Skip to main content

बांते स्रेइ- एक सुखद स्वप्न

 Banteay Srei - बांते स्रेइ हे एक सुखद स्वप्न आहे. अंगकोरवाट मंदिर समूहातील काळी राखाडी मंदिरे, त्यांची अवाढव्य आणि कलापूर्ण रचना, त्यांचे ढासळणारे चिरे पाहून मन एकाचवेळी विस्मयचकित आणि खिन्न झालेले असते. अशा वेळी जेव्हा बांते स्रेइ समोर येते तेव्हा मन सुखावते. 

बांते स्रेइ अनेक कारणांसाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. एकतर ह्या कामासाठी गुलाबी लालसर दगड वापरला आहे. त्यामुळे त्याला डोळ्यांना सुखावणारा सुंदर रंग आहे. दुसरे म्हणजे त्याचा आकार बाकी मंदिरांच्या आकारांच्या तुलनेत लहान आहे. शिवाय एकाच स्तरावर असल्याने अंगकोरवाटप्रमाणे वर जिने चढणे, उतरणे, अनेक किलोमीटर चालणे असे काही करायला लागत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकदेखील संपूर्ण मंदिर बघू शकतात. तिसरे म्हणजे त्यावरील कोरीवकाम बऱ्याच प्रमाणात चांगले राहिले आहे. 

आत्तापर्यंत इतक्यांदा 'बांते स्रेइ' असे नाव घेतले. पण ते काय आहे ते सांगितलेच नाही. बांते स्रेइ आहे कंबोडियातील एक प्राचीन मंदिर. साधारण दहाव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर वेगळे आहे ह्याचे कारण म्हणजे हे तेथील एकमेव मंदिर आहे जे राजाने बांधलेले नाही . हे मंदिर बांधले आहे राजदरबारातील दोन जणांनी. त्यांची नावे होती यज्ञवराह आणि विष्णुकुमार. कदाचित राजाने बांधलेले नसल्यानेच मंदिराचा आकार लहान असेल. 

ह्या ठिकाणचे मूळ नाव होते ईश्वरपूर आणि मंदिराचे नाव होते त्रिभुवनमहेश्वर. तिन्ही जगांचा स्वामी असलेला शंकर इथली मुख्य देवता. काळाच्या ओघात मंदिराचे नाव बदलले. तिथल्या ख्मेर भाषेत आता नाव आहे Prasat Banteay Srei. नावावरील संस्कृत प्रभावामुळे आपल्याला अर्थ सहज कळतो . तो आहे सुंदर स्त्रियांचा महाल, किल्ला किंवा शहर. 

शंकराचे मंदिर असताना नाव असे का बदलले असेल? तर त्या मंदिरात असणारे स्त्रियांचे सुंदर पुतळे हे ह्याचे कारण असू शकेल. जनसामान्य एकमेकांशी बोलताना, कोणते शंकराचे मंदिर ह्याची खूण सांगताना म्हणत असतील की जिथे सुंदर स्त्रियांचे पुतळे आहेत किंवा स्त्रियांचे सुंदर पुतळे आहेत ते मंदिर!! 

देवता 

देवता 

अंगकोरवाटच्या मंदिरापेक्षाही हे मंदिर जुने असूनदेखील त्याच्या
तुलनेने सुस्थितीत कसे? तर त्याचे जीर्णोद्धार वेळोवेळी यशस्वी पणे करता आले. बऱ्याचदा केले गेले हेच कारण.

सियाम रीप पासून साधारण ३० किलोमीटर आणि अंगकोरवाट मंदिर समूहांपासून २०-२५ किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर. रस्त्यात लहान लहान गावे, शेते, झाडे,रस्त्यावर फुले,भाज्या विकणारे स्थानिक ह्या सगळ्यांत प्रवास अगदी पटकन होतो. 

