मुख्य सामग्रीवर वगळा

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक (महाराष्ट्र राज्य, भारत) आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत, काही प्राचीन मूर्ती आणि मंदिर रचनेसाठी प्रसिद्ध आहेत तर काही वाईनरीज आहेत.
पण अशी एक जागा आहे जिथे यापैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही संपूर्ण भारतातील लोकांना तेथे जाण्याची इच्छा असते. त्या स्थळाचे नाव आहे भगूर!
भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे. जर आपण नाशिकहून जात असाल तर आपल्याला देवळाली लष्करी भागातील सुंदर परिसर ओलांडून जावे लागेल. स्वच्छ आणि सुंदर, उत्तम देखभाल केलेल्या बागा आणि इमारती आणि खूप मोठमोठे, शतकभराचे जुने वृक्ष ह्यामुळे हा रस्ता नक्कीच संस्मरणीय होतो.
मला खात्री आहे की आपणा सर्वांना भगूर बद्दल माहिती असेल आणि प्रत्येक भारतीयाला भगूरला भेट द्यावीशी का वाटते ते देखील माहिती असेल.
भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे.
असे म्हणतात की या गावचे नाव भृगु ऋषींच्या नावावरून पडले आहे. भृगु ऋषींचा आश्रम ह्या भागात होता.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म २७ मे १८८३ ह्या दिवशी भगूर येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात झाला. सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती आणि सध्या सावरकर स्मारकाचे श्री. रणजित सावरकर हे ह्या वास्तूची व्यवस्था पाहत आहेत. इथे लवकरच सावरकर संग्रहालय विकसित केले जाणार आहे.आम्ही २०२१  मध्ये भेट दिली होती. तेव्हाचे हे फोटोज आहेत. 
सावरकर वाडा 
स्वातंत्र्यवीर सावरकर 
सावरकर वाडा 
सावरकर वाडा 
स्वातंत्र्यदेवी स्तोत्र 
सावरकर वाडा 
जीर्णोद्धाराच्या आधी आणि नंतर 
दार बंद करण्यासाठी जुनी पद्धत - आगळ 
बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यामध्ये तीन मजले आहेत. एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे, जो घरापासून नदीपर्यंत जातो. आता हा भुयारी रस्ता पुढे बंद केलेला असला तरी आपण सुरुवातीच्या पायऱ्या अजूनही पाहू शकतो!
आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी सशस्त्र क्रांतीची शपथ जिथे घेतली होती ती जागा म्हणजे त्यांच्या भगूरमधील घरातले देवघर. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, त्या देवीची मूर्ती पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस, सर्व सावरकर बंधू भगूरच्या बाहेर असल्याने, ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली.
देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पितळ किंवा पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.
सावरकरांच्या घरची देवी 
सावरकरांच्या घरची देवी 
सावरकरांनी चौदाव्या पंधराव्या वर्षी ह्या देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती,"महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्यासाठी ते अखेरपर्यंत झटले.
तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर मध्ये पाहू शकतो.
सावरकरांची शाळा 
शाळेतील पाटी 
आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो.
जेव्हा सावरकर अंदमान जेलमध्ये होते तेव्हा त्यांना गळ्यात एक कैद्याचा बिल्ला घालायला लागायचा. त्याची प्रतिकृती आपण सावरकर वाड्यात पाहू शकतो. त्या बिल्ल्यावर कैद आणि सुटकेच्या दिनांकांच्या मध्ये आपल्याला 'D' दिसेल. 'D ' म्हणजे डेंजरस.
जेलमधील बिल्ल्याची प्रतिकृती 
आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी.


टिप्पण्या

  1. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. ज्वाला ही धगधगती, उजळे दिव्य शौर्य पराक्रमा ।
    सळसळला तेजस वारसा, त्रिवार वंदन स्वातंत्र्य सूर्या,
    तुला विधिज्ञ विनायका ।
    मी स्वा.सावरकरांना पाहिले आहे.केसरी वाडा,14जाने.(1962/3)संक्रांत.अविस्मरणीय प्रसंग!मी त्यांना तिळगूळ देऊन नमस्कार केला. त्यांनी मला तिळगूळ देऊन,'बाळ,तिळगूळ घे,गोड बोल',आशिर्वाद दिला. मी आमरण तो आशिर्वाद पाळत आहे.----धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन .

    उत्तर द्याहटवा
  4. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शत शत नमन त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती खरी करून दाखवली व त्यासाठी पराक्रमाची शर्थ केली यातच त्यांचे महत्व लक्षात येते व येणाऱ्या प्रत्येक पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे

    उत्तर द्याहटवा
  5. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शत शत प्रणाम

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

मथुरेचे कृष्ण जन्मस्थान मंदिर: इतिहास, महत्त्व आणि दर्शन

  मथुरा म्हणजे कंस. मथुरा म्हणजे तुरुंग. हे खरे होतेच. पण मथुरा म्हणजे कृष्ण जन्म हे ही खरेच ना!  श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर  मथुरेच्या बाजाराला दही, दूध, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी तर अगदी बालवाडी पासूनच स्नेहसंमेलनात आपण सगळेजण पाहत आलो! पुढे नाटक, सिनेमा, वग या सगळ्यात या मथुरेने आपला पाठपुरावा केलेला असतो. शिवाय ‘अयोध्या केवल झांकी हैं ..काशी मथुरा बाकी हैं’ ही घोषणाही आपण ऐकलेली असतेच. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥  सप्तपुरी स्थान असलेली आणि श्रीकृष्णाच्या आधीपासून अगदी रामायण काळापासून असलेली ही मथुरा. शत्रुघ्नाने लवणासुराला मारून मथुरेची स्थापना केली असे पौराणिक कथांत वाचायला मिळते. वाल्मिकी रामायणांत देखील तसा उल्लेख आहे.  तर यमुनेच्या तीरावर असलेल्या या प्राचीन नगरी मथुरेला कृष्णजन्मभूमी पाहण्यासाठी आम्ही यावर्षीच्या श्रावणात म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला पोहोचलो. स्टेशनवर बाहेर पडताच अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले आपल्या भोवती गोळा होतात.  इथे ठाण्यात आपल्याला जिथे जायचे असेल तिथे यायला नकार देणारे रिक्षा...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...