नाशिक (महाराष्ट्र राज्य, भारत) आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत, काही प्राचीन मूर्ती आणि मंदिर रचनेसाठी प्रसिद्ध आहेत तर काही वाईनरीज आहेत.
पण अशी एक जागा आहे जिथे यापैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही संपूर्ण भारतातील लोकांना तेथे जाण्याची इच्छा असते. त्या स्थळाचे नाव आहे भगूर!
भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे. जर आपण नाशिकहून जात असाल तर आपल्याला देवळाली लष्करी भागातील सुंदर परिसर ओलांडून जावे लागेल. स्वच्छ आणि सुंदर, उत्तम देखभाल केलेल्या बागा आणि इमारती आणि खूप मोठमोठे, शतकभराचे जुने वृक्ष ह्यामुळे हा रस्ता नक्कीच संस्मरणीय होतो.
मला खात्री आहे की आपणा सर्वांना भगूर बद्दल माहिती असेल आणि प्रत्येक भारतीयाला भगूरला भेट द्यावीशी का वाटते ते देखील माहिती असेल.
भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे.
असे म्हणतात की या गावचे नाव भृगु ऋषींच्या नावावरून पडले आहे. भृगु ऋषींचा आश्रम ह्या भागात होता.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म २७ मे १८८३ ह्या दिवशी भगूर येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात झाला. सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती आणि सध्या सावरकर स्मारकाचे श्री. रणजित सावरकर हे ह्या वास्तूची व्यवस्था पाहत आहेत. इथे लवकरच सावरकर संग्रहालय विकसित केले जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर |
सावरकर वाडा |
सावरकर वाड्याचा काही भाग |
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची कविता - स्वातंत्र्यदेवी स्तोत्र |
जीर्णोद्धाराच्या आधी व नंतर |
दार बंद कारण्यासाठी जुनी पद्धत -आगळ |
बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यामध्ये तीन मजले आहेत. एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे, जो घरापासून नदीपर्यंत जातो. आता हा भुयारी रस्ता पुढे बंद केलेला असला तरी आपण सुरुवातीच्या पायऱ्या अजूनही पाहू शकतो!
आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी सशस्त्र क्रांतीची शपथ जिथे घेतली होती ती जागा म्हणजे त्यांच्या भगूरमधील घरातले देवघर. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, त्या देवीची मूर्ती पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस, सर्व सावरकर बंधू भगूरच्या बाहेर असल्याने, ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली.
देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पितळ किंवा पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.
सावरकरांनी चौदा/ पंधराव्या वर्षी ह्या देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती," महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्यासाठी ते अखेरपर्यंत झटले.
तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर मध्ये पाहू शकतो.
आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो.
जेव्हा सावरकर अंदमान जेलमध्ये होते तेव्हा त्यांना गळ्यात एक कैद्याचा बिल्ला घालायला लागायचा. त्याची प्रतिकृती आपण सावरकर वाड्यात पाहू शकतो. त्या बिल्ल्यावर कैद आणि सुटकेच्या दिनांकांच्या मध्ये आपल्याला 'D' दिसेल. 'D ' म्हणजे डेंजरस.
आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी.
स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
ReplyDeleteInformative post,,,🙏🙏 Thanks for sharing this
ReplyDeleteसावरकरांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!!
ReplyDeleteज्वाला ही धगधगती, उजळे दिव्य शौर्य पराक्रमा ।
ReplyDeleteसळसळला तेजस वारसा, त्रिवार वंदन स्वातंत्र्य सूर्या,
तुला विधिज्ञ विनायका ।
मी स्वा.सावरकरांना पाहिले आहे.केसरी वाडा,14जाने.(1962/3)संक्रांत.अविस्मरणीय प्रसंग!मी त्यांना तिळगूळ देऊन नमस्कार केला. त्यांनी मला तिळगूळ देऊन,'बाळ,तिळगूळ घे,गोड बोल',आशिर्वाद दिला. मी आमरण तो आशिर्वाद पाळत आहे.----धन्यवाद!
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन .
ReplyDeleteस्वातंत्र्यवीर सावरकर यांना शत शत नमन त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती खरी करून दाखवली व त्यासाठी पराक्रमाची शर्थ केली यातच त्यांचे महत्व लक्षात येते व येणाऱ्या प्रत्येक पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे
ReplyDeleteस्वातंत्र्यवीर सावरकर यांना शत शत प्रणाम
ReplyDeleteGreat personality. Namaskar..
ReplyDeleteI wish I could visit
ReplyDelete