पिवळा रंग म्हणजे तेज. पिवळा रंग म्हणजे आनंद. पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता. पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश. पिवळा रंग म्हणजे वसंत ऋतू!
गेल्या आठवड्यात भारतात आम्ही विजयादशमी साजरी केली. दारांना झेंडूच्या माळा बांधल्या. झेंडूचा तो झळाळता पिवळा आणि केशरी रंग खूपच ऊर्जा देणारा आहे. त्या पिवळ्या रंगाने मला आठवण झाली ती एका ठिकाणाची. असे ठिकाण की जिथे नजर पोचेल तिथपर्यंत, मला असा सुंदर ऊर्जादायी पिवळा रंग दिसला होता.
ते ठिकाण होते दक्षिण कोरियामधील ज्येजू बेट. दक्षिण कोरियाला अपार नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे आणि ज्येजू तर जणू त्या नैसर्गिक सौंदर्याचा मुकुटमणीच!
पूर्वी ज्येजू अनेक नावानी ओळखले जात असे. देवांची भूमी, कोरियाचे हवाई अशी अनेक नावे. त्यातील सर्वात योग्य नाव होते समदादो. समदादो म्हणजे तीन गोष्टी विपुल प्रमाणात असणारे बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर खडक, वारा आणि स्त्रिया.
ज्वालामुखीच्या मुळे बनलेले बेट असल्याने सर्वत्र बसाल्ट खडक दिसतो. समुद्रात असलेले स्वतंत्र बेट आहे, त्यामुळे चहुबाजूनी वारा वर्षभर घोंघावत असतो. त्यामुळे ज्येजू ला कधी कधी वादळी रस्त्यावरचे वळण किंवा कोपरा असेही म्हटले जाते. कधी काळी ज्येजू ला मातृसत्ताक पद्धतीशी साधर्म्य असलेली कुटुंब पद्धती देखील होती. स्त्रियांनी ज्येजूची खडकाळ जमीन सुपीक बनवण्यासाठी शतकानुशतके अपार मेहनत केलेली आहे. शिवाय ज्येजू च्या हेनयो पाणबुड्या महिला तर जगप्रसिद्ध आहेत. कोणत्याही संरक्षक उपकरणांच्या शिवाय, खोल पाण्यात बुडी मारून अबलोन्स आणि इतर सागरी जीव संपत्ती कमावून आणणाऱ्या ह्या निधड्या महिला जगात एकमेव.
मी तुम्हाला म्हणाले की झेंडूच्या उत्सवी पिवळ्या केशरी रंगामुळे मला ज्येजूची आठवण झाली. ज्येजूवरील पिवळा रंग आहे कॅनोला फुलांचा आणि केशरी रंग आहे संत्र्यांचा.
गन्ग्यूल जातीची ही संत्री सगळीकडे तुम्हाला दिसतील. साधारण पणे मँडरिन ऑरेंजेस किंवा टॅन्ग्रीन्स सारखी असणारी ही छोटी छोटी संत्री. बागांतून तर असतातच पण अगदी रस्त्याच्या कडेला देखील, झुडुपांच्या रांगाच्या रांगा ह्या संत्र्यांनी लगडलेल्या दिसतात. काही संत्री तर जमिनीवर गळून पडलेली देखील असतात. पण कोणी ती उचलत नाहीत. ती शहराच्या नगरपालिकेच्या मालकीची असतात. हे पाहिल्यावर ज्येजूचे अजून एक नाव किती चपखल आहे त्याची जाणीव होते. अजून एक नाव होते सम्मोदो. त्याचा अर्थ तीन गोष्टी नसलेले बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर चोर, भिकारी आणि घरांची फाटके! चोर आणि भिकारी नसल्यामुळे घरांना फाटके लावायची गरज नव्हतीच.
ज्येजूची अर्थव्यवस्था खरेतर उद्योगधंदे, शेती आणि मासेमारीवर अवलंबून होती. पण आता पर्यटन व्यवसायाने ह्या साऱ्यांना मागे टाकले आहे. दक्षिण कोरियातीलच नव्हे तर जगभरातील सगळ्यांनाच जिथे जायचे असते असे हे ठिकाण. अनेक गोष्टींसाठी ज्येजू प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहे. दरवर्षी हजारो लाखो कोरियन आणि चिनी प्रवासी ज्येजूला भेट देतात.
