ह्या आधी एका पोस्टमध्ये आपण तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराबद्दल वाचले आहे. त्या पोस्टची लिंक येथे आहे.https://silvervegantravels.blogspot.com/2020/10/blog-post_24.html
त्या पोस्टमध्ये मी बृहदेश्वर मंदिराचा इतिहास आणि सर्वसाधारण रचना याबद्दल लिहिले होते. या पोस्टमध्ये मी मंदिरातील काही गोष्टींविषयी, काही शिल्पाकृतींविषयी विस्ताराने व तपशीलवार लिहावे असा विचार करत आहे.
पहिल्या पोस्टमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल, तर मी तंजावरच्या मराठा शासकांबद्दल आणि बृहदेश्वर मंदिरातील त्यांच्या योगदानाबद्दल लिहिले होते. मंदिराच्या मराठा प्रवेशद्वाराचे छायाचित्र येथे देते आहे. मंदिराचे हे पहिले गोपुर/प्रवेशद्वार आहे. आतल्या गोपुरांचे संरक्षण व्हावे म्हणून हे उभारले गेले होते. विटा व चुनखडीने बांधलेले हे प्रवेशद्वार आहे.
Maratha Gate 📷 Jayant Abhyankar |
मराठा राज्यकर्त्यांच्या मंदिरांमधील सहभागाविषयी सांगणारे देवनागरी लिपी आणि मराठी भाषेतील शिलालेख ह्या मंदिरातच कोरलेले दिसतात.
Marathi Inscription 📷Aniruddha |
मी येथे मंदिराचा आराखडा देत आहे, म्हणजे तुम्हाला मंदिर रचनेची संपूर्ण कल्पना येईल.
Temple plan 📷 Jayant Abhyankar |
नंदी मंडपासमोर एक अतिशय सुंदर सुशोभित असा जयस्तंभ किंवा ध्वज स्तंभ आहे.
Dhwajstambh as seen from Nandimandapam. 📷Yashwant Kakad |
Dhwajstambh 📷 Jayant Abhyankar |
ध्वजस्तंभ हा नेहमीच मंदिर रचनेचा महत्वाचा भाग असतो. येथे आपण वरच्या बाजूला तीन पताकांसारखे भाग किंवा प्लेट्स पाहू शकता. त्यांना मेखला असे म्हणतात. मेखलांना लहान लहान घंटा लटकवलेल्या असतात. वाऱ्याने त्या हलतात आणि मधुर आवाज करतात.
Dhwajstambh 📷 Wikipedia |
घंटा आणि मेखला दाखविण्यासाठी मी छायाचित्राचा काही भाग येथे झूम करुन दाखविला आहे. ध्वज स्तंभाच्या शीर्षस्थानी आपण एक नंदी पाहू शकता. सहसा ध्वजस्तंभाच्या सर्वात वर मंदिराच्या मुख्य दैवताचे वाहन असते. येथे मंदिराची मुख्य देवता शिव आहेत, म्हणून त्यांचे वाहन असलेला नंदी ध्वजस्तंभाच्या शिखरावर बसलेला आहे. स्तंभ खूपच उंच आहे आणि तो वेगवेगळ्या आकार आणि रचनांनी तोलून धरलेला आहे.
DhwajStambh base 📷Aniruddha |
पायथ्याच्या बाजूला गणेश, शिव + पार्वती, कार्तिकेय / सुब्रमण्यम यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
Ganesh on Dhwajstambh 📷 Yashwant Kakad |
Shiv+parvati 📷Jayant Abhyankar |
कमळाच्या फुलाच्या पायथ्यावर, ध्वजस्तंभाच्या वरच्या थरांचे वजन उचलणार्या काही सशक्त स्त्रिया तुम्ही पाहू शकता. कमळांच्या आकाराचे आणि पाकळ्यांचे पाकळ्याचे डिझाईन वरच्या थरांवर देखील कायम ठेवलेले आहे.
आपण देवतांच्या प्रतिमांच्या वर पाहिले तर आपल्याला कमळाच्या फुलांच्या मध्यभागाचे किंवा बियांच्या सारखे डिझाइन दिसेल.
बृहदेश्वर मंदिर हे मूर्तिशास्त्र प्रेमींसाठी, अभ्यासकांसाठी एक नंदनवन आहे. तेथे हजारो सुंदर आणि बारकाईने कोरलेल्या मानव, देवदेवता तसेच प्राण्यांच्या मूर्ती बघायला मिळतात.
जर आपण केवळ हत्तीच बघायचे म्हटले तरी तिथे विविध पोझेसमध्ये असंख्य हत्ती आहेत. हत्ती जिथे जिथे जे जे काम करत आहेत त्यानुसार त्यांची पोझ दाखवली आहे.
ध्वजस्तंभावर, तुम्ही हत्तींना, उंचावलेल्या सोंडेने ध्वजस्तंभाचे वजन तोलताना पाहिले आहे. येथे आणखी काही हत्ती आहेत.
