मुख्य सामग्रीवर वगळा

कुंभलगड - एक आश्चर्य - भारतातील सर्वात जास्त लांबीची भिंत. 

मागच्या आठवड्यात मी माझ्या टेराकोटा सेना ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये चीनच्या प्रसिद्ध भिंतीचा उल्लेख केला होता. म्हणून ह्या वेळी ठरवले होते की तुम्हाला ती चीन ची भिंत दाखवायला घेऊन जावे. पण मग वाटले तुम्हाला भारतातली प्रसिद्ध भिंतच दाखवावी, कदाचित ही भारतातली भिंत पण बऱ्याच जणांना माहितीच नसेल! 

संपूर्ण जगातील क्रमांक दोनची लांब भिंत म्हणून ही भिंत जगभरात प्रसिद्ध आहे. युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून पण घोषित केलेलं आहे. हे ठिकाण आहे तळ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या, राजस्थानमधील उदयपूर ह्या शहरापासून साधारण ९० किलोमीटर वर. ही भिंत बांधली गेली आहे कुंभलगड किल्ल्याची संरक्षक भिंत म्हणून. 




कुंभलगड 
📷 गिरीश टिळक 


अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर कुंभलगड किल्ला आहे. राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगड वन्य जीव अभयारण्यात हा किल्ला वसलेला आहे. त्याची अतिशय दुर्गम जागा आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना ह्यामुळे कुंभलगड हा अजेय आणि अभेद्य किल्ला बनला आहे. मेवाड भागातील सर्वात भक्कम किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक लागेल. 

हा किल्ला पंधराव्या शतकात राणा कुंभ ह्यांनी बांधला. फक्त हा किल्लाच नव्हे तर मेवाडचा इतिहास देखील राणा कुंभाचे नाव एक शूर योद्धा म्हणून लक्षात ठेवतो. राजस्थानमधील अनेक छोटी छोटी राज्ये त्यांनी एकत्र केली. आक्रमकांविरुद्ध, मुस्लिम सुल्तानांविरूद्ध राणा कुंभांनी जोरदार लढा दिला. त्यांचे राज्य रणथंबोर पासून ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर पर्यंत पसरले होते. 


महाराणा कुंभ 
📷Commons Wikimedia.org

राणा कुंभांनी एकूण ३२ किल्ले बांधले किंवा त्यातील बऱ्याचशा किल्ल्यांचे पुनरुज्जीवन केले. चित्तोडगड वरील कीर्तिस्तंभ देखील त्यांनीच बांधलेला आहे. हा सात मजली सुंदर विजयस्तंभ मोहम्मद खिलजीवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून बांधण्यात आला आहे. 


 महाराणा कुंभ ह्यांनी बांधलेला कीर्तिस्तंभ, चितोडगड. 
📷Commons Wikimedia.org

महाराणा कुंभ अतिशय चांगले वीणावादक होते तसेच त्यांना संगीतात देखील चांगली गती होती. वेद आणि उपनिषदांचे त्यांनी अध्ययन केलेले होते. 
असे म्हणतात की ह्या ठिकाणी साधारण दुसऱ्या शतकात एका जैन राजपुत्राने छोटा किल्ला वसवला. पण मध्ये अनेक शतके हा किल्ला विस्मृतीत गेला होता, दाट जंगलात,विजनवासात होता. महाराणा कुंभ ह्यांनी ह्या जागेचे आणि पर्यायाने दुर्गम किल्ल्याचे महत्व ओळखले आणि तो साधारणपणे सध्या आहे त्या स्वरूपात बांधून घेतला. त्या काळाचे विख्यात वास्तुरचनाकार मदन ह्यांनी हा किल्ला बांधण्यात सहाय्य केले आहे. १४४३-१४५८ इतकी वर्षे बांधकाम चालू होते. 

तो राजस्थानमधील सर्वात उंच किल्ला आहे. तुम्ही उदयपूर किंवा जोधपूरहून कुंभलगडला जाऊ शकता. तुमच्या राजस्थान सहलीत ही दोन्ही ठिकाणे तर असणारच. 

पर्यटकांची वाहने किल्ल्यात आणायला परवानगी नाही. त्यामुळे ती बाहेर उभी करून आत चालत जायला लागते. किल्ल्याच्या भव्य विस्तारात अनेक दरवाजे आहेत. त्यांना तिथे पोल म्हणतात. आपल्याला हनुमान पोल, राम पोल असे अनेक दरवाजे बघायला मिळतात. माझ्या आठवणीने ह्या वाहन तळाजवळच्या फोटोतल्या दरवाजाचे नाव राम पोल होते. 
 

