![]() |
भिंतीवरील कोरीवकाम |
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच.
सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर.
सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा!
![]() |
मंदिराचा परिसर |
सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे, सिद्धेश्वर महादेवाचे.
![]() |
सिद्धेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य 📷विकिमीडिया कॉमन्स |
शंकराचे वाहन असलेला नंदी, शंकर मंदिरात नेहमी हजर असतोच. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीकडे तोंड करून ध्यान लावून बसलेला असतो. सर्वात सुंदर कोरीवकामाने सजवलेल्या नंदींपैकी एक नंदी तुम्हाला सापडेल तो ह्या सिद्धेश्वर महादेवासमोर.
त्या घुंगुरमाळा, छोट्या घंटांच्या माळा, वेगवेगळ्या साखळ्या हे सगळे तो नंदी अगदी जिवंत असल्याचा भास उत्पन्न करतात. नंदीच्या पाठीवरची झूलदेखील कोरलेली आहे!
![]() |
सुशोभित नंदी |
गाभाऱ्याकडे तोंड करून ध्यान लावलेला नंदी नेहमी भक्तांना सांगतो की परमेश्वराकडे लक्ष एकाग्र करा!
नंदी बघून झाल्यावर आपण समोर बघितले की आपल्याला दिसते एक अर्धी भिंत, शिव मंदिराच्या सभागृहाला वेढणारी. चारी बाजूला त्या भिंतीवर अतिशय सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. रामायण, महाभारतातील विविध प्रसंग तर आहेतच पण इतरही अनेक मूर्ती आहेत.
एका भिंतीवर तर राजा मिरवणुकीने देव दर्शनासाठी जातो आहे असा प्रसंग कोरलेला आहे. असे म्हणतात की नानासाहेब पेशवे सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनाला येत आहेत असा प्रसंग कोरलेला आहे.
![]() |
द्वारपाल आणि भिंतीवरील कोरीवकाम |
![]() |
राम रावण युद्ध |
ह्या पॅनेलवर रामायणातील एक महत्वाचा प्रसंग, राम-रावण युद्ध बघायला मिळतो. दहा शिरे, वीस हात असलेला रावण आणि राम लक्ष्मण ह्यांचे युद्ध. राम लक्ष्मण धनुष्याला बाण लावून, प्रत्यंचा ताणून युद्धासाठी सज्ज आहेत. त्यांच्या आकारातील फरक बघा. रावण असुर/राक्षस असल्याने अजस्र दाखवलेला आहे, तर राम लक्ष्मण माणसाइतक्याच आकाराचे दाखवले आहेत. झाडावर बसलेला हनुमान देखील पाहायला विसरू नका.
![]() |
हनुमान आणि द्रोणागिरी 📷जयंत अभ्यंकर |
हा प्रसंग आहे, हनुमानाने रामलक्ष्मणासाठी औषधी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याचा. आता खाली तिथे ती संदूक काय करते आहे मला कल्पना नाही! बहुधा त्या संदुकीत शस्त्रे ठेवत असावेत. त्यावरचे डिझाईन, त्याच्या कड्या किती सुंदर कोरलेल्या आहेत.
![]() |
कृष्ण 📷जयंत अभ्यंकर |
बहुतेक तरी हा प्रसंग कृष्ण आणि गोपींचा असावा. गोपी नदीत स्नान करीत असताना, कृष्ण त्यांची वस्त्रे घेऊन झाडावर ठेवून देतो आणि मग त्या, 'वस्त्रे परत दे' अशी प्रार्थना करतात तो प्रसंग असेल. "दे रे कान्हा, चोळी अन लुगडी" बरोबर गाणे आठवले आहे तुम्हाला आणि त्या सोबतच लता मंगेशकरांचा स्वर्गीय आवाज कानात गुंजत असेलच!
![]() |
सुकेशिनी 📷जयंत अभ्यंकर |
लांब केस असलेली ही स्त्री, सुकेशिनी, केशरचना करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या खाली असलेल्या पक्षाला बहुधा ते कमळाचे दांडे असावेत असा भास झाला असेल का? त्याने केस तोंडात धरून ओढायला सुरुवात केली आहे!! आता ती सुकेशिनी, त्या पक्ष्याच्या तोंडातून केस ओढून घेण्याचा प्रयत्न करते आहे.