येथे हत्तीची सोंड पायऱ्यांसाठी कठडा म्हणून वापरली गेली आहे. येथे ते स्थिर आहेत, परंतु तरीही त्यांच्या देहबोलीत गती दर्शविण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. चालत असताना हत्तीने एका माणसाला खाली पाडले आहे की काय? खाली एक मानवाकृती पडलेली दिसते आहे.
Elephant 📷 Jayant Abhyankar |
येथे आपण पाहू शकता की हत्ती संतप्त झालेला आहे आणि वेगाने चालत आहे, जवळजवळ पळतच आहे म्हणा ना! त्याचा पुढचा डावा पाय आणि उजवा मागचा पाय हवेत आहेत. त्याने कान पसरले आहेत. त्याची शेपटी वळलेली आहे. सोंडेत एका माणसाला धरले आहे. तो माणूस बहुतेक आधी घोड्यावर बसलेला असावा. हत्तीच्या सोंडेत तो माणूस अक्षरश: पिळला जात आहे. अनेक शतके लढाईसाठी हत्तींचा वापर केला जात असे. हे अशाच एखाद्या युद्धाच्या वेळचे दृश्य दिसते आहे.
बृहदेश्वर मंदिरातील शिल्पांमध्ये बरेच हत्ती आहेत हे अगदी मान्य, परंतु आणखी एक प्राणीदेखील बर्याच वेळा दिसतो. त्याचे नाव व्याल किंवा यली आहे. हे काल्पनिक संमिश्र प्राणी आहेत, ज्यांचे शरीर वाघ, सिंह, घोडा, हत्ती, बैल आणि बरेच वेगवेगळे प्राणी असे मिळून बनलेले दाखवलेले असते.
काही वेळा त्यांना ते मकर नावाचे दुसरे काल्पनिक प्राणी आहेत असे गैरसमजाने म्हटले जाते. पण मकर प्राण्याचे तोंड मगरीचे आणि शरीर माशाचे असते.
Vyal 📷 Jayant Abhyankar |
इथे मगरीचे तोंड असणारे व्याल दाखवलेले आहेत.
Vyala on pillar 📷 Jayant Abhyankar |
Closeup Vyala 📷 Jayant Abhyankar |
व्याल किंवा यली हे मंदिरांचे रक्षक मानले जातात आणि म्हणून स्तंभांवर आणि मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर कोरले जातात.
मंदिरातून अभिषेक जल किंवा पाणी वाहून नेण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. ती हत्तीची सोंड आहे का? चेहरा मगरीसारखा दिसत आहे.
Outlet of Abhishek Jal 📷 Jayant Abhyankar |
Tank 📷 Jayant Abhyankar |
अभिषेक जल एका हौदामध्ये पडते. हा हौद किंवा टाके एका दगडातून कोरलेले आहे. हा हौद सिंहावर विराजमान झालेला आहे.
आपण प्राण्यांबद्दल खूप बोललो, आता आपण देवांच्या शिल्पांबद्दल बोलू या!
मंदिरात गणेशमूर्ती अनेक रूपात दिसते. कधी बसलेल्या स्थितीत, कधी उभ्या स्थितीत, काही वेळा चार हातांची तर काही वेळा आठ हातांची.
Ganesh with ten hands 📷 Aniruddha |
ही शिल्पाकृती अतिशय विलक्षण आहे. आपल्याला, दहा हातांची गणेशमूर्ती सहसा पाहायला मिळत नाही. मंदिराचे पहिले गोपूर असलेल्या मराठा वेशीवर ही आकृती कोरलेली आहे.
उजवीकडील दोन हात तुटलेल्या अवस्थेत आहेत. एक उजवा हात मांडीवर ठेवलेला आहे. डावीकडच्या हातापैकी, एक हात गणेशाने मांडीवर बसलेल्या शक्तीला वेढून ठेवला आहे. बाकी हातांत मला जे दिसले ते म्हणजे शंख, फूल, धान्याच्या ओंब्या, पाश आणि अंकुश. बहुधा हा महागणपती रूपातील गणेश आहे.
Ganesh with four hands 📷 Aniruddha |
इथे वरील छायाचित्रात तुम्हाला तीन गणेशमूर्ती दिसतील. तिन्हीही मूर्ती चार हात असलेल्या आहेत. साधारणपणे सारखीच आयुधे व मोदक तिन्ही मूर्तींच्या हातात आहेत.
Ganesh in one of the temples 📷 Aniruddha |
Ganesh in one of the temples 📷 Aniruddha |
Ganesh in standing position 📷 Jayant Abhyankar |
Siblings 📷 Jayant Abhyankar |
येथे आपण दोन भावंडे बघत आहोत. उंदरावर बसलेला गणेश आणि मोरावर बसलेला त्याचा भाऊ कार्तिकेय किंवा सुब्रमण्यम असे दोघे इथे दिसत आहेत.
या मंदिराबद्दल अजून बरेच काही लिहायचे आहे. शिल्प, चित्र, वास्तूकला किती किती आहे लिहिण्याजोगे!
शिव मंदिर असल्याने अनेक प्रकारच्या शिव मूर्ती आहेत, देवी, कार्तिकेय, योगीजन, नर्तकी, नृत्यमुद्रा आणि अजून कितीतरी. द्वारपाल मूर्तीदेखील आवर्जून दखल घ्यावी अशाच आहेत. मला माहित नाही की मी या सर्वांबद्दल कधी लिहिणार आहे! पण आजची पोस्ट मात्र मी मानवी शिल्पाकृतींच्या वर्णनाने संपवत आहे.
हे गोपी वस्त्रहरणाचे दृश्य आहे. किती सुंदर कोरीव काम आहे!
पायथ्याशी आपल्याला दोन मकराचे चेहरे दिसू शकतात. हे चेहरे दर्शवितात की ही पाण्याजवळची जागा आहे.
डावीकडच्या दोन स्त्रिया प्रौढ तर उजव्या दोन तरुण मुली आहेत. आपण त्यांच्या केशरचना आणि देहबोली मधला फरक पाहू शकता. डाव्या दोघीजणींनी आपले केस अंबाडा घालून गुंडाळून ठेवले आहेत. तर तरुण मुलींनी आपले केस मोकळे सोडले आहेत!!!
अंगावर काहीच कपडे नसल्यामुळे डाव्या कोपऱ्यातील बाईला लाज वाटते आहे. तिने तोंडाला हात लावला आहे. दुसरी बाई आपले कपडे घेण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण मुली काय होत आहे त्याचा फार त्रास करून न घेता आरामात इकडे तिकडे पाहत बसल्या आहेत!!
त्यांचे विविध प्रकारचे दागदागिने- हस्तभूषणे, कर्णभूषणे, पैंजण, कंठहार अतिशय सुंदर दाखवले आहे. सगळे दागदागिने निरनिराळे. ज्वेलरी डिझाईन करणाऱ्या लोकांनी खास नोंद घ्यावी असे!
ह्या शिल्पात फांद्या, पाने, फुले, खडबडीत पण भक्कम खोड असे झाड खूप छान दाखवले आहे.
झाडावर खोडकर, खट्याळ कृष्ण बसलेला आहे. नदीत स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रे त्याने पळवली आहेत, ती त्याच्या हातात दिसत आहेत. इतके सगळे वाचून होईपर्यंत सगळ्यांच्या मनात,"दे रे कान्हा.. चोळी अन लुगडी.. " हे गाणे वाजायला लागले असेल. पण आश्चर्य म्हणजे गोपी वस्रहरणाच्या इतर शिल्पांत दाखवतात तसे इथे ह्या गोपींनी हात जोडून विनवणी केलेली नाही. उलट झाडावर चढून आपले कपडे मिळवण्याच्या प्रयत्नांत त्यातली एक आहे. मग गोपी आत्मनिर्भर आहेत म्हणावे की हे शिल्प गोपी वस्रहरणाचे नाहीच? हे चित्र गोपी वस्रहरणाचे आहे असा मी काढलेला निष्कर्ष संपूर्ण चुकीचा आहे? तुम्हांला काय वाटते?
कुशल कारागिराने हा प्रसंग दगडाच्या शिल्पामध्ये अगदी जिवंत केला आहे. ग्रॅनाइटचे झाड देखील अगदी खरे झाड वाटते आहे आणि असे केवळ प्रेक्षकांनाच नाही तर एका जिवंत पोपटाला पण वाटते आहे! आपण चित्र झूम केल्यास, आपण झाडाच्या पानात एक खरा, जिवंत पोपट बसलेला पाहू शकता. एखाद्या कलाकाराला मिळालेली यापेक्षा चांगली दाद ती काय असणार?!!
Gopi Vastraharan 📷 Yashwant Kakad |
Overview of the temple. 📷Aniruddha |
आत्तापुरते इतकेच. कोविड वॅक्सीन चा पहिला डोस घेणे हा विनाकारण बाहेर फिरण्याचा परवाना नाही हे लक्षात ठेवा! काळजी घ्या, सुरक्षित राहा!
#HinduIconography #BrihadeshwarIconography #WondersOfIndia #MostbeautifulTemple #GrandestTemple #WhatToSeeInThanjavur #UnderstandingBrihadeshwar #TallestTempleInTheWorld #BrihdeshwarTempleFacts #TallestShivTemple #TheBigTemple
#TamilnaduTemples #HinduShivTemple #11thCenturyTemple #TallShivling
सूक्ष्म निरीक्षण आणि शब्दांकन मस्त 👌👌
ReplyDeleteMasta !
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteइतकेच लिहीत आहे !!!!!!!!!!
अप्रतिम
ReplyDeleteइतकेच!!!!!!!!!!!!!!!
किती बारकाईने पाहते नी लिहतेस तू खूप
ReplyDeleteकृष्ण हा वैश्णव देव आहे. शैव संकुलात असणे शक्य नाही.
ReplyDelete