मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

 आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते. 

नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते. 

मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात. 

काद्री मंजुनाथ मंदिर 

काद्री मंजुनाथ मंदिर 

काद्री मंजुनाथ मंदिर 

काद्री मंजुनाथ मंदिर 

काद्री मंजुनाथ मंदिर 
सर्वच मंदिरातील देवतांचे फोटो काढण्यास अनुमती नव्हती. त्यामुळे ते फोटो माझ्याकडे नाहीत. हे वर दिलेले फोटोज मंदिर परिसरातील आहेत. 

ह्या नंतर आम्ही ज्या मंदिरात गेलो ते होते मंगलादेवी मंदिर. मंगळुरूच्या बोलारा भागात हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि शहराचे नाव ह्याच मंदिरावरून मंगळुरु असे पडले आहे. 

माझ्याकडे ह्या मंदिराचा फोटो नाही. पण तिथल्या दुकानातून देवीसाठी सुंदर वेणी घेतली होती ती दाखवते!! ह्या संपूर्ण भागात फार छान फुलांची दुकाने आहेत. 

सुंदर गुंफण 
मच्छिन्द्रनाथ आणि गोरखनाथ जेव्हा ह्या भागात आले तेव्हा त्यांनी तुळूनाडूच्या त्यावेळच्या राजाला म्हणजेच राजा कुन्दवर्मनला सांगितले की पूर्वी ह्या भागात मंगलादेवीचे जागृत मंदिर होते. राजाने त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी शोध घेतला. जमीन खोदल्यावर राजाला एक अभिषेक पात्र आणि शिवलिंग सापडले. त्याच जागेवर राजाने मंगलादेवीचे भव्य मंदिर बांधले. ही कथा सांगितली जाते ती नवव्या शतकातील. पण मंगलादेवीचे मूळ मंदिर म्हणजे ज्या मंदिराच्या खुणा नवव्या शतकात राजा कुंदवर्मनला सापडल्या ते मंदिर परशुरामाने बांधले होते असे मानले जाते. 

मंगळुरु मध्ये हे मंदिर महाथोबारा मंदिर म्हणून ओळखले जाते. प्राचीन, महान असा ह्याचा अर्थ असावा. 

मंदिरात शिरतानाच उजव्या हाताला दहा बारा पायऱ्या चढून गेले की नागदेवतेचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या समोर उंच आणि अष्ट दिक्पालांच्या मूर्ती कोरलेला असा सुंदर जयस्तंभ आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर ताम्रपट्टीवर मंदिराशी संबंधित प्रसंग तसेच सिंह कोरलेले आहेत. 

मुख्य मंदिर सुंदर नक्षीदार लाकडी खांबांनी सुशोभित आहे. देवीची आसनाधिष्ठित प्रसन्न मूर्ती, तिची पूजा, तिच्यावरचे ताज्या फुलांचे हार, मंदिरातील शांतता आणि भक्तिभाव सगळेच मंदिरात अजून थोडा वेळ थांबावे असे वाटायला लावणारे आहे. 

आम्ही ह्या मंदिरात २७ फेब्रुवारीला होतो. मराठी भाषा गौरव दिवस होता. आमचे मराठी बोलणे ऐकून पूर्वी मुंबईला राहिलेली आणि आता लग्नानंतर मंगळुरुला राहणारी एक मुलगी इतक्या प्रेमाने बोलायला आली. मराठी बोलताना तिला होणारा आनंद अगदी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आमचा 'मराठी भाषा गौरव दिन' खऱ्या अर्थाने साजरा झाला! 

तिने आम्हाला आम्ही काय काय पाहणार विचारल्यावर आम्ही सांगितले की आम्ही तिथून उडुपीला जाणार आहोत. तिने आम्हाला सांगितले की उचिलच्या महालक्ष्मी मंदिरात अवश्य जा. 

आम्ही गाडीनेच जाणार होतो आणि आमच्या उडुपीच्या वाटेवरच मंदिर होते. म्हणून आम्ही सांगितले की अवश्य जाऊ आणि त्याप्रमाणे गेलो सुद्धा. 

उचिलचे हे महालक्ष्मी मंदिर एक सुंदर प्रसन्न मंदिर आहे. कोल्हापूर आणि मुंबईच्या महालक्ष्मीनंतर हे देवीचे जागृत स्थान मानले जाते. आम्ही गेलो तर मंदिरात आरती सुरु होती. त्यात आम्हाला सहभागी होता आले. मंदिराच्या मागील दोन्ही कोपऱ्यात वेगवेगळी मंदिरे आहेत. मागच्या बाजूला भोजन मंडप आहे. 

लाकडी कोरीवकाम केलेल्या मंदिर सभागृहातील मूर्ती लक्षवेधक आहेत. मंदिर सजावटीतील मूर्ती जुन्या प्रकारच्या केलेल्या असतील तरी सर्व काम नव्याने केले आहे ते दिसते. नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. 

पण त्याच्याही आधी, मंगळुरुहुन निघाल्यावर आम्ही पाहिले ते मुलकी बाप्पानाडूचे श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर. मंगळूरुपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर ते आहे. तो दिवस योगायोगांनी भरलेला आणि भारलेला होता. आम्ही मंदिरात गेलो तर समोरच देवीच्या विग्रहाची सवाद्य मिरवणूक चालू होती. ती आम्हाला अनुभवता आली. त्या वेळी अशी मिरवणूक असते हेही आम्हाला माहिती नव्हते. त्यामुळे तिथे पोचताक्षणीच अनपेक्षितपणे तो आनंद योग आमच्या वाट्याला आला. आम्हाला दोन प्रदक्षिणा पाहता आल्या. 

मंदिरात फोटो काढण्याची अनुमती नाही. पण ह्या प्रदक्षिणेचा विडिओ अनुमती घेऊनच काढला आहे. तो आपल्याला पाहता येईल. ह्या आधीच्या प्रदक्षिणेच्या त्यांनी विग्रह डोक्यावर धरला होता. आता ह्या व्हिडिओत दिसते आहे त्या प्रदक्षिणेच्या वेळी हातात धरला आहे. त्याचेही काही नियम असावेत. 

Shri Durga Parameshwari Mulaki 

https://youtu.be/DJrPI2_9VrM

ह्या व्हिडिओत दिसते आहे त्यावरून मंदिर किती सुंदर असेल ह्याचा अंदाज येईलच. साधारण ८०० वर्षे जुने, केरळ पद्धतीचे मंदिर, नक्षीदार खांब, समयांचा मंद प्रकाश अतिशय सुखद अनुभूती होती ती. मंदिरे अशीच असावीत, स्वच्छ, नीटनेटकी, नैसर्गिक प्रकाशातील आणि फोटो काढण्याची अनुमती नसलेली! त्यामुळे अतिशय निवांत मनाने दर्शन घेता येते! 

हे मंदिर शांभवी नदीच्या काठावर होते असे म्हटले जाते. आता नदी आणि मंदिराच्या मध्ये बरेच काही आहे. नदीने प्रवाह बदलला की पाणी आटले की तिथे भराव घालून जमीन करून वस्ती झाली? माहिती नाही. 

मंगळुरूहून निघाल्यापासून आपल्याला हिरवीगार झाडी, चांगले रस्ते, समुद्र किंवा नद्या दिसत राहतात. प्रवास फार आनंदाचा होतो. 

आम्ही गुरूपूरा, नंदिनी, शांभवी, पांगला, उद्यवारा, इतक्या सगळ्या नद्या मंगळुरु- उडुपी प्रवासात पार केल्या. मंगळुरु- उडुपी अंतर आहे साधारण पन्नास ते साठ किलोमीटर! म्हणजे बघा प्रवास किती सुंदर असेल! 

उडुपीच्या कृष्ण मंदिराच्या भेटीची कथा आणखीच वेगळी. तुमच्यापैकी जे कोणी उडुपीला जाऊन आले आहेत त्यांच्या लक्षात असेल की तिथे एक खिडकीला उभ्या आडव्या चांदीच्या नक्षीदार पट्ट्या लावलेली अशी चौकट आहे. त्या चौकटीला नऊ छिद्रे आहेत. ह्या छिद्रातून आपण कृष्णाचे दर्शन घ्यायचे. ह्या खिडकीला नवग्रह किंडी असे म्हणतात. 

दर्शनासाठी आधी मोठी रांग असते. त्यातून आपण खिडकीपर्यंत पोचलो की काही सेकंद तिथे थांबता येते. गर्दीच एवढी असते की आपल्याला लगेचच बाजूला व्हावेच लागते. 

खिडकीतून म्हणजे लहानशा छिद्रातून आत पाहताना, आतल्या अंधाराला डोळे सरावून मूर्ती कुठे आहे हे कळेपर्यंत बाजूला होण्याची वेळ येते. 

मला वाटले होते की इथे असे दर्शन आधी खिडकीतून घ्यायचे आणि नंतर मग गाभाऱ्यासमोर जाऊन संपूर्ण दर्शन घेता येते. तसे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेताच येत नाही, झाले ह्या नवग्रह किंडीतून तेच उडुपीच्या कृष्णमूर्तीचे दर्शन आहे..हे कळल्यावर मन फार खट्टू झाले. मूर्ती नीट दिसली सुद्धा नाही असे आम्ही हळहळत बोलत होतो. आमच्या शेजारी एक उडुपीच्या बाई उभ्या होत्या. त्या रोज येत असाव्यात. त्यांनी विचारले की तुम्हाला परत दर्शन घ्यायचे आहे का? आम्ही अत्यंत आनंदाने 'हो' म्हणालो. पण इतकी मोठी रांग परत लावणे कठीण होते. पण त्यांनी आम्हाला थेट त्या नवग्रह खिडकीजवळ नेऊन दर्शन करवले. 

हा खरोखर भाग्य योग होता. ओळख ना देख, भाषा पण वेगळी..पण त्यांना आमच्या मनातला भाव कळला. इतक्या लांबून येऊन आम्हाला मूर्ती दिसलीच नाही तर किती हळहळ वाटत असेल हे त्यांनी जाणले आणि आम्ही न म्हणताही त्यांनी पुन्हा दर्शन करवले. 

ह्या अजब घटनेला काय म्हणावे? माणुसकी, भक्ती की उडुपीत आलेल्या पाहुण्यांचे मन जाणून आदरातिथ्य म्हणून पुन्हा दर्शन करवणे?? 

नंतर त्यांच्याशी गप्पा मारताना आम्ही म्हटले, "किती गर्दी आहे आज ही." तर त्या म्हणाल्या, "तरी आज एकादशी आहे. जेवण नाही. म्हणून गर्दी कमी आहे! नाहीतर रोज ह्यापेक्षा खूप जास्त गर्दी असते!" 

उडुपीचे मंदिर चविष्ट प्रसादभोजनासाठी प्रसिद्ध आहे. सर्व जगभर प्रसिद्ध असणाऱ्या उडुपी खाद्यसंस्कृतीचा उगम ह्या कृष्ण मठातच आहे. मठातले सात्विक भोजन म्हणून उदयास आलेली ही संस्कृती नंतर विकसत गेली. आता जगभर उडुपी रेस्टॉरंट्स आहेत. थट्टेने म्हटले जाते की नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेला तेव्हा तिथे आधीच एक उडुपी रेस्टॉरंट होते! थट्टेचा भाग सोडला तरी उडुपी रेस्टॉरंट मधील स्वच्छता, चव आणि पौष्टिक अन्नाचे गुणवर्णन करावे तेवढे थोडेच!

उडुपीचे मंदिर ज्याला मठ असेही म्हटले जाते त्याची स्थापना तेराव्या शतकात श्री मध्वाचार्यांनी केली. त्यांना ही मूर्ती समुद्रात बुडालेल्या जहाजात, गोपीचंदनाच्या ढिगात सापडली असे सांगितले जाते. असेही म्हणतात की ही मूर्ती प्रत्यक्ष रुक्मिणीच्या पूजेतील आहे.

इथे उडुपी मंदिरातील मूर्ती म्हणजे कृष्णाचे बालरूप आहे. मूर्ती उभी आहे पण नेहमीसारखी त्रिभंग ( मान. कंबर आणि पायात वाकलेली)अवस्थेतील नाही तर समचरण म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले अशी आहे. हातात नेहमीसारखी बासरी किंवा सुदर्शन चक्र नाही तर चक्क ताक घुसळण्याची रवी आहे असे म्हणतात. आपल्याला त्या नवग्रह खिडकीतून बघताना हाराखाली झाकलेल्या मूर्तीच्या हातात काय आहे ते नीट दिसत नाही. रवी असेल असे लक्षातही येत नाही! गदा टेकवलेली असेल असे वाटते. पण मंदिराच्या बाहेर खूप दुकानांतून अगदी लहानशा रवीपासून ते महाकाय रवीपर्यंत सगळे प्रकार विकायला होते खरे. 

मंदिराच्या बाहेरच्या भिंतीला मागे एक खिडकी आहे. त्याला कनकदास किंडी म्हणतात. कनकदासाला मंदिरात प्रवेश नव्हता. पण त्याच्या भक्तीने श्रीकृष्ण प्रसन्न झाले. मंदिराच्या मागे कनकदास जिथे होता, तिकडे त्यांनी आपले तोंड वळवले. जणू भूकंप व्हावा तशी भिंतीला चीर पडली आणि त्यातून कनकदासाला देवाचे दर्शन झाले. त्याच्या भक्तीला गौरवण्यासाठी ती भेग बुजवून न टाकता उलट तिथे खिडकी बांधण्यात आली. 

उडुपीच्या श्रीकृष्ण मठ परिसरात आठ मठ आहेत. इथे केवळ पूजा अर्चा चालत नाही तर शिक्षण आणि शास्त्रचर्चा चालते. त्या आठ मठांच्याकडे ओळीने मुख्य मंदिरातील पूजेचे आणि व्यवस्थापनाचे अधिकार असतात. पालीमरु, अडमरु, कृष्णपुरा, पुट्टीगे, शिरुरु, सोधे, कणियुरु आणि पेजावर हे ते अष्टमठ. एक मोठा चौकोनी परिसर त्यात तीन बाजूनी हे आठ मठ आणि उरलेल्या बाजूला मध्यभागी मुख्य मंदिर अशी त्या परिसराची रचना आहे. ह्या सर्व मठांची रचना, इमारती, त्यातील विद्यार्थ्यांची लगबग ह्यामुळे आपण एकदम जुन्या काळात आहोत असाच भास होतो. काही शतकांपूर्वी इथे केवढे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव नांदत असेल ह्याची जाणीव होते. 

तर आता पाहू या उडुपीचे फोटोज. अर्थातच मुख्य मंदिरात फोटो काढता येत नाहीत. हे सर्व बाहेरचे फोटो आहेत. 

प्रवेशद्वार 
मंदिर परिसर 
उडुपी श्रीकृष्ण मंदिर 
परिसर आणि अष्टमठ 
मंदिराशेजारचा तलाव 
कनकदास किंडी 
मुख्य मंदिरातील गाभाऱ्याच्या बाहेरच्या सभागृहाला मला वाटते पावसापासून वाचण्यासाठी खूप उतरते छप्पर केलेले आहे. तसेच गर्दी अतोनात असते. तेलातुपाचे दिवे जळत असतात. ह्या सगळ्यांमुळे एखाद्याला घुसमटू शकते. श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. 

 तसेच ज्यांना चालणे सहजशक्य नाही त्यांच्यासाठी ह्या मंदिरातील रांग जास्त लांब अंतराची आहे असे वाटू शकते. आपण चपला काढतो तिथपासून एक चढाचा रस्ता आहे. तिकडून रांग सुरु होते. एक वळसा घेऊन ती खाली उतरते आणि त्यापुढे मुख्य मंदिरातील रांग सुरु होते. दर्शनासाठी किती वेळ लागेल त्याचा अंदाज गर्दीवर अवलंबून आहे! 

उडुपी श्रीकृष्ण मंदिराच्या अगदी जवळ उडुपी श्रीकृष्ण मंदिरापेक्षाही प्राचीन अशी दोन शिवमंदिरे आहेत. एक आहे चंद्रमौलीश्वर आणि दुसरे आहे अनंतेश्वर. 

चंद्रमौलीश्वर मंदिर म्हणजे जिथे चंद्राने तपश्चर्या केली ते मंदिर असे सांगितले जाते. पण अर्थात असे भारतात अनेक ठिकाणी सांगितले जाते. आपण भावार्थ इतकाच घ्यायचा की हे एक पुरातन पवित्र स्थान आहे. हे मंदिर साधारण आठव्या शतकातील आहे असे म्हणतात. 

अनंतेश्वर मंदिरात मध्वाचार्यांच्या माता पित्यानी पुत्रप्राप्तीसाठी बारा वर्षे तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. हे मंदिर दुसऱ्या शतकातील आहे. इथे शैव आणि वैष्णव दोन्ही पंथांचे भाविक पूजा करतात. अनंतेश्वर मंदिराच्या बाहेर मोठी जवळपास तीस चाळीस फूट उंच दीपस्तंभ आहे. मंदिर परिसर असे शीर्षक असलेला वर एक फोटो आहे. त्यात आपण हा दीपस्तंभ पाहू शकाल.

दिवसाचा शेवट अर्थातच उडुपीच्या सुप्रसिद्ध वूडलॅंड्स रेस्टॉरंटमधील सुग्रास भोजनाने झाला! 

#CoastalKarnataka #Mangalore #Udupi #Mulki #KarnatakaTourism #ExploreKarnataka #SouthIndiaTravel #IncredibleIndia #KadriManjunathTemple #MangaladeviTemple #UchilaMahalakshmi #AncientTemples #SpiritualTravel #KarnatakaTemples  #MarathiTravelBlog #MarathiTravelogue #TravelInMarathi #मराठीब्लॉग #पर्यटन #मंगळुरू #SilverVeganTravels









 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...