न्यू तिनसुखियाला उतरल्यावर आधी आरक्षित करून ठेवलेली गाडी आमची स्टेशनवर वाट पाहत होती.
|
New Tinsukiya Railway Station |
तेव्हा साधारण सकाळचे ११ वाजत आले होते. रस्त्यात कुठे जेवण्याचे चांगले ठिकाण मिळेल ना, असे विचारल्यावर वाहनचालकाने मिळेल असे सांगितले. पण शाकाहारी लोक जिथे खाउ शकतील असे ठिकाण काही रस्त्यात कुठेच दिसले नाही. मग आम्ही बरोबर नेलेल्या चिवडा लाडूवर समाधान मानले!
आमचे रात्री राहण्याचे बुकिंग होते नामसाईला, पण त्या आधी आम्ही रोइंग देखील पाहणार होतो. निसर्गसुंदर रोइंगमधले नवे झालेले संग्रहालय आणि केंद्र आम्हाला पाहायचे होते.
पण तिकडे जाताना आम्ही रस्ता चुकलो. अगदीच साफ चुकलो! वाहनचालकाला पण त्या भागाची विशेष माहिती नव्हती. शेवटी भरपूर प्रवास करूनही काहीच पाहता आले नाही. मोठ्या प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्याच! पण एक सुख होते की रस्ते अतिशय चांगले होते. अगदी गुळगुळीत, एकही धक्का बसणार नाही असे!
तिथे संध्याकाळ फार लवकर होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत नामसाईला पोचणे आवश्यक होते. नव्या भागात प्रवास करताना अशी काळजी घेणे आवश्यकच असते.त्यामुळे मग रोइंगला आणखी शोधत न बसता, आम्ही टेंगापानीला जायला निघालो. हा देखील रस्ता फार छान होता.
मुक्कामाजवळ पोचायच्या आधीच, पॅगोडाचे सोनेरी कळस रस्त्याच्या वळणानुसार अधुनमधून दिसत होते, खुणावत होते.
गडद अंधार पडलाच होता. पाऊसही पडायला लागलेला होता. पहाटे नाहरलगूनला प्रवास सुरु झाला होता तो दिवसभर चालूच होता. त्यामुळे गोल्डन पॅगोडा रिसॉर्ट येताच अगदी हायसे वाटले पण नेमके त्या परिसरातले लाईट गेलेले होते. आमचे बंगल्याचे बुकिंग झालेले होते. अंधारात ते बंगले एकमेकांपासून खूप लांब आहेत असे वाटले. पण बंगल्यातले आतले लाईट होते. त्यामुळे जीव भांड्यात पडला!
फार सुंदर बंगले आहेत. बाहेरचा व्हरांडा, हॉल, भव्य बेडरूम, मुंबईच्या एखाद्या घराचा हॉल असेल तेवढी मोठी बाथरूम आणि एक बाल्कनी, इतकी मोठी जागा प्रत्येक बंगल्यात आहे. आजूबाजूला चांगली निगा राखलेली बाग आणि झाडे आहेत.
जेवणासाठी रिसॉर्टमध्येच डायनिंग हॉल मध्ये जाऊन जेवायची सोय आहे. पण ऑर्डर मात्र आधी द्यायला लागते. ऑर्डर दिल्यापासून साधारण तास दीड तास लागतो अन्न तयार व्हायला. कारण प्रत्येक गोष्ट ते ताजी आणि हवी असेल तितकीच तयार करतात.
परत अंधारातून, पावसातून जेवायला जायचा खरे तर कंटाळा आला होता. पण जेवायला हवे तर जायलाच लागणार होते! तिथे पोचल्यावर गरम गरम अन्न मिळाल्यावर मात्र उत्साह वाटला.
रिसॉर्ट किती सुंदर आहे, हे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यावरच कळले! फार सुंदर परिसर आहे. बंगले तर आहेतच, पण काही एकेक खोलीची निवासस्थाने देखील आहेत असे वाटले.
जागेची अजिबात काटकसर केलेली नाही. आतले रस्ते पण रुंद. दोन बंगल्यात भरपूर अंतर. खूपच प्रसन्न परिसर.
तुम्ही जर का मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या पहिल्याच पॅगोडाच्या पाटीशी उतरलात तर तुम्हाला बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात. मात्र जरा पुढे जाऊन रिसॉर्टच्या जवळून गेलात तर मात्र थेट पॅगोडाच्या गेटपर्यंत गाडी जाते. रिसॉर्टमधून पण एक लहान रस्ता आहे पॅगोडात जायला, आम्ही तिथूनच गेलो. गाडीला मात्र वळसा घालून यायला लागले.
हा पॅगोडा अतिशय भव्य परिसरात उभारला गेला आहे. अगदी नवा प्रकल्प आहे, २००८ मध्ये सुरु होऊन २०१० मध्ये पूर्ण झाला.
पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण आहे. नामसाई जिल्हा हा पूर्वी लोहित जिल्ह्याचाच भाग होता . नामसाई जिल्ह्यातील टेंगापानी येथील हा गोल्डन पॅगोडा प्रमुख पर्यटन आकर्षण केंद्र आहे.
थायलंडच्या बौद्ध भिख्खूनी भारतातील बौद्ध धर्म तत्वांच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धाची ही ब्रॉन्झची मूर्ती भेट दिली. मग त्यावर बर्मीज वास्तुशैलीचे मंदिर बांधले गेले. आज मुख्य पॅगोडात ही भेट मिळालेली मूर्ती आहे.
|
The Main Buddha idol |
पॅगोडाला अनेक लहान लहान शिखरे आणि मध्यभागी उंच शिखर अशी रचना आहे. सोनेरी रंग दिल्याने हा पॅगोडा सतत चमचमत असतो.
|
Golden Pagoda |
|
Guardian Deity outside the main pagoda |
|
Pair of lions guarding each entrance |
|
Three entrances |
गोल्डन पॅगोडाला चारी दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारासमोर (पहिल्याच छायाचित्रात) एक जयस्तंभ पण दिसेल. बुद्ध मूर्ती उत्तरेकडे तोंड केलेली अशी आहे. प्रत्येक प्रवेशद्वार सिंहांच्या जोडीने संरक्षित केलेले आहे. प्रत्येक कोपऱ्यात संरक्षक देवता किंवा घंटा आहे.
आवारात इतर अनेक इमारती आहेत. वाचनालय, भिक्खुंच्या राहण्याची व शिकण्याची जागा, ध्यानधारणा सभागृह, संस्कृती संशोधन केंद्र आणि इतर काही. आम्ही २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथे भेट दिली तेव्हा काही बांधकाम देखील चालू होते.
|
Other Buddha Temple P.C. - G. D. Sathe |
ह्या मंदिरातील बुद्ध मूर्ती ही सोनेरी तुकड्या तुकड्यानी संपूर्ण आच्छादलेली आहे ह्या प्रकारची, भारतातील ही सर्वात मोठी मूर्ती आहे.
|
P.C. - G. D. Sathe |
|
One More Building and Ashok Stambh P.C. - G. D. Sathe |
|
A Rainy Day |
मंदिराचा खूप मोठा प्रदक्षिणा मार्ग काँक्रीट ने बांधून काढलेला आहे.
|
P.C. - G. Y. Tilak |
|
P.C. - G. Y. Tilak |
|
Main Entrance |
|
Students
|
एक शांत सुंदर ठिकाण म्हणून हे लक्षात राहील. बौद्धधर्माचा उदय भारतात झाला. भारतातून बौद्धधर्म इतर देशात पसरला.आता हे बौद्ध मंदिर थायलंडची मूर्ती, ब्रम्हदेशाच्या मंदिराचे वास्तुशास्त्र असे करत एक कालचक्र पूर्ण करीत आहे!
#Namsai #Tengapani #NamsaiGoldenPagoda #DibrugarhToGoldenPagