मुख्य सामग्रीवर वगळा

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र


भिंतीवरील कोरीवकाम 
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच.
सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर.
सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा!
मंदिराचा परिसर 
सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे, सिद्धेश्वर महादेवाचे.
सिद्धेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य 
📷विकिमीडिया कॉमन्स 
शंकराचे वाहन असलेला नंदी, शंकर मंदिरात नेहमी हजर असतोच. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीकडे तोंड करून ध्यान लावून बसलेला असतो. सर्वात सुंदर कोरीवकामाने सजवलेल्या नंदींपैकी एक नंदी तुम्हाला सापडेल तो ह्या सिद्धेश्वर महादेवासमोर.
त्या घुंगुरमाळा, छोट्या घंटांच्या माळा, वेगवेगळ्या साखळ्या हे सगळे तो नंदी अगदी जिवंत असल्याचा भास उत्पन्न करतात. नंदीच्या पाठीवरची झूलदेखील कोरलेली आहे!
सुशोभित नंदी 
गाभाऱ्याकडे तोंड करून ध्यान लावलेला नंदी नेहमी भक्तांना सांगतो की परमेश्वराकडे लक्ष एकाग्र करा!
नंदी बघून झाल्यावर आपण समोर बघितले की आपल्याला दिसते एक अर्धी भिंत, शिव मंदिराच्या सभागृहाला वेढणारी. चारी बाजूला त्या भिंतीवर अतिशय सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. रामायण, महाभारतातील विविध प्रसंग तर आहेतच पण इतरही अनेक मूर्ती आहेत.
एका भिंतीवर तर राजा मिरवणुकीने देव दर्शनासाठी जातो आहे असा प्रसंग कोरलेला आहे. असे म्हणतात की नानासाहेब पेशवे सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनाला येत आहेत असा प्रसंग कोरलेला आहे.
द्वारपाल आणि भिंतीवरील कोरीवकाम 
राम रावण युद्ध 
ह्या पॅनेलवर रामायणातील एक महत्वाचा प्रसंग, राम-रावण युद्ध बघायला मिळतो. दहा शिरे, वीस हात असलेला रावण आणि राम लक्ष्मण ह्यांचे युद्ध. राम लक्ष्मण धनुष्याला बाण लावून, प्रत्यंचा ताणून युद्धासाठी सज्ज आहेत. त्यांच्या आकारातील फरक बघा. रावण असुर/राक्षस असल्याने अजस्र दाखवलेला आहे, तर राम लक्ष्मण माणसाइतक्याच आकाराचे दाखवले आहेत. झाडावर बसलेला हनुमान देखील पाहायला विसरू नका.
हनुमान आणि द्रोणागिरी 
📷जयंत अभ्यंकर 
हा प्रसंग आहे, हनुमानाने रामलक्ष्मणासाठी औषधी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याचा. आता खाली तिथे ती संदूक काय करते आहे मला कल्पना नाही! बहुधा त्या संदुकीत शस्त्रे ठेवत असावेत. त्यावरचे डिझाईन, त्याच्या कड्या किती सुंदर कोरलेल्या आहेत.
कृष्ण 
📷जयंत अभ्यंकर 
बहुतेक तरी हा प्रसंग कृष्ण आणि गोपींचा असावा. गोपी नदीत स्नान करीत असताना, कृष्ण त्यांची वस्त्रे घेऊन झाडावर ठेवून देतो आणि मग त्या, 'वस्त्रे परत दे' अशी प्रार्थना करतात तो प्रसंग असेल. "दे रे कान्हा, चोळी अन लुगडी" बरोबर गाणे आठवले आहे तुम्हाला आणि त्या सोबतच लता मंगेशकरांचा स्वर्गीय आवाज कानात गुंजत असेलच!
सुकेशिनी 
📷जयंत अभ्यंकर 
लांब केस असलेली ही स्त्री, सुकेशिनी, केशरचना करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या खाली असलेल्या पक्षाला बहुधा ते कमळाचे दांडे असावेत असा भास झाला असेल का? त्याने केस तोंडात धरून ओढायला सुरुवात केली आहे!! आता ती सुकेशिनी, त्या पक्ष्याच्या तोंडातून केस ओढून घेण्याचा प्रयत्न करते आहे.
