मुख्य सामग्रीवर वगळा

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल. 

काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते? ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी. 

हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते. ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात. 

शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, चांदी, लाकूड, दगड अशी माध्यमे बदलत अनेक वेळा पुनर्निर्माण केले गेले. 

अतिशय वैभवशाली होते हे मंदिर. गाभाऱ्यात जडवलेली रत्ने, सोन्याचांदीचे दरवाजे आणि कळस तर होतेच पण मंदिरात टांगलेली घंटा होती ती देखील सोन्याची होती. आसपासच्या गावात भरभराटीला आलेली बाजारपेठ होती. देशातील तसेच विदेशातील व्यापारी तिथे व्यापारासाठी येत असत. समुद्र जवळच असल्याने समुद्रमार्गे मालाची वाहतूक करणे सोपे होते. 

ह्या वैभवाच्या लोभाने तसेच हिंदू अस्मितेवर घाव घालण्यासाठी सोमनाथावर अनेकदा मुस्लिम आक्रमणे झाली. 

गझनीच्या महंमदने १०२६/२७ मध्ये स्वारी करून संपत्ती लुटून नेली, मंदिर उद्ध्वस्त केले. ह्या त्याच्या “ कर्तृत्वामुळे” गझनीचा महंमद हा मुस्लिम इतिहासात वीरपुरुष, शूर योद्धा म्हणून मान्यता पावला. ह्या घटनेचा गौरवपूर्ण उल्लेख अनेक मुसलमान इतिहासकारांनी, बखरकारांनी, प्रवाशांनी केलेला आढळतो. 

त्यांनतर चालुक्य राजा कुमारपाल ह्याने पुन्हा ते मंदिर अतिशय सुंदररित्या बांधले. ते १२९९ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने लुटून नेले, उध्वस्त केले. पुन्हा चौदाव्या शतकात चुडासामा राजा महिपालने ते बांधले. त्या नंतर १३९५ मध्ये गुजराथचा सुलतान जफरखान, १४५१ मध्ये महमूद बागेंदा ह्यांनी ते लुटले, उध्वस्त केले. ह्या खेरीज अधून मधून अनेक मुस्लिम सरदार, राजे, सुलतान ह्यांनी आक्रमणे केली होती ती वेगळीच. त्या नंतर १६६५ मध्ये मुगल औरंगझेबाने ते लुटले, उध्वस्त केले. त्यानंतर मंदिराच्या काही भागात मशीद स्थापण्यात आली. 

हे असे वारंवार हल्ले आणि उध्वस्त करणे का? तर हिंदूंचा आपल्या धर्म, संस्कृती आणि परंपरांविषयीचा अभिमान ठेचून काढण्यासाठी आणि इस्लामचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असे केले गेले. त्या मशिदीमुळे तर हिंदूंच्या मनावरील जखम भळभळत राहिली. काहींच्या मनात अंगार उसळत राहिला तर काहींच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तिथली मशीद हलवली जाऊन तिथे मंदिर पुनर्स्थापित व्हावे ह्याला काही नेत्यांचा विरोध होताच. मात्र स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे मशीद हलवली गेली आणि मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला गेला. आजही सोमनाथ नाव घेताच प्रत्येकाच्या भावना उचंबळून येतात आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या सारखा द्रष्टा नेता लाभला म्हणून आपण आज हे मंदिर पाहू शकतो आहोत ह्याची कृतज्ञ जाणीव होते.

भारतातील पारंपरिक मंदिरांचे वास्तुरचनाकार असलेल्या सुप्रसिद्ध सोमपूरा परिवारातील प्रमुखांनी ह्या मंदिराचा आराखडा तयार केला आणि वास्तू उभारणीला सुरुवात झाली. 

कुठे आहे हे मंदिर?

भारताच्या पश्चिम भागात असलेल्या गुजराथ राज्यातील सौराष्ट्र मध्ये श्री प्रभास पाटण क्षेत्रात हे मंदिर आहे. वेरावळच्या अगदी जवळ आहे. 

कसे आहे हे मंदिर ?

सागराच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे अतिशय सुंदर आणि भव्य असे हे मंदिर आहे. गर्भगृह, सभागृह आणि नृत्यमंडप अशी पारंपरिक रचना आहे. सर्वत्र अतिशय प्रमाणबद्ध मानवी आकृती तसेच अनेक कलाकृती कोरलेल्या आहेत. मुख्य शिखर १५५ फूट उंच असून त्यावरील कलश १० टन वजनाचा आहे. त्यावरील डौलाने फडकणारा ध्वज आहे २७ फूट उंच ध्वजदंडावर. 

मंदिरात खूप कडक सुरक्षा व्यवस्था आहे. आपल्या पिशव्या, फोन,चपला सगळे काउंटरवर जमा करावे लागते. मंदिराच्या आवारात तुम्ही फोटो काढू शकत नाही. त्यामुळे हे फोटो आहेत ते दूर अंतरावरून दिसणाऱ्या कळसाचे फोटो आहेत. 

सोमनाथ मंदिर (2025)

सोमनाथ मंदिर (2025)

समुद्र किनारा आणि सोमनाथ मंदिर (2025)

सोमनाथ मंदिर - धर्मध्वज (2025)

मंदिर - शिल्पकला (२०२५)

मंदिर - शिल्पकला (२०२५)

मंदिर - शिल्पकला (२०२५)

सोमनाथ - कळस (२०२५)

दर्शनासाठी अगदी शिस्तशीर पणे रांगेची व्यवस्था आहे. पैसे दिले की रांग न लावता आधी दर्शन असे दिसले नाही त्यामुळे आनंद झाला.
आम्ही भाग्यवान होतो की सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या प्रतिज्ञेच्या अमृतमहोत्सवाला म्हणजे २०२२ च्या दीपावली पर्वात आम्ही मंदिरात होतो. आम्ही खूपच भाग्यशाली होतो की आरतीच्या वेळी आम्हाला मंदिरातही थांबता आले.

भारतभरातून आणि विदेशातूनही तिथे जमलेले भाविक, आरतीच्या तालावर अनेक हातांतून एका लयीत वाजणाऱ्या टाळ्या, अनेक वाद्यांचा नाद मेळ, आरतीच्या दिव्यांचा सोनेरी प्रकाश, धूप उदबत्तीचा हवेत पसरलेला सुगंध, मंदिराची भव्य वास्तू ह्यामुळे अतिशय पवित्र आणि भारावून टाकणारे वातावरण होते. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच होते, डोळ्यात आनंदाश्रू होते आणि कंठ आनंदातिशयाने सद्गदित झालेला होता. केवळ त्या दिवशी तिथे असलेल्याच नव्हे तर नेहमीच सोमनाथाचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाची अशीच अवस्था होत असणार. 

मंदिरात एका काउंटरवर सोमनाथाची प्रतिमा असलेली चांदीची नाणी मिळतात. प्रत्येक दिवशी ठराविक संख्येत नाणी विकली जातात. अशी चांदीची नाणी तर कुठेही मिळतील. ह्या नाण्यांचा विशेष असा की त्या आधी ती सोमनाथावर वाहिली जातात. त्यावरील चंदन अष्टगंधाचा सुगंध त्या दिवशी तर दरवळलाच पण मनात निरंतर दरवळत राहील ह्यात शंकाच नाही. 
मंदिरात रात्री ध्वनी प्रकाशाच्या साहाय्याने होणारा कार्यक्रम न चुकवण्याजोगा आहे. सहसा अशा कार्यक्रमात लेझर किरणांची जादू एखाद्या दंतकथेच्या वा क्वचित पौराणिक कथेच्या माध्यमातून सांगितलेली असते. पण इथे मात्र खरा खरा इतिहास सांगितला आहे. मंदिराच्या भव्य कळसावर पडणारे प्रकाशाचे झोत, त्यातून उमटणारी चित्रे, कथा अक्षरश: निर्माण करतात. कथेतील निवेदक आहे समुद्र आणि त्याला आवाज लाभला आहे अमिताभ बच्चन ह्यांचा. त्या कार्यक्रमातील सरदार वल्लभभाई पटेल आणि अटलबिहारीजी वाजपेयी ह्यांचे भाषण हा कळसाध्याय!
मंदिराच्या आवारात एक अनोखा बाण स्तंभ आहे. त्यावर समुद्राच्या दिशेने एक बाण दाखवलेला असून त्यावर एक संस्कृत श्लोक कोरलेला आहे. “ आसमुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंतम अबाधित ज्योतिरमार्ग” ह्या दिशेला दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये रेषा खंडित होत नाही. म्हणजेच जमीन नाही.
आता तर आपल्याकडे अनेक साधने आहेत. प्रगत विज्ञान आहे. पण तेव्हा हे कसे कळले असेल? त्यांना हे कळले ह्याचाच अर्थ अनेक क्षेत्रातील विकसित ज्ञान भारतात होते. ह्या स्तंभाची नेमकी कालगणना ठाऊक नाही. पण अनेक शतके आधी भारतात असलेले गणित, भूगोल, विज्ञान, समुद्री प्रवास ह्या क्षेत्रात असलेले ज्ञान आणि प्रगती पाहून मन थक्क होते. 