तिच्या अंगावरचे अलंकार बघा, किती बारकाईने कोरलेले आहेत. तेव्हा लांब आणि मोठ्या कर्णभूषणांची नक्कीच फॅशन होती!!!
![]() |
भीम आणि हनुमान |
हा आहे महाभारतातील एक प्रसंग, भीमाच्या गर्व हरणाचा. जेव्हा भीमाला असा गर्व झाला की तोच ह्या पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिमान आहे, तेव्हा हनुमान एका म्हाताऱ्या माकडाचे रूप घेऊन, भीमाच्या वाटेत शेपटी ठेवून बसला. भीम म्हणाला, "शेपटी बाजूला कर." तेव्हा हनुमान म्हणाला, "आता वय इतके झाले आहे की शेपटी बाजूला करण्या इतकी पण ताकद अंगात नाही राहिली. तूच दे बाबा शेपटी बाजूला करून." भीमाने खूप प्रयत्न केला पण त्याला काही ती शेपटी उचलून बाजूला ठेवता आली नाही आणि अर्थातच त्याचे गर्व हरण झाले.
![]() |
नर्तिका |
![]() |
सभागृह - सिद्धेश्वर महादेव मंदिर |
आपण मंदिरात आत जातो घुमटाच्या आकाराचे छत दिसते. आत जरी फारसे कोरीवकाम केलेलं नसले, तरी आपल्याला काही मूर्ती दिसतात. दिशांच्या देवता असतील, खांबावरचे छत तोलून धरणारे यक्ष असतील किंवा खांबा, कोनाड्यांवरचे कोरीवकाम असेल. आत प्रवेश करताच जमिनीवर एक कासव आहे.
हिंदू मंदिरांचा अविभाज्य भाग असलेले कासव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अलिप्तता, चिकाटी, ज्ञानार्जनाची इच्छा आणि इतरही अनेक गोष्टी अंगात असल्या पाहिजेत असे सांगत राहते.
![]() |
सिद्धेश्वर महादेव - गर्भगृह |
आपण शिव मंदिरातून बाहेर आलो की अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले एक मंदिर बघायला मिळते. चांदणीच्या आकाराच्या ह्या मंदिराला चांदणीसारखीच टोके आहेत. हे देवीचे मंदिर आहे आणि बाहेरच्या बाजूला देवीची मातृकासदृश्य अनेक रूपे कोरलेली आढळतात.
![]() |
देवी मंदिर |
देवी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आढळणारी देवीची विविध रूपे.
![]() |
देवी 📷जयंत अभ्यंकर |
ही देवी चतुर्हस्त धारण करणारी आहे. तिचे वाहन मोर आहे. उजव्या मागच्या हातात शस्त्र दिसते आहे. डाव्या मागच्या हातात एक भले मोठे फळ धरलेले आहे. बहुतेक म्हाळुंग असावे. डाव्या पुढच्या हातात कमंडलू आहे. चौथ्या हातात काय आहे ते मला कळले नाही. तुमच्या लक्षात आले असेल तर कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
![]() |
देवी 📷जयंत अभ्यंकर |
ही देवी देखील चतुर्हस्त धारिणी आहे. उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहेत. डाव्या मागच्या हातात डमरू आहे. तिच्या चौथ्या हातात विड्याचे पान आहे की नुसतीच वरद मुद्रा आहे, कळले नाही.
![]() |
देवी 📷जयंत अभ्यंकर |
ह्या देवीने आपल्या चार हातांपैकी तीन हातात अंकुश, डमरू आणि तलवार धारण केलेले आहेत. चौथा हात वरद मुद्रेत आहे. तिचे वाहन असलेला नंदी तिच्या बरोबर आहे. बहुतेक ही माहेश्वरी असावी.
![]() |
देवी 📷जयंत अभ्यंकर |
ह्या देवीने एका हातात एक लोट्याच्या आकाराचे पण उंच मानेचे भांडे धरलेले आहे, सुरईपेक्षा वेगळा आहे हा आकार. दुसऱ्या हातात वाडगा आहे. मागच्या हातात तलवार आहे आणि मागच्या दुसऱ्या हातात बहुतेक कमळ आहे. तिचे वाहन वाघ तिच्याबरोबर आहे. त्या प्राण्याचे तोंड वाघासारखे आहे पण गळ्यावर कोरलेली आहे ती आयाळ असेल का? म्हणजे हा सिंह असेल का?
