मुख्य सामग्रीवर वगळा

मथुरेचे कृष्ण जन्मस्थान मंदिर: इतिहास, महत्त्व आणि दर्शन

 मथुरा म्हणजे कंस. मथुरा म्हणजे तुरुंग. हे खरे होतेच. पण मथुरा म्हणजे कृष्ण जन्म हे ही खरेच ना! 

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर 
मथुरेच्या बाजाराला दही, दूध, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी तर अगदी बालवाडी पासूनच स्नेहसंमेलनात आपण सगळेजण पाहत आलो! पुढे नाटक, सिनेमा, वग या सगळ्यात या मथुरेने आपला पाठपुरावा केलेला असतो. शिवाय ‘अयोध्या केवल झांकी हैं ..काशी मथुरा बाकी हैं’ ही घोषणाही आपण ऐकलेली असतेच.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥ 
सप्तपुरी स्थान असलेली आणि श्रीकृष्णाच्या आधीपासून अगदी रामायण काळापासून असलेली ही मथुरा. शत्रुघ्नाने लवणासुराला मारून मथुरेची स्थापना केली असे पौराणिक कथांत वाचायला मिळते. वाल्मिकी रामायणांत देखील तसा उल्लेख आहे. तर यमुनेच्या तीरावर असलेल्या या प्राचीन नगरी मथुरेला कृष्णजन्मभूमी पाहण्यासाठी आम्ही यावर्षीच्या श्रावणात म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला पोहोचलो. स्टेशनवर बाहेर पडताच अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले आपल्या भोवती गोळा होतात. इथे ठाण्यात आपल्याला जिथे जायचे असेल तिथे यायला नकार देणारे रिक्षावाले सवयीचे असताना मथुरा, वृंदावन, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज या सर्व प्रवासात प्रवाशांना नेण्यासाठी उत्सुक असणारे रिक्षावाले तेही इतक्या मोठ्या संख्येने, पाहून ‘घेता किती घेशील दो करांनी’ अशी आमची स्थिती झाली! किंबहुना ईश्वर जब देता हैं तो छप्पर फाड़के देता हैं ..ह्या वाक्प्रचाराचा प्रत्यय आला. कारण सतत आपल्याभोवती घोटाळणाऱ्या ह्या रिक्शावाल्याना संयमाने, शांतपणे ‘नाही’ असे सांगत राहणे हेच एक मोठे काम होऊन बसले!!

बरं, या संपूर्ण भागात वाहने तरी किती वेगवेगळी! सायकल रिक्षा, इ रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी.. शिवाय काही ठिकाणी मोटरसायकलवर आपल्याला घेऊन जाणारे.. खरोखरीच चैन वाटत होती अगदी. स्पॉइल्ड बाय चॉईस' की काय म्हणतात तसे! 

मंदिराच्या कोपऱ्यावरच्या रस्ता 
आम्ही आधी द्वारकाधीश मंदिरात गेलो. तिथे जाण्याचा रस्ता एका छोट्या गल्लीतून आहे. त्यामुळे त्याच्या आधीच रिक्षातून उतरायला लागते. आम्ही पोहोचलो ती वेळ नेमकी आरतीची आणि नैवेद्य (तिकडे नैवेद्याला ‘भोग’ म्हणतात.) दाखवण्याची असल्याने मंदिरात तुंबळ गर्दी झाली होती. त्या ढकलाढकलीत जेमतेम दर्शन झाले. नंतर मंदिरात थोड्या वेळ बसल्यावर लक्षात आले की आता गाभाऱ्याजवळ अजिबात गर्दी नाही. मग पुन्हा जाऊन अगदी निवांत दर्शन घेतले!
द्वारकाधीश मंदिर 

द्वारकाधीश मंदिर प्रवेशद्वार 

मंदिराच्या चारी बाजूने दोन मजली हवेली असावी तशा खोल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराखेरीज आणखीही दोन दारे आहेत. 

