कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव. गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.
 |
श्री व्याडेश्वर देवस्थान. |
 |
श्री व्याडेश्वर देवस्थान. |
तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत.
 |
श्री व्याडेश्वर देवस्थान. |
पूजा अर्चा व्यवस्थित चालू आहेत. नुकत्याच केलेल्या पूजेतील फुलांचा, हारांचा, धुपाचा, उदबत्तीचा वास हवेत दरवळत असतो. अतिशय प्रसन्न वाटते. मंदिरात अनेक भक्त आणि पुजारी दिसतात. तरीही भरपूर जागा असल्याने कोलाहल, गजबज नसते हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.  |
श्री व्याडेश्वर देवस्थान. |
 |
श्री व्याडेश्वर |
 |
श्री व्याडेश्वर |
समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या मंदिराविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. काहींच्या मते हे मंदिर हजारो वर्ष जुने आहे. अगदी परशुरामाच्या काळापर्यंत या मंदिराचे धागे पोचलेले आहेत. परशुरामांचे शिष्य व्याड ऋषी यांनी स्थापन केलेले मंदिर म्हणून व्याडेश्वर असे म्हटले जाते.
व्याड ऋषीनी पूजन केलेले हे शिवलिंग कालांतराने बांबूच्या बेटात लुप्त झाले. त्यानंतर सांकुराण राजाचा मुलगा कायुराण ह्याच्या काळात ते शिवलिंग सापडले आणि त्याच्यावर भव्य मंदिर बांधले गेले.
सांकुराण राजाने दुसऱ्या तिसऱ्या शतकात हे मंदिर पुन्हा बांधले असा उल्लेख सापडतो. त्यानंतर अनेकदा कोणी कोणी अर्थातच जीर्णोद्धार केला असेल. पण त्यांची नावे उपलब्ध नाहीत. व्याडेश्वर महात्म्य व्याडेश्वरोदय या चारसाडेचारशे वर्ष जुन्या पोथीत इतर उल्लेख सापडतात.
.jpg) |
मंदिर आख्यायिका |
आता सध्या आहे ते मंदिर देखील अडीचशे तीनशे वर्ष जुने असावे. पेशवेकालीन बांधकाम असावे असे वाटते. मुख्य मंदिर शंकराचे आहे. इथेही अनेक कमानींनी युक्त असे सुंदर भव्य सभागृह आहे. अनेक कमानी असलेल्या ह्या सभागृहात परशुरामाची भव्य प्रतिमा आहे.
 |
श्री परशुराम |
गाभाऱ्यातील शिवलिंग आणि पूजा त्याच्या विरुद्धच्या आरशात तर दिसतेच. शिवाय तिथे एका स्क्रीनवर लाईव्ह टेलिकास्ट चालू असते. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. हे पंचायतन मंदिर आहे. म्हणजेच एकाच आवारात मुख्य शिवमंदिर व इतर चार मंदिरे आहेत. पंचायतनातील इतर मंदिरे देखील चांगली मोठी आहेत.
 |
श्री अंबिका देवी मंदिर |
.jpg) |
श्री लक्ष्मी नारायण मंदिर |
 |
श्री लक्ष्मीनारायण मंदिर |
 |
श्री सूर्यनारायण मंदिर |
 |
श्री सूर्यनारायण मंदिर |
 |
श्री गणपती मंदिर |
गणेश, अंबिका, लक्ष्मीविष्णू, सूर्यनारायण अशी ही मंदिरे आहेत. शिवाय प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हनुमान आणि गरुड मंदिरे आहेत. मंदिरासमोर मोठी दीपमाळ आहे. प्रत्येक शिवमंदिरात असतो तसा इथेही एक नंदी आहे. हा नंदी अगदी जिवंत वाटावा अश्या कलाकुसरीचा आणि भव्य आहे. |
नंदी |
मंदिराच्या आवारात गोड्यापाण्याची एक विहीर आहे. तिचेच पाणी पूजेला वापरले जाते. आपल्याला पूजा अर्चा करायच्या असतील तर मंदिरात असलेल्या ऑफिसमध्ये नोंदणी करू शकता.
.jpg) |
मंदिराचे भव्य आवार |
मंदिरात इतर अनेक फुलझाडांच्या सोबत बेलाचा वृक्ष आहे. दीपमाळेचा काही भाग आपण ह्या फोटोत पाहू शकतो. पलीकडे भक्त निवासाची इमारत आहे.मंदिराच्या बाहेर असलेली पुष्करणी पूर्वी मंदिराच्या आवारात असणार. आता मात्र मधून रस्ता जातो आहे.
आषाढी, कार्तिकी एकादशी, त्रिपुरी पौर्णिमा ह्या दिवशी विशेष उत्सव असतात. वर्षभर ह्या मंदिरात अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम होतात. गरजूना मदत केली जाते.
अधिक माहितीसाठी मंदिरात जे माहितीफलक होते त्यांचे फोटो देत आहे. आपण इथे चौकशी करू शकता.
 |
मंदिरातील माहितीफलक |
 |
मंदिरातील माहितीफलक |
 |
मंदिरातील माहितीफलक |
आपल्या कोकण प्रवासात अवश्य जायलाच हवे असे हे व्याडेश्वर मंदिर आहे.
एसटी स्टँड च्या जवळ असल्याने जवळच्या इतर गावाहून जाणे येणे सोपे आहे. गणपतीपुळ्यापासून साधारण 80 किलोमीटरवर आणि चिपळूण पासून अंदाजे पन्नास किलोमीटरवर असलेले गुहागर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आहेत. तसेच जेवण्यासाठी अनेक चांगली रेस्टॉरंट्स आणि घरगुती खानावळी आहेत. अगदी खास कोकणी पदार्थ तिथे मिळतात. घरगुती चवीचे असतात. आम्हांला जोग, कानिटकर अशा दोन खानावळी तसेच सुरुची रेस्टॉरंट चे नाव कळले होते.
आम्ही जोग आजींच्या खानावळीत जेवलो. चुलीवर शिजवलेले अतिशय रुचकर जेवण, प्रेमळ आतिथ्य ह्यामुळे जेवणाचा आनंद द्विगुणित होतो. तुम्ही गुहागरला जाल तेव्हा अवश्य ह्या खानावळीत जा. फक्त थोडे आधी जाऊन आपण जेवायला येणार असल्याचे सांगायला लागते किंवा फोन देखील करू शकता. वरच्या पाटावर हा त्यांचा पत्ता आहे. गुहागरात कोणालाही विचारले तरी पत्ता सहज सापडेल. जेवायला बसण्याची जागा त्यांच्या घरामागे वाडीतच आहे. त्यामुळे झाडांच्या सानिध्यात चविष्ट जेवण जेवून तृप्त होण्याचा अनुभव मिळतो. आम्ही फोन नंबर घ्यायचा विसरलो. जे गुगल सर्च मध्ये त्यांचे फोन नंबर सापडले ते देते आहे.
जोग आजी - +91 72761 58316, 91581 58316.
वृंदा इतकी छान माहिती देतेस की प्रत्यक्ष जाऊन आल्या सारखे वाटते 😍खूप छान उपक्रम आहे 🙏🙏
ReplyDelete