मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका 

आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे. 

सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!!

शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!! 

आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता! 

अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती. म्हणजे त्यांना हॉटेल्स बुक करायची गरजच नव्हती. अंघोळी करून दर्शन घेऊन ते पुढच्या प्रवासाला निघणार असावेत. 

स्वच्छ अंघोळी करून चांगले समारंभाचे कपडे घालून लोक तयार होत होते. बायका सिल्कच्या साड्या, गजरे घालून तयार झाल्या होत्या. सार्वजनिक स्वच्छतागृहात अंघोळी करून इतक्या उत्साहाने तयार होऊन मगच मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या त्या सगळ्यांचे फार कौतुक वाटले. 

चपला काढण्यासाठीचा काउंटर तसा थोडा लांब आहे. तिकडे चपला जमा करून आम्ही मंदिराकडे निघालो. 

मंदिर परिसराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. 

प्रवेशद्वार 

आत गेलो तर अनेक तरुण जोडपी पारंपरिक पोशाखात आणि त्यांची इटुकली पिटुकली मुले देखील छान पारंपरिक पोशाखात दिसत होती. 

तीन चार वर्षांची मुले वेष्टी म्हणजे पांढरी लुंगी आणि मुली परकर पोलके, गजरे घातलेल्या .. ते सर्वच इतके गोजिरवाणे दिसत होते. 

मग ते सगळे काय करत आहेत पाहिले तर डाव्या हाताला सरस्वती मंडपम होता. तिथे पाटी पूजन चालू होते. मुलांच्या अक्षरलेखनाचा प्रारंभ विद्येची देवता सरस्वती हिचे विधिपूर्वक आशीर्वाद घेऊन करण्याची ही प्रथा फार आवडली. ह्याला अक्षराभ्यास किंवा विद्यारंभ म्हणतात. विजयादशमी, ललिता पंचमी आणि अक्षयतृतीया हे विद्यारंभासाठी विशेष दिवस मानले जातात. अडीच ते पाच वर्षांच्या मुलांसाठी विद्यारंभ करवतात. 

शृंगेरी मंदिर परिसरात अनेक लहान लहान मंदिरे आहेत. त्यातील दोन प्रमुख मंदिरे म्हणजे श्री विद्याशंकर मंदिर आणि श्री शारदाम्बा मंदिर. 

श्री विद्याशंकर मंदिर हे चौदाव्या शतकात उभारलेले अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे मंदिर आहे. 

श्री विद्याशंकर मंदिर 
श्री विद्याशंकर मंदिर 
श्री विद्याशंकर मंदिर 

उंच जोत्यावर उभ्या असलेल्या ह्या मंदिरात सुंदर कोरीव काम केलेले आहे.मंदिराच्या पश्चिम बाजूला गर्भगृहात एका बाजूला विद्या गणपती तर दुसऱ्या बाजूला दुर्गा देवीची मूर्ती आहे. मुख्य स्थानी विद्याशंकर म्हणजे शिवलिंग आहे. 

गर्भगृहाच्या इतर तीन बाजूला ब्रह्म, विष्णू आणि महेश देवींसह विराजमान आहेत. मंदिरातील पूर्व बाजूला बारा सुंदर कोरीवकाम असलेले खांब आहेत. त्यावर बारा राशींची चिन्हे कोरलेली आहेत. असे म्हणतात की सूर्याची किरणे बरोबर त्या त्या राशीत सूर्य असताना त्या त्या खांबावर पडतात. अर्थातच हे किरण कधी पडतात त्याची काही विशिष्ट वेळ असणार. 

ह्या मंदिरात भारतीय खगोल शास्त्र, विज्ञानातील प्रगती, बांधकामातील अचूकता, कोरीवकामातील कौशल्य आणि इतिहासाचा संगम झालेला आढळतो. इथे सगळी माहिती देणारे गाईड असायला हवेत असे आवर्जून वाटले. इतक्या सुंदर मूर्ती, बांधकामातील वैशिष्ट्ये ह्यांची माहितीदेखील येणाऱ्या लोकांना झाली पाहिजे. 

 दर्शन घेणारे भाविक किंवा बाहेरच्या बाजूला फोटोशूट आणि रिल्स करणारे हौशी लोक ह्यांनाही ही सर्व माहिती दिली तर त्यांच्या ज्ञानात आणि इतिहास, संस्कृतीकडे पाहण्याच्या दृष्टीत फरक पडेल असे वाटते. 

