Skip to main content

नागाव

 नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!!

नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह. 

अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली. 

ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे. 

आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका आड एका वाडीत आपल्याला रिसॉर्ट झालेला दिसतो. राहण्या जेवण्याची अनेक ठिकाणी सोय होते आहे. आता नुसती वाडी क्वचितच बघायला मिळते आहे. शनिवार रविवार ही सगळी गावे पर्यटकांनी ओसंडून वाहत असतात. गावात शिरायच्या आधीच ट्रॅफिक जामने त्रस्त असतात. 

मुंबई पासून शंभर एक किलोमीटर वर आणि पुण्यापासून साधारण दीडशे -पावणेदोनशे किलोमीटर वर असलेली, अगदी एक दिवसाची ट्रिप करण्याच्या अंतरावर असलेली ही ठिकाणे आहेत. पण ह्या गावांचे सौंदर्य, हिरवाई, शांतता अनुभवायची असेल तर तिथे एक दिवस राहायलाच हवे. 

 अजूनही हा परिसर नयनरम्य आहे. इथली हिरवाई सुखावणारी आहे. देखभाल आणि व्यवस्था नीट होत असल्याने इथली मंदिरे सुस्थितीत आहेत. नित्य पूजाअर्चा होत असल्याने जागती आहेत. 

सुरुवात करू या वंखनाथ मंदिरापासून. 

मंदिरासमोरील पुष्करणी 

वंखनाथ मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथे गेल्या गेल्या लक्ष वेधून घेते ती सुंदर भव्य पुष्करणी. काळ्या घडीव दगडातील बांधकाम, चौकोनी आकार असलेली ही पुष्करणी, घडवलेल्या पायऱ्या, चारी बाजूचे कोरीव काम ह्यामुळे विशेष सुंदर दिसते. उन्हाळ्यात पाणी कमी होते तेव्हा सगळे कोरीवकाम नीट पाहता येत असेल. 

त्याच्या समोरची दीपमाळ एकेकाळी मंदिर परिसराचा भाग असणार. आज त्या आवाराचा संकोच होऊन मधून एक रस्ता गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला पुष्करणी आणि एका बाजूला तळे अशी रचना दिसते आहे. 

ह्या मंदिराचे बांधकाम आणि स्थापना अठराव्या शतकाच्या अखेरीस, साधारण १७९० च्या सुमारास  अहिल्याबाई होळकर ह्यांनी दिलेल्या निधीतून झाली. 

मंदिराचे तीन कळस दिसतात. गर्भगृहावरील कळस अर्थातच सर्वात उंच आणि कोरीवकामाने शोभिवंत आहे. 

श्री वंखनाथ मंदिर
सभागृह 

मंदिरात आत शिरताच काळ्या कुळकुळीत दगडातील नंदी, नक्षीदार लाकडी खांब आणि अष्टकोनी सभागृह दिसते. छताला लाकडी तुळयांचा आधार दिलेला दिसतो. 

नंदी 
मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भिंतीमध्ये गणेश आणि कालभैरवाच्या सुंदर मूर्ती आहेत. 
गणेश 
कालभैरव 
गर्भगृहातील शिवलिंग सोनेरी पत्र्याने मढवलेले आहे. त्याचे आरशातील प्रतिबिंब अगदी प्रवेशद्वारापासूनच आपल्याला दिसू लागते. मागे पार्वतीची सुंदर मूर्ती आहे. 
प्रतिबिंबासह शिवलिंग 
पार्वती 
पुष्करणीतील शिल्पे तसेच मंदिरातील शिल्पे पाहून गतकाळातील मंदिराच्या वैभवाची कल्पना येते. नवीन काही इतके सुंदर निर्माण करता येणे अवघड आहे. निदान  आहे त्याचे जतन  तरी आपण करायला हवे, ही वारंवार होणारी जाणीव पुन्हा एकदा इथे होते. 

 असेच दुसरे, काही शतके जुने असलेले मंदिर म्हणजे नागेश्वर मंदिर, नागाव. अगदी साधे, सुंदर मंदिर. मंदिरासमोरील तळे, दीपमाळ, जवळच असलेली समाधी सगळा परिसरच खूप शांत असतो. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील नक्षीदार खांबांचा सज्जा गतवैभवाची साक्ष देतो. आता मंदिराला डागडुजीची गरज आहे असेही सांगत राहतो. 

