जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरे दार उघडते... उघडतेच! मार्च २०१६ मध्ये जेव्हा आम्ही यूएसए दौर्याची आखणी केली होती, तेव्हा आमच्याबाबतीतही हे खरे ठरेल अशी आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.
आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा आम्ही नायगाराच्या राईड्ससाठी ती योग्य वेळ नव्हती, आम्ही खूप लवकर गेलेलो होतो! त्या राईड्सची सुरुवात एप्रिलमध्ये होणार होती आणि आम्ही गेलो तेव्हा तर अजून मार्च महिनाच चालू होता. म्हणून जरी आम्हाला नायगारा पाहता आला तरी त्यावरील राईड्सचा आनंद घेता आला नाही.
परंतु वॉशिंग्टन डी.सी. मध्ये निसर्गाचा आणखी एक नेत्रदीपक खेळ आमची प्रतीक्षा करत होता! विमानतळावरील माहितीकक्षातील अधिकाऱ्याने आम्हाला याबद्दल सांगितले. तो होता चेरी ब्लॉसम फेस्टिवल. आमच्यासाठी हे एक आनंददायी आश्चर्य होते, कारण आम्हाला वॉशिंग्टन डी.सी. मध्ये इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या चेरी ब्लॉसम वृक्षांबद्दल माहितीच नव्हते.
Washington D.C.
अमेरिकेची ही राजधानी. शहराचे नाव अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांच्या स्मरणार्थ दिले गेले आहे. डी.सी. हे ए.डी. आणि बी.सी. सारखे कालमापक असावे असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी ते आहे कोलंबिया डिस्ट्रिक्ट चे संक्षिप्त रूप.
आमच्यासारख्या पर्यटकांसाठी वॉशिंग्टन म्हणजे नॅशनल मॉल. सर्व महत्वाची स्मारके, संग्रहालये, टाईडल बेसिन (मानवनिर्मित जलाशय) हे सर्व याच भागात आहेत. या भागाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात
ही एखाद्या निमुळत्या होत जाणाऱ्या मनोऱ्यासारखी रचना आहे. १८३५ मध्ये स्मारकाच्या रचनेची चर्चा होत असताना, स्मारकाचे डिझाइन अद्वितीय आणि अतुलनीय असावे अशी अपेक्षा होती. अमेरिकन लोकांसाठी हा अभिमानाचा विषय ठरावा, अश्या रचनेची अपेक्षा होती. ही रचना या सर्व अपेक्षांवर खरी उतरली आहे! अजूनही हा जगातील सर्वात उंच दगडी स्तंभ आहे. 500 फुटापेक्षा जास्त उंचीचे हे स्मारक प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित करते. हे बांधकाम बरीच वर्षे सुरु होते आणि परिणामस्वरूप स्मारकासाठी वापरलेले दोन प्रकारचे दगड आपल्याला दिसू शकतात.
सर्वात वरचे टोक, शिखर अल्युमिनियम पासून बनवलेले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अल्युमिनियम त्या काळी चांदीइतकेच महाग होते!!
Washington Monument |
Lincoln Memorial
या स्मारकाला वर्षभरात जगभरातील लाखो लोक भेट देतात. काही ऐतिहासिक सभा, संमेलने आणि निदर्शने इथेच झाली आहेत.
हे स्मारक बर्याच चित्रपट आणि वेब सिरीज तसेच टेलिव्हिजन शोमध्ये दिसलेले आहे. हे ग्रीक मंदिरासारख्या वास्तूशैलीत बांधले गेले आहे. स्मारकाच्या आत अमेरिकेतील राज्यांची नावे कोरलेली आहेत.
लिंकनची एक विशाल मूर्ती आत आहे. स्मारकासमोर रिफ्लेक्टिन्ग पूल,एक जलाशय आहे. स्वच्छ हवा असेल आणि वारा नसेल तेव्हा त्यात दिसणारे स्मारकाचे प्रतिबिंब हे फार सुंदर दिसत असणार ह्यात शंकाच नाही.
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष होते. त्यांनी १८६१ - १८६५ या काळात हे पद सांभाळले.