मंदिर आणि प्रतिबिंब 
मंदिर आणि प्रतिबिंब 
मंदिर आणि प्रतिबिंब 
मंदिराभोवती खंदक, पाण्याचा कालवा, मग आत मंदिराभोवती सज्जा आणि त्याच्या आत एकामध्ये एक असलेले प्राकार अशी मंदिराची साधारण संरचना आहे. आम्ही गेलो तेव्हा पाण्याच्या कालव्यात कमळे फुललेली होती. 
कमलवनचिताम्बुः 
कमल पुष्प 
एकात एक असलेले प्राकार असल्याने बाहेरपासून आतपर्यंत थोड्या थोड्या अंतराने अशी प्रवेशद्वारे दिसतात. 

सुंदर कलापूर्ण द्वार 
बांते स्रेइमधील प्रवेशद्वाराची रचना साधारण अशी आहे. अतिशय सुंदर नक्षीदार खांबांची नाजूक चौकट. त्या द्वारशाखेवर भली मोठी त्रिकोणी आकाराची रचना. त्यावर रामायण महाभारत व इतर हिंदू कथांमधील प्रसंग कोरलेले. 

सज्जाचे मात्र आता फक्त खांब उरले आहेत. एकूणच बांते स्रेइमध्ये आच्छादित भाग कमी असल्याने इथे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हे उतरू लागल्यावर जाणे सोयीचे होते. नाहीतर कडक उन्हाच्या माऱ्यामुळे मंदिर नीट बघता येत नाही. शिवाय प्रखर उन्हात फोटो चांगले येत नाहीत ते वेगळेच. 

आवार 
खांब - (मधला नव्हे !!- आजूबाजूचे !!)
खांबांवरचे कोरीवकाम देखील अगदी नाजूक आणि सुंदर आहे. 

नक्षीदार खांब 
नक्षीदार खांब 
तुम्हाला झूम करून बघता आले हे सगळे फोटोज तर त्या नक्षीचा आनंद घेता येईल. 

नक्षीदार खांब 
नक्षीदार खांब 
शैव मंदिर असल्याने शंकराशी संबंधित बरेच प्रसंग आपल्याला शिल्पात चित्रित केलेले आढळतात. 

नटराज 
इथे ह्या दरवाजाच्या द्वारशाखेवर जी त्रिकोणी रचना आहे त्यावर आपल्याला नृत्यमग्न शंकर - नटराज दिसतो आहे. एक हात आणि पाय भंगलेला असूनदेखील त्या नृत्याचे सौंदर्य आणि लालित्य लक्षात आल्यावाचून राहत नाही. द्वारशाखेवर देखील अतिशय बारीक सुंदर काम केलेले आहे. 

द्वारशाखा 
रावण गर्वहरण 
इथे आपल्याला कैलास हलवू पाहणारा रावण दिसत आहे. कैलास हलवण्यासाठी जोर यावा म्हणून त्याने जमिनीवर रोवलेले पाय, एका बाजूला झुकल्याने त्याची वाकलेली मान, त्यावरची त्याच्या दहा मस्तकांची एकावर एक अशी चमत्कृतीपूर्ण रचना, त्याच्या वस्त्रावरील चुण्या, कानातील कुंडले, मुगुटांवरची नक्षी इतकेच काय वेगवेगळ्या चेहऱ्यांवरचे निरनिराळे भाव आपल्याला ह्या शिल्पात पाहायला मिळतात. 

कैलासावर तीन थरांत अनेक आकृती दिसतात. खालच्या थरातले प्राणी घाबरलेले आहेत. काही पळत आहेत. मधल्या थरात प्राण्यांचे चेहरे असलेल्या मनुष्याकृती आहेत. अगदी वरच्या थरातले ऋषी विचार विनिमय करत आहेत. त्यांच्यावर आहेत कैलासावर बसलेले उमा महेश. पण दुर्दैवाने त्यांचाच फोटो आला नाही. खालच्या द्वारशाखेचा फोटो घेण्याच्या नादात वरचे महत्वाचे काही फ्रेममध्ये घ्यायचे राहून गेले हे तेव्हा लक्षातच आले नाही. 