औरंगजेबाने मंदिर उध्वस्त केल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जवळच म्हणजे मूळ मंदिराच्या आवारात दुसरे मंदिर बांधले. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की मूळ शिवलिंग खालच्या मजल्यावर जाऊन दिसते. आक्रमकांपासून वाचण्यासाठी कदाचित असे केले असावे. जमिनीच्या पातळीवर दुसरे एक शिवलिंग आहेच. म्हणजे कोणीही मंदिरात जाईल तर त्याला हे दुसरे शिवलिंग दिसेल. ह्या मंदिरात फोटो काढण्याची अनुमती आहे. 

सोमनाथ मंदिर. ( पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
ह्यांनी पुनर्स्थापित केलेलं )
📷प्रज्ञा साठे (२०२२)

पुराना मंदिर शिवलिंग (२०२५)
पुराना मंदिर (२०२५)

पुराना मंदिर शिवलिंग (२०२५ )

पुराना मंदिर (२०२५)

पुराना मंदिर (२०२५)

पुराना मंदिर (२०२५)

प्रभास पाटण क्षेत्रात अजूनही काही विशेष महत्वाची मंदिरे आणि स्थाने आहेत. त्यापैकी एक आहे भालका तीर्थ. 

योगेश्वर श्रीकृष्ण यादवांच्या आपापसातील कलहाने त्रस्त होऊन ह्या वनात आले. पिंपळाच्या झाडाखाली आपला उजवा पाय डाव्या पायावर ठेवून बसले होते. त्यांच्या उजव्या पायाचे पाऊल एका व्याधाने दुरून पाहिले. त्याला ते हरणाचे तोंड वाटले. शिकार करण्यासाठी त्याने बाण मारला. जवळ येऊन पाहतो तर तिथे हरीण नसून एक दिव्य पुरुष. त्याला अतिशय दुःख झाले, भय ही वाटले. त्याने क्षमा मागितली. 

असे होणे ही देखील माझीच इच्छा होती असे उत्तर कृष्णाने दिले. जिथे बाण म्हणजे भल्ल लागला ते भालका तीर्थ. अजूनही तिथे अनेक मोठाली झाडे आहेत. मंदिरात असलेले एक झाड तेच आहे ज्या खाली कृष्ण ध्यानस्थ होता असे म्हणतात. 

भालका तीर्थ मंदिर 

भालका तीर्थ - बाण लागला ते स्थान 

भालका तीर्थ मंदिर 

भालका तीर्थ 

ह्या खेरीज त्रिवेणी संगम, जिथे श्रीकृष्णांनी देह ठेवला ते देहोत्सर्ग मंदिर, गीतामंदिर अशी काही महत्वाची मंदिरे आहेत. पण आम्ही २०२२ मध्ये तिथे गेलो त्या दिवशी गृहमंत्री मा. अमित शहा तिथे येणार होते. त्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला असल्याने ती सर्व ठिकाणे पाहता आली नाहीत. तुम्ही जाल तेव्हा मात्र नक्की पाहून या. जगातील प्रत्येक हिंदूने, प्रत्येक भारतीयाने पहिलेच पाहिजे असे हे सोमनाथ - प्रभास पट्टण. मी साधारण २००० मध्ये पहिल्यांदा, २०२२ मध्ये दुसऱ्यांदा आणि २०२५ मध्ये तिसऱ्यांदा जाऊन आले.

परकीय आक्रमणांच्या विषयी गाफील राहून चालणार नाही, आपण सर्वानी एकदिलाने, दृढ संकल्पाने आणि एकता जपत, परस्पर सहकार्याची भावना ठेवून वाटचाल केली पाहिजे असे सांगणारी ही वंदनीय स्थाने.

आज हा पुढील मजकूर जुन्या पोस्टमध्ये नव्याने लिहिते आहे ते जानेवारी २०२६ मध्ये. सोमनाथ मंदिराचे स्वाभिमान पर्व आजपासून चार दिवस साजरे होणार आहे. त्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान आणि सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष मा. नरेंद्र मोदी ह्यांच्या लेखातील काही अंश देणे उचित होईल.

