रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व!
शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता.
राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहासनाकडे, हिंदवी स्वराज्याकडे, संघटनेकडे वळवली. व्यक्ती माहात्म्य टाळले. अशी दृष्टी असणारे राज्यकर्ते फारच विरळे.
शिवाजी महाराज आदर्श राजा होते, उत्कृष्ट सेनापती होते. राज्याभिषेकाच्या निमित्ताने इतर राष्ट्रांची मान्यता मिळवणे हा हेतू तर त्यांनी साध्य केलाच पण रयतेची निष्ठा स्वराज्याकडे वळवून, आपल्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे हा लढा चालू राहील अशी व्यवस्था निर्माण केली. विजिगिषु वृत्ती जागृत केली.
|
|
ह्या अभूतपूर्व राज्याभिषेकाचे स्थान होते किल्ले रायगड! आजच्या दिवशी ही पोस्ट लिहिताना मला अतिशय आनंद होतो आहे. एरवी मी ब्लॉगपोस्ट लिहिते, ते मी जाऊन आलेल्या ठिकाणांची माहिती वाचकांना द्यावी म्हणून. पण ह्या पोस्टमध्ये काहीही माहिती नव्याने द्यायची गरजच नाही. आपल्याला सगळ्यांना रायगड, जरी प्रत्यक्ष तिथे गेलेलो नसलो तरीही, माहितीच असतो. माननीय बाबासाहेब पुरंदरे, गो. नी दांडेकर ह्यांच्या लेखनातून, भाषणातून रायगड आपल्या ओळखीचा झालेला असतो. कोणत्याही गडापेक्षा रायगडावर अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत. अगदी पहिल्यांदा तिथे जाणाऱ्या लोकांना देखील आपण पहिल्यांदाच हे सगळे बघत आहोत असे वाटत नाही! मी आज फक्त तुमच्या रायगडाच्या आठवणी जागविण्याचे काम करणार आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १३५० मीटर आहे. पण भारतीय मनातील ह्या किल्ल्याची उंची न मोजता येण्याइतकी आहे. (रायगडाची उंची अनेक जण वेगवेगळी सांगतात. मी इथे लिहिलेली उंची रायगडावर जो फलक लावलेला आहे त्यावरची आहे.) आम्ही ऑक्टोबर २०१५ मध्ये रायगडला गेलो होतो. तेव्हाचे फोटो आहेत हे सगळे.
|
रायगडावरील माहितीफलक |
बाराव्या शतकात हा किल्ला सर्वप्रथम बांधला गेला. त्या आधी नुसता डोंगर असतानाची नावे होती रासिवटा, तणस, नंदादीप. नंतर किल्ला बांधल्यावर नाव होते रायरी. अनेक वर्षे शिर्के ह्यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीत कैदी ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे.
मे १६५६ मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला. इथे पोचायला आणि चढायला अत्यंत अवघड होते, तसेच समुद्र जवळ होता. म्हणून इथे राजधानी करावी असे राजांनी ठरवले. डच, पोर्तुगीज, अरब, इंग्रज या आक्रमकांचा विचार करून नाविक शक्ती, आरमार व्यवस्था विकसित करणाऱ्या महाराजांनी राजधानीसाठी समुद्र जवळ असलेला किल्ला निवडला हे अगदीच संयुक्तिक आहे.
महाराज हा किल्ला राजधानीसाठी निवडताना काय म्हणाले ते अनेक ठिकाणी वाचायला मिळते. किल्ल्यावरचा गाईड पण ते सांगतोच तरी देखील मी पुन्हा इथे ते शब्द देत आहे.
महाराजांचे त्यावेळचे शब्द सभासदाच्या बखरीत वाचायला मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."
|
आमचा किल्ल्यावरील मार्गदर्शक |
मा. गो. नी. दांडेकर महाराजांच्या गड निवडीविषयी म्हणतात, "आधीही दुर्ग होतेच. पण शिवछत्रपतींनी दुर्गरचना, त्यांची गरज, उपयोग, महत्व, स्थान, आवश्यकता इत्यादी सर्व बाबींचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला व एक स्वतंत्र शास्त्र बनवले. जिथे पूर्वी दुर्गं होते त्यांची डागडुजी केली. नव्हते तिथे मोक्याच्या जागी नवे बांधवून घेतले.
