मागच्या आठवड्यात मी माझ्या टेराकोटा सेना ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये चीनच्या प्रसिद्ध भिंतीचा उल्लेख केला होता. म्हणून ह्या वेळी ठरवले होते की तुम्हाला ती चीन ची भिंत दाखवायला घेऊन जावे. पण मग वाटले तुम्हाला भारतातली प्रसिद्ध भिंतच दाखवावी, कदाचित ही भारतातली भिंत पण बऱ्याच जणांना माहितीच नसेल!
संपूर्ण जगातील क्रमांक दोनची लांब भिंत म्हणून ही भिंत जगभरात प्रसिद्ध आहे. युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून पण घोषित केलेलं आहे. हे ठिकाण आहे तळ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या, राजस्थानमधील उदयपूर ह्या शहरापासून साधारण ९० किलोमीटर वर. ही भिंत बांधली गेली आहे कुंभलगड किल्ल्याची संरक्षक भिंत म्हणून.
अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर कुंभलगड किल्ला आहे. राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगड वन्य जीव अभयारण्यात हा किल्ला वसलेला आहे. त्याची अतिशय दुर्गम जागा आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना ह्यामुळे कुंभलगड हा अजेय आणि अभेद्य किल्ला बनला आहे. मेवाड भागातील सर्वात भक्कम किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक लागेल.
हा किल्ला पंधराव्या शतकात राणा कुंभ ह्यांनी बांधला. फक्त हा किल्लाच नव्हे तर मेवाडचा इतिहास देखील राणा कुंभाचे नाव एक शूर योद्धा म्हणून लक्षात ठेवतो. राजस्थानमधील अनेक छोटी छोटी राज्ये त्यांनी एकत्र केली. आक्रमकांविरुद्ध, मुस्लिम सुल्तानांविरूद्ध राणा कुंभांनी जोरदार लढा दिला. त्यांचे राज्य रणथंबोर पासून ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर पर्यंत पसरले होते.
राणा कुंभांनी एकूण ३२ किल्ले बांधले किंवा त्यातील बऱ्याचशा किल्ल्यांचे पुनरुज्जीवन केले. चित्तोडगड वरील कीर्तिस्तंभ देखील त्यांनीच बांधलेला आहे. हा सात मजली सुंदर विजयस्तंभ मोहम्मद खिलजीवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून बांधण्यात आला आहे.
महाराणा कुंभ ह्यांनी बांधलेला कीर्तिस्तंभ, चितोडगड. 📷Commons Wikimedia.org |
महाराणा कुंभ अतिशय चांगले वीणावादक होते तसेच त्यांना संगीतात देखील चांगली गती होती. वेद आणि उपनिषदांचे त्यांनी अध्ययन केलेले होते.
असे म्हणतात की ह्या ठिकाणी साधारण दुसऱ्या शतकात एका जैन राजपुत्राने छोटा किल्ला वसवला. पण मध्ये अनेक शतके हा किल्ला विस्मृतीत गेला होता, दाट जंगलात,विजनवासात होता. महाराणा कुंभ ह्यांनी ह्या जागेचे आणि पर्यायाने दुर्गम किल्ल्याचे महत्व ओळखले आणि तो साधारणपणे सध्या आहे त्या स्वरूपात बांधून घेतला. त्या काळाचे विख्यात वास्तुरचनाकार मदन ह्यांनी हा किल्ला बांधण्यात सहाय्य केले आहे. १४४३-१४५८ इतकी वर्षे बांधकाम चालू होते.
तो राजस्थानमधील सर्वात उंच किल्ला आहे. तुम्ही उदयपूर किंवा जोधपूरहून कुंभलगडला जाऊ शकता. तुमच्या राजस्थान सहलीत ही दोन्ही ठिकाणे तर असणारच.
पर्यटकांची वाहने किल्ल्यात आणायला परवानगी नाही. त्यामुळे ती बाहेर उभी करून आत चालत जायला लागते. किल्ल्याच्या भव्य विस्तारात अनेक दरवाजे आहेत. त्यांना तिथे पोल म्हणतात. आपल्याला हनुमान पोल, राम पोल असे अनेक दरवाजे बघायला मिळतात. माझ्या आठवणीने ह्या वाहन तळाजवळच्या फोटोतल्या दरवाजाचे नाव राम पोल होते.
किल्ल्याच्या आत निवासी भाग देखील आहे. तिथे लोक राहतात. त्यामुळे आपल्याला नव्या पद्धतीची अनेक घरे, झोपड्या, अपार्टमेंट्स असे सगळे तिथे दिसते. पण तरीही त्या भव्य परिसरात विखुरलेल्या जुन्या इमारती नक्की लक्ष वेधून घेतातच.