"जानेवारी 1026 मध्ये गझनीच्या महमूदने सोमनाथवर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले होते. पंतप्रधानांनी याला 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' असे नाव दिले आहे.
सोमनाथ... हा शब्द ऐकताच आपल्या मनात आणि हृदयात अभिमान आणि श्रद्धेची भावना भरून येते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातमध्ये, प्रभास पाटन नावाच्या ठिकाणी स्थित सोमनाथ, भारताच्या आत्म्याचे शाश्वत सादरीकरण आहे.
दुर्दैवाने, हेच सोमनाथ मंदिर, जे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धा आणि प्रार्थनांचे केंद्र होते, परदेशी आक्रमकांचे लक्ष्य बनले, ज्यांचा उद्देश विध्वंस होता. जानेवारी १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने या मंदिरावर मोठे आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले होते.
हा हल्ला श्रद्धा आणि संस्कृतीच्या एका महान प्रतीकाला नष्ट करण्याच्या उद्देशाने केलेला एक हिंसक आणि बर्बर प्रयत्न होता. तरीही, एक हजार वर्षांनंतर आजही हे मंदिर पूर्ण वैभवाने उभे आहे.
सन 1026 नंतर वेळोवेळी या मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू राहिले. मंदिराचे सध्याचे स्वरूप 1951 मध्ये साकार होऊ शकले.
योगायोगाने 2026 हेच वर्ष सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्षे पूर्ण होण्याचेही वर्ष आहे. 11 मे 1951 रोजी या मंदिराचे पुनर्निर्माण पूर्ण झाले होते.
सोमनाथ मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे होते. हे अशा समाजाची प्रेरणा होते, ज्याची आर्थिक क्षमताही खूप सशक्त होती. आमचे सागरी व्यापारी आणि नाविक याच्या वैभवाच्या कथा दूरदूरपर्यंत घेऊन जात होते. सोमनाथवरील हल्ले आणि त्यानंतरच्या गुलामगिरीच्या दीर्घ काळानंतरही, आज मी पूर्ण विश्वासाने आणि गर्वाने हे सांगू इच्छितो की, सोमनाथची गाथा विध्वंसाची कहाणी नाही.
ही गेल्या 1000 वर्षांपासून चालत आलेली भारतमातेच्या कोट्यवधी सुपुत्रांच्या स्वाभिमानाची गाथा आहे, ही आम्हा भारतीयांच्या अटूट श्रद्धेची गाथा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मंदिरावर आक्रमण झाले, तेव्हा आपल्याकडे असे महान पुरुष आणि स्त्रियाही होत्या, ज्यांनी त्याच्या रक्षणासाठी उभे राहून सर्वोच्च बलिदान दिले. आणि प्रत्येक वेळी, पिढ्यानपिढ्या, आपल्या महान संस्कृतीच्या लोकांनी स्वतःला सावरले, मंदिराला पुन्हा उभे केले आणि त्याला पुन्हा जिवंत केले.
महमूद गजनवी लुटून निघून गेला, पण सोमनाथबद्दलची आमची भावना तो आमच्यापासून हिरावून घेऊ शकला नाही. आज 2026 मध्येही सोमनाथ मंदिर जगाला हा संदेश देत आहे, की नष्ट करण्याची मानसिकता असलेले लोक संपून जातात, तर सोमनाथ मंदिर आज आमच्या श्रद्धेचा मजबूत आधार बनून उभे आहे.
या मंदिरांवर शेकडो आक्रमणांच्या खुणा आहेत, आणि शेकडो वेळा त्यांचे पुनरुत्थान झाले आहे. ती वारंवार नष्ट केली गेली आणि प्रत्येक वेळी स्वतःच्याच अवशेषांमधून पुन्हा उभी राहिली. हेच राष्ट्रीय मन आहे, हीच राष्ट्रीय जीवनधारा आहे. हे सोडून देण्याचा अर्थ आहे, मृत्यू. यापासून वेगळे झाल्यास विनाशच होईल.
स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची पवित्र जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सक्षम हातात आली. 1947 मध्ये दिवाळीच्या वेळी त्यांनी सोमनाथला भेट दिली. त्या प्रवासाच्या अनुभवाने त्यांना आतून हादरवून सोडले, त्याच वेळी त्यांनी घोषणा केली की येथेच सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी होईल. अखेरीस, 11 मे 1951 रोजी सोमनाथमधील भव्य मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले.
आपण अशी एक संस्कृती आहोत जी आत्मा आणि विचारांच्या अमरत्वावर अटूट विश्वास ठेवते. आपण विश्वास ठेवतो- नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। सोमनाथची भौतिक रचना नष्ट झाली, पण त्याची चेतना अमर राहिली.
जर हजार वर्षांपूर्वी खंडित झालेले सोमनाथ मंदिर पूर्ण वैभवाने पुन्हा उभे राहू शकते, तर आपण हजार वर्षांपूर्वीचा समृद्ध भारतही निर्माण करू शकतो.
चला, याच प्रेरणेने आपण पुढे वाटचाल करूया. विकसित भारताच्या निर्मितीसाठी. असा भारत, ज्याचे सभ्यतागत ज्ञान आपल्याला विश्व कल्याणासाठी प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा देते.
जय सोमनाथ..."


#somnath #mahadev #harharmahadev #shiva #bholenath #shiv #rajkot #surat #mahakaal #junagadh #bhole #lordshiva #shivshakti #omnamahshivay #india #temple #gujarat #bhavnagar

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....