प्रत्येक वेळीच महाराजांचे चातुर्य व दूरदृष्टी दिसून येते. पण सर्वाधिक चातुर्य दिसते ते रायगडी राजधानी स्थापन करण्यात. रायगड ऐन कोकणात. चहुबाजूंस डोंगरदाटी. वरंध घाट, लिंगाणा, माणगाव अशा चारदोन ठिकाणांव्यतिरिक्त अन्यत्र कुठुन तो किल्ला कोणता, ते त्या डोंगर दाटी मध्ये ओळखू येत नाही. घाटापासून तसा जवळ पण अडचणीत. समुद्रकिनारा अंदाजे तीस मैलांवर. चहूकडून तुटलेला ताशीव कडा. अगदी पाखरू बसू म्हणेल तरी त्यास जागा नाही. असा हा दुर्गम किल्ला त्यांनी राजधानी म्हणून निवडला. तिथून घाटावरही लक्ष पोचत असे व समुद्रही आवाक्यात होता."
आता कशी आहे रायगडाची वाट? पुण्याहून रायगड दर्शन बस आहे. मुंबईकरांना महाडमार्गे जाता येते. रस्ता २०१५ मध्ये आम्ही गेलो तेव्हा चांगला नव्हता. पण लवकरच दुरुस्ती होणार होती. तेव्हा आता चांगला असेल.
|
रायगडावर जाणारा रस्ता |
पायथ्यापासून चढून जाणार असाल तर साधारण १४००/१५०० पायऱ्या चढून जावे लागेल. चढताना निसर्ग आणि अनेक ठिकाणे बघायला मिळतील. डोंगर चढण्याचा आनंद देखील मिळेल. तेव्हा खरे तर रायगड ह्याच मार्गाने पाहायला हवा.
नवा रज्जुमार्ग झालेला आहे. त्याचे ऑनलाईन आरक्षण होते. त्यांची साईट आहे,
https://www.raigadropeway.com/index.html
त्या साईटवर आपण केबल कारचे आरक्षण करू शकता. एका वेळचे अथवा परतीचे सुद्धा आरक्षण होऊ शकते. अवघ्या काही मिनिटात ही केबल कार आपल्याला गडावर घेऊन जाते.
|
केबल कार मधून दिसणारे दृश्य |
|
केबल कार मधून दिसणारे दृश्य |
|
केबल कार मधून दिसणारे दृश्य |
|
केबल कार मधून दिसणारे दृश्य |
|
केबल कार मधून दिसणारे दृश्य |
इतका मोठा परिसर नजरेच्या आवाक्यात येतो. केबल कार अजून थोड्या वेळ चालू राहावी असेच वाटायला लागते!
ह्याच साईटवर राहण्याच्या व्यवस्थेचे पण आरक्षण होते. त्यांचे गडावर रेस्टॉरंट आहे. पण आम्ही २०१५ मध्ये गेलो तेव्हा तिथे फारसा स्वैपाक होत नसे. त्यामुळे आपल्याला काय आणि कधी हवे त्याची मागणी पायथ्याशी असलेल्या ऑफिस मध्ये नोंदवायची आणि मग त्या त्या वेळी अन्न केबल कारने गडावर येणार अशी व्यवस्था होती.
तुम्ही जाल तेव्हा चौकशी करून मगच वर जा. पायथ्याशी दुकाने आहेत. शिवाय तुम्ही स्वतः बरोबर काही अन्न पदार्थ ठेवणे चांगले.
गडावर MTDC ची देखील राहण्याची सोय तसेच रेस्टॉरंट आहे. त्यांचे बुकिंग पण आधीच करावे लागते. ऐनवेळी जाऊन सोय होण्याची शक्यता कमीच असते.
१६७४ मध्ये साम्राज्याची राजधानी हा रायगड बांधला तो महाराजांच्या आज्ञेवरून हिरोजी इंदुलकरांनी. आज इतक्या शतकानंतर, इंग्रजांनी उध्वस्त करून देखील ज्या काही थोड्या खुणा उरल्या आहेत त्यावरून तेव्हाच्या वैभवाची कल्पना आपण करू शकतो.
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड - पाण्याची टाकी |
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड |
|
गवत खूप वाढले आहे! |
मी तुम्हाला सगळा गड फिरवणार नाही. अगदी विस्तृत माहिती देखील लिहिणार नाही! ज्यांनी रायगड पाहिला नाही त्यांना उत्सुकता वाटेल आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांच्या आठवणी जागृत होऊन परत जावेसे वाटेल इतकेच सांगणार आहे!
|
बाजारपेठ |
रायगडावरील बाजारपेठ घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशी आणि इतकी उंच आणि रुंद आहे. पेठेच्या दोन रांगा आहेत. आता दुकानांची जोती उरली आहेत. दोन्ही रांगांमध्ये साधारण ४० फूट इतके अंतर सोडलेले आहे. प्रत्येक रांगेत वीस पेक्षा जास्त दुकाने आहेत.
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड - नगारखाना दरवाजा |
|
किल्ले रायगड - कथा सांगतो शिवरायांची |
|
सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज |
|
किल्ले रायगड |
प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी ही जागा. महाराजांच्या अनेक कथा आठवतात. इथे प्रत्यक्ष महाराज वावरलेले आहेत, राज्याभिषेक झालेला आहे ह्या कल्पनेने देखील रायगडावर फिरताना अंगावर रोमांच उभे राहतात. असे म्हणतात की दरवाज्याजवळ उभे राहून बोललेले सिंहासनाशी ऐकू जाईल अशी ध्वनी व्यवस्था गड बांधताना केलेली आहे. त्याचा अनुभव आम्ही घेतला.
आम्ही नगारखाना दरवाज्याजवळ असताना पाहिले की काही हौशी पर्यटक सिंहासनावर चढून महाराजांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ह्या उद्दामपणाने अक्षरश: अंगाचा संताप झाला. आम्ही नगारखाना दरवाज्यातून "खाली उतरा" असे ओरडलेले तिथे ऐकू गेले. कोणी ओरडल्यानंतर तरी खाली उतरण्याइतकी लाज त्यांच्याकडे शिल्लक होती हे आमचे नशीब.
हे असे उद्दाम हौशी पर्यटक, गडांवर जाऊन धूम्रपान, मद्यपान करणारे, घाण टाकून गड खराब करणारे पर्यटक ह्यांचे काय करावे, कळत नाही.
|
टकमक टोक |
पूर्वी गुन्हेगारांना देहदंड देण्यासाठी ह्या कड्या वरून ढकलून देण्यात येत असे. खरोखरच उभा कातळ आहे. कपाळमोक्ष शंभर टक्के ठरलेलाच. आता तो एक चांगला व्यू पॉईंट झाला आहे.
|
किल्ले रायगड - खलबतखाना |
|
किल्ले रायगड स्तंभ |
|
किल्ले रायगड - स्तंभ |
गंगासागर च्या जवळ उभे असलेले हे दोन सुंदर स्तंभ. अजूनही नक्षीदार तीन मजले दिसतात. पूर्वी हे पाच मजले होते असे म्हणतात. बारा कोनांचे हे स्तंभ खूपच विशेष आहेत. जगदीश्वर मंदिराजवळ असलेला शिलालेख पुढे दिला आहे त्यात उल्लेख केलेले स्तंभ हेच असावेत.
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड |
|
गंगा सागर तलाव |
राज्याभिषेकाच्या वेळी ह्या तलावात विविध तीर्थक्षेत्रीचे, नद्यांचे पाणी आणून मिसळले होते. त्यामुळेच ह्याचे नाव गंगा सागर असे पडले.
