मुख्य सामग्रीवर वगळा

गोल्डन पॅगोडा, नामसाई

ईशान्य भारताच्या ट्रीपमध्ये आम्ही नाहरलगूनला राहिलो होतो. तिथून झिरो, कार्डो, इटानगर पाहून ट्रेनने निघालो ते तिनसुखियाला जाण्यासाठी. फार सुंदर रस्ता आहे तो. नाहरलगून हे इटानगरच्या रेल्वे स्टेशनचे नाव. इटानगरहून नाहरलगून साधारण १५ किलोमीटरवर आहे. 


From Nahar Lagun to Itanagar 


रस्ता कसा होता हे नीट कळावे म्हणून हा छोटासा विडिओ बघा.

https://youtu.be/JNztM_dFN3I


रस्ता म्हणजे नुसते नेत्रसुख! सगळीकडे हिरवळ, तळी , डोंगर, स्वच्छता आणि असे संपूर्ण रस्ताभर! 





ट्रेनही आरामदायक होती. कुर्सीयान होते. आमच्या डब्यात चढणारे उतरणारे प्रवासी सगळे नोकरीनिमित्त रोज ये जा करणारे असे वाटत होते. 




आम्हाला रस्त्यात लागला भारतातील सर्वात मोठा रेल- रोड ब्रिज, बोगीबील ब्रिज. ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला ५ किलोमीटरच्या ह्या ब्रिजवरून आम्ही गेलो ते ऑक्टोबर २०१९ मध्ये. ह्या पुलाचे उदघाटन डिसेंबर २०१८ मध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते झाले होते. 

ह्या पुलामुळे प्रवाश्यांची, विद्यार्थ्यांची, पेशंटसची, उद्योगधंद्यांची फार सोय झाली आहे. 

हा पूल किती मोठा आहे ते ह्या व्हिडिओत कळेल. किती वेळ झाला तरी ट्रेन ह्या पुलावरून जातच असते! आपण पुलावरून जायला सुरुवात केली हे माझ्या लक्षात आल्यावर विडिओ करायला सुरुवात केली तरी पाच मिनिटांची विडिओ आहे!

ब्रह्मपुत्रेला नद म्हणतात ते किती सार्थ आहे हे आपल्याला तिचे पात्र बघून कळते. 

https://youtu.be/yV_7b_9ezT8




न्यू तिनसुखियाला उतरल्यावर आधी आरक्षित करून ठेवलेली गाडी आमची स्टेशनवर वाट पाहत होती. 

New Tinsukiya Railway Station 


तेव्हा साधारण सकाळचे ११ वाजत आले होते. रस्त्यात कुठे जेवण्याचे चांगले ठिकाण मिळेल ना, असे विचारल्यावर वाहनचालकाने मिळेल असे सांगितले. पण शाकाहारी लोक जिथे खाउ शकतील असे ठिकाण काही रस्त्यात कुठेच दिसले नाही. मग आम्ही बरोबर नेलेल्या चिवडा लाडूवर समाधान मानले!

 आमचे रात्री राहण्याचे बुकिंग होते नामसाईला, पण त्या आधी आम्ही रोइंग देखील पाहणार होतो. निसर्गसुंदर रोइंगमधले नवे झालेले संग्रहालय आणि केंद्र आम्हाला पाहायचे होते. 
 
पण तिकडे जाताना आम्ही रस्ता चुकलो. अगदीच साफ चुकलो! वाहनचालकाला पण त्या भागाची विशेष माहिती नव्हती. शेवटी भरपूर प्रवास करूनही काहीच पाहता आले नाही. मोठ्या प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच! पण एक सुख होते की रस्ते अतिशय चांगले होते. अगदी गुळगुळीत, एकही धक्का बसणार नाही असे!

तिथे संध्याकाळ फार लवकर होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत नामसाईला पोचणे आवश्यक होते. नव्या भागात प्रवास करताना अशी काळजी घेणे आवश्यकच असते.त्यामुळे मग रोइंगला आणखी शोधत न बसता, आम्ही टेंगापानीला जायला निघालो. हा देखील रस्ता फार छान होता. 

मुक्कामाजवळ पोचायच्या आधीच, पॅगोडाचे सोनेरी कळस रस्त्याच्या वळणानुसार अधुनमधून दिसत होते, खुणावत होते.

गडद अंधार पडलाच होता. पाऊसही पडायला लागलेला होता. पहाटे नाहरलगूनला प्रवास सुरु झाला होता तो दिवसभर चालूच होता. त्यामुळे गोल्डन पॅगोडा रिसॉर्ट येताच अगदी हायसे वाटले पण नेमके त्या परिसरातले लाईट गेलेले होते. आमचे बंगल्याचे बुकिंग झालेले होते. अंधारात ते बंगले एकमेकांपासून खूप लांब आहेत असे वाटले. पण बंगल्यातले आतले लाईट होते. त्यामुळे जीव भांड्यात पडला!

फार सुंदर बंगले आहेत. बाहेरचा व्हरांडा, हॉल, भव्य बेडरूम, मुंबईच्या एखाद्या घराचा हॉल असेल तेवढी मोठी बाथरूम आणि एक बाल्कनी, इतकी मोठी जागा प्रत्येक बंगल्यात आहे. आजूबाजूला चांगली निगा राखलेली बाग आणि झाडे आहेत. 

जेवणासाठी रिसॉर्टमध्येच डायनिंग हॉल मध्ये जाऊन जेवायची सोय आहे. पण ऑर्डर मात्र आधी द्यायला लागते. ऑर्डर दिल्यापासून साधारण तास दीड तास लागतो अन्न तयार व्हायला. कारण प्रत्येक गोष्ट ते ताजी आणि हवी असेल तितकीच तयार करतात. 