वाहनतळावरून दिसणारे किल्ल्याचे दृश्य 
📷 गिरीश टिळक 


हनुमान पोल 


किल्ल्याच्या आत निवासी भाग देखील आहे. तिथे लोक राहतात. त्यामुळे आपल्याला नव्या पद्धतीची अनेक घरे, झोपड्या, अपार्टमेंट्स असे सगळे तिथे दिसते. पण तरीही त्या भव्य परिसरात विखुरलेल्या जुन्या इमारती नक्की लक्ष वेधून घेतातच. 


किल्ल्याच्या आतला भाग 

विविध टेकड्यांवर मिळून हा किल्ला बांधला आहे. त्या टेकड्यांच्या चढ उतारांवर बांधलेला किल्ला असल्याने कित्येक ठिकाणी रस्त्याला अगदी खडी चढण आहे. ह्या फोटोत देखील रस्त्याला असलेला चढ तुम्ही बघू शकता! किल्ल्यात अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. त्यांची संख्या तीनशेहून अधिक आहे असे म्हणतात. 


किल्ल्यातील मंदिर 
📷 गिरीश टिळक 


किल्ल्यातील अनेक मंदिरांपैकी एक मंदिर

 
किल्ला 

खालून दिसणारे कुंभ महालाचे दृश्य 

किल्ल्याची सुंदर भिंत 

किल्ल्याची सुंदर भिंत.

जरा चढून वर आलात की तुम्हाला किल्ल्याचा भव्य परिसर आणि ती सुप्रसिद्ध लांब भिंत दिसू लागते. कुंभलगड जगातील दोन नंबरच्या लांब भिंतीसाठी प्रसिद्ध आहे. ही भिंत जवळपास ३२ ते ३४ किलोमीटर लांबीची आहे. भिंतीचा काही भाग अभयारण्यातून जातो. तुम्ही त्या भिंतीवरून चालत चालत एक संपूर्ण फेरी मारू शकता. पण सोबत मार्गदर्शक मात्र घेऊन जा. कारण अभयारण्यात वन्य प्राणी देखील आहेत. ज्या ठिकाणाहून निघाला असाल तिथे फेरी पूर्ण करून परत यायला किमान दोन दिवस तरी लागतील.


वरून दिसणारे किल्ल्याचा परिसर आणि भिंत. 


किल्ला,भिंत आणि अरावली पर्वत रांगा.

कुंभलगड ची सुप्रसिद्ध भिंत 
📷 गिरीश टिळक 


भिंत काही ठिकाणी इतकी रुंद आहे की एकावेळी शेजारी शेजारी असे आठ घोडे धावू शकतील. विशेष गोष्ट अशी की भिंत सरळ रेषेत बांधलेली नाही तर वेगवेगळ्या टेकड्यांची जशी नैसर्गिक वळणे असतील त्या नुसार बांधलेली आहे.

किल्ल्यावर देखील काही एकदम अवघड वळणे आहेत. त्यामुळे शत्रूने चढाई केली तरी शत्रूला आत येणे अवघड होत असणार. हा किल्ला म्हणूनच कोणी जिंकू शकले नाही. एकदाच मुघलांनी कब्जा केला होता पण तो देखील नेहमीच्या मुगल पद्धतीप्रमाणे कपटाचा आधार घेऊन, पाण्यात विष कालवून. अश्या मार्गाने जिंकून घेतलेला किल्ला ते फार काळ स्वतःकडे राखू शकले नाहीत. राजपूत राजांनी तो परत जिंकून आपल्या ताब्यात घेतला. ह्या किल्ल्याला अनेक युद्धांचा, कटांचा, सत्तेच्या हव्यासाचा इतिहास आहे. 

भिंतीवर अनेक ठिकाणी टेहळणी बुरुज आहेत. भिंतीला छोट्या छोट्या कोनाड्यांप्रमाणे खिडक्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे तिरंदाज त्यातून नेम धरून शत्रूवर बाण तर मारू शकतील पण त्यांना स्वतःला भक्कम दगडी भिंतीचे संरक्षण असेल. 


टेहळणी बुरुज 


किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे. त्यामुळे नक्कीच मार्गदर्शकाची आवश्यकता भासते. अन्यथा काय बघायचे, कुठल्या मार्गाने जायचे हे कळणारच नाही. वाहन तळा जवळ तिकीट खिडकी आहे तिथे मार्ग दर्शक मिळू शकतात. 

किल्ल्याच्या आतल्या इमारती म्हणजे नुसत्या भिंती, रिकाम्या खोल्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा तरी तिथे चित्रे, काही कलाकृती असे काही नव्हते. ते सगळे म्हणे गेले आहे, निरनिराळ्या वस्तू संग्रहालयात आणि काही हॉटेल्स मध्ये. 

पगडा पोल जवळ एक खास वास्तू आहे जिचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. ते आहे महाराणा प्रतापचे जन्मस्थळ! आयुष्यभर लढत राहून, मुगल राजा अकबराला विरोध करत आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवणारा महाराणा प्रताप! 
 