तिच्या अंगावरचे अलंकार बघा, किती बारकाईने कोरलेले आहेत. तेव्हा लांब आणि मोठ्या कर्णभूषणांची नक्कीच फॅशन होती!!!
भीम आणि हनुमान 
हा आहे महाभारतातील एक प्रसंग, भीमाच्या गर्व हरणाचा. जेव्हा भीमाला असा गर्व झाला की तोच ह्या पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिमान आहे, तेव्हा हनुमान एका म्हाताऱ्या माकडाचे रूप घेऊन, भीमाच्या वाटेत शेपटी ठेवून बसला. भीम म्हणाला, "शेपटी बाजूला कर." तेव्हा हनुमान म्हणाला, "आता वय इतके झाले आहे की शेपटी बाजूला करण्या इतकी पण ताकद अंगात नाही राहिली. तूच दे बाबा शेपटी बाजूला करून." भीमाने खूप प्रयत्न केला पण त्याला काही ती शेपटी उचलून बाजूला ठेवता आली नाही आणि अर्थातच त्याचे गर्व हरण झाले.
नर्तिका 
सभागृह - सिद्धेश्वर महादेव मंदिर 
आपण मंदिरात आत जातो घुमटाच्या आकाराचे छत दिसते. आत जरी फारसे कोरीवकाम केलेलं नसले, तरी आपल्याला काही मूर्ती दिसतात. दिशांच्या देवता असतील, खांबावरचे छत तोलून धरणारे यक्ष असतील किंवा खांबा, कोनाड्यांवरचे कोरीवकाम असेल. आत प्रवेश करताच जमिनीवर एक कासव आहे.
हिंदू मंदिरांचा अविभाज्य भाग असलेले कासव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अलिप्तता, चिकाटी, ज्ञानार्जनाची इच्छा आणि इतरही अनेक गोष्टी अंगात असल्या पाहिजेत असे सांगत राहते.
सिद्धेश्वर महादेव - गर्भगृह 
आपण शिव मंदिरातून बाहेर आलो की अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले एक मंदिर बघायला मिळते. चांदणीच्या आकाराच्या ह्या मंदिराला चांदणीसारखीच टोके आहेत. हे देवीचे मंदिर आहे आणि बाहेरच्या बाजूला देवीची मातृकासदृश्य अनेक रूपे कोरलेली आढळतात.
देवी मंदिर 
देवी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आढळणारी देवीची विविध रूपे.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ही देवी चतुर्हस्त धारण करणारी आहे. तिचे वाहन मोर आहे. उजव्या मागच्या हातात शस्त्र दिसते आहे. डाव्या मागच्या हातात एक भले मोठे फळ धरलेले आहे. बहुतेक म्हाळुंग असावे. डाव्या पुढच्या हातात कमंडलू आहे. चौथ्या हातात काय आहे ते मला कळले नाही. तुमच्या लक्षात आले असेल तर कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ही देवी देखील चतुर्हस्त धारिणी आहे. उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहेत. डाव्या मागच्या हातात डमरू आहे. तिच्या चौथ्या हातात विड्याचे पान आहे की नुसतीच वरद मुद्रा आहे, कळले नाही.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ह्या देवीने आपल्या चार हातांपैकी तीन हातात अंकुश, डमरू आणि तलवार धारण केलेले आहेत. चौथा हात वरद मुद्रेत आहे. तिचे वाहन असलेला नंदी तिच्या बरोबर आहे. बहुतेक ही माहेश्वरी असावी.
देवी 
📷जयंत अभ्यंकर 
ह्या देवीने एका हातात एक लोट्याच्या आकाराचे पण उंच मानेचे भांडे धरलेले आहे, सुरईपेक्षा वेगळा आहे हा आकार. दुसऱ्या हातात वाडगा आहे. मागच्या हातात तलवार आहे आणि मागच्या दुसऱ्या हातात बहुतेक कमळ आहे. तिचे वाहन वाघ तिच्याबरोबर आहे. त्या प्राण्याचे तोंड वाघासारखे आहे पण गळ्यावर कोरलेली आहे ती आयाळ असेल का? म्हणजे हा सिंह असेल का?
