मला वाटते तुम्ही आधी बाँपो म्युझियम बघून मनाची तयारी करावी, नंतर टेराकोटा योध्दे प्रतिकृती बनताना पाहून, मग आपल्याला काय पाहायचे आहे त्या विषयीच्या कल्पना कराव्यात आणि मग टेराकोटा योध्दे सापडले ते ठिकाण पाहायला जावे. सरळ टेराकोटा योध्देच बघायला जाणे थोडे धक्कादायक होऊ शकते.
टेराकोटा सेना |
आधुनिक काळातील उत्खननात टेराकोटा सेनेचे उत्खनन हे खूपच, जवळपास सर्वात महत्वाचे उत्खनन आहे. काय आहे ही टेराकोटा सेना आणि ती कशी सापडली? आपण ते नंतर बघू या. आधी मी म्हटले तसे बाँपो संग्रहालय बघायला जाऊ या.
बाँपो म्युझियम |
चीन मधील शान्क्सि भागात बाँपो म्युझियम आहे. शियान शहराजवळच्या एका प्रागैतिहासिक उत्खनन स्थळाजवळ हे म्युझियम उभारलेले आहे. ६००० वर्षांपूर्वीच्या खेड्यातील जीवन कसे असेल ह्याची झलक आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रदर्शन कक्षात उत्खननात सापडलेल्या अनेक कलाकृती पाहायला मिळतात.
बाँपो येथे सापडलेली चित्राकृती |
बाँपो येथे सापडलेली ही एक चित्राकृती. ह्या चित्रात मासे, माणूस आणि डोंगर दाखवला आहे. चित्रलिपीतील काही अक्षरे दगडावर किंवा एखाद्या खापरावर कोरलेली अशी देखील ह्या उत्खननात सापडली आहेत.
बाँपो ला आपण एक व्यवस्थित आराखड्यानुसार आखलेली, सगळीकडून खंदकाने सुरक्षित केलेली अशी वसाहत, म्हणजे तिचे अवशेष पाहू शकतो. ह्या वसाहतीचा कालावधी आहे, ५००० B.C. ते ३००० B.C. म्हणजे जवळपास सहा ते सात हजार वर्षांपूर्वीच्या ह्या वसाहती आहेत.
काही घरांचा पाया, जोती आपण ह्या उत्खनन स्थळी पाहू शकतो.
सहा हजार वर्षांपूर्वीचा घराचा पाया |
त्या वेळी घरांच्या भिंती लाकडाच्या भुश्यापासून केलेल्या असाव्यात व वाळलेल्या गवताने शाकारलेली छपरे असावीत असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. तिथे सापडलेल्या आराखड्यानुसार बांधलेली काही घरे प्रदर्शनीत आपण पाहू शकतो.
मूळ आराखड्यानुसार बांधलेली घराची प्रतिकृती |
असे वाटते की त्या गावाचे तीन भाग असावेत. एक होता राहण्यासाठी घरे असलेला भाग. दुसरा होता कुंभारकाम चालायचे, त्यासाठी अवजारे आणि भट्ट्या असलेला भाग. इथे सापडलेली काही अवजारे आणि भट्ट्यांचे भाग प्रदर्शनीत मांडलेले आहेत. तिसरा होता दफन विधी साठी नियुक्त केलेला भाग. लहान मुलांना पुरण्यासाठी वापरले जाणारे रांजण आणि मोठ्या माणसांची थडगी उत्खननात सापडली आहेत. म्हणून मग गावातील ह्या भागाला दफनभूमी असे म्हटले जाते.
गावातली दफनभूमी |
प्रदर्शनातली चिनी म्हण |
प्रतिकृती तयार होत आहेत. |
मी ५०००वर्षांची आहे??? |
सम्राटाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा सिंहासनाचा वारस होता. पण त्याच्या दुसऱ्या मुलाला सत्ता हवी होती. त्यासाठी त्याने आपल्या सर्व सख्ख्या व सावत्र भावांना मारून टाकले. एवढेच काय सिंहासनाला आपल्याखेरीज इतर कोणीच वारसदार राहू नये म्हणून वडिलांच्या सर्व रखेल्याना देखील मारून टाकले. न जाणो, त्यातील एखादी सम्राटाच्या मृत्यूच्या वेळी गरोदर असेल, तो वारस कुठेतरी गुप्तपणे वाढवला जाईल आणि नंतर सिंहासनावर हक्क सांगायला येईल म्हणून. त्या सर्वांचे मृतदेह त्याच परिसरात पुरले गेले आहेत.
इतक्या अघोरी रक्तरंजित मार्गाने सत्ता मिळवलेल्या त्या राजपुत्राला केवळ तीन वर्षे राज्य करता आले.
जो सम्राट होता, Qin Shi Huangdi त्याला मृत्यूनंतर काय ह्याची खूप उत्सुकता होती. माणसाला अमर करणाऱ्या औषधीच्या शोधात त्याने अनेक प्रवास केले होते, अनेक वर्षे तो शोध घेत होता. मृत्यूनंतरच्या आयुष्यातही आपल्या सोबत असावी म्हणून त्याने ही सगळी टेराकोटा सेना उभारली असे म्हणतात.
गेल्या जवळपास पन्नास वर्षात, अगदी नेमके सांगायचे तर ४६ वर्षात पुरातत्व खात्याला ६०० तळघरे सापडली आहेत. त्यातील काही तळघरे अजून उघडता आलेली नाहीत. काही तळघरात मात्र प्रवेश करता आला आहे.
त्यातील दोन तळघरे अशी होती की त्यात काहीतरी संपूर्णपणे जाळून टाकले गेले होते. काय होते त्यात? कोणाला जाळले गेले? का जाळले गेले? कोणालाच माहिती नाही.
बाकी तळघरातून सैनिकांच्या तुकड्या युद्ध करण्यासाठी तयार असलेल्या अवस्थेत उभ्या दिसतात. कोणाशी युद्ध? मृत्यूशी तर नव्हे? कोणालाच माहिती नाही.
सेना संरक्षण करण्यासाठी नेमली गेली आहे का? कोणाचे आणि कशापासून संरक्षण? कोणालाच माहिती नाही.
हे सगळे सैनिक आपापल्या हुद्द्याप्रमाणे उभे आहेत. सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. पायदळ, घोडेस्वार, शस्त्रधारी घोडेस्वार एका व्यूहरचनेत उभे आहेत. त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा आहे. बाजूच्या तळघरातून गायक, वादक, कसरतपटू, दरबारी अधिकारी, चित्रविचित्र प्राणी ह्यांचे पुतळे सापडले आहेत.
टेराकोटा सेना |
घोडदळ |
पायदळ |
तळघरे |
युद्धासाठी सज्ज |
स्वारांची वाट पाहणारे घोडे |
पुतळ्यांची दुरुस्ती, देखरेख |
दर्शिका |
उच्चपदस्थ अधिकारी |
उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे वर्णन |
विविध पदांवरील सैनिक आणि अधिकारी आपापल्या पदानुसार गणवेश घातलेले आणि शस्त्रे धारण केलेले दाखवले आहेत.
धनुर्धारी |
धनुर्धाऱ्याचे वर्णन |
उत्खननात हजारो सैनिकांचे पुतळे सापडले. आत्तापर्यंत ८००० हुन अधिक सैनिक, शंभराहून अधिक रथ, पाचशे हुन अधिक घोडे असे पुतळे सापडले आहेत. अजूनही सापडत आहेत. नुकतेच तिथे २०० पुतळे सापडले अशी बातमी आहे. ते कोणाचे पुतळे आहेत ते मात्र अजून चीन ने जगाला सांगितलेलले नाही. प्रत्यक्षात एकूण किती योध्दे होते ते कदाचित कोणालाच, कधीच कळणार नाही.
तिथे सापडलेले दोन हजार वर्षांपूर्वीचे दोन कास्य रथ हे तर एक अद्भुत नमुना आहेत. प्रदर्शनीत पाहायला मिळतात.
ह्यातला प्रत्येक सैनिक वेगळा दिसतो. त्याची चेहरेपट्टी, चेहऱ्यावरचे भाव, अंगकाठी सर्व वेगवेगळे. एकही सैनिक दुसऱ्यासारखा नाही. किती कौशल्य त्या शिल्पकारांचे!!! मुळात त्यांचे कपडे रंगीत होते. पण उत्खनन झाल्यावर हवेचा स्पर्श झाल्याने ते रंग उडून गेले आहेत. आता सर्व जण राखाडी रंगा च्या कपड्यात दिसतात. कुठे कुठे मात्र थोडा थोडा रंग अजूनही शिल्लक आहे.
हे सगळे पुतळे हाताने बनवलेले आहेत. त्यांची उंची आत्ताच्या सर्वसाधारण चिनी माणसापेक्षा खूप जास्त आहे. असे का? हे देखील नवलच आहे. कारण दोन हजार वर्षांपूर्वी देखील चिनी माणूस ह्या पुतळ्यांइतका उंच नव्हता.
तिथे सापडणाऱ्या स्थानिक पिवळ्या मातीपासून हे पुतळे तयार केले गेलेले आहेत आणि नंतर भट्टीत भाजले गेले आहेत. आसपासच्या परिसरात भट्ट्यांचे अनेक अवशेष सापडले आहेत ते स्वाभाविकच आहे.
गुडघ्यावर बसलेला धनुर्धारी |
गुडघे टेकलेला धनुर्धारी हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. त्याने डावा पाय दुमडला आहे आणि उजवा पाय जमिनीवर टेकलेला आहे.
त्यांची अनेक शस्त्रे. काही शस्त्रांची धातूची टोके, २००० वर्षानंतर अजूनही अगदी चांगल्या स्थितीत आहेत हे एक आश्चर्यच आहे. काहींना तर अजिबात गंजदेखील लागलेला नाही.
ह्या भव्य कबरीचा परिसर, त्यातील तळघरे आणि पुतळे तयार करण्यासाठी ७,००,००० कामगार जवळपास तीस ते चाळीस वर्षे काम करीत होते. त्यातले काही कैदी, वेठबिगार देखील होते. त्यांच्या हातातल्या बेड्या, गळ्यातले साखळदंड सापडले आहेत. कुठे सापडले? त्याचा उल्लेख नंतर येईलच.
सम्राट Qin Shi Huang मृत्यूनंतरच्या जीवनाच्या कल्पनेने भारून गेला होता, पछाडला गेला होता. राज्यावर आल्या आल्या लगेचच त्याने ह्या कबरींचे काम सुरु करवले होते.
आपल्या कार्यकाळात त्याने, सतत आपसात लढाई करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांना एकत्र आणले. लिपी विकसित केली. नाणी प्रमाणित केली. वजनमापे प्रमाणित केली. वेगवेगळ्या राज्यातले कालवे आणि रस्ते एकमेकांना जोडले. संरक्षणासाठी पहिली भिंत बांधण्याची सुरुवात त्यानेच केली. त्याच भिंतीच्या पुढच्या आवृत्यांना चीनची प्रसिद्ध भिंत म्हणून ओळखले गेले. एकूणच त्याची कारकीर्द अतिशय प्रभावशाली ठरली.
सर्वात मोठे उत्खनन,आधुनिक काळातला सर्वात मोठा शोध असल्याने टेराकोटा सेना संग्रहालयाला जगभरातुन हजारो लोक भेट देतात. हे संग्रहालय उत्खननाच्या ठिकाणीच उभारण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष उत्खननाची जागा बघता येते. बाँपो आणि टेराकोटा सेनेच्या शोधामुळे वाढलेल्या पर्यटकांचा खूपच फायदा चीन सरकारला होतो आहे.
पण ज्या शेतकऱ्यांना विहीर खणताना हे सगळे सापडले त्यांचे काय झाले? त्यांची शेते आणि घरे सरकारने ह्या संग्रहालयासाठी, त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांसाठी घेऊन टाकली. त्यांना अतिशय नाममात्र मोबदला मिळाला.
एकाने विपन्नावस्थेला कंटाळून, त्याला काही आजार झाला होता तर औषधासाठीही पैसे न उरल्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अजून दोन जण काही विचित्र आजाराने ग्रासून मरण पावले. ह्यामुळे अनेक दंतकथा प्रचलित झाल्या. ते कबरस्थान उघडले गेल्याचा शाप शेतकऱ्यांना भोवला अशी चर्चा झाली. म्हणजे श्रीमंत झाले सरकार आणि शाप भोवला गरीब शेतकऱ्यांना.
ह्यातले काही शेतकरी तुम्हाला पुस्तकांच्या दुकानाबाहेर बसलेले दिसतात. टेराकोटा सेनेविषयीचे एखादे पुस्तक आपण घेतले तर ते त्यावर सही करून देतात. त्याचे त्यांना अगदी थोडे पैसे मिळतात. पण हे शेतकरी खरेच ते शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतात टेराकोटा सेना सापडली तेच आहेत की कोणी तोतया आहेत, हे मात्र कोणीच सांगू शकत नाही!!
अजून कित्येक अवशेषांचे उत्खनन होणे बाकी आहे. बराच खजिना अजून जमिनीत दडलेला आहे. किती? ते माहिती नाही.#LifeAfterDeath #ClayArmy #ChineseEmperorTomb #UnExcavatedTomb #TeracottaWarriors #BanpoCulture #MatriarchalClan #GreatestExcavationOn Earth
Comments
Post a Comment