Skip to main content

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर हिरवी रेषा दिसते. ही रेषा गुजराथ येथून सुरु होते आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते.
ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत. 
या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे!
वरंधा घाट 
📷विकिमीडिया कॉमन्स 
पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात. 
पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो. 
हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवरून, डोंगरमाथ्यावरून खाली झेपावतो. धबधब्याचा आवाज, धबधब्याच्या प्रवाहातून विखुरलेले थेंब आणि त्याच्या सभोवतालची हिरवाई हे सगळे गिर्यारोहकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षण केंद्र बनलेले आहेत.
शिवथर धबधबा
 📷 माझी मैत्रीण 
पावसाळ्यातील शिवथर धबधबा 
📷विकिमिडीया कॉमन्स 

सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे आणि तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ आहे. 
हा सह्याद्री पर्वतरांगामधील धबधब्यांपैकी एक सर्वात सुंदर धबधबा आहे हे निश्चितच, पण लोक या ठिकाणी येण्याचे मुख्य कारण मात्र ते नाही! तर शिवथर घळीच्या मुळे इतके लोक या ठिकाणी भेट देतात. 
शिवथरघळ ही धबधब्याजवळील घळ किंवा गुहा आहे, खरे तर जवळजवळ धबधब्याखालीच आहे म्हणा ना!
ही शिवथरघळ इतक्या लोकांनी भेट देण्याइतकी का महत्वाची आहे? नैसर्गिक सौंदर्य, भोवतालची हिरवाई, भूरचना शास्त्राच्या अभ्यासकांसाठी असलेले ह्या जागेचे महत्व हे तर कारण आहेच, पण मुख्य म्हणजे ह्या घळीत २२ वर्षे समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते हे इतक्या लोकांनी वर्षानुवर्षे, परत परत भेट देण्याचे कारण आहे. 
समर्थ रामदास स्वामी हे सतराव्या शतकातील भारतीय, राष्ट्रउपासक संत होते जे एक उत्तम कवी, तत्वज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते.
समर्थ रामदास 
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून, आज इतक्या शतकांनंतरही, हजारो नव्हे तर कोट्यावधी लोक त्यांचे अनुयायी आहेत. दासबोध हे त्यांचे प्रमुख लेखन आहे, जे त्यांनी शिवथर घळीत लिहिले आहे.
दासबोध हा जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नव्याने उमगत जातो असा ग्रंथ आहे. 
शिवथर घळीमध्ये रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी यांच्या मूर्ती आपण पाहू शकतो. समर्थ रामदासस्वामी दासबोध सांगत आहेत आणि कल्याणस्वामी लिहित आहेत.
समर्थ रामदास आणि कल्याणस्वामी 
ह्या दोन्ही मूर्ती पाहिल्या की आठवते कल्याणस्वामींचे पद,
मज तो आवडतो मम स्वामी | निशिदिनी अंतर्यामी ||धृ||
अक्षैपदाचा सुखदाता | निरसोनी माया ममता ||1||
भक्तीमार्गाचा गजढाला | चालविल्या आढाला ||2||
काय बोलो मी किर्तीसी | न दिसे तुळणेसी ||3||
छेत्र बहुतांचे दासाचे | धाम ची कल्याणाचे ||4||
धबधब्याजवळच्या किंवा खरे तर धबधब्याखालच्याच म्हणा ना, घळीत ह्या मूर्ती आहेत. ह्या मूर्तींच्या मागे श्रीरामाचे रामदासस्वामींनी स्थापन केलेले लहानसे मंदिर दिसेल. ह्या फोटोतही आपण मागे मूर्ती पाहू शकता. 
घळीचे प्रवेशद्वार हे खालच्या फोटोत आहेत तसे दिसते. खडकापासून आपले डोके वाचावे म्हणून आपण झुकून आत जातो आणि आत ह्या मूर्ती दिसल्या की आपोआप नतमस्तक होतोच!
घळीचे प्रवेशद्वार 
इथे फोटोत आपल्याला जो बोर्ड दिसतो त्यावर समर्थ रामदास स्वामींनी शिवथर घळ धबधब्याचे केलेले वर्णनपर काव्य वाचायला मिळते. ते काव्य असे आहे, 
गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥
गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥
तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ॥ ३ ॥
दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥
गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥
कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥
ज्या परिसरात शिवथर घळ आहे त्या परिसराला सुंदरमठ असे म्हणतात. 
सुंदरमठाचे प्रवेशद्वार 
ह्या प्रवेशद्वारा पर्यंत आपण गाडीने जाऊ शकता. पुढे काही पायऱ्या चढून गेलात की मग शिवथर घळीत जाण्याचा रस्ता लागतो. तिथून अगदी काही पावलांच्या अंतरावर आहे शिवथरघळ. 
माहितीपत्रक 
माहितीपत्रक 
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. असे म्हणतात की त्या दोघांची शिवथर घळीत भेट झाली होती. 
समर्थ रामदास म्हणाले होते की जरी मी देहाने तुमच्यामध्ये नसलो तरी दासबोधाच्या रूपाने मी आहेच. 
माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||
आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वत:सिद्ध |
असता न करावा खेद | भक्तजनी ||२||
नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |
तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||३||
इतक्या शतकानंतर अजूनही, दासबोध कालबाह्य न होता, अनेकांना मार्गदर्शक ठरला आहे. दासबोधाचे अनेक भारतीय भाषांत तर भाषांतर झाले आहेच पण अनेक आंतरराष्ट्रीय भाषांत देखील अनुवाद झालेला आहे. 
दासबोध जयंती दरवर्षी माघ शुद्ध नवमीला साजरी केली जाते. ह्याच दिवशी १६५४ मध्ये दासबोध लिहून पूर्ण झाला होता. 
त्या दिवशी दासबोधाची पालखीतून मिरवणूक निघते. हे एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा होणे ह्याचे अनोखे उदाहरण आहे. त्या निमित्ताने त्यातील विचारांना उजाळा मिळतो हे सर्वात महत्वाचे. 
आसपासच्या गावांतून म्हणजे कुंभे शिवथर, आंबे शिवथर, कसबे शिवथर आणि खडकेश्वर ह्या गावातून पालखी नेली जाते. ह्या सोहळ्यासाठी आधीच अनेक ठिकाणाहून दिंड्या शिवथरघळीत दाखल झालेल्या असतात. 
स्थानिक लोक पालखीची वाट पाहत असतात. मग पालखी दाराशी आली की तिची साग्रसंगीत पूजा करतात आणि थोडा वेळ का होईना, पण पालखी आपल्या खांद्यावरून नेतात. 
त्या त्या गावातील मंदिरांतून पण पालखी नेली जाते. सर्वाना नंतर शिवथर घळीत येण्याचे आमंत्रण दिले जाते. ते आमंत्रण पण अगदी ऐकण्याजोगे असते. 
सगळीकडे फिरून काही तासांनी पालखी जेव्हा शिवथरघळीत परत येते तेव्हा तिथे पूजा, आरती, प्रार्थना आणि प्रसाद असतो. आलेल्या सर्व गावकऱ्यांना तसेच पालखीसाठी आलेल्या दिंडयांना जेवण असते. सामु हिकतेचा आणि समरसतेचा आविष्कारच आपल्याला त्या वेळी बघायला मिळतो. मला फेब्रुवारी २०१९ मध्ये ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची अविस्मरणीय संधी मिळाली होती. 
पालखी 
पालखी 
दासबोधाची पालखी 