Reflecting Pool - The step of 'I have a dream' speech. |
ह्या फोटोत, पायरीवर तुम्हाला मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) च्या सुप्रसिद्ध भाषणातील (१९६३) काही ओली कोरलेल्या दिसतील. ह्याच ठिकाणी उभे राहून त्यांनी हे भाषण केले होते.
World War II Memorial
रिफ्लेक्टिन्ग पूलच्या दुसर्या बाजूला दुसऱ्या महायुद्धाचे स्मारक आहे. दुसर्या महायुद्धात कामगिरी केलेल्या अमेरिकन लोकांच्या स्मृतीसाठी हे स्मारक उभारण्यात आले. येथे सर्व अमेरिकन राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ आणि पॅसिफिक आणि अटलांटिक अशी नावे असलेल्या दोन कमानी आहेत.
Second World War Memorial |
ही व्हिडिओ पाहून आपल्याला संपूर्ण स्मारकाबद्दल अधिक स्पष्ट कल्पना येईल. एका बाजूला लिंकन मेमोरियल आणि दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन स्मारक आणि मध्ये असलेले दुसऱ्या महायुद्धाचे स्मारक या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता.
मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नॅशनल मॉलच्या क्षेत्रामध्ये अनेक महत्वाची स्मारके, संग्रहालये आहेत. कॅपिटॉल मैदान जवळच आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे अति महत्व पूर्ण व्यक्तींच्या गाड्यांचे ताफे दिसतात!
The convoy |
Martin Luther King Jr. Memorial
हे एमएलके मेमोरियल किंवा किंग स्मारक म्हणून लोकप्रिय आहे. हे स्मारक खूप खास आहे. कारण राष्ट्राध्यक्ष नसलेल्या, एका आफ्रिकन अमेरिकन नेत्याचे स्मारक, नॅशनल मॉलजवळ उभारले गेले आहे.
एमएलके कोण होते हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जग त्यांना ओळखते आणि नागरी हक्क कार्यकर्ते म्हणून त्यांचा सन्मान करते. महात्मा गांधीजींच्या अहिंसा चळवळीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
हे स्मारक त्यांच्या प्रसिद्ध भाषणातील एका ओळीनुसार डिझाइन केलेले आहे, "माझे एक स्वप्न आहे" ह्या भाषणातील ती ओळ होती, "निराशेच्या डोंगराच्या बाहेर, आशेचा दगड." हे स्मारक टाईडल बेसिन जवळ आहे आणि चेरी ब्लॉसम वृक्षांनी वेढलेले आहे.
चेरी ब्लॉसम
१९१० मध्ये टोकियो शहराने वॉशिंग्टन शहराला चेरी ब्लॉसमची ही रोपे भेट म्हणून दिली. तसे तर एकोणिसाव्या शतकापासून काही लोक जपानमधून चेरी ब्लॉसम रोपांची आयात करीत असले तरी टोकियो शहराने 2000 रोपांची भेट दिल्याने, वॉशिंग्टनमध्ये चेरी ब्लॉसम लावण्याच्या प्रयत्नांना वेग आला. जपान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या मैत्रीचे प्रतीक म्हणून चेरी ब्लॉसम देण्यात आले. दुसर्या महायुद्धात ते जरी शत्रुत्व व वैमनस्य टाळू शकले नसले तरी चेरी ब्लॉसमच्या सतत झालेल्या लागवडीमुळे नॅशनल मॉलमधील टाईडल बेसिनला अतिशय नयनरम्य स्वरूप प्राप्त झाले.
दरवर्षी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये मुख्यतः मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल साजरा केला जातो. आम्ही 24 ते 26 मार्च 2016 पर्यंत वॉशिंग्टन शहरात होतो आणि चेरी ब्लॉसमच्या बहराचा आनंद घेऊ शकलो.
थॉमस जेफरसन मेमोरियल म्हणजे आपण वर पाहिलेल्या अनेक चेरी ब्लॉसमच्या छायाचित्रांना बॅक ड्रॉप देणारी सुंदर पांढरी इमारत आहे.