पण मग बाकी फोटो पाहत असताना एका सुंदर दाराचा फोटो दिसला. त्यात हा संपूर्ण प्रसंग फोटोत आलेला होता. 

सुंदर दार 

रावण गर्वहरण 
वर बसलेल्या शंकरांचा पाय दिसतो आहे. मांडीवर पार्वती बसलेली आहे. शक्तिमान रावण कैलास हलवत असताना शंकरांनी केवळ पायाचा अंगठा खाली दाबून रावणाच्या गर्वाचे हरण केले ही कथा आपल्याला माहितीच आहे. 

आणखी एका द्वारशाखेच्या वर आपल्याला 'काळ' चित्रित केलेला दिसतो. शंकराचे एक रूप असलेला काळ, समयाचे प्रतीक असणारा काळ. 

काळ 
आणखी एक वैशिष्टयपूर्ण शिल्प आहे ते नृसिंहावताराचे. सहसा आपण पाहतो त्यात नृसिंहाच्या मांडीवर आडवा हिरण्यकश्यपू असतो. पण इथल्या शिल्पात मात्र हिरण्यकश्यपूचे तोंड आपल्याला नृसिंहाच्या मांडीवरून उलटे आपल्याकडे बघताना दिसते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हिरण्यकश्यपूचा चेहरा दैत्यासारखा किंवा घाबरलेला न दाखवता सौम्य दाखवला आहे. त्यामुळे नृसिंह हिरण्यकश्यपूचा पोट फाडतो आहे का नाही असाच आपल्याला प्रश्न पडतो!! 

नृसिंह - हिरण्यकश्यपू 
नृसिंह - हिरण्यकश्यपू 

रामायण प्रत्येक देशात थोडे थोडे तिथले काहीतरी वेगळेपण किंवा लोककथा घेऊन प्रचलित झाले. कंबोडिया मधील रामायणात रावणाच्या आधी विराधाने सीतेला पळवण्याचा प्रयत्न केला होता व रामाने त्याला मारले होते अशी कथा आहे. त्याचे चित्रण आपल्याला एका शिल्पात दिसते. 

सीताहरण 
रामायणातील आणखी एक प्रसंग इथे दिसला तो म्हणजे वाली सुग्रीव युद्ध. सुग्रीवाच्या विनंतीवरून रामाने त्या युद्धात केलेला हस्तक्षेप आणि वालीचा वध. 

वाली-सुग्रीव युद्ध 

वैभवाचे, समृद्धीचे प्रतीक असणारी गजलक्ष्मी आपल्याला एका दारावर चित्रित केलेली दिसते. 

गजलक्ष्मी 
आता हा पुढचा फोटो पहा. अतिशय सुंदर रचना अत्यंत बारकाईने चित्रित केलेले हे संपूर्ण दारच नयनरम्य आहे. 

नक्षीदार दार!
पण मला तुमचे लक्ष वेधायचे आहे ते त्यावर कोरलेल्या खांडव वनाच्या शिल्पाकडे. इतके बारकाईने कोरलेले शिल्प आपल्याला आश्चर्यचकित करते. 

खांडववन दहन 
अग्नीला खांडव वन जाळायचे असते. पण जेव्हा जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इंद्र पाऊस पाडतो आणि खांडव वनाला लागलेली आग विझून जाते. कारण तिथला नागराजा तक्षक हा इंद्राचा मित्र असतो. 

मग अग्नी, अर्जुन आणि कृष्णाकडे भिक्षुकांचे रूप घेऊन जातो आणि मदतीची भिक्षा मागतो. मदत करण्याचे वचन दिल्यामुळे कृष्ण आणि अर्जुन अग्नीच्या मदतीला खांडववनाशी येतात. अग्नीने खांडववन भस्मसात करायला सुरुवात केल्यावर नेहमीप्रमाणे इंद्र पाऊस पडण्यास सुरुवात करतो. पण कृष्ण आणि अर्जुन अस्त्रे सोडून पाऊस रोखून धरतात. खांडव वन जळू लागते. प्राणी इतस्ततः धावू लागतात. वनातून बाहेर पळू लागतात.त्यांच्या मध्यभागी दोघेजण दाखवले आहेत ते ह्या आगीतून कसे वाचावे ह्याचा विचार करत आहेत. 

