आज आपण बृहदेश्वर ला जाणार आहोत. जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, असे शिवलिंग ज्या मंदिरात आहे, ते हे मंदिर! ज्याचे शिखर (विमान) जगातील सर्वात उंच मंदिर शिखरांपैकी एक आहे, असे हे मंदिर!
गोपुर आणि विमान ह्या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. गोपुर हे प्रवेशद्वारावर असते तर विमान /शिखर हे गर्भगृहावर असते. अनेक वर्षे बृहदेश्वरचे शिखरच जगातील सर्वात उंच शिखर होते. पण नव्यानेच बांधलेले वाराणसीमधील मंदिर आणि अजून जे बांधून होते आहे असे वृन्दावनमधील कृष्णाचे मंदिर ही दोन मंदिरे आता जगातील सर्वात उंच शिखर/विमान असणारी मंदिरे आहेत.
कुठे आहे हे बृहदेश्वर? तामिळनाडूमधील तंजावर मध्ये हे मंदिर आहे. हो.. बरोबर! तेच हे तंजावर, जे कावेरी नदीच्या तीरावर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी राजे सतराव्या शतकात राज्य करत होते आणि नंतर त्यांचे वंशज जिथे राज्य करीत होते. तेच हे तंजावर, जिथे विविध विषयांवरील हजारोंच्या संख्येने दुर्मिळ पुस्तके असलेले विश्व विख्यात सरस्वती महाल वाचनालय आहे. हे तेच तंजावर, जे तंजावर शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तेच हे तंजावर जिथे भरतनाट्यम नृत्याला, कर्नाटक संगीताला सुविहित रूप देणारी चार भावंडे, सुप्रसिद्ध तंजावर चौकडी जन्माला आली.
पण ह्या सगळ्यासाठी प्रसिद्ध होण्याच्याही कितीतरी आधीपासून तंजावर प्रसिद्ध होते ते बृहदेश्वर मंदिरासाठी. हे मंदिर बांधले गेले १०१० मध्ये, म्हणजे बरोब्बर १०१० वर्षांपूर्वी!! महान राजा राजराजा चोला प्रथम ह्याने हे मंदिर बांधले आणि म्हणूनच ह्याचे नाव राजराजेश्वर मंदिर असे देखील आहे.
जेव्हा हा राजा सत्तेवर आला तेव्हा चोलांचे राज्य अगदी छोटे होते. पण नंतर राजराजा प्रथम ह्याने अतिशय कार्यक्षम सैन्य आणि शक्तिशाली नौदल उभारले. त्यांच्या जोरावर आपले छोटेसे राज्य, एक मोठे साम्राज्य बनवले. त्याने श्रीलंकेवर स्वारी करून लंका जिन्कली होती तसेच त्याच्याच कार्यकाळात त्याच्या मुलाने, राजेंद्र प्रथम ह्याने पार श्रीविजय राज्यापर्यंत म्हणजे आजचे इंडोनेशिया आणि जवळपास सगळेच दक्षिण पूर्व आशिया इथपर्यंत मोहीम नेऊन तेथपर्यंत आपले राज्य वाढवले होते. आपण ह्या मोहिमांचे संदर्भ आधीच्या काही लेखांत वाचले होतेच.
चोलांच्या नंतर ह्या प्रदेशावर राज्य केले ते पांड्या, नंतर नायक आणि त्या नंतर मराठ्यांनी. ह्या सर्वानी बृहदेश्वर मंदिराच्या आवारात आणखी काही मंदिरे उभारली. पण सुदैवाने ही नंतर उभारलेली मंदिरे देखील मूळ आराखड्याच्या सौंदर्यात भर घालतील, अशाच रीतीने उभारली गेली.
ब्रिटिशांनी जेव्हा हा भाग काबीज केला होता तेव्हा म्हणजे साधारण १७७२- १८०१ मध्ये हे मंदिर, ब्रिटिश सैनिकांच्या बराकी म्हणून वापरले गेले आणि मंदिराचे बरेच नुकसान झाले. महाराज सर्फोजी राजे भोसले ह्यांनी १८०१ मध्ये पुढाकार घेतला आणि मंदिराची दुरुस्ती, संगोपन ह्यात लक्ष घातले. आज देखील भोसल्यांचेच वंशज मंदिराची व्यवस्था बघतात.