सगळीकडे असलेली प्रसन्न आणि गडद रंगांची उधळण पाहून आपण कृष्णाच्या भूमीत आहोत याची अगदी खूणगाठ पटते. आणि त्यात हे तर राजाधिराज द्वारकाधीशाचे मंदिर! मग तिथली कलाकुसर आणि वैभव पाहण्याजोगे आहे.

द्वारकाधीश मंदिर 
बांधकामावर राजस्थानी पद्धतीची खूप ठळक छाप आहे.आत्ताचे हे मंदिर साधारण सव्वा दोनशे वर्ष जुने आहे. १८१४ मध्ये ग्वाल्हेर राज्याचे खजिनदार असलेल्या सेठ गोकुळदास पारेख ह्यांनी हे मंदिर बांधले आहे. त्या आधीही ह्या स्थानावर मंदिर होते का? असेल तर ते कोणी बांधलेले होते ह्याची काही माहिती सापडली नाही.
काळ्या कळकुळीत दगडातील श्रीकृष्णाची मूर्ती आणि पांढऱ्या संगमरवरतील राधेची मूर्ती या देवळातील मुख्य देवता आहेत. या खेरीज परिसरात इतर अनेक देवताही आहेत. 

या मंदिरातली झुलन यात्रा प्रसिद्ध आहे. झुलनयात्रा म्हणजे कृष्णाच्या जीवनावर अनेक देखावे, हलणाऱ्या पुतळ्यांच्या स्वरूपात सादर केले जातात. रोषणाई असते, सजावट असते. आम्हाला या मंदिरातली झुलनयात्रा तर बघायला मिळाली नाही. पण नंतर याच प्रवासात दुसऱ्या एका मंदिरात झुलन यात्रा बघण्याचा योग मात्र आला. 

द्वारकाधीश मंदिरात आत मात्र फोटो काढायला अनुमती नाही. त्यामुळे आतले फोटो माझ्याकडे नाही. 

या मंदिराच्या स्थानावर श्रीकृष्णाच्या आयुष्यातला कोणता प्रसंग घडला असे काही कळले नाही. मात्र जवळच असलेल्या विश्राम घाटावर कंसाला मारून झाल्यावर श्रीकृष्णाने विश्रांती घेतली होती हा उल्लेख मात्र सापडला. इथून जवळच कुब्जा आणि कृष्णभेटीचा प्रसंग घडला असे सांगितले जाते.

विश्राम घाटावरून यमुना 

यमुना धर्मराज मंदिर 

हनुमान मंदिर 

विश्राम घाट कमान 
या विश्राम घाटावर आणि घाटाच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आहेत. नुसती मंदिरेच आहेत असे नाही, तर तिथे जाणारे, पूजा करणारे भाविक आहेत. पुजारी आहेत. त्यामुळे ती मंदिरे जिवंत जागती वाटतात. 
मथुरेतील आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे ठिकाण होते ते म्हणजे कृष्णजन्मभूमी. कटरा केशवदेव मंदिर. इथेच कंसाने तुरुंग बांधला होता. इथेच कृष्णाचा जन्म झाला. 

मंदिराकडे जाणारा रस्ता 
श्रीकृष्णाच्या वडिलांचे नाव वसुदेव आणि आईचे नाव देवकी होते. कंस हा उग्रसेनाचा मुलगा म्हणजेच कृष्णाचा चुलत मामा होता. उग्रसेनाला कैदेत टाकून तो स्वतः मथुरेचा राजा झाला होता. अतिशय दुष्ट, जुलमी आणि असुरी प्रवृत्तीच्या ह्या राजाच्या राजवटीने प्रजाजन त्रस्त झाले होते. 
देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करील अशी आकाशवाणी झाल्यामुळे मृत्यूभयाने घाबरलेल्या कंसाने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकून त्यांच्या सात अपत्यांचा जन्म होताच वध केला होता. आठवे अपत्य म्हणजे कृष्ण. कृष्णाच्या जन्माची, त्याच्याजागी नंदाची मुलगी जी योगमायेचे रूप मानली जाते तिची अदलाबदल होण्याची कथा आपणां सर्वाना माहितीच आहे. 

जन्मस्थान मंदिराचे प्रवेशद्वार भव्य आहे. त्यावर रथारूढ श्रीकृष्ण आहे. अशी भव्य प्रवेशद्वारे अनेक आहेत. त्यांच्यावर कृष्णाच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे सुंदर चित्रण असलेले पुतळे आहेत. औरंगझेबाने मूळ मंदिर पाडून तिथे बांधलेली मशीद आणि आत्ताचे मंदिर हे अगदी एकमेकांला चिकटून आहे. कोर्टात ह्या स्थानाविषयी अनेक वर्षे केस चालू आहे. परिणाम स्वरूप सध्या ह्या मंदिरात लष्कराचा कडक पहारा असतो.

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर 

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर 

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर 
आपले सर्व सामान प्रवेशद्वारजवळ उभारलेल्या कक्षात जमा करावे लागते. अगदी मोबाईल फोन, स्मार्ट वोच, बॅटरी ऑपरेटेड किल्ल्या काहीही आत नेता येत नाही. त्यामुळे आपोआपच आतले फोटो देखील येत नाहीत!!

प्रशासनाने सोय मात्र अतिशय उत्तम केली आहे. भव्य परिसर आहे, सुनियोजित व्यवस्था आहे. कितीही गर्दी झाली तरी रांगा लावून सुरळीत दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे. 

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर 
📷mathura.nic.in 

(ह्या फोटोत डावीकडे मागे अगदी चिकटून असलेली मशीद देखील दिसते आहे. )

ह्या स्थानावर कृष्णजन्मस्थान मंदिर साधारण गेली ५००० वर्षे आहे. कृष्णाचा पणतू व्रज ह्याने सर्वप्रथम हे मंदिर बांधले होते असा उल्लेख सापडतो. त्यानंतर काळाच्या ओघात अनेकदा ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन अनेक राजांनी केले. आक्रमकांनी ते अनेकदा तोडले. पण त्या नंतर पुन्हा एखाद्या पराक्रमी राजाने ते भव्य स्वरूपात बांधले अशा नोंदी आढळतात. 

इ.स. ८०० मध्ये विक्रमादित्याच्या काळात बांधण्यात आलेले मंदिर इ.स.१०१७-१८ मध्ये गझनीच्या महमूदाने तोडले. इ.स.११५० मध्ये महाराजा विजयपाल देव यांच्या राजवटीत आधीच्या मंदिरापेक्षा भव्य मंदिर बांधले गेले. ते सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोदी याने नष्ट केले.

नंतर ओरछाचे राजा वीरसिंह जू देव बुंदेला ह्यांनी मंदिराचे अवशेष असलेल्या जागेवर पूर्वीपेक्षाही अधिक भव्य असे मंदिर बांधले. असे म्हणतात की हे मंदिर इतके उंच आणि विशाल होते की आग्रा येथूनही दिसत असे.

१६७० मध्ये मंदिर पाडून त्याच्याच सामग्रीतून मंदिराच्या जागेवर मशीद बांधण्याचा औरंगजेबाने हुकूम दिला आणि मग त्या नव्याने बांधलेल्या मशिदीत औरंगजेब नमाज अदा करायला गेला. 

या ईदगाहच्या मागील जागेवर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रेरणेने पुन्हा एक मंदिर स्थापन करण्यात आले. तेच हे सध्याचे मंदिर. सध्या ह्याच शाही ईदगाह संबंधी कोर्टात केस चालू आहे. 

आताचे अस्तित्वात असणारे मंदिर भव्य आहे. परिसरात अनेक देवतांची मंदिरे आहेत.

राधा कृष्ण मंदिर
📷mathura.nic.in 
अनेक भाविकांना सामावून घेईल इतके भव्य सभागृह असणारे राधाकृष्ण मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, शंकराचे आहे. केशवदेव मंदिर आहे, गिरिराजजी मंदिर आहे, दुर्गादेवी मंदिर आहे. शेजारीच देवीचे आणखी एक मंदिर आहे. अष्टभुजा योगमाया देवी इथेच प्रगट झाली होती असे मानले जाते. 

कारागृहात झालेल्या, कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून कृष्णजन्मस्थानी जाणारी भिंत आपल्याला तुरुंगाच्या गजांसारखी आणि भिंतींसारखी केलेली दिसते. शेजारीच तुरुंगाच्या भिंतीसारख्या मार्गाने पुढे गेल्यावर एक खोली येते. त्यालाच आपण गर्भगृह म्हणू शकतो. तिथे कृष्णाचा पाळणा ठेवला आहे. तिथेच आपण बालमूर्तीचे दर्शन घेतो. 

श्रावण महिन्यात इथे दिवसानुसार, तिथीनुसार वेगवेगळ्या रंगछटांची प्रकाश योजना आणि संपूर्ण सजावट असते. आम्ही गेलो तेव्हा हिरव्या रंगछटेची संपूर्ण सजावट होती. ह्या संपूर्ण परिसरात अतिशय प्रसन्न असे वातावरण आहे. जगभरातून इथे हिंदू भाविक भेट देत असतात.

वरच्या मजल्यावर गेलात की जो पूर्वीच्या मंदिरातला गाभारा होता आणि आताच्या मंदिराची जी शेवटची भिंत आहे तिथे जाऊन यायला विसरू नका. आपल्या मनात कृष्ण इतका वसलेला असतो की तिथे संगमरवरात जे नैसर्गिक डिझाईन असते ते देखील आपल्याला श्रीकृष्णासारखेच दिसते! गंमत म्हणजे असे वाटणारे आपण एकटेच नसतो, तर आपल्या आसपासच्या अनेक भाविकांना तसेच वाटत असते!

प्रत्यक्ष श्रीकृष्ण जन्मस्थानावर पूर्वीचे मंदिर होते, ते पाडून मशीद बांधली गेली आहे. त्यामुळे आता कोर्टाचा निकाल काय लागतो? ती जमीन देवस्थानाला मिळते का? प्रत्यक्ष जन्मस्थानी भव्य मंदिर बांधले जाते का ह्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर प्रवेशद्वार 

रात्रीची रोषणाई 
📷mathura.nic.in 

अवांतर माहिती- श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये साधारण सकाळी ५ ते १२ आणि दुपारी ४ते ९.३० असे उघडे असते. हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल मध्ये सकाळी ५.३० ते १२ आणि दुपारी ३ ते ८.३० असे उघडे असते. तेव्हा मंदिरात जाण्यापूर्वी चौकशी करून जा म्हणजे वेळ वाया जाणार नाही.
मथुरा हे गावच कृष्णमय आहे. मथुरा जंक्शनवर आपण बाहेर येतो तर हे दृश्य दिसते!
मथुरा जंक्शन 
#Shri Krishna Janmabhoomi, #Krishna Janmasthan Mandir, #Mathura Temple, #Birthplace of Lord Krishna, #Krishna Janmabhoomi Mathura, #Mathura Vrindavan Trip, #Places to Visit in Mathura, #Mathura Tourism, #Uttar Pradesh Tourism, #Incredible India, #Spiritual Travel India, #Indian Pilgrimage Sites, #Lord Krishna, #Hare Krishna, #Jai Shri Krishna, #Sanatan Dharma, #Hindu Temples, #Vaishnavism, #Braj Bhoomi, #श्रीकृष्ण जन्मभूमी, #कृष्ण जन्मस्थान मंदिर, #मथुरा मंदिर, #मथुरेचे कृष्ण मंदिर, #भगवान कृष्णाचे जन्मस्थान, #मथुरा वृंदावन दर्शन, #मथुरेतील प्रेक्षणीय स्थळे, #मथुरेत फिरण्याची ठिकाणे, #मथुरा प्रवास माहिती, #तीर्थक्षेत्र दर्शन, #भगवान श्रीकृष्ण, #जय श्रीकृष्ण, #ब्रजभूमी, #धार्मिक प्रवास, #कृष्ण भक्ती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....