पर्यटनावर आधारलेली अर्थव्यवस्था असेल तरीही चिनी प्रवाशांची वाढती संख्या खरे तर स्थानिक लोकांना फारशी आवडत नाही. त्यांचे म्हणणे आहे की जरी चिनी लोक ज्येजूमध्ये येऊन पैसे खर्च करतात तरी ते पैसे नेहमी चिनी माणसाच्या हॉटेलमध्येच खर्च करतात. त्याचा स्थानिकांना काही उपयोग नाही. चिनी लोक जमिनीचे, जागेचे मालक असण्याचे प्रमाण गेल्या काही दशकात अनेक पटींनी वाढले आहे.
पण मग नंतर आली चीन सरकारने साऊथ कोरियाला जाणारी तिकिटे विकू नयेत अशी चिनी पर्यटन कंपन्यांना केलेली सूचना. ह्याचे कारण होते दक्षिण कोरियाने उभारलेली Thadd- terminal high altitude area defense system. चीन सरकारला हे आवडले नव्हते. खरेतर चिनी लोक इतक्या जास्त प्रमाणात यायचे की ते यायचे बंद झाल्यावर पर्यटन व्यवसाय धोक्यातच आला असता. पण आता चिनी लोक येत नाहीत म्हटल्यावर, सगळीकडे त्यांचा गोंधळ नसेल असे जाणवल्यावर, दक्षिण कोरियाच्या मुख्य प्रदेशातील लोक जास्त प्रमाणात यायला लागले. ज्येजू ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली.
दिवसाची सुरुवात थोडा ढगाळ दिवस! |
तर आता परत वळू या आपल्या कॅनोलाच्या फुलांकडे! कॅनोला काय आहे? रॅपसीड नावाच्या तेलबियांपासून एक सुधारित वाण तयार केला गेला. हा वाण शोधला आणि तयार केला होता कॅनडा ने. त्यामुळे कॅन म्हणजे कॅनडा आणि ओला म्हणजे तेल. रॅपसीड पेक्षा कॅनोला अधिक चांगले कारण त्यात आम्ल कमी प्रमाणात असते. ह्या तेलात अँटीबॅक्टरीअल आणि इतरही औषधी गुणधर्म आहेत. मोहरीच्या जातीतील ह्या बिया आहेत. कॅनोला ला कोरियन भाषेत यूचे म्हणतात. पण त्याचे नाव घेताना म्हणतात यूक्कोत! म्हणजे यूचे चे फुल असे म्हणतात.
वसंत ऋतूचे आगमन ज्येजू बेटावर साधारणपणे मार्चच्या मध्यात होते. ज्येजूची खासियत अशी की तुम्ही चेरी ब्लॉसम (कोरियन भाषेत त्याला बेक्कोत म्हणतात.) आणि यूक्कोत चा बहर एका वेळी पाहू शकता! ह्याच मुळे ज्येजू हे वसंत ऋतूचा आनंद घेण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण आहे.
नंतर काय दिसणार आहे ह्याची एक झलक रस्त्याच्या बाजूला पडलेल्या चेरी ब्लॉसम आणि कॅनोलाच्या पाकळ्या. |
चेरीब्लॉसम चा सरता बहर |
चेरी ब्लॉसम - बेक्कोत |
कॅनोला ची फुले |
युक्कोतचा गुच्छ |
Seogwipo शहर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते सगळे! घोडे, चेरी ब्लॉसम आणि कॅनोला ची फुले |
युक्कोत आणि बेक्कोत |
ह्या विस्तीर्ण पटावर बेक्कोतचा फिका गुलाबी आणि युक्कोत चा झगमगता पिवळा रंग अतिशय खुलून दिसतात. बेक्कोत ची झाडे उंच असतात तर यूक्कोत फुले झुडुपांवर येतात. लाल जमीन, पिवळे यूक्कोत, गुलाबी बेक्कोत, काळे बसाल्ट चे डोंगर आणि गडद निळे आकाश. रंगांचा आणि आकारांचा अतिशय मनोवेधक पट आपल्यासमोर उलगडत जातो!