इथे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा मी जूनमध्ये अधिकृतरीत्या माझा प्रवास वर्णनाचा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा मला सारखे वाटत होते की आपल्याला ह्या सगळ्या मूर्तींच्या मागचा अर्थ माहिती असायला हवा. मूर्तिशास्त्राची, इंडॉलॉजीची माहिती हवी. तसे तर आपल्याला सगळ्यांनाच आपण प्राचीन मंदिरे, लेण्या पाहत असतो तेव्हा असेच वाटत असते. पण पावलो कोएलो ने अल्केमिस्ट मध्ये लिहिले आहे ," जेव्हा तुम्ही कशाची तरी मनापासून इच्छा करता तेव्हा हे संपूर्ण विश्व तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी काम करायला लागते!" माझ्या बाबतीत तसेच झाले. VivekSaptahik मध्ये आलेली एका ऑनलाईन कोर्स विषयीची जाहिरात मला दिसली.
ह्या वर्गात Virasat च्या इंद्रनील बंकापूरे ह्यांनी अत्यंत बारकाईने आणि सहनशीलतेने आम्हाला हिंदू मंदिरातील शिल्पकलेविषयी समजावून सांगितले. ह्यामुळे भारतीय तत्वज्ञान, वास्तुकला, कला आणि संस्कृती ह्याविषयी जास्तच उत्सुकता निर्माण झाली.
नंतर माहिती मिळाली ह्याच क्षेत्रात काम करणाऱ्या Haaक ह्या संस्थेविषयी आणि अगदी जेव्हा मी बृहदेश्वर मंदिराची पोस्ट लिहिण्यासाठी अभ्यास करत होते तेव्हाच haaक च्या क्षेत्रभेटीत (अर्थात ऑनलाईन क्षेत्रभेट!), उत्साही आणि ज्ञानी वक्त्या केतकी पटवर्धन ह्यांच्याबरोबर बृहदेश्वर ला भेट देता आली. खरेच संपूर्ण विश्व माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते आहे की नाही!!
इतक्या मोठ्या प्रस्तावनेनंतर, चला तर जाऊ या आता बृहदेश्वर ला! जेव्हा तुम्ही ह्या मंदिराच्या जवळ येता तेव्हा प्रथमदर्शनीच भारावून जाण्याची अनुभूती मिळते. प्रचंड मोठे शिखर दुरूनही दिसते. मंदिराची भौमितिक रचना आहे आणि ती अगदी गणिती अचूकतेने उभारण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही प्रवेशद्वाराशी उभे राहता, तेव्हा बाहेरचे गोपुर, आतले गोपुर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिर सगळे अगदी एका सरळ रेषेत आहेत. ह्या फोटोत तुम्हाला हे दिसेलच.
Outside the main entrance- Gopuram |
Beautiful images on the Gopuram |
The Geometrical accuracy |
आहे ना हा वास्तुकलेचा विलक्षण सुंदर नमुना?! प्रवेशद्वारावर, गोपुरावर शेकडो प्रमाणबद्ध सुंदर मूर्ती आपल्याला दिसतात आणि पुढे आपल्याला चोला वास्तुशैलीचे अद्वितीय उदाहरण पाहायला मिळणार आहे ह्याची चुणूक दिसते.
Well.. you can't stop taking photos!! |
बृहदेश्वर ह्या नावात जाणवते ते सगळे गुण ह्या मंदिरात आहेत. ते उंच आहे, रुंद आहे, भव्य आहे, दणकट आहे, शक्तिवान आहे, सुंदर आहे... सगळे काही आहे. हा परिसरच भव्य आहे. नायक राजांनी ह्या मंदिराभोवती एक छोटा किल्ला, त्याच्या भोवती खंदक आणि एक तळेदेखील आहे असा किल्ला बांधला आहे. त्याचे नाव शिवगंगा.
