसलमान इतिहासकारांनी, बखरकारांनी, प्रवाशांनी केलेला आढळतो.
त्यांनतर चालुक्य राजा कुमारपाल ह्याने पुन्हा ते मंदिर अतिशय सुंदररित्या बांधले. ते १२९९ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने लुटून नेले, उध्वस्त केले. पुन्हा चौदाव्या शतकात चुडासामा राजा महिपालने ते बांधले. त्या नंतर १३९५ मध्ये गुजराथचा सुलतान जफरखान, १४५१ मध्ये महमूद बागेंदा ह्यांनी ते लुटले, उध्वस्त केले. ह्या खेरीज अधून मधून अनेक मुस्लिम सरदार, राजे, सुलतान ह्यांनी आक्रमणे केली होती ती वेगळीच. त्या नंतर १६६५ मध्ये मुगल औरंगझेबाने ते लुटले, उध्वस्त केले. त्यानंतर मंदिराच्या काही भागात मशीद स्थापण्यात आली.
हे असे वारंवार हल्ले आणि उध्वस्त करणे का? तर हिंदूंचा आपल्या धर्म, संस्कृती आणि परंपरांविषयीचा अभिमान ठेचून काढण्यासाठी आणि इस्लामचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असे केले गेले. त्या मशिदीमुळे तर हिंदूंच्या मनावरील जखम भळभळत राहिली. काहींच्या मनात अंगार उसळत राहिला तर काहींच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तिथली मशीद हलवली जाऊन तिथे मंदिर पुनर्स्थापित व्हावे ह्याला काही नेत्यांचा विरोध होताच. मात्र स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे मशीद हलवली गेली आणि मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला गेला. आजही सोमनाथ नाव घेताच प्रत्येकाच्या भावना उचंबळून येतात आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या सारखा द्रष्टा नेता लाभला म्हणून आपण आज हे मंदिर पाहू शकतो आहोत ह्याची कृतज्ञ जाणीव होते.
भारतातील पारंपरिक मंदिरांचे वास्तुरचनाकार असलेल्या सुप्रसिद्ध सोमपूरा परिवारातील प्रमुखांनी ह्या मंदिराचा आराखडा तयार केला आणि वास्तू उभारणीला सुरुवात झाली.
कुठे आहे हे मंदिर?
भारताच्या पश्चिम भागात असलेल्या गुजराथ राज्यातील सौराष्ट्र मध्ये श्री प्रभास पाटण क्षेत्रात हे मंदिर आहे. वेरावळच्या अगदी जवळ आहे.
कसे आहे हे मंदिर ?
सागराच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे अतिशय सुंदर आणि भव्य असे हे मंदिर आहे. गर्भगृह, सभागृह आणि नृत्यमंडप अशी पारंपरिक रचना आहे. सर्वत्र अतिशय प्रमाणबद्ध मानवी आकृती तसेच अनेक कलाकृती कोरलेल्या आहेत. मुख्य शिखर १५५ फूट उंच असून त्यावरील कलश १० टन वजनाचा आहे. त्यावरील डौलाने फडकणारा ध्वज आहे २७ फूट उंच ध्वजदंडावर.
मंदिरात खूप कडक सुरक्षा व्यवस्था आहे. आपल्या पिशव्या, फोन,चपला सगळे काउंटरवर जमा करावे लागते. मंदिराच्या आवारात तुम्ही फोटो काढू शकत नाही. त्यामुळे हे फोटो आहेत ते दूर अंतरावरून दिसणाऱ्या कळसाचे फोटो आहेत.
सोमनाथ मंदिर. 📷प्रज्ञा साठे |
सोमनाथ मंदिर. 📷प्रज्ञा साठे |
सोमनाथ मंदिर. 📷प्रज्ञा साठे |
दर्शनासाठी अगदी शिस्तशीर पणे रांगेची व्यवस्था आहे. पैसे दिले की रांग न लावता आधी दर्शन असे दिसले नाही त्यामुळे आनंद झाला.
आम्ही भाग्यवान होतो की सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या प्रतिज्ञेच्या अमृतमहोत्सवाला म्हणजे २०२२ च्या दीपावली पर्वात आम्ही मंदिरात होतो. आम्ही खूपच भाग्यशाली होतो की आरतीच्या वेळी आम्हाला मंदिरात राहता आले.