हे दोन्हीही म्हणजे चेरी ब्लॉसम आणि कॅनोला अल्पकाळासाठीच फुलतात. त्यामुळे तुम्हाला तुमची ट्रिप त्यांच्या फुलण्याच्या वेळा बघून त्याप्रमाणे ठरवायला लागते. आम्ही ज्येजूला एप्रिल २०१९ मध्ये भेट दिली होती आणि आमचे नशीब चांगले की आम्हांला बेक्कोतचा सरता बहर आणि यूक्कोतचा ऐन बहर बघता आला होता.
ज्येजूच्या Seogwipo शहरात १९६० पासून कॅनोलाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. जेव्हा ही फुले बघायला येणारे पर्यटक म्हणजे अर्थव्यवस्थेला भरती हे गणित स्थानिक ग्रामपरिषदांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आणखी मोठ्या प्रमाणात कॅनोलाची लागवड करायला सुरुवात केली.
Gasi Ri नावाचे गाव कॅनोलाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त फुले बघायला मिळतात असे ते ठिकाण आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिथे ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सव भरवला जातो. विविध कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा, फोटो काढण्यासाठी तयार केलेली ठिकाणे, खाद्यपदार्थ स्पर्धा, कार्यशाळा आणि विक्री, गोंडस बालक स्पर्धा, भेटवस्तू, स्मृतिचिन्हे आणि कितीतरी कार्यक्रम असतात. तीन दिवसांसाठी हा महोत्सव चालतो. ह्या फुलांच्या बहराच्या काळात साधारणपणे १६०,००० लोक ज्येजूला भेट देतात.
ह्या गावात १० किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे, त्याचे नाव Noksan-ro. हा रस्ता दक्षिण कोरियातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. का बरे? कारण त्याच्या दोन्ही बाजूला चेरी ब्लॉसम आणि कॅनोला फुले फुललेली असतात! दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा हे पुष्पवैभव आपल्या डोळ्यांना, मनाला सुखावत असते. जेव्हा तो रस्ता समोर येतो तेव्हा त्यांच्या प्रथम दर्शनानेच आपण अवाक होऊन जातो. नक्कीच तो जगातील सर्वात नयनरम्य रस्त्यांपैकी एक आहे.
Noksan Ri |
Noksan -ro वरून प्रवास करताना अर्थातच तुम्ही अनेकदा गाडी थांबवून खाली उतरता. फोटो घेण्यासाठी! तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही. त्या सुंदर दृश्याने तुमचे भान हरपलेले असते. पण विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या वाहनांकडे मात्र लक्ष राहू द्या!
Noksan Ri - एक सुंदर रस्ता!
हा प्रवास झाल्यावर किंवा खरे तर ह्या सुंदर प्रवासातच तुम्ही पोचता Gas ri पवन ऊर्जा निर्मिती केंद्राच्या जवळच्या शेतांमध्ये. आमची गाडी जेव्हा मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळली तेव्हा समोर एक अतिशय रुक्ष भिंत आली. एखाद्या गोदामाची असावी तितकीच अनाकर्षक. मला कळलेच नाही की इतक्या सुंदर रस्त्यावरून इतक्या रुक्ष ठिकाणी ड्रॉयव्हर आम्हाला का घेऊन आला असेल? त्याने नुसते सांगितले की आत जा. त्याच्या सूचनेप्रमाणे आम्ही आत गेलो आणि आमच्या समोर होते आयुष्यात क्वचितच पाहायला मिळते इतके सुंदर दृश्य!
जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत ही छोटुकली, नाजूक, झळाळत्या पिवळ्या रंगाची सुंदर फुले वाऱ्यावर डोलत होती. मी आयुष्यात कधीही हे दृश्य विसरणार नाही. जादुई दृश्य, दैवी दृश्य. शांतता देणारे दृश्य. जरी मुख्य रस्ता जवळच होता, तरी वाहनांचा आवाज शांती भंग करण्यासाठी कानांपर्यंत येत नव्हता. त्या पवन चक्क्या आणि डोंगर आजोबा ह्या शेतात खेळणाऱ्या कॅनोला बाळांवर लक्ष ठेवून होते. आकाश साक्षीभावाने माझ्या उचंबळून आलेल्या भावनांकडे पाहत होते. एकदम पारलौकिक, अद्भुत अनुभव होता तो.
फुलांच्या महासागरात हरवताना
चकित करणारा परमानंद अनुभवताना
हरवून जाते भान स्थळकाळाचे
वाटते अनंतकाळापासून आहोत असेच, इथेच.
