पंचमहाभूत - या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीचा आधार असलेली पाच तत्त्वे किंवा पाच घटक. पृथ्वी, आप/ जल, तेज/अग्नी, वायु आणि आकाश/अवकाश ही ती पाच तत्वे.
आम्ही ऐकले होते की या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करणारी अशी पाच शिव मंदिरे आहेत. ही मंदिरे दक्षिण भारतात आहेत. आम्ही ती मंदिरे बघण्याची संधीच शोधत होतो! ऑगस्ट २०१८ मध्ये आम्ही त्या पाचपैकी तीन मंदिरे पाहू शकलो.
आम्ही कन्याकुमारीपासून सुरुवात केली होती. कन्याकुमारी ते चेन्नई या मार्गावरील सर्वात जवळचे मंदिर असल्याने, आम्ही प्रथम जलतत्वाच्या मंदिराला भेट दिली.
जांबुकेश्वरम मंदिर - तिरुवनाईकावल
हे मंदिर त्रिची जिल्ह्यातील श्रीरंगम बेटावर आहे. श्रीरंगम बेट कावेरी आणि कोलाडम नद्यांनी वेढलेले आहे. हे मंदिर पंचमहाभूतातील जलतत्वाचे मंदिर आहे आणि म्हणून हे शिवलिंग अप्पू लिंगम म्हणून ओळखले जाते.
शिवलिंगाखाली पाण्याचा प्रवाह आहे जो पावसाळ्यात हळूहळू वाढतो. परंतु वर्षभर, ते पाणी दिसत नसले तरी तो क्षीण का होईना, पण जलप्रवाह असतो. मंदिरात शिवलिंगाच्या सभोवती वेढलेले वस्त्र, जमिनीलगत ओले होते त्यावरून त्या जलप्रवाहाचे अस्तित्व लक्षात येते.
मंदिराचा परिसर विशाल आहे. किल्ल्यासारखी रुंद व उंच अशी बाहेरील भिंत आहे. एकाच्या आत एक असे, पाच विशाल प्राकार आहेत. त्यांच्या आत गोपुरम आणि हजारो सुंदर खांब असलेली सभागृहे आहेत. पाण्याचे साठे आहेत.
|
📷 YouTube Video (Link Given below) |
ह्या विडिओ मध्ये तुम्ही मंदिराचा अंतर्भाग बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=m7bWVNrLyh4
Jambukeshwara
या मंदिराशी अनेक दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. जांब हे एक फळ आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रोज ऍपल किंवा जावा सफरचंद म्हणतात. मी दंतकथांबद्दल काही तपशीलवार सांगणार नाही, परंतु आख्यायिका दर्शविणारी शिल्पे पाहण्यासारखी आहेत, हे मात्र नक्की सांगेन!
खांबांवरील कोरीव काम फार सुंदर आहे. या मंदिराबद्दल एक विलक्षण गोष्ट आहे ती म्हणजे गर्भगृहाचे प्रवेशद्वार. जेव्हा आपण सर्वात आतील प्राकारात जातो, तेव्हा गर्भगृहाचे प्रवेशद्वार एका दगडी खिडकीने बंद केले आहे, असे आपल्याला दिसते. त्या खिडकीला जाळी आहे. त्यातून आपल्याला शिवलिंग दिसू शकते.
प्रवेशद्वारासाठी, आपल्या उजव्या बाजूला, डावीकडे वळावे लागते! प्रवेशद्वार खूपच लहान आहे. त्यातून गाभाऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला मान खाली वाकवूनच जावे लागते.
मंदिराचा विशाल परिसर, गगनचुंबी गोपुरम आणि मंदिराच्या उंचच उंच भिंती लक्षात घेता, गर्भगृहाचे प्रवेशद्वार इतके छोटे का असेल याचा आपण विचार करत राहतो!
मंदिराच्या आवारात देवी अखिलानंदेश्वरी मंदिर आहे. १५ ऑगस्ट २०१८ ह्या दिवशी आम्ही ह्या मंदिरात गेलो होतो. तेव्हा अनपेक्षितपणे आम्हाला एक उत्सव आणि मिरवणूक पाहण्याचे भाग्य लाभले!
मिरवणुक आतल्या प्राकारातून सुरू झाली आणि फेरी मारत तिने परिसरातील तलावाला भेट दिली. देवांना घातलेले सुंदर आणि अनोखे पुष्पहार, त्या दिव्याचा उजेड, वाद्यांचा आवाज, भाविकांची गर्दी .. अनपेक्षितपणे आम्हाला ह्या साऱ्याचा आनंद घेता आला.
|
जम्बुकेश्वर मंदिर |
|
जम्बुकेश्वर मंदिर |
|
जम्बुकेश्वर मंदिर |
|
जम्बुकेश्वर मंदिर |
मंदिराच्या आवारात नादस्वरम नावाच्या पारंपरिक सुषिर वादनाचे शिक्षण देणारे विद्यालय आहे.
|
जम्बुकेश्वर मंदिर |
|
जम्बुकेश्वर मंदिर |
|
जम्बुकेश्वर मंदिर |
|
जम्बुकेश्वर मंदिर |
त्रिचीमध्ये, आणखी एक सुंदर मंदिर आहे जे पंचमहाभूत मंदिरात समाविष्ट नाही, परंतु हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. ते म्हणजे रंगनाथस्वामी मंदिर.
