जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर हिरवी रेषा दिसते. ही रेषा गुजराथ येथून सुरु होते आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते.
ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.
या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे!
![]() |
वरंधा घाट 📷विकिमीडिया कॉमन्स |
पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.
पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.
हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवरून, डोंगरमाथ्यावरून खाली झेपावतो. धबधब्याचा आवाज, धबधब्याच्या प्रवाहातून विखुरलेले थेंब आणि त्याच्या सभोवतालची हिरवाई हे सगळे गिर्यारोहकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षण केंद्र बनलेले आहेत.
![]() |
पावसाळ्यातील शिवथर धबधबा 📷विकिमिडीया कॉमन्स |
सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे आणि तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ आहे.
हा सह्याद्री पर्वतरांगामधील धबधब्यांपैकी एक सर्वात सुंदर धबधबा आहे हे निश्चितच, पण लोक या ठिकाणी येण्याचे मुख्य कारण मात्र ते नाही! तर शिवथर घळीच्या मुळे इतके लोक या ठिकाणी भेट देतात.
शिवथरघळ ही धबधब्याजवळील घळ किंवा गुहा आहे, खरे तर जवळजवळ धबधब्याखालीच आहे म्हणा ना!
ही शिवथरघळ इतक्या लोकांनी भेट देण्याइतकी का महत्वाची आहे? नैसर्गिक सौंदर्य, भोवतालची हिरवाई, भूरचना शास्त्राच्या अभ्यासकांसाठी असलेले ह्या जागेचे महत्व हे तर कारण आहेच, पण मुख्य म्हणजे ह्या घळीत २२ वर्षे समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते हे इतक्या लोकांनी वर्षानुवर्षे, परत परत भेट देण्याचे कारण आहे.
समर्थ रामदास स्वामी हे सतराव्या शतकातील भारतीय, राष्ट्रउपासक संत होते जे एक उत्तम कवी, तत्वज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते.
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून, आज इतक्या शतकांनंतरही, हजारो नव्हे तर कोट्यावधी लोक त्यांचे अनुयायी आहेत. दासबोध हे त्यांचे प्रमुख लेखन आहे, जे त्यांनी शिवथर घळीत लिहिले आहे.
दासबोध हा जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नव्याने उमगत जातो असा ग्रंथ आहे.
शिवथर घळीमध्ये रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी यांच्या मूर्ती आपण पाहू शकतो. समर्थ रामदासस्वामी दासबोध सांगत आहेत आणि कल्याणस्वामी लिहित आहेत.
मज तो आवडतो मम स्वामी | निशिदिनी अंतर्यामी ||धृ||
अक्षैपदाचा सुखदाता | निरसोनी माया ममता ||1||
भक्तीमार्गाचा गजढाला | चालविल्या आढाला ||2||
काय बोलो मी किर्तीसी | न दिसे तुळणेसी ||3||
छेत्र बहुतांचे दासाचे | धाम ची कल्याणाचे ||4||
धबधब्याजवळच्या किंवा खरे तर धबधब्याखालच्याच म्हणा ना, घळीत ह्या मूर्ती आहेत. ह्या मूर्तींच्या मागे श्रीरामाचे रामदासस्वामींनी स्थापन केलेले लहानसे मंदिर दिसेल. ह्या फोटोतही आपण मागे मूर्ती पाहू शकता.
घळीचे प्रवेशद्वार हे खालच्या फोटोत आहेत तसे दिसते. खडकापासून आपले डोके वाचावे म्हणून आपण झुकून आत जातो आणि आत ह्या मूर्ती दिसल्या की आपोआप नतमस्तक होतोच!
![]() |
घळीचे प्रवेशद्वार |
गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥
गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥
तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ॥ ३ ॥
दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥
गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥
कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥
विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥
ज्या परिसरात शिवथर घळ आहे त्या परिसराला सुंदरमठ असे म्हणतात.
![]() |
सुंदरमठाचे प्रवेशद्वार |
![]() |
माहितीपत्रक |
![]() |
माहितीपत्रक |
समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु होते. असे म्हणतात की त्या दोघांची शिवथर घळीत भेट झाली होती.
समर्थ रामदास म्हणाले होते की जरी मी देहाने तुमच्यामध्ये नसलो तरी दासबोधाच्या रूपाने मी आहेच.
माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वत:सिद्ध |
असता न करावा खेद | भक्तजनी ||२||
नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |
तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||३||
इतक्या शतकानंतर अजूनही, दासबोध कालबाह्य न होता, अनेकांना मार्गदर्शक ठरला आहे. दासबोधाचे अनेक भारतीय भाषांत तर भाषांतर झाले आहेच पण अनेक आंतरराष्ट्रीय भाषांत देखील अनुवाद झालेला आहे.
दासबोध जयंती दरवर्षी माघ शुद्ध नवमीला साजरी केली जाते. ह्याच दिवशी १६५४ मध्ये दासबोध लिहून पूर्ण झाला होता.
त्या दिवशी दासबोधाची पालखीतून मिरवणूक निघते. हे एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा होणे ह्याचे अनोखे उदाहरण आहे. त्या निमित्ताने त्यातील विचारांना उजाळा मिळतो हे सर्वात महत्वाचे.
आसपासच्या गावांतून म्हणजे कुंभे शिवथर, आंबे शिवथर, कसबे शिवथर आणि खडकेश्वर ह्या गावातून पालखी नेली जाते. ह्या सोहळ्यासाठी आधीच अनेक ठिकाणाहून दिंड्या शिवथरघळीत दाखल झालेल्या असतात.
स्थानिक लोक पालखीची वाट पाहत असतात. मग पालखी दाराशी आली की तिची साग्रसंगीत पूजा करतात आणि थोडा वेळ का होईना, पण पालखी आपल्या खांद्यावरून नेतात.
त्या त्या गावातील मंदिरांतून पण पालखी नेली जाते. सर्वाना नंतर शिवथर घळीत येण्याचे आमंत्रण दिले जाते. ते आमंत्रण पण अगदी ऐकण्याजोगे असते.
सगळीकडे फिरून काही तासांनी पालखी जेव्हा शिवथरघळीत परत येते तेव्हा तिथे पूजा, आरती, प्रार्थना आणि प्रसाद असतो. आलेल्या सर्व गावकऱ्यांना तसेच पालखीसाठी आलेल्या दिंडयांना जेवण असते. सामु हिकतेचा आणि समरसतेचा आविष्कारच आपल्याला त्या वेळी बघायला मिळतो. मला फेब्रुवारी २०१९ मध्ये ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची अविस्मरणीय संधी मिळाली होती.
![]() |
पालखी |
![]() |
पालखी |
![]() |
दासबोधाची पालखी |
सह्याद्री पर्वतरांगा 📷प्रज्ञा साठे |
मिरवणूक 📷प्रज्ञा साठे |
मी भाग्यवान! ( Feb 2019) 📷प्रज्ञा साठे |
मिरवणूक 📷प्रज्ञा साठे |
![]() |
झेंडा रामनामाचा 📷प्रज्ञा साठे |
मला सांगायला फार अभिमान वाटतो की ह्या गावातील अनेक जण सैन्यात आहेत. सुट्टीसाठी घरी आलेले सैनिक देखील ह्या मिरवणुकीत सामील झाले होते.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावांतून चालत जाता येणे, तिथल्या स्थानिकांसोबत मिसळता येणे, दासबोधाची पालखी काही क्षण का होईना खांद्यांवर घेता येण्याचे भाग्य लाभणे आणि मिरवणुकीचा भाग होण्याची संधी मिळणे हे ह्या अविस्मरणीय अनुभवाचे उत्कर्ष बिंदू होते.
शिवथरघळीत कसे आणि कधी जाता येईल ह्या विषयी अधिक माहिती हवी असेल तर हा मी फेब्रुवारी २०१९ मध्ये काढलेला फोटो पहा. हे नंबर आत्तापर्यंत बदललेले नसतील तर तुम्हाला माहिती मिळू शकेल.
#OneDayTrip #JayJayRaghuveerSamarth #RamdasSwami #DasNavami #DasbodhNavami #Raigad#PlacsToVisitNearRaigad
पालखी मिरविता आली तुला, धन्य झालीस ����
ReplyDeleteखरंच पालखीत सामिल होणे व त्याचा झेंडा मिरवायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे, धन्य झालीस तू वृंदा
ReplyDeleteआठवणींना उजाळा मिळाला😍🙏🙏मला आ.मीराताईमुळे हे भाग्य सलग ६-७ वर्ष मिळाल 🙏🙏
ReplyDelete