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड - राणीवसा |
|
किल्ले रायगड - राणीवसा |
राणीवसा म्हणजे राण्यांची राहण्याची जागा. इथे सहा महाल आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मदतनीसांची पण राहण्याची सोय केलेली आहे. मेणा दरवाजातून ह्या सर्वांची ये जा होत असे.
|
किल्ले रायगड |
रायगड संरक्षित स्मारक म्हणून आता शासनाच्या ताब्यात आहे. त्याची देखभाल शासनाच्या संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे. गडावरचे रस्ते ठीक आहेत आणि सर्वत्र पाट्या लावलेल्या आहेत.
|
किल्ले रायगड - होळीचा माळ |
|
किल्ले रायगड - होळीचा माळ |
|
किल्ले रायगड - होळीचा माळ व महाराजांचा पुतळा |
|
किल्ले रायगड |
|
किल्ले रायगड - जगदीश्वराची पायरी |
रायगडचा आराखडा करणारे व इमारती बांधवून घेणारे होते हिरोजी इंदुलकर. महाराजांच्या कल्पनेपेक्षाही भव्य अश्या इमारती बांधून त्यांनी गड सुसज्ज केला. महाराजांनी प्रसन्न होऊन, काय हवे ते माग सांगितल्यावर हिरोजी म्हणाले, काही नको. देवाच्या पायरीवर नाव लिहितो. माझ्या नावावर पाय देऊन महाराज देवाच्या दर्शनाला जातील. तुमच्या पायाची धूळ मस्तकी लागेल. अजून काय हवे? अहंकाराचा लोप होण्याचे किती मोठे उदाहरण! नाव पण काय लिहिले तर 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर'.
|
जगदीश्वर मंदिर - बाह्य द्वार व नंदी |
|
जगदीश्वर मंदिर |
|
जगदीश्वर मंदिर -शिलालेख |
|
शिलालेख वाचून दाखवताना आमचा मार्गदर्शक |
तो शिलालेख असा आहे.
"श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेःसिंहासने तिष्ठतः। शाकेषण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते। श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥"( इंटरनेटवरून साभार )
ह्याचा साधारण अर्थ असा, "गणपतीला नमस्कार! हा जगदीश्वराचा प्रासाद,सर्व जगाला आनंददायी असा, सिंहासनाधिश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर अशीच विलसत राहो."
|
वाघ्याचा स्मृतिस्तंभ |
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडाने पाहिला तसाच त्यांचा मृत्यू देखील रायगडाला सहन करावा लागला. शके १६०२ चैत्र शुद्ध १५ म्हणजेच १६८० मध्ये महाराजांचा मृत्यू झाला. असे म्हणतात की महाराजांच्या चितेत त्यांच्या वाघ्या कुत्र्याने देखील उडी मारली व आत्मार्पण केले. त्याचे स्मृतिस्थळ आपल्याला जगदीश्वराच्या मंदिरासमोरच दिसते आणि अर्थातच ह्या फोटोत उंच दिसते आहे ती महाराजांची समाधी. अष्टकोनी जोते बांधलेले आहे.
|
📷विकिमीडिया कॉमन्स |
महाराजांची समाधी पाहून मन विषण्ण होते खरे, पण मग वाटते, आपल्या सगळ्यांच्या मनात तर महाराज कायम राहणार आहेतच..अगदी त्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे यावतचंद्र दिवाकरौ. त्यांनी दिलेली शिकवण आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहणार आहे.
|
किल्ले रायगड |
|
जय भवानी जय शिवाजी |
#Raigad #ShivajiMaharajRajyabhishek #ShivajiMaharajThrone #WheretostayonRaigad #HowtogotoRaigad #OneDayTripToRaigad #RaigadRopeway #Hirkani #Takmaktok #ChatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajCapital #shivSwarajyaDin
किल्ले रायगड - नाव उच्चारताच रोमांच उसे राहतात. वृंदा टिळक आज सर्व आठवणींना उजाळा मिळाला. छान लेख लिहीला आहे.महाराजांना त्रिवार प्रणाम 🙏
ReplyDeleteMast lekh vrunda tai , Raigad che vernan atishay surekh
ReplyDelete