हे एक अतिशय प्राचीन वैष्णव मंदिर आहे. चौदाव्या शतकात मोगलांनी अनेकदा लुटलेले व नष्ट केलेले असे हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. त्यावेळी मंदिराचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात १०,००० हून अधिक वैष्णव भक्त मरण पावले होते. काही दशकांनंतर, विजयनगर राजवटीत ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुन्हा पुन्हा या मंदिर आणि शहराला बर्याच हल्ल्यांचा सामना करावा लागला. पण सर्व हल्ले सहन करून, आजही हे मंदिर मोठ्या वैभवाने तळपते आहे.
|
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची. |
|
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची. |
|
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची. |
|
रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम, त्रिची. |
आम्ही पाहिलेले दुसरे पंचमहाभूत मंदिर होते चिदंबरम मंदिर.
थिल्लई नटराज मंदिर किंवा चिदंबरम नटराज मंदिर.
हे मंदिर तामिळनाडूमधील कुडलोर जिल्ह्यातील चिदंबरम शहरात आहे. हे पांडिचेरीपासून ६० कि.मी. आणि तंजावूरपासून १०० कि.मी. अंतरावर आहे.
शिव आपले सुप्रसिद्ध दैवी नृत्य करत असतानाची मूर्ती ही मंदिरातील मुख्य देवता आहे.
विशाल आवाराच्या आत बरीच लहान मंदिरे आहेत आणि चिदंबरम मंदिराचे गोपुरम, भारतातील मंदिरांच्या सर्वात उंच गोपुरांपैकी एक आहे.
हे मंदिर पंचमहाभूताच्या आकाश तत्त्वाला समर्पित आहे.
हे एक प्रसिद्ध, महत्वाचे व प्रमुख मंदिर असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. येथील शिवलिंग खूपच विलक्षण आहे. नृत्य नटराजा शिव मूर्ती आहे आणि तिथेच उजवीकडे चितसभेत एक रिकामी जागा आहे. ही जागा ग्रंथांमध्ये 'रहस्य' म्हणून सांगितली गेली आहे. ही एक पडद्याने झाकलेली जागा आहे, जी बहुधा वर आकाशाला खुली आहे. ही जागा म्हणजेच आकाश तत्वातील शिवलिंग आहे असे मानले जाते. जर तुम्हाला त्याची एक झलक पहायची असेल तर तुम्हाला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागेल!
|
थिल्लई नटराज /चिदंबरम मंदिर |
तिसरे पंचमहाभूत मंदिर, जे आम्ही पाहू शकलो ते कांची येथे होते.
एकंबरेश्वर मंदिर
हे मंदिर चेन्नई जवळच्या कांची येथे आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. येथे, गर्भगृहात, पृथ्वीचे तत्व दर्शविणारे एक शिवलिंग आहे. मंदिरातील गोपुरांमध्ये आहेत, सर्वात उंच गोपूर १९२ फूट आहे.
|
एकंबरेश्वर मंदिर, कांची 📷 विकिमीडिया कॉमन्स |
या मंदिराविषयी एक वेगळी गोष्ट म्हणजे ह्या मंदिर परिसरात पार्वती मंदिर नाही. असे म्हणतात की कांची येथील कामाक्षी मंदिर हीच एकंबरेश्वरची पार्वती आहे.
कांची कामाक्षी मंदिर.
देवीची अत्यंत सुंदर मूर्ती म्हणजे या मंदिराची मुख्य देवता. लांब रांगेत उभे रहायला लागेलच. पण तरीही देवीची मूर्ती पाहण्यास विसरू नका. अप्रतिम आहे.
|
कांची कामाक्षी मंदिर |
|
कांची कामाक्षी मंदिर |
हे मंदिर तुमच्या 'अवश्य भेट देण्याच्या ' यादीमध्ये असलेच पाहिजे. मी तर म्हणेन, सर्वात सुंदर देवी मंदिर आहे हे!
सुमारे पाच एकरांच्या विशाल परिसरामध्ये अनेक लहान मंदिरे तसेच तलाव /तीर्थे आहेत.
आपण कांचीमध्ये असतांना श्री कांची कामकोटी पीठमला भेट द्यायला विसरू नका आणि शक्य असल्यास तेथील पूजेच्या वेळी उपस्थित रहा. पाहण्या,अनुभवण्याजोगे आणि आयुष्यभर लक्षात राहण्याजोगेच दृश्य आहे ते.
कांची रेशमी आणि सुती साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. व्हीगन असल्याने, रेशमी किड्यांचा संहार करून, रेशमी वस्त्र परिधान करणे मला अजिबातच मान्य नाही. म्हणून मी जरी रेशीम विकत घेत नसले तरी मला सुंदर सुती साड्या नक्कीच खरेदी करता आल्या! आम्ही ज्या दुकानात गेलो होतो त्या दुकानात मी आत्तापर्यंत पाहिलेल्या दुकानांपेक्षा कित्येक पटींनी मोठा असा साड्यांचा साठा होता!
|
No Caption Needed! |
ह्या भागात असताना तुम्ही जेवणाची काळजीच करू नका. उत्तम, चविष्ट दक्षिण भारतीय शाकाहारी अन्न इथे मिळते.
अजून दोन पंचमहाभूत मंदिरे पाहायची राहिली आहेत. एक म्हणजे तामिळनाडू मधील अरुणाचलेश्वर मंदिर (अग्नि) आणि आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्तेश्वर मंदिर (वायु). पण त्या ट्रिपमध्ये ह्या दोन्ही मंदिरांना भेट देता आली नाही.. आता पुन्हा कधीतरी.
चेन्नई हे कांचीहून सर्वात जवळचा विमानतळ आहे. ते कांचीपासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर आहे.
Comments
Post a Comment