हे मंदिर शृंगेरी पिठाचे दहावे शंकराचार्य विद्याशंकर ह्यांच्या स्मरणार्थ बांधलेले असले तरी बांधण्यामागची प्रेरणा आहे विजयनगर साम्राज्याचे गुरु असणारे विद्यारण्य स्वामी ह्यांची. त्या साम्राज्यातील कला संस्कृतीचे वैभव ह्या मंदिरात प्रतीत होते आहे. 

मंदिर परिसरातील दुसरे मुख्य मंदिर म्हणजे श्री शारदाम्बा मंदिर. श्री शारदाम्बा मंदिर तर आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले आहे. तेव्हा देवीची चंदनाची मूर्ती होती असे म्हणतात. मागील इतक्या शतकांमध्ये वेळोवेळी मंदिरात बदल, दुरुस्ती होत गेली. आता तिथे सोन्याची मूर्ती आहे. फोटो काढण्याची अनुमती नव्हती. मंदिर परिसराचे प्रवेशद्वार आहे त्या तुलनेत हे शारदाम्बा मंदिर बैठे आहे. 

श्री शारदाम्बा मंदिर आणि एकूणच परिसरात वातावरण अतिशय पवित्र आहे आणि ते अगदी कोणालाही जाणवेल असेच आहे. 

ही दोन मंदिरे पाहून आम्ही आवारात येतो तर सरस्वती मंडपांच्या समोर एक खरा हत्ती झुलत होता. 

ह्या दोन प्रमूख मंदिरांच्या खेरीज इतर अनेक लहान मंदिरे ह्या परिसरात आहेत. तोरण गणपती, जनार्दन मंदिर, हनुमान मंदिर, गरुड मंदिर, आदि शंकराचार्य मंदिर आणि अजून काही मंदिरे आहेत. शृंगेरीच्या चार दिशांना, दिशांच्या स्वामींची मंदिरे आदि शंकराचार्यांनी उभारली होती. ती अर्थातच ह्या परिसराबाहेर आहेत. 

शृंगेरी हे गावाचे नाव ऋष्यशृंग ऋषींच्या नावावरून पडले आहे. आदि शंकराचार्यांनी भारतभरात जे चार प्रमुख मठ स्थापन केले त्यातील एक प्रमुख मठ म्हणजे शृंगेरी. शृंगेरी हे मंदिरांचे स्थान आहेच पण ते अध्ययनाचेआणि संशोधनाचे देखील स्थान आहे. अनेक विद्यार्थी इथे अभ्यास करत असतात. 

देशभरात अनेक लोक भगवदगीता पाठांतर करत असतात. ते शृंगेरी मठात येऊन परीक्षा देतात आणि उत्तीर्ण झाल्यास त्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक मिळते. शृंगेरी मठातून प्रमाणपत्र मिळणे ही अभ्यासकांसाठी सन्माननीय बाब असते. 

हा संपूर्ण मंदिर परिसर तुंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. श्री विद्याशंकर मंदिराच्या जवळ नदी ओलांडण्यासाठी एक पूल आहे. पलीकडे श्री शंकराचार्यांचे निवासस्थान आणि इतर इमारती आहेत. ह्या पलीकडल्या तीरावरच भगवदगीता परीक्षा घेतली जाते. तसेच चंद्रमौलीश्वराची पूजा देखील तिकडेच होते. 

पुलाच्या पलीकडे 
पुलाच्या पलीकडे - शृंगेरी मठ 
तुंगा नदीवरील पूल 
पुलावरून श्री विद्याशंकर मंदिर 

पुलाच्या ह्या बाजूला असलेल्या मठात फोटो काढण्यास अनुमती नाही. ह्या बाजूला देखील मोठा परिसर आहे. आम्हाला गीता पाठांतर परीक्षा चालू असताना ऐकायला मिळाली. तसेच स्फटिक लिंग श्री चंद्रमौलीश्वराची सकाळची पूजा देखील पाहायला मिळाली. 

शृंगेरीहून आम्ही निघालो ते मुकाम्बिका मंदिरात जाण्यासाठी कोल्लुरला. शृंगेरी अनेक लहान लहान टेकड्यांच्या परिसरात आहे. तसेच कोल्लूरही कोडाचादरीच्या किंवा कुटजाद्रीच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे सर्व परिसर अगदी हिरवागार आणि पर्वत टेकड्यानी वेढलेला आहे. 

कोल्लूरला आम्ही ज्योती रेसिडेन्सी मध्ये राहिलो होतो. आम्ही पोचलो ती अगदी भुकेचीच वेळ होती. सामान खोलीत ठेवून आम्ही लगेचच जेवायला गेलो. 