परत अंधारातून, पावसातून जेवायला जायचा खरे तर कंटाळा आला होता. पण जेवायला हवे तर जायलाच लागणार होते! तिथे पोचल्यावर गरम गरम अन्न मिळाल्यावर मात्र उत्साह वाटला. 

रिसॉर्ट किती सुंदर आहे, हे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यावरच कळले! फार सुंदर परिसर आहे. बंगले तर आहेतच, पण काही एकेक खोलीची निवासस्थाने देखील आहेत असे वाटले. 
 
जागेची अजिबात काटकसर केलेली नाही. आतले रस्ते पण रुंद. दोन बंगल्यात भरपूर अंतर. खूपच प्रसन्न परिसर. 

 Villas 


The Golden Pagoda Resort 


The Campus 

तिथे आम्हाला एक नवल पाहायला मिळाले. खाली वेगवेगळी खोडे पण वर मात्र एकत्र आलेली पाने आणि शेंडे, असा झाडांचा समूह बघायला मिळाला. मला दर वेळी हा फोटो बघताना वाटते, ती झाडे ,'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' हे गाणे म्हणत असणार! 


Unusual cluster!

Reception 

तो दिवस अगदी खास अरुणाचली पावसाचा दिवस होता. सतत पाऊस, राखाडी आकाश, थंड हवा. सकाळी रिसॉर्टच्या रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो गोल्डन पॅगोडा पाहायला.

तुम्ही जर का मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या पहिल्याच पॅगोडाच्या पाटीशी उतरलात तर तुम्हाला बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात. मात्र जरा पुढे जाऊन रिसॉर्टच्या जवळून गेलात तर मात्र थेट पॅगोडाच्या गेटपर्यंत गाडी जाते. रिसॉर्टमधून पण एक लहान रस्ता आहे पॅगोडात जायला, आम्ही तिथूनच गेलो. गाडीला मात्र वळसा घालून यायला लागले. 

हा पॅगोडा अतिशय भव्य परिसरात उभारला गेला आहे. अगदी नवा प्रकल्प आहे, २००८ मध्ये सुरु होऊन २०१० मध्ये पूर्ण झाला. 

पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण आहे. नामसाई जिल्हा हा पूर्वी लोहित जिल्ह्याचाच भाग होता . नामसाई जिल्ह्यातील टेंगापानी येथील हा गोल्डन पॅगोडा प्रमुख पर्यटन आकर्षण केंद्र आहे. 

थायलंडच्या बौद्ध भिख्खूनी भारतातील बौद्ध धर्म तत्वांच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धाची ही ब्रॉन्झची मूर्ती भेट दिली. मग त्यावर बर्मीज वास्तुशैलीचे मंदिर बांधले गेले. आज मुख्य पॅगोडात ही भेट मिळालेली मूर्ती आहे. 



The Main Buddha idol 

पॅगोडाला अनेक लहान लहान शिखरे आणि मध्यभागी उंच शिखर अशी रचना आहे. सोनेरी रंग दिल्याने हा पॅगोडा सतत चमचमत असतो. 


Golden Pagoda 


Guardian Deity outside the main pagoda 


Pair of lions guarding each entrance 

Three entrances 

गोल्डन पॅगोडाला चारी दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारासमोर (पहिल्याच छायाचित्रात) एक जयस्तंभ पण दिसेल. बुद्ध मूर्ती उत्तरेकडे तोंड केलेली अशी आहे. प्रत्येक प्रवेशद्वार सिंहांच्या जोडीने संरक्षित केलेले आहे. प्रत्येक कोपऱ्यात संरक्षक देवता किंवा घंटा आहे.

आवारात इतर अनेक इमारती आहेत. वाचनालय, भिक्खुंच्या राहण्याची व शिकण्याची जागा, ध्यानधारणा सभागृह, संस्कृती संशोधन केंद्र आणि इतर काही. आम्ही २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथे भेट दिली तेव्हा काही बांधकाम देखील चालू होते.



Other Buddha Temple 
P.C. - G. D. Sathe

ह्या मंदिरातील बुद्ध मूर्ती ही सोनेरी तुकड्या तुकड्यानी संपूर्ण आच्छादलेली आहे ह्या प्रकारची, भारतातील ही सर्वात मोठी मूर्ती आहे.

P.C. - G. D. Sathe

One More Building and Ashok Stambh 
P.C. - G. D. Sathe


A Rainy Day 

मंदिराचा खूप मोठा प्रदक्षिणा मार्ग काँक्रीट ने बांधून काढलेला आहे. 

P.C. - G. Y. Tilak



 
P.C. - G. Y. Tilak


Main Entrance 


Students 

एक शांत सुंदर ठिकाण म्हणून हे लक्षात राहील. बौद्धधर्माचा उदय भारतात झाला. भारतातून बौद्धधर्म इतर देशात पसरला.आता हे बौद्ध मंदिर थायलंडची मूर्ती, ब्रम्हदेशाच्या मंदिराचे वास्तुशास्त्र असे करत एक कालचक्र पूर्ण करीत आहे!

#Namsai #Tengapani #NamsaiGoldenPagoda #DibrugarhToGoldenPagoda #Roing #WhereToStayInNamsai #PlacesToVisitInArunachal #Buddha #Thailand
#BurmeseArchitecture #Tinsukia #GoldenPagodaEcoResort #Naharlagun 

टिप्पण्या

  1. खूप सुंदर निसर्ग, देखण्या बुद्ध मूर्ती, अणि सुंदर फोटो. तितके समर्पक लेखन.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर प्रवास झाला तुमच्या शब्द आणि छायाचित्रणातून !!! धन्यवाद वृंदाकाकू 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा