मागे एका पोस्टमध्ये आपण प्रचंड मोठ्या आणि सुंदर बृहदेश्वर मंदिराविषयी वाचले होते. (Here! ) तंजावर मध्ये बघण्याजोगी अजून देखील बरीच ठिकाणे आहेत. तंजावर तामिळनाडू राज्यात आहे.
मराठा पॅलेस आणि म्युझियम हे तर नक्कीच बघण्याजोगे आहे. राजवाड्याच्या भिंतींवर रंगवलेली चित्रे आता फिकी झाली आहेत आणि राजवाड्याला दुरुस्तीची आणि देखभालीची खूप गरज आहे हे बघताना सतत जाणवत राहते. राजवाड्यातच रॉयल पॅलेस म्युझियम आणि आर्ट गॅलरी आहेत. तिथे अतिशय सुंदर कलावस्तूंचा संग्रह आहे. धातूच्या पुरातन मूर्तींचा मोठा संग्रह आहे. अनेक शतकांच्या आणि शतकांतल्या आहेत ह्या मूर्ती! नाण्यांचा संग्रह आहे. काही चित्रे आहेत. शस्त्रे देखील आहेत. राजघराण्यातील काही कपडे देखील ठेवलेले आहेत.
आम्ही राजवाड्याला दिनांक १७ ऑगस्ट २०१८ ला भेट दिली तेव्हा दरबार हॉल काही दुरुस्तीच्या कारणासाठी बंद होता.
Darbar Hall 📷 Wikimedia Commons |
The royal palace museum 📷 Wikimedia Commons |
तिथेच एक सुंदर मनोऱ्यासारखी इमारत आहे. त्यातील सर्वात वरचा मजला टेहळणीसाठी असावा असे वाटते. परिसरात संगीत महाल म्हणून पण एक इमारत आहे. एका बोगद्यासारख्या जिन्याने राजवाड्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाता येते.
राजवाड्याच्या आवारात, सरस्वती महाल ग्रंथालय आहे. आशिया खंडातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी हे एक. इथे पुस्तके, हस्तलिखिते आणि भूर्जपत्रांचा विशाल संग्रह आहे. विविध विषयांवरची दुर्मिळ आणि पुरातन पुस्तके असलेला हा खजिना आश्चर्यचकित करणारा आहे.
ह्या ग्रंथालयाची सोळाव्या शतकात स्थापना झाली ते नायक राजवटीतील राजांसाठी शाही ग्रंथालय म्हणून. नंतरच्या मराठा राजांनी पण संग्रहात मोलाची भर घातली व ग्रंथालय जतन केले. विशेषतः सर्फोजीराजे भोसले ह्यांनी देशोदेशींचे विविध भाषेतले तसेच देशभरातील दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते मिळवण्यासाठी अपार प्रयत्न केले व सरस्वती महाल ग्रंथालयाला त्याचे आत्ताचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांचे नाव ग्रंथालयाला देणे औचित्यपूर्ण होते. आता हे ग्रंथालय 'महाराज सर्फोजीराजे भोसले सरस्वती महाल ग्रंथालय' म्हणून ओळखले जाते. ह्या ग्रंथालयात हस्तलिखिते आणि पुस्तके मिळून नक्कीच लाखाच्यावर संग्रह असेल!
तळमजल्यावर ग्रंथालयाचे संग्रहालय आहे. ग्रंथालयात काय काय पाहायला मिळणार आहे ह्याची झलक आपल्याला इथे दिसते. नुसते ते संग्रहालय नीट पाहायचे असेल तरी काही तास राखून ठेवायला हवेत. आम्ही तळमजला पाहिला आणि ग्रंथालय बंद होण्याची वेळ झाल्याने उद्या परत येऊ, असे ठरवले.
पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी, भूतपूर्व पंतप्रधान व आपल्या सर्वांचे लाडके नेते मा. अटल बिहारीजी वाजपेयी ह्यांच्या दुःखद निधनानिमित्त राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला व सर्व शासकीय संस्था बंद राहिल्या. सरस्वती महाल ग्रंथालय आता तामिळनाडू सरकारच्या अखत्यारीत आहे.
राजवाड्याच्या आवारातील प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे तिकीट आहे. पण मला वाटते सगळ्याचे मिळून एकत्र असे, एकच तिकीट घेता येत असावे. सरस्वती महाल ग्रंथालयात एक पुस्तकांचे दुकान आहे. बाहेर कुठे मिळणार नाहीत अशी जुनी व काहीशी दुर्मिळ, सरस्वती महाल ग्रंथालयाने प्रकाशित केलेली पुस्तके इथे मिळतात.
त्याच ट्रीपमध्ये आम्ही अजून एका महत्वाच्या ठिकाणाला भेट दिली ती म्हणजे रामदास स्वामी मठाला! महाराष्ट्राचे संत रामदास (१६०८-१६८१) ह्यांनी अफगाणिस्तान पासून ते सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंके पर्यंत प्रवास केला. समाजाला जागृत करणे व ऐक्य घडवणे हे त्या दौऱ्यामुळे साध्य झाले.
रामदास स्वामी एक थोर संत, कवी, तत्वज्ञ आणि अध्यात्मिक गुरु होते. ते छत्रपती शिवाजीमहाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. जेव्हा त्यांच्या भारत भ्रमणात समर्थ रामदास स्वामी ह्यांनी तंजावरला भेट दिली तेव्हा तात्कालिन मराठा राजवटीचे राजे व्यंकोजीराजे भोसले ह्यांनी देखील त्यांचे शिष्यत्व पत्करले.
रामदास स्वामींनी देशभरात हजाराहून जास्त मठांची स्थापना केली. ही अभ्यासाची, पूजेची केंद्रे तर होतीच पण शक्तिसंवर्धनाची, चेतना जागृतीची केंद्रे देखील होती. त्यांनी तंजावरला एक मठ स्थापन केला व आपले शिष्य भीमस्वामी ह्यांना तिथे राहून मठाची देखभाल करण्यास सांगितले. भीमस्वामी तिथे अनेक वर्षे म्हणजे त्यांच्या अंतापर्यंत राहिले, मठाची देखभाल केली, इतकेच नव्हे तर तंजावरमध्येच आणखी काही मठांची स्थापना केली.
आम्ही ज्या मठात गेलो, तो सापडायला जरा कठीण गेला. खूप वेळ आम्ही दुतर्फा घरे असलेल्या गल्लीबोळातून फिरलो, मग अखेर तो सापडला. रॉयल पॅलेस पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर आहे हा मठ.
आम्ही मठाधिपतींच्या वारसांना भेटू शकलो. ते आता मठाची व्यवस्था बघतात. त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली.
भरपूर हिंडल्यावर जेव्हा आम्हाला हा कळस दिसला तेव्हा आपण योग्य ठिकाणी पोचल्याची जाणीव झाली!
असे म्हणतात की रामदास स्वामींचे हे मूळ चित्र आहे. त्यांना प्रत्यक्ष बघून काढलेले. तसे असेल तर मग हे चित्र काही शतके जुने आहे असेच म्हणावे लागेल. तसेच ही झोळी देखील काही शतके जुनी आहे असे सांगण्यात आले. इथे असलेले रामपंचायतन आणि चाफळच्या मंदिरातील रामपंचायतन हे दोन्ही सारखे आहे असे म्हणतात. तंजावर जवळच्या एका कलाकाराकडून समर्थानी घडवून घेतलेल्या मूर्ती आहेत ह्या.
तुम्हाला बघायचे असेल, तर तुम्ही दासबोधाच्या हस्तलिखित प्रतीविषयी त्यांना विचारू शकता. आम्हाला खूप उत्सुकता होती आणि खरोखर हस्तलिखित दासबोध बघायला मिळाल्याने फार आनंद झाला.
भिक्षाफेरी उत्सवाच्या वेळी काढली जाते. भजने म्हणत अनेक लोक त्यात सामील होतात. त्यात मराठी तसेच अमराठी लोकांचा समावेश असतो असे कळले. हा उत्सव वर्षप्रतिपदा ते रामनवमी असा असतो की दासनवमीला ते मात्र मी आता विसरले.
तुम्ही तंजावर ला जाणार असाल तर ह्या मठांना नक्की भेट द्या. त्यांनी हे मठ अनेक शतके सांभाळले आहेत. आपण भेट देऊन, काही सहभाग राशी देणे, कमीतकमी इतके तर करूच शकतो. कोणी जाणार असेल तर त्यांना सांगा. मला देखील माझ्या मैत्रिणीने सांगितले होते म्हणूनच जायचे लक्षात आले.
तंजावर कसे आहे? तर हे एक मध्यम आकाराचे उत्साही आणि गजबजलेले शहर आहे. दुकानांनी, लोकांनी ओसंडणारे रस्ते आणि बाजार, खूप सुंदर देवळे, मशिदी, चर्चेस ह्या शहराला त्याचे व्यक्तिमत्व प्रदान करतात. रस्त्यांवर बेताची वाहतूक व वर्दळ असते. त्यामुळे गर्दीला सरावलेल्या आपल्या डोळ्यांना चुकल्या चुकल्यासारखे होत नाही!!
तंजावर मध्ये उत्तम प्रतीची सुटी वस्त्रे अतिशय रास्त दरात मिळतात. मला तिथे एक छानशी सुती साडी घेता आली.
आणि हे विसरू नका!!
समर्थरामदास स्वामींच्या मठ बघितलास किती मस्त 🙏🙏🙏
ReplyDeleteवा तिकडे जाऊन मठात जाणे मस्त वाटले असेल ना
ReplyDelete