इतकी सगळी गोष्ट ह्या शिल्पात अत्यंत सुंदर रित्या, सर्व बारकाव्यांसह दाखवली आहे. तीन हत्ती असलेल्या रथात आरूढ इंद्र सर्वात वर. खरे तर एरवी तो ऐरावतावर असतो. मग आता तीन हत्ती का? त्याचे काही विशेष महत्व आहे का, ह्याची मला उत्सुकता वाटते आहे. इंद्राने वर्षाव केलेल्या पर्जन्यधारा, त्या अडवणारे कृष्णार्जुनाच्या बाणांचे कवच, जंगलातील वृक्षांची पाने, उडणारे पक्षी, घाबरलेले प्राणी, रथात आरूढ असलेले कृष्ण आणि अर्जुन ..किती म्हणून बारकावे टिपावे! नीट पाहिलेत तर दिसेल की रथाचे घोडे धावत आहेत ती गती पण स्पष्ट कळते आहे. त्यांची शेपटी हवेत उडते आहे. पण सारथ्याने लगाम ओढला आहे. त्यामुळे गतीला अवरोध झाला आहे. मागचे पाय दुमडले गेले आहे. इतकेच नाही तर घोड्यांच्या गळयातील माळेचे मणीदेखील हिंदकाळले आहेत. 

इतके आणि असे बारकावे शिल्पात कोरून अजरामर करणाऱ्या शिल्पकाराचे अपार कौतुक वाटते. आता मला सांगा, मंदिर लहान असले तरी इतकी सुंदर शिल्पे बघायला वेळ लागणारच ना! 

मंदिर 


द्वारपाल 
द्वारपाल 
द्वारपालांच्या अशा आकृती दरवाजांपुढे आहेत. त्या अगदी सजीव भासतात. आम्ही बांते स्रेइला गेलो होतो २५ डिसेंबर २०१२ ह्या दिवशी सकाळी. तेव्हाचे हे सगळे फोटो आहेत. अगदी आतपर्यंत मात्र जाउ देत नव्हते त्या वेळी. काहीतरी दुरुस्तीचे काम चालू असावे बहुधा. त्यामुळे आत शिवलिंग आहे की नाही ते पाहण्याची संधी मिळाली नाही. 

लाकडावर करावे इतके नजाकतीने केलेले दगडातील शिल्पकाम, सोन्यावर असावे इतके मौल्यवान, मिळालेल्या जागेचा इंच न इंच नाजूक आणि अर्थपूर्ण सुंदर आकारांनी आणि आकृतींनी व्यापलेला असे हे बांते स्रेइ , 'ख्मेर कलेचा मुकुटमणी', 'अंगकोरचे रत्न ' ही सर्व बिरुदे सार्थ करणारे असेच आहे. 

#banteaysrei #cambodia #siemreap #angkorwat #angkor #angkorwattemple #angkorwatcambodia #angkorthom #angkorwattour #angkortemple #siemreapcambodia #angkorwatsunrise #explorecambodia #siemreaptrip #siemrep #Pinktemple 








Comments

  1. वाह अगदी चवीने आणि भरपूर वेळ घेऊन लिहिलेला लेख अतिशय आवडला. भारताचा दैदिप्यमान इतिहास जपण्यासाठी तुम्ही मोलाची भर घातली आहे हे विशेष भावले!

    ReplyDelete
  2. वृंदा किती बारकाईने निरीक्षण केले आहेस मंदिराचे....आम्ही सुद्धा angorvat मंदिर पाहिले पण हे मंदिर नव्हते पाहिले व जरी पाहिले असते तरी तुझ्याइतकी निरीक्षणशक्ती व कल्पनाशक्तीची आमच्याकडे नक्कीच नाही....प्रणाम तुझ्या सर्वच शक्तींना !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...