निसर्गाबरोबर एकात्मभावाचा प्रत्यय येतानाच
ते गारुड कब्जा घेते तुमचा,
आता तुम्हाला आनंद नुसता वाटत नसतो..
तर तुम्हीच आनंदस्वरुप बनलेले असता!!
तिथे कुंपणे नाहीत. तुम्ही फुलांच्या जवळ जाऊ शकता, फुलांच्या रांगांतून चालू शकता. फुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच टाकलेली असते. तिथे कोणी रखवालदार नसतात. पण प्रत्येकाला हे माहिती असते, की तुमच्याकडे कोणी बघत नसताना देखील, तुम्ही कसे वागता ह्यावरून तुमची संस्कृती आणि संस्कार दिसतात! अर्थात काही नग तिथेही असतातच, की जे फुले तोडतात किंवा फोटो काढण्याच्या गडबडीत, खरे तर नशेत, फुले पायदळी तुडवतात. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बाकी सगळे अगदी जपूनच चालतात.
आम्ही ज्येजू ला एप्रिल २०१९ मध्ये गेलो होतो. मला उत्सुकता होती २०२० च्या ज्येजू कॅनोला पुष्प महोत्सवाचे काय होणार ह्याची. दक्षिण कोरियाने कोरोनाचा अतिशय यशस्वी सामना केला होता. मार्च मध्येच त्यांच्याकडची रुग्णसंख्या खूप कमी झाली होती.
मी बातम्यांवर लक्ष ठेवले होते. पण जे वाचायला मिळाले ते अतिशय धक्कादायक होते. फुले तर निसर्गनियमानुसार वेळच्या वेळीच फुलली होती. स्थानिक प्रशासन, लोकांना ज्येजूला भेट न देण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करीत होते. हॉटेल्स आणि विमानकंपन्या मात्र ज्येजूला लोकांनी भेट द्यावी म्हणून, खास सवलती जाहीर करत होत्या. बाकी अनेक देशांनी विमान वाहतूक बंद केल्याने जे कोरियन लोक दुसरीकडे फिरायला जाऊ शकत नव्हते त्या सगळ्यांनी ह्या सवलतींचा लाभ घ्यायला सुरुवात केली.
अशा बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांमुळे, स्थानिक लोकांना कोरोना संसर्ग होण्याच्या घटना आढळू लागल्या तशी स्थानिक जनतेला आणि प्रशासनाला चिंता वाटू लागली. Seogwipo नगर परिषदेला नाईलाजाने एक दुःखद आणि क्रूर निर्णय घ्यावा लागला.
त्यांनी चक्क चार ट्रॅक्टर आणले आणि सगळ्या शेतातून फिरवून सर्व फुले तोडून टाकली. हेक्टर च्या हेक्टर जिथे फुललेले रान होते ते आता उजाड माळरान होऊन गेले. त्या गावात अनेक वयोवृद्ध लोक राहत असल्याने, त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला. येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असे नगर परिषदेने जाहीर केले.
तुम्ही इंटरनेट वर शोधलेत तर अजूनही ह्या बातम्या आणि फोटोज पाहू शकता.
https://www.dailymotion.com/video/x7t6qhk ह्या लिंकवर विडिओ देखील पाहू शकता.मी जेव्हा बातम्या वाचल्या, हा विडिओ पाहिला तेव्हा अतिशय दुःख झाले. माणसे त्यांची पैश्यांची हाव, त्यांच्या ईच्छा आणि लहरी ह्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत ह्याची शिक्षा फुलांना का? त्यांचा काय दोष? माणसांना वळण लावणे अवघड आहे, फुलांना जमीनदोस्त करणे सोपे आहे.
जास्त प्रमाणात पर्यटक यावेत, पैसे मिळावेत म्हणून मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली गेली. येणाऱ्या लोकांपासून, प्राणांचे भय निर्माण झाले तेव्हा त्यांना येण्यापासून रोखण्यासाठी ती उपटून टाकली गेली. एक वर्तुळ पूर्ण झाले.
#PlacesToSeeInSouthKorea #CanolaFestivalInJeju #HaenyeoInJeju #HaenyeoWomenBraveWomen #CherryBlossomInJeju #YellowFlowersInJeju
Comments
Post a Comment