जेवण 

भात वेगळ्याच तांदुळाचा होता. आपल्याकडे अलिबाग नागाव परिसरात लाल तांदूळ मिळतो तसा. गरम गरम भात आणि अतिशय चविष्ट, मसाल्यांचा मारा नसलेल्या भाज्या!! जेवून तृप्त झालो. 

वर खोलीत आल्यावर आजूबाजूला काय काय दिसते आहे ते पाहिले. गर्द झाडी, डोंगर आणि मुख्य म्हणजे मंदिर अगदी दृष्टीपथात होते. ते दृश्य तुम्ही इथे पाहू शकता. 

https://youtu.be/3N5tCXVjbHk

झूम इन केला आहे तो मंदिर परिसर आहे. हॉटेलपासून मंदिर अगदी चार पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अनेकदा मंदिरात जाऊन येऊ शकलो. कमी गर्दीच्या वेळेला दर्शन घेऊ शकलो. अन्यथा मुकाम्बिका मंदिरात मोठी रांग असते. 

मुकाम्बिका मंदिर अतिशय प्राचीन आहे. आदि शंकराचार्यांनी ह्या स्थानी तपश्चर्या केली होती. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र इथून प्रामुख्याने तसेच देशभरातून इथे भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे. 

ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की दिवसभरातील तीन वेळेला तिची तीन स्वरूपांत पूजा केली जाते. सकाळी महाकाली, दुपारी महालक्ष्मी आणि रात्री महासरस्वती. आम्हाला रात्रीचे आणि सकाळचे रूप तसेच मंदिर प्रदक्षिणा पाहता आली. 

एरवी ह्या मंदिरात फोटो काढायला अनुमती नाही. पण प्रदक्षिणेच्या वेळी आपण फोटो काढू शकतो. प्रदक्षिणेसाठी प्रदक्षिणा मूर्ती वेगळी असते. मूळ मूर्ती हलवत नाहीत. 

मुकाम्बिका मंदिर 
सायं प्रदक्षिणेचा रथ 
परिसरातील एक मंदिर 
सुवर्ण रथ 
 वाट पाहताना 
सायं प्रदक्षिणा 
सुवर्णरथात देवी विराजमान 

सायं प्रदक्षिणा म्हणजे तशी खरी तर रात्रीच म्हणायला हवी, ती साधारण सात साडेसातला सुरु होते. आधी पायी डोक्यावर मूर्ती घेऊन, मग पालखी, मग चांदीच्या रथातून आणि मग सोन्याच्या रथातून अशा तीन/चार प्रदक्षिणा आम्ही पाहिल्या. अलोट गर्दी असते. ज्यांनी आधी नोंदवले असेल आणि बहुधा पैसे भरले असतील त्यांना रथ ओढण्याचा मान मिळतो. 

तिचा विडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. विडिओ तीन भागात आहे. 

पहिला भाग 

https://youtu.be/XmGhXL-rzuU

दुसरा भाग 

https://youtu.be/mbfETRdx4CU

तिसरा भाग 

https://youtu.be/r3I3uIWwMuA


मंदिर सजावट 
सोनेरी जयस्तंभ 
मंदिराचे बाह्य रंग.. रात्री निरोप घेताना. 
संध्याकाळी मंदिरात गेलेलो आम्ही ते रात्रीची प्रदक्षिणा संपल्यावरच साडेआठला परत आलो. मंदिराजवळ राहण्याचा हा फायदा असतो. भरपूर वेळ मंदिरात थांबता येते. तिथून पायी चार मिनिटांवर आमचे हॉटेल होते. 

मुकाम्बिका देवीचे मंदिर सौपर्णिका नदीच्या काठावर आहे. ती कोल्लूर गावातून वाहते म्हणून तिला कोल्लूर असेही म्हटले जाते असे मी ह्या आधीच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिलेले तुम्हाला आठवत असेल. 

गावाबाहेरच्या नदीच्या स्थितीचे माहिती नाही. पण प्रत्यक्ष गावातील आणि मंदिराजवळील नदीची स्थिती दयनीय आहे. आम्ही हॉटेलमधून मंदिरात जाताना एका लहान पूल ओलांडून जायचो. त्या पुलाखालून वाहणारा लहानसा ओहोळ म्हणजेच नदी आहे हे मी नकाशात पाहिल्यावरच लक्षात आले. प्रत्यक्ष पाहताना ती नदी म्हणजे ओहोळ +नाला असेच दिसत होते. 

दुसऱ्या दिवशी लवकर सगळे आवरून आम्ही पुन्हा मंदिरात गेलो. सकाळी सातच्या सुमाराला प्रदक्षिणा असते ती आम्हाला पाहायची होती. तसेही मंदिराच्या गावात आपण इतक्या लांबून जातो तेव्हा जास्तीत जास्त वेळ मंदिरात राहावे असा प्रयत्न आम्ही करतोच. 

प्रात: प्रदक्षिणा 

प्रात: प्रदक्षिणा 

सकाळच्या प्रदक्षिणेची विडिओ आपण इथे बघू शकता. विडिओ दोन भागात आहे.
सकाळी रथ नसतो. एक मूर्ती डोक्यावर घेऊन आणि मग मूर्ती पालखीत ठेवून,अशाच प्रदक्षिणा आम्ही पाहिल्या. मग प्रदक्षिणा मूर्ती मुख्य मंदिरात घेऊन गेले. 
मुकाम्बिका मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेलो की मोठे आवार आहे. त्यात मधोमध मुख्य मंदिर आहे आणि चारी बाजूला इतर लहान लहान मंदिरे आहेत. त्यामुळे प्रदक्षिणेसाठी चांगली मोठी जागा मिळते. 

मुकाम्बिका मंदिरात शक्तिदेवता म्हणून देवी पुजली जाते ती ज्योतिर्लिंग स्वरूपात. ह्या स्वयंभू लिंगाला मध्ये सोनेरी रेष आहे. त्यात डावीकडचा भाग म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आणि उजवीकडचा भाग म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि शंकर. हे आपल्याला दिसत नाही. बहुतेक हारांखाली झाकलेले असावे. 

शंकराचार्यांना इथे तपस्या करताना देवीचे स्वरूप दिसले त्याची स्थापना त्यांनी श्रीचक्र यंत्रावर केली. 

आपल्याला देवीची मूर्ती दिसते ती अगदी थोडा वेळ ..मिनिटभर. कारण गर्दीच इतकी असते की पुढे पुढे सरकावे लागते. कोणी मला विचारले की "देवीच्या गळ्यात विजयनगर साम्राज्यातील राजांनी अर्पण केलेले एक नारळाएवढे रत्न आहे म्हणतात, ते पाहिले का?" तर त्याकडे माझे लक्षच गेले नव्हते!! मला तर देवीचे स्मितहास्य आणि तिचे डोळेच खिळवून ठेवतात. बाकी असे सगळे दागदागिने, पोशाख बघायचे तर निवांतपणे तिथे उभे राहता यायला हवे!!

दागदागिने, पोशाख ह्यावरून आठवले की मंदिराच्या परिसरात देवीला अर्पण केलेल्या साड्यांचे दुकान आहे आणि मंदिराबाहेर बाजारात बाकी बरीच दुकाने आहेत!! हे मात्र हिंडताना पाहिले होते! 

आम्ही निघालो तेव्हा शृंगेरीचे शंकराचार्य मुकाम्बिका देवीच्या दर्शनाला आणि काहीतरी कार्यक्रम होता त्या साठी आलेले होते. पण आम्हाला दिसले नाहीत. त्यांच्या गाड्यांचा ताफा मात्र दिसला! त्यावर त्यांचे नावही लिहिलेले होते. 

शंकराचार्यांची गाडी!
तुमच्या लक्षात आले असेलच की आपण कोस्टल कर्नाटक ४ तर पूर्ण केलाच शिवाय ५ मधलाही दिवसाचा पहिला भाग आपण मुकाम्बिका मंदिरातच आहोत!!उरलेल्या कोस्टल कर्नाटक ५ ह्या दिवशी काय केले ते लवकरच लिहीन!

#Sringeri and Mookambika travel guide in Marathi, #Udupi to Sringeri road trip via Agumbe Ghat, #Vidyashankara temple architecture details in Marathi, #Places to visit in Coastal Karnataka, #शृंगेरी आणि मुकाम्बिका मंदिर प्रवास, #कोस्टल कर्नाटक पर्यटन माहिती, #Kollur Mookambika temple darshan, #CoastalKarnataka #Sringeri #MookambikaTemple #AgumbeGhat #KarnatakaTourism #MarathiTravelBlogger #MarathiBlog #MarathiTravelStory #KollurMookambika #IncredibleIndia #TravelKarnataka #Shrungeri #TravelVlogMarathi #MarathiContentCreator



















 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....