अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन आम्ही निघालो ते परशुराम कुंड ला जाण्यासाठी.
पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये असतेच.
डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. वारा किती? तर ड्राइवर ने आम्हाला खिडक्या उघडायला सांगितल्या, म्हणजे वारा खिडकीतून जाईल आणि गाडीला त्रास होणार नाही. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता.
रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.
ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित.
पायऱ्यांवरून दिसणारे कुंड |
परशुराम कुंड हे भारतातील एक प्रसिद्ध स्थान. भारत आणि नेपाळ मधून दर मकर संक्रांतीला लाखो हिंदू ह्या स्थानी, यात्रेसाठी येतात.
परशुराम हे दशावतारापैकी सहावा अवतार मानले जातात. ह्या ठिकाणाशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत. त्या सर्वातला समान धागा हा की परशुराम इथे आले होते. त्यांनी इथे तप केले.
पायथ्यापर्यंत गाडी जाते. नंतर मात्र आधी भरपूर पायऱ्या चढायला व उतरायला लागतात. म्हणजे आपण एक लहान डोंगर चढतो व पलीकडच्या बाजूने उतरून नदीशी जातो. जवळपास तीनशे पायऱ्या असतील. त्यापैकी काही अवघड आहेत. वयस्कर किंवा इतर काही शारीरिक व्याधी असणाऱ्या लोकांना कदाचित ह्या पायऱ्या अवघड जातील. नुकतेच भारत सरकारने हे ठिकाण सुव्यवस्थित करण्यासाठी मदत जाहीर केली आहे. तेव्हा आता हे चढणे उतरणे सोयीचे होईल.
आम्ही गेलो तेव्हा पूर्ण वेळ बारीक बारीक पाऊस पडत होता. घनदाट जंगलात हे ठिकाण असल्याने पायऱ्यांच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे. त्यामुळे पायऱ्या चढण्याचा थकवा अजिबात जाणवत नाही.
पायऱ्यांवरून दिसणारे दृश्य अनुभवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा.
Parashuram Kund From the steps
पायथ्याशी एक परशुराम मंदिर आहे. पायऱ्या चढताना अधूनमधून काही मंदिरे लागतात. ह्या सर्व मंदिरांच्या आसपास गायी मुक्तपणाने फिरत असतात.
श्री परशुराम मंदिर |
इथे पूर्वी जे ब्रम्हकुंड होते, ते १९५० च्या भूकंपामध्ये नाहीसे झाले. त्यावरून आता पाण्याचा वेगवान प्रवाह वाहतो आहे. पण आता त्याच जागी, आश्चर्यकारक रित्या खडकांनी वेढलेला असा एक वर्तुळाकार भाग निर्माण झाला आहे.
परशुराम कुंड |
परशुराम कुंड |
परशुराम कुंड |
परशुराम कुंड |
ह्या ठिकाणाला भेट देण्याचा आनंद विलक्षण आहे. निसर्गाचे शांत रम्य रूप इथे दिसते तसेच अत्यंत रौद्र रूप देखील दिसते. अनेक भाविक ह्या कुंडात स्नान करण्यासाठी, काही पूजाविधी करण्यासाठी दूरवरून येतात. श्रद्धापूर्वक यात्रा करतात.
कुंडाला जाणाऱ्या रस्त्याच्या पायथ्याशी, जिथे गाड्या पार्क केल्या जातात तिथे जवळच काही लहानलहान दुकाने आणि खानावळी आहेत. आम्हाला तिथे ताजे, गरम, चविष्ट शाकाहारी जेवण मिळू शकले. अर्थात आम्ही आधी फोन केला होता व कुंडाला जाताना पण सांगून गेलो होतो की आम्ही आल्यावर जेवायला येतो म्हणून.
पूर्ण वेळ पावसात भिजत, इतक्या पायऱ्या चढ उत्तर केल्यावर गरम भजी, सुग्रास अन्न खाताना विशेष आनंद झाला. वारा तर इतका होता की आमच्या पानातले पापड धरून ठेवण्याची कसरत करायला लागत होती. नाहीतर ते उडून जात होते!!
पाऊस आणि भजी! |
स्थानिक चवीचे शाकाहारी जेवण |
कोरा चहा |
जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला. टी सेट खूपच वेगळा दिसला म्हणून मी तिला विचारले की कुठून आणला? तर तिने सांगितले की ब्रम्हदेशाच्या बाजारातून! कसे काय विचारताच ती म्हणाली, हा जो मागे डोंगर दिसतो आहे ना? तो पार केला की ब्रम्हदेश आहे!
तुझी प्रवास वर्णन छान असतात.पर्शुराम कुंडाची माहिती माझ्यासाठी नविन आहे.सोप्या मराठी भाषेत लिहिलेले वाचताना खूप आनंद मिळतो.
ReplyDeleteशुभेच्छा.
खूप छान माहिती, फोटो...! धन्यवाद..!
ReplyDelete