मंदिराचे प्राकार अतिशय भव्य आहे. त्यात अनेक मंदिरे आहेत. गणपती, कार्तिकेय म्हणजेच सुब्रमण्यम, पार्वती माता ही त्यातली काही मंदिरे. मी तुम्हाला ह्या प्राकाराच्या स्वरूपाविषयी कसे बरे सांगू? थांबा, मी १७ ऑगस्ट २०१८ ला काढलेला एक छोटासा व्हिडिओच बघा. म्हणजे तुम्हाला नीट कल्पना येईल.
सुब्रमण्यम मंदिरात अतिशय शोभिवंत असे खांब असलेली रचना आहे. हे खांब अर्धे भिंतीत आहेत, आणि अर्धी बाहेर असलेली बाजू कोरीवकाम केलेली आहे.
Subramaniam Temple 📷Girish Tilak |
गणपती मंदिर तसे त्या मानाने साधे आहे पण त्याचे शिखर मात्र कोरीव कामाने सजवलेले आहे. नऊ मजली इमारत असावी तेवढे उंच हे शिखर आहे.
Ganesh in Brihadeshwar 📷Girish Tilak |
प्राकाराच्या बाहेरच्या भागाच्या केंद्रस्थानी आहे नंदी मंडप. हा महाकाय नंदी एकाच पाषाणातून अखंड कोरलेला आहे. किती असेल ह्याचा आकार? तर हा सोळा फूट लांब आणि तेरा फूट उंच आहे.
Nandi 📷Girish Tilak |
त्याच्या छतावरची चित्रे ही नंतरच्या म्हणजे बहुधा नायक राजांच्या काळातील असावीत असे म्हणतात.
Nandi Mandap From other side |
आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊ या. प्राकाराच्या मागच्या भागाच्या अर्थातच केंद्रस्थानी आहे हे मुख्य मंदिर.
शिवलिंगाची उंची आहे २. ७ मीटर! इतक्या उंच पिंडीच्या अभिषेकासाठी चक्क एक गॅलरीच बांधलेली आहे. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही.
मंदिर सांधारा पद्धतीचे आहे. म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे तो खांबा खांबांच्या गॅलरी ने बंदिस्त केलेला आहे. खालच्या भागात काही चित्रे रंगवलेली आहेत. वरच्या भागात १०८ नृत्यमुद्रा दाखवणाऱ्या मूर्ती आहेत. आपण आधी पाहिलेच होते की भरतनाट्यम नृत्याला आत्ताचे सुविहित रूप देण्यात बृहदेश्वरचा आणि तंजावरचा मोठा वाटा आहे.
Mural of RajRaja I with his Guru 📷 Wikipedia |
ते भव्य शिखर ज्याच्यामुळे मंदिराला बृहदेश्वर किंवा मोठे मंदिर हे नाव मिळाले ते शिखर आहे २१६ फूट उंचीचे! म्हणजे साधारण २१ मजली इमारती इतक्या उंचीचे! शिलालेखांतून त्याचा उल्लेख दक्षिण मेरू म्हणून केलेला आढळतो.
Beautiful Architecture |
Brihadeshwar Temples |
शिखराचा दोन मजली प्रस्तर आहे. त्यावर विविध मूर्ती कोरलेल्या आढळतात. त्यात प्रामुख्याने शिवाच्या मूर्ती दिसतात. शिखराच्या मध्ये आपल्याला काही खिडक्या देखील दिसतात. प्रस्तराच्या वर तेरा ताल आहेत. ताल म्हणजे शिखरावर असलेले मजले किंवा थर. वर जाताना हे क्षेत्रफळाने कमी कमी होत जातात आणि म्हणूनच शिखराला निमुळता आकार येतो.
तालांच्या वर अष्टकोनी पायावर बसवलेला गोल घुमट, कळस आहे. हा भाग आतून पोकळ आहे. नंदी प्रमाणेच हा देखील एका पाषाणातून कोरलेला असा अखंड, अवाढव्य कळस आहे. वजन आहे अवघे ८० टन. त्यावर एक तांब्याचा कलश आणि त्यावर सोन्याचा शिरोबिंदू स्थापिलेला आहे.
मंदिराच्या भिंतींवर वेगवेगळ्या शतकात कोरले गेलेले विविध शिलालेख आहेत.
राजाने आणि राजपरिवाराने मंदिराला दिलेल्या विविध देणग्या, भेटी, जडजवाहीर ह्यांची यादीच ह्या शिलालेखात दिलेली दिसते. ह्याखेरीज मंदिर कोणी, कसे, कधी उभारले? त्या सर्व कारागिरांची नावे, कोणत्या पूजा कधी, कशा व्हाव्यात? कोणी कराव्यात? त्याचा विधी काय? अगदी हे सगळे देखील शिला लेखात सविस्तर लिहिलेले आढळते. इतक्या सविस्तर नोंदी ठेवणारे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. शिलालेखांचे १०७ परिच्छेद आहेत.
शिखरातून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट करून देणारे पन्हाळ देखील अगदी बघण्याजोगे आहेत.
Interesting feature |
Brihadeshwara -- till we meet again |
बृहदेश्वर हे भारतातील सर्वात जास्त पर्यटक भेट देतात अशा स्थानांपैकी एक आहे. शिवभक्त, वास्तुशास्त्र आणि इंडॉलॉजी चे अभ्यासक, पर्यटक, आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि विद्वान लोक बृहदेश्वरला अनेकदा भेट देत असतात. छायाचित्रकारांसाठी तर तो स्वर्गच आहे. तुम्ही सकाळी लवकर भेट देऊन ह्या वातावरणाचा आनंद अनुभवू शकता. आम्ही तर सकाळी सहा वाजताच मंदिरात पोचलो होतो. त्यामुळे आकाशातल्या अनोख्या रंगछटा आणि उंचच उंच कळस ह्यांचे अद्भुत दर्शन झाले.
Simply magnificent! |
बृहदेश्वरचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा स्थळांमध्ये द ग्रेट लिविंग चोला टेम्पल्स म्हणून झाला आहे. ह्या मध्ये बृहदेश्वर सोबतच गंगाईकोंडा चोलापूरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर ह्यांचा समावेश आहे. लिविंग टेम्पल चा अर्थ आहे की जिथे पूर्वीपासून आजपर्यंत, अजूनही पूजा अर्चा होते आहे असे मंदिर.
चोलांच्या शिवभक्तीचा बृहदेश्वर हा एक अप्रतिम पुरावा आहे. ते एक शैव संप्रदायाचे, चोला काळातील वास्तू शास्त्र, शिल्पकला, गणित, धातुशास्त्र आणि चित्रकलेतील प्राविण्याचे, प्रगतीचे अनुपम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर पाहून, तुमचे मन पुन्हा एकदा महान भारतीय वारसा, भारतीय कला आणि संस्कृती ह्या विषयीच्या अभिमानाने भारावून जाते.
राजा राजराजेश्वर स्वतःला शिवपाद शेखर म्हणवून घेत असे. शिवपाद शेखर चा अर्थ आहे, ज्याचा मुकुट शिवाच्या चरणी अर्पण केलेला आहे, जो शंकरा समोर नतमस्तक आहे. त्याने बहुधा शिवाचे, देवांच्या सर्वश्रेष्ठ शक्तीचे, सर्वत्र असणारे, सार्वकालिक महान अस्तित्व जगाला दाखवून देण्यासाठी, जाणवत राहावे म्हणूनच इतक्या भव्य राजराजेश्वर अर्थातच बृहदेश्वर मंदिराची निर्मिती केली.
#TallestTempleInTheWorld #BrihdeshwarTempleFacts #TallestShivTemple #TheBigTemple
#TamilnaduTemples #HinduShivTemple #11thCenturyTemple #TallShivling
खूप मस्त 🙂
ReplyDeleteधन्यवाद अरुंधती! तू नियमितपणे वाचून कॉमेंट्स लिहितोस, फार हुरूप येतो त्याने!
Delete