मंदिराच्या गाभाऱ्यातील देवी. 
ह्या आवारातील तिसरे मंदिर आहे विष्णूचे. विष्णूचे वाहन असणारा गरुड आपल्याला मंदिराच्या समोरच दिसतो.
गरुड 
मंदिर आवार आणि गरुड 
विष्णू मंदिर 
विष्णू मंदिराच्या सुंदर कमानी 
आपण मगाशी गरुडाचा फोटो पाहिला होता. त्याच्या मागच्या बाजूला हा हनुमान आहे. ह्या वरच्या फोटोत आपल्याला तो हनुमान दिसतो आहे.
सुंदर कोरीवकाम 
मंदिर आवार 
ही सर्व मंदिरे आणि त्यावरील कोरीवकाम सुंदर आहे. त्यांचे पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे तसेच इतिहासाच्या दृष्टीने पण महत्व आहे. अठराव्या शतकात बांधलेली आणि इतके कोरीवकाम असलेली फार कमी मंदिरे बघायला मिळतात.
देवळाच्या बाहेरच्या बाजूला नदीत उतरणारे सुंदर घाट आहेत. तसेच मेणवलीच्या मंदिरात आपण पाहिली होती तशी एक घंटा देखील आहे. पण आम्ही हे दोन्हीही बघू शकलो नाही.
मला नेहमी ह्या मंदिराचा विचार करताना आश्चर्य वाटते. आजच्या मानाने हे आवार नक्कीच भव्य आहे. पण तेव्हाच्या काळाचा विचार केला तर ही जागा थोडी कमीच वाटते. तटबंदीच्या आत आणि इतक्या जवळ जवळ ही तिन्ही मंदिरे का बांधली गेली असतील? विशेषतः ते चांदणीच्या आकारातील देवी मंदिर! त्याच्या आजूबाजूला थोडी जास्त मोकळी जागा असती तर त्या रचनेचे सौंदर्य आणखी खुलले असते.
मंदिराच्या तटबंदीला असलेली दुसऱ्या मजल्यावरची दर्शिका/ गॅलरी हा ह्या मंदिराचा विशेष आहे. त्या दर्शिकेच्या कमानी देखील अतिशय प्रमाणबद्ध आहेत. आपल्याला वरच्या एका फोटोत त्या बघायला मिळाल्याच आहेत. त्या गॅलरीतून नदी, घाट, झाडे असे सुंदर दृश्य आत्ताही दिसते.
पैसाचा खांब असलेले ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, देवगड दत्त संस्थान इत्यादी ठिकाणे ह्या टोक्याच्या सिद्धेश्वर मंदिरापासून अगदी जवळ आहेत. फार फार तर १५ किलोमीटर अंतरावर.
जास्त लोकांनी ह्या सर्व ठिकाणांना भेटी देऊन वास्तुशास्त्रातील आणि अध्यात्मातील आश्चर्याचे दर्शन घेतले पाहिजे. मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांना देखील हे मंदिर बघण्यात, ह्या मूर्ती कोणाच्या आहेत ते उलगडण्यात आनंद वाटेल.
आपल्याही परिसरात किंवा पाहण्यात अशी अनोखी  मंदिरे असल्यास त्या विषयी इतरांना सांगायला हवे. लिहायला हवे. माणसांची ये जा होत राहिली तर मंदिरे जागती राहतात.
मी सुरुवातीला म्हटले होते, की टोक्याचे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर वसलेले एक दगडी बिल्वपत्र वाटते.  बेल त्रिदल का? तर तीन मंदिरे एका आवारात इतकी जवळ जवळ आणि मुख्य मंदिर शंकराचे आहे म्हणून. पण त्यावरील कोरीवकाम पाहिल्यावर मात्र नदीच्या किनारीवर उमललेले तीन पाकळ्यांचे फुल वाटते!!



#Dronagiri #PeshaveEraTemple #EighteenthCenturyCarvings #TemplesOnConfluence #MaharashtraTempleArchitecture

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...