![]() |
मंदिराच्या गाभाऱ्यातील देवी. |
ह्या आवारातील तिसरे मंदिर आहे विष्णूचे. विष्णूचे वाहन असणारा गरुड आपल्याला मंदिराच्या समोरच दिसतो.
![]() |
गरुड |
![]() |
मंदिर आवार आणि गरुड |
![]() |
विष्णू मंदिर |
![]() |
विष्णू मंदिराच्या सुंदर कमानी |
आपण मगाशी गरुडाचा फोटो पाहिला होता. त्याच्या मागच्या बाजूला हा हनुमान आहे. ह्या वरच्या फोटोत आपल्याला तो हनुमान दिसतो आहे.
![]() |
सुंदर कोरीवकाम |
![]() |
मंदिर आवार |
ही सर्व मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम सुंदर आहे. त्यांचे पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे तसेच इतिहासाच्या दृष्टीने पण महत्व आहे. अठराव्या शतकात बांधलेली आणि इतके कोरीवकाम असलेली फार कमी मंदिरे बघायला मिळतात.
देवळाच्या बाहेरच्या बाजूला नदीत उतरणारे सुंदर घाट आहेत. तसेच मेणवलीच्या मंदिरात आपण पाहिली होती तशी एक घंटा देखील आहे. पण आम्ही हे दोन्हीही बघू शकलो नाही.
मला नेहमी ह्या मंदिराचा विचार करताना आश्चर्य वाटते. आजच्या मानाने हे आवार नक्कीच भव्य आहे. पण तेव्हाच्या काळाचा विचार केला तर ही जागा थोडी कमीच वाटते. तटबंदीच्या आत आणि इतक्या जवळ जवळ ही तिन्ही मंदिरे का बांधली गेली असतील? विशेषतः ते चांदणीच्या आकारातील देवी मंदिर! त्याच्या आजूबाजूला थोडी जास्त मोकळी जागा असती तर त्या रचनेचे सौंदर्य आणखी खुलले असते.
मंदिराच्या तटबंदीला असलेली दुसऱ्या मजल्यावरची दर्शिका/ गॅलरी हा ह्या मंदिराचा विशेष आहे. त्या दर्शिकेच्या कमानी देखील अतिशय प्रमाणबद्ध आहेत. आपल्याला वरच्या एका फोटोत त्या बघायला मिळाल्याच आहेत. त्या गॅलरीतून नदी, घाट, झाडे असे सुंदर दृश्य आत्ताही दिसते.
पैसाचा खांब असलेले ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, देवगड दत्त संस्थान इत्यादी ठिकाणे ह्या टोक्याच्या सिद्धेश्वर मंदिरापासून अगदी जवळ आहेत. फार फार तर १५ किलोमीटर अंतरावर.
जास्त लोकांनी ह्या सर्व ठिकाणांना भेटी देऊन वास्तुशास्त्रातील आणि अध्यात्मातील आश्चर्याचे दर्शन घेतले पाहिजे. मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांना देखील हे मंदिर बघण्यात, ह्या मूर्ती कोणाच्या आहेत ते उलगडण्यात आनंद वाटेल.
आपल्याही परिसरात किंवा पाहण्यात अशी अनोखी मंदिरे असल्यास त्या विषयी इतरांना सांगायला हवे. लिहायला हवे. माणसांची ये जा होत राहिली तर मंदिरे जागती राहतात.
मी सुरुवातीला म्हटले होते, की टोक्याचे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर वसलेले एक दगडी बिल्वपत्र वाटते. बेल त्रिदल का? तर तीन मंदिरे एका आवारात इतकी जवळ जवळ आणि मुख्य मंदिर शंकराचे आहे म्हणून. पण त्यावरील कोरीवकाम पाहिल्यावर मात्र नदीच्या किनारीवर उमललेले तीन पाकळ्यांचे फुल वाटते!!
#Dronagiri #PeshaveEraTemple #EighteenthCenturyCarvings #TemplesOnConfluence #MaharashtraTempleArchitecture
छान माहिती आहे 😍 🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद अरुंधती!
Delete