सह्याद्री पर्वतरांगा 
📷प्रज्ञा साठे 

मिरवणूक 
📷प्रज्ञा साठे 

मी भाग्यवान! ( Feb 2019)
📷प्रज्ञा साठे 

मिरवणूक 
📷प्रज्ञा साठे 

झेंडा रामनामाचा 
📷प्रज्ञा साठे 
मला सांगायला फार अभिमान वाटतो की ह्या गावातील अनेक जण सैन्यात आहेत. सुट्टीसाठी घरी आलेले सैनिक देखील ह्या मिरवणुकीत सामील झाले होते. 
सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावांतून चालत जाता येणे, तिथल्या स्थानिकांसोबत मिसळता येणे, दासबोधाची पालखी काही क्षण का होईना खांद्यांवर घेता येण्याचे भाग्य लाभणे आणि मिरवणुकीचा भाग होण्याची संधी मिळणे हे ह्या अविस्मरणीय अनुभवाचे उत्कर्ष बिंदू होते. 
शिवथरघळीत कसे आणि कधी जाता येईल ह्या विषयी अधिक माहिती हवी असेल तर हा मी फेब्रुवारी २०१९ मध्ये काढलेला फोटो पहा. हे नंबर आत्तापर्यंत बदललेले नसतील तर तुम्हाला माहिती मिळू शकेल. 


 #OneDayTrip #JayJayRaghuveerSamarth #RamdasSwami #DasNavami #DasbodhNavami #Raigad#PlacsToVisitNearRaigad

Comments

  1. पालखी मिरविता आली तुला, धन्य झालीस ����

    ReplyDelete
  2. खरंच पालखीत सामिल होणे व त्याचा झेंडा मिरवायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे, धन्य झालीस तू वृंदा

    ReplyDelete
  3. आठवणींना उजाळा मिळाला😍🙏🙏मला आ.मीराताईमुळे हे भाग्य सलग ६-७ वर्ष मिळाल 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...