नागेश्वर मंदिर 
नागेश्वर मंदिर दीपमाळ 
नागाव मध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. भीमेश्वर मंदिर हे त्या पैकी एक. मंदिराबाहेर येथे फोटो काढू नयेत अशी पाटी लावलेली असल्याने मी तिथले फोटो काढलेले नाहीत. हा बाहेरचा फोटो असा दिसतो. अर्थातच इथेही मंदिरासमोर पुष्करणी आहेच. दीपमाळ आहेच. 
मंदिरात आत सुंदर हंड्या झुंबरे टांगलेली आहेत. 
भीमेश्वर  मंदिर 
भीमेश्वर मंदिर 
नागावमध्ये मंदिरासमोर पुष्करणी नसेल तर फाउल मानला जातो की काय त्याची कल्पना नाही!! जवळपास सर्व मंदिरांच्या समोर पुष्करणी आहेच! पण अशी मंदिरे बघताना एक विशेष प्रसन्नता वाटते हे खरेच. 
पाणी, हिरवाई, स्वच्छता, शांतता ह्या सगळ्यांमुळे मन निवळत जाते. 

नागाव हे नाव कसे पडले असेल? नाग आणि गाव मिळून झाले असेल का? असे मनात यायचे कारण म्हणजे नागाव ला असलेले नऊ नाग स्वयंभू देवस्थान. जमीन खणत असताना इथे ह्या मूर्ती सापडल्या आणि मग त्यांच्यासाठी मंदिर उभे केले गेले. एका वाडीत असावे असेच हे मंदिर आहे. सगळीकडे झाडे, वेली, फुलांनी वेढलेले हे मंदिर खरे तर अगदी रस्त्याला लागून आहे. पण पटकन लक्षात येत नाही. 
नऊ नाग मंदिर
म्हणताना नऊ नाग मंदिर म्हटले तरी प्रत्यक्षात तिथे दहा नाग प्रतिमा आहेत. मंदिरात मागे नवनाग स्तोत्र आणि आरती लावलेली आहे. ती सहसा इतरत्र पाहायला मिळत नाही. 
नऊ नाग आरती आणि स्तोत्र 

मंदिरात अनेक घंटा वाऱ्या सोबत झुलताना दिसतात. नवसाच्या घंटा इकडे बांधल्या जातात असे कळले. 

नागावचा समुद्रकिनारा विशेष सुंदर आहे. सरळच्या सरळ किनाऱ्याची रेषा सिंधूसागराशी गप्पा मारत मारत पुढे जाते. किनाऱ्यावरच्या मऊ वाळूमूळे धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा देखील मवाळ होऊन जातात. अगदी स्वच्छ आणि तुलनेने निर्धोक असा हा किनारा पर्यटकांचा आवडता आहे. अनेक वॉटर स्पोर्ट्स देखील इथे आहेत. त्यामुळे शनिवार रविवारी इथे भरपूर गर्दी असते. ह्या समुद्रकिनाऱ्याचा खरा आनंद घ्यायचा तर थोडी शांतता हवी. 
तुम्ही नागाव ला असाल आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर गेला नाहीत तर मात्र नक्कीच फाऊल मानला जातो बरं का!! हा किनाराही भुरळ पाडणारा असाच आहे. 
समुद्राचे पहिले दर्शन हे असे होते. 
आणि मग आत्ता आत्ता तर भेटलो आहोत असे म्हणताना त्याच्याशी मैत्रीच होऊन जाते. 






नागावच्या समुद्रकिनाऱ्यावरून निघताना पावले जड होतात. आणाभाका न घेताही आता तो समुद्रकिनारा कायमचा लक्षात राहणार असतोच. 
नागावच्या परिसरातील अजून काही मंदिरांच्या विषयी लिहायचे आहे. पण ते पुन्हा कधीतरी. आजच्यापुरते इतकेच. 

#alibag #alibagbeach #nagaon #navgav #nagavbeach #alibaug #travelmaharashtra #kokan # kokanbeaches 
# onedaytravelfrommumbai 



Comments

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या  वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.  देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,  "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.  📷Samrat Darda  सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक- भाग 1 - तयारी !!

  आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.  हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.  नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली.  असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...