महाराणा प्रताप जन्मस्थळ 


ही इमारत महाराणा प्रताप जन्मस्थळ म्हणून दाखवली जाते. कुंभलगड ह्या नावाशी आणखी एक आख्यायिका जोडली गेलेली आहे. राणी कर्णावतीची मदतनीस आणि राजा उदयसिंग (दुसरा) ह्याची दूध आई असलेली पन्नादाई आपण सर्वाना माहिती आहेच. तिने स्वत:चा मुलगा चंदन ह्याचा बळी देऊन बाल राजा उदयसिंग (दुसरा) ह्याचे प्राण वाचवले. मग उदयसिंग (दुसरा) ह्याला गुप्तपणे कुंभलगड ला आणण्यात आले. दुसऱ्याच नावाने इथेच वाढविण्यात आले आणि इथेच त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच सुमारास त्याला ह्याच किल्ल्यावर पुत्रप्राप्ती झाली. तो पुत्र म्हणजेच प्रतापसिंग जो पुढे महाराणा प्रताप म्हणून विख्यात झाला. पन्नादाईचे नाव असलेली एक जागा देखील किल्ल्यात दाखवली जाते.

बादल महाल 

किल्ल्यात सर्वात उंच ठिकाणी असलेली बादल महाल ही इमारत त्या मानाने नवी म्हटली पाहिजे. राजा फतेसिंगानी एकोणिसाव्या शतकात बांधली आहे ही इमारत. त्या महालाचे दोन स्वतंत्र भाग आहेत, जे जिन्यांनी आणि एका रस्त्याने एकमेकांना जोडले गेले आहेत. ते दोन भाग जनाना आणि मर्दाना निवासासाठी होते असे सांगितले जाते. 

जोडणारा रस्ता 



बादल महालातून दिसणारे दृश्य 



बादल महालाची हवेशीर खिडकी
📷 गिरीश टिळक 

पावसाळ्यात हा महाल संपूर्णपणे ढगांनी आच्छादलेला असतो, म्हणून त्याचे नाव बादल महाल. किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणावरून दिसणारे दृश्य इतके सुंदर आहे की इतके जिने आणि चढाचे रस्ते पार करून इथे पोचल्याचे सार्थक होते. अरवलीच्या पर्वतरांगा तर दिसतातच पण हवा स्वच्छ असेल तर पार अगदी दूरवरचे वाळवंट देखील इथून दिसते म्हणतात. 

सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावर एक सुंदर, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने इतिहास जिवंत करणारा कार्यक्रम असतो. तो नक्की पहा. नंतर तासभर किल्ल्यावर रोषणाई केलेली असते. छायाचित्र कारांसाठी तर ही पर्वणीच असेल. आम्ही मात्र हा कार्यक्रम बघू शकलो नाही. आम्हांला दुपारी निघून रात्रीपर्यंत पुष्करला पोचायचे होते. 

किल्ल्यात जरी काही चित्रे, कलाकृती नसल्या तरीही कुंभलगड हे अगदी नक्की भेट द्यावी असेच ठिकाण आहे. ती सुप्रसिद्ध भिंत, सुंदर वास्तू, महाराणा प्रतापाचे जन्मस्थळ आणि अरवलीच्या पर्वत रांगा. तुमचे मन नक्कीच आकर्षून घेतील. 

कुंभलगड ला भेट देण्याचा सर्वात चांगला काळ आहे ऑक्टोबर ते मार्च. त्या नंतर खूप उन होते. आधी जुलैच्या सुमाराला, पावसाळ्यात पण सगळे हिरवेगार आणि सुंदर दिसते म्हणतात. पण रस्ते मात्र निसरडे झालेले असतात. 

किल्ल्यातला चढ बराच आहे, काही ठिकाणी अवघड पण वाटेल. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी एक काठी सोबत घ्यायला हवी. पण तरीही इथे जा नक्की!! सगळ्या मंदिरांसकट गड बघायचा असेल तर मात्र संपूर्ण दिवस राखून ठेवा. नाहीतर मग तीन चार तास पुरेसे आहेत. 
तुम्ही किल्ल्याच्या अगदी जवळ येईपर्यंत तुम्हाला इथे एखादा किल्ला आहे आणि तो देखील एवढा अजस्त्र हे कळत देखील नाही हे ह्याच्या रचनेचे आणि वळण वळणांच्या रस्त्यांमुळे घडवलेले नवल आहे. म्हणूनच हा किल्ला कायम राजपूत राजांचे आश्रयस्थान, संकटांपासून वाचण्याचे ठिकाण होता. 

#TheLongestWallInIndia #SecondLongestWallInWorld #RajputKingsLegends #GreatWarriorMaharanaPratap #WondersOfArchitecture #PlacesToSeeInRajasthan #WhatShouldYouKnowBeforeTravellingToRajasthan 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...