थॉमस जेफरसन हे तिसरे अध्यक्ष व युनायटेड स्टेट्स डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडेंसचे प्रमुख लेखक होते.
FDR- Franklin Delano Roosevelt Memorial
टाईडल बेसिन जवळील चेरी ब्लॉसम मार्गावरील हे स्मारक दगड, पाणी, फुले आणि त्यातील शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहे.
रुझवेल्टचा पुतळा खूप प्रभावी पद्धतीने साकारलेला आहे. त्यांच्या पायघोळ अंगरख्याच्या घोळात त्यांची व्हीलचेयर लपवलेली आहे.
The Capitol
नॅशनल मॉलमधील सर्वात महत्वाची इमारत म्हणजे कॅपिटॉल. कॅपिटॉल हिलवर वसलेले हे युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसचे सभागृह आहे. आपण इमारतीच्या अंतर्गत भागाचा मार्गदर्शकासोबत दौरा करू शकता.
ही विशेष इमारत मूलतः १८०० मध्ये बांधली गेली होती, परंतु त्यानंतर काही वेळा नूतनीकरण झाले. ही भव्य इमारत साधी आहे पण सुंदर आहे.
White house
आता व्हाईट हाऊसच्या दिशेने जाउ या. हे १८०० पासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे. तेव्हापासून त्याचे बर्याच वेळा नूतनीकरण करण्यात आले आहे.
इमारतीत अनेक भाग आहेत. इमारतीचा एक भाग, वेस्ट विंग हा लोकांना बघण्यासाठी खुला आहे. मात्र तुमच्या भेटीच्या आधी, तीन महिन्यांपूर्वी, तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल.
रेल्वे स्थानकांपासून व्हाईट हाऊस चालत जाण्याच्या अंतरावर आहे. रस्ता, अनेक शिल्पे असलेला, महत्वाच्या इमारती असलेला असा आणि सुंदर आहे.
Lafayette Statue |
On the way to White House |
हे तिबेटचे नागरिक असावेत. अनेक वर्षांपासून ते व्हाईट हाऊस समोर निदर्शन करत आहेत.
स्मिथसोनियन संस्था परिसर हा वॉशिंग्टनमधील अजिबात चुकवू नये असा परिसर. हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय संकुल आहे.
आपल्याला संग्रहालयांना भेट देणे आवडत असल्यास, त्यासाठी नक्की जा. परंतु नसेल तरीही, मी किमान ३/४ संग्रहालये तरी नक्की पाहण्याची शिफारस करेन. National air and space museum, Natural history museum, National museum of African American art and culture, National gallery of art ही इतकी तर आपण नक्कीच पाहिली पाहिजेत. या परिसरात इतर अनेक अद्भुत संग्रहालयेदेखील आहेत.
जर आपण सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेद्वारे प्रवास करण्यास तयार असाल तर वॉशिंग्टन डीसी मधील प्रवास बर्यापैकी सोपा आणि स्वस्त आहे.
आपल्याला आरामदायक पादत्राणे मात्र घालायला हवीत. स्मारके आणि संग्रहालये पाहायचे म्हणजे आपल्याला सतत उभे राहावे लागते किंवा चालावे लागते. जर आपण तीन किंवा चार दिवस वॉशिंग्टनमध्ये फेरफटका मारत असाल तर ते चालणे आपले महिनाभराचा चालण्याचा हिशेब पूर्ण करून टाकेल. पण मी म्हणेन की तरीही वॉशिंग्टन पाहणे हे अतिशय आनंददायी आहे. न्यूयॉर्क आपल्याला तांत्रिक चमत्कार, प्रचंड मोठ्या आधुनिक इमारती दाखवते परंतु वॉशिंग्टन डीसी मात्र आपल्या मनात घर करते.
टाईडल बेसिन च्या किनाऱ्यावर फुललेले हजारो चेरी ब्लॉसम्स, मोकळी मोठी उद्याने, प्रचंड स्मारके आणि जगभरातील पर्यटक ही वॉशिंग्टनची माझ्या मनावर उमटलेली छाप आहे. ते अविस्मरणीय आहे!
Comments
Post a Comment