भारतभरातून आणि विदेशातूनही तिथे जमलेले भाविक, आरतीच्या तालावर अनेक हातांतून एका लयीत वाजणाऱ्या टाळ्या, अनेक वाद्यांचा नाद मेळ, आरतीच्या दिव्यांचा सोनेरी प्रकाश, धूप उदबत्तीचा हवेत पसरलेला सुगंध, मंदिराची भव्य वास्तू ह्यामुळे अतिशय पवित्र आणि भारावून टाकणारे वातावरण होते. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच होते, डोळ्यात आनंदाश्रू होते आणि कंठ आनंदातिशयाने सद्गदित झालेला होता. केवळ त्या दिवशी तिथे असलेल्याच नव्हे तर नेहमीच सोमनाथाचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाची अशीच अवस्था होत असणार.
औरंगजेबाने मंदिर उध्वस्त केल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जवळच म्हणजे मूळ मंदिराच्या आवारात दुसरे मंदिर बांधले. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की मूळ शिवलिंग खालच्या मजल्यावर जाऊन दिसते. आक्रमकांपासून वाचण्यासाठी कदाचित असे केले असावे. जमिनीच्या पातळीवर दुसरे एक शिवलिंग आहेच. म्हणजे कोणीही मंदिरात जाईल तर त्याला हे दुसरे शिवलिंग दिसेल. ह्या मंदिरात फोटो काढण्याची अनुमती आहे.
सोमनाथ मंदिर. ( पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनी पुनर्स्थापित केलेलं ) 📷प्रज्ञा साठे |
प्रभास पाटण क्षेत्रात अजूनही काही विशेष महत्वाची मंदिरे आणि स्थाने आहेत. त्यापैकी एक आहे भालका तीर्थ.
योगेश्वर श्रीकृष्ण यादवांच्या आपापसातील कलहाने त्रस्त होऊन ह्या वनात आले. पिंपळाच्या झाडाखाली आपला उजवा पाय डाव्या पायावर ठेवून बसले होते. त्यांच्या उजव्या पायाचे पाऊल एका व्याधाने दुरून पाहिले. त्याला ते हरणाचे तोंड वाटले. शिकार करण्यासाठी त्याने बाण मारला. जवळ येऊन पाहतो तर तिथे हरीण नसून एक दिव्य पुरुष. त्याला अतिशय दुःख झाले, भय ही वाटले. त्याने क्षमा मागितली.
असे होणे ही देखील माझीच इच्छा होती असे उत्तर कृष्णाने दिले. जिथे बाण म्हणजे भल्ल लागला ते भालका तीर्थ. अजूनही तिथे अनेक मोठाली झाडे आहेत. मंदिरात असलेले एक झाड तेच आहे ज्या खाली कृष्ण ध्यानस्थ होता असे म्हणतात.
भालका तीर्थ |
भालका तीर्थ |
भालका तीर्थ |
भालका तीर्थ - योगेश्वर कृष्ण आणि व्याध |
भालका तीर्थ - हेच ते झाड |
ह्या खेरीज त्रिवेणी संगम, जिथे श्रीकृष्णांनी देह ठेवला ते मंदिर, गीतामंदिर अशी काही महत्वाची मंदिरे आहेत. पण आम्ही गेलो त्या दिवशी गृहमंत्री मा. अमित शहा तिथे येणार होते. त्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला असल्याने ती सर्व ठिकाणे पाहता आली नाहीत. तुम्ही जाल तेव्हा मात्र नक्की पाहून या. जगातील प्रत्येक हिंदूने, प्रत्येक भारतीयाने पहिलेच पाहिजे असे हे सोमनाथ - प्रभास पट्टण.
परकीय आक्रमणांच्या विषयी गाफील राहून चालणार नाही, आपण सर्वानी एकदिलाने, दृढ संकल्पाने आणि एकता जपत, परस्पर सहकार्याची भावना ठेवून वाटचाल केली पाहिजे असे सांगणारी ही वंदनीय स्थाने.
Best!
ReplyDeleteखूप मस्त 🙏🙏🙏
ReplyDelete