किल्ल्याच्या आतला भाग |
विविध टेकड्यांवर मिळून हा किल्ला बांधला आहे. त्या टेकड्यांच्या चढ उतारांवर बांधलेला किल्ला असल्याने कित्येक ठिकाणी रस्त्याला अगदी खडी चढण आहे. ह्या फोटोत देखील रस्त्याला असलेला चढ तुम्ही बघू शकता! किल्ल्यात अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. त्यांची संख्या तीनशेहून अधिक आहे असे म्हणतात.
किल्ल्यातील अनेक मंदिरांपैकी एक मंदिर |
किल्ला |
खालून दिसणारे कुंभ महालाचे दृश्य |
किल्ल्याची सुंदर भिंत |
किल्ल्याची सुंदर भिंत. |
जरा चढून वर आलात की तुम्हाला किल्ल्याचा भव्य परिसर आणि ती सुप्रसिद्ध लांब भिंत दिसू लागते. कुंभलगड जगातील दोन नंबरच्या लांब भिंतीसाठी प्रसिद्ध आहे. ही भिंत जवळपास ३२ ते ३४ किलोमीटर लांबीची आहे. भिंतीचा काही भाग अभयारण्यातून जातो. तुम्ही त्या भिंतीवरून चालत चालत एक संपूर्ण फेरी मारू शकता. पण सोबत मार्गदर्शक मात्र घेऊन जा. कारण अभयारण्यात वन्य प्राणी देखील आहेत. ज्या ठिकाणाहून निघाला असाल तिथे फेरी पूर्ण करून परत यायला किमान दोन दिवस तरी लागतील.
भिंत काही ठिकाणी इतकी रुंद आहे की एकावेळी शेजारी शेजारी असे आठ घोडे धावू शकतील. विशेष गोष्ट अशी की भिंत सरळ रेषेत बांधलेली नाही तर वेगवेगळ्या टेकड्यांची जशी नैसर्गिक वळणे असतील त्या नुसार बांधलेली आहे.
किल्ल्यावर देखील काही एकदम अवघड वळणे आहेत. त्यामुळे शत्रूने चढाई केली तरी शत्रूला आत येणे अवघड होत असणार. हा किल्ला म्हणूनच कोणी जिंकू शकले नाही. एकदाच मुघलांनी कब्जा केला होता पण तो देखील नेहमीच्या मुगल पद्धतीप्रमाणे कपटाचा आधार घेऊन, पाण्यात विष कालवून. अश्या मार्गाने जिंकून घेतलेला किल्ला ते फार काळ स्वतःकडे राखू शकले नाहीत. राजपूत राजांनी तो परत जिंकून आपल्या ताब्यात घेतला. ह्या किल्ल्याला अनेक युद्धांचा, कटांचा, सत्तेच्या हव्यासाचा इतिहास आहे.
भिंतीवर अनेक ठिकाणी टेहळणी बुरुज आहेत. भिंतीला छोट्या छोट्या कोनाड्यांप्रमाणे खिडक्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे तिरंदाज त्यातून नेम धरून शत्रूवर बाण तर मारू शकतील पण त्यांना स्वतःला भक्कम दगडी भिंतीचे संरक्षण असेल.
किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे. त्यामुळे नक्कीच मार्गदर्शकाची आवश्यकता भासते. अन्यथा काय बघायचे, कुठल्या मार्गाने जायचे हे कळणारच नाही. वाहन तळा जवळ तिकीट खिडकी आहे तिथे मार्ग दर्शक मिळू शकतात.
किल्ल्याच्या आतल्या इमारती म्हणजे नुसत्या भिंती, रिकाम्या खोल्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा तरी तिथे चित्रे, काही कलाकृती असे काही नव्हते. ते सगळे म्हणे गेले आहे, निरनिराळ्या वस्तू संग्रहालयात आणि काही हॉटेल्स मध्ये.
पगडा पोल जवळ एक खास वास्तू आहे जिचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. ते आहे महाराणा प्रतापचे जन्मस्थळ! आयुष्यभर लढत राहून, मुगल राजा अकबराला विरोध करत आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवणारा महाराणा प्रताप!
ही इमारत महाराणा प्रताप जन्मस्थळ म्हणून दाखवली जाते. कुंभलगड ह्या नावाशी आणखी एक आख्यायिका जोडली गेलेली आहे. राणी कर्णावतीची मदतनीस आणि राजा उदयसिंग (दुसरा) ह्याची दूध आई असलेली पन्नादाई आपण सर्वाना माहिती आहेच. तिने स्वत:चा मुलगा चंदन ह्याचा बळी देऊन बाल राजा उदयसिंग (दुसरा) ह्याचे प्राण वाचवले. मग उदयसिंग (दुसरा) ह्याला गुप्तपणे कुंभलगड ला आणण्यात आले. दुसऱ्याच नावाने इथेच वाढविण्यात आले आणि इथेच त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच सुमारास त्याला ह्याच किल्ल्यावर पुत्रप्राप्ती झाली. तो पुत्र म्हणजेच प्रतापसिंग जो पुढे महाराणा प्रताप म्हणून विख्यात झाला. पन्नादाईचे नाव असलेली एक जागा देखील किल्ल्यात दाखवली जाते.
बादल महाल |
किल्ल्यात सर्वात उंच ठिकाणी असलेली बादल महाल ही इमारत त्या मानाने नवी म्हटली पाहिजे. राजा फतेसिंगानी एकोणिसाव्या शतकात बांधली आहे ही इमारत. त्या महालाचे दोन स्वतंत्र भाग आहेत, जे जिन्यांनी आणि एका रस्त्याने एकमेकांना जोडले गेले आहेत. ते दोन भाग जनाना आणि मर्दाना निवासासाठी होते असे सांगितले जाते.
बादल महालातून दिसणारे दृश्य |
बादल महालाची हवेशीर खिडकी 📷 गिरीश टिळक |
पावसाळ्यात हा महाल संपूर्णपणे ढगांनी आच्छादलेला असतो, म्हणून त्याचे नाव बादल महाल. किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणावरून दिसणारे दृश्य इतके सुंदर आहे की इतके जिने आणि चढाचे रस्ते पार करून इथे पोचल्याचे सार्थक होते. अरवलीच्या पर्वतरांगा तर दिसतातच पण हवा स्वच्छ असेल तर पार अगदी दूरवरचे वाळवंट देखील इथून दिसते म्हणतात.
सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावर एक सुंदर, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने इतिहास जिवंत करणारा कार्यक्रम असतो. तो नक्की पहा. नंतर तासभर किल्ल्यावर रोषणाई केलेली असते. छायाचित्र कारांसाठी तर ही पर्वणीच असेल. आम्ही मात्र हा कार्यक्रम बघू शकलो नाही. आम्हांला दुपारी निघून रात्रीपर्यंत पुष्करला पोचायचे होते.
किल्ल्यात जरी काही चित्रे, कलाकृती नसल्या तरीही कुंभलगड हे अगदी नक्की भेट द्यावी असेच ठिकाण आहे. ती सुप्रसिद्ध भिंत, सुंदर वास्तू, महाराणा प्रतापाचे जन्मस्थळ आणि अरवलीच्या पर्वत रांगा. तुमचे मन नक्कीच आकर्षून घेतील.
कुंभलगड ला भेट देण्याचा सर्वात चांगला काळ आहे ऑक्टोबर ते मार्च. त्या नंतर खूप उन होते. आधी जुलैच्या सुमाराला, पावसाळ्यात पण सगळे हिरवेगार आणि सुंदर दिसते म्हणतात. पण रस्ते मात्र निसरडे झालेले असतात.
किल्ल्यातला चढ बराच आहे, काही ठिकाणी अवघड पण वाटेल. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी एक काठी सोबत घ्यायला हवी. पण तरीही इथे जा नक्की!! सगळ्या मंदिरांसकट गड बघायचा असेल तर मात्र संपूर्ण दिवस राखून ठेवा. नाहीतर मग तीन चार तास पुरेसे आहेत.
तुम्ही किल्ल्याच्या अगदी जवळ येईपर्यंत तुम्हाला इथे एखादा किल्ला आहे आणि तो देखील एवढा अजस्त्र हे कळत देखील नाही हे ह्याच्या रचनेचे आणि वळण वळणांच्या रस्त्यांमुळे घडवलेले नवल आहे. म्हणूनच हा किल्ला कायम राजपूत राजांचे आश्रयस्थान, संकटांपासून वाचण्याचे ठिकाण होता.
#TheLongestWallInIndia #SecondLongestWallInWorld #RajputKingsLegends #GreatWarriorMaharanaPratap #WondersOfArchitecture #PlacesToSeeInRajasthan #WhatShouldYouKnowBeforeTravellingToRajasthan
Wa किती छान आहे g, केवढे भव्य
ReplyDeleteThanks!!
DeleteVery very interesting write up, photos and interesting place. I would love to go for that 2 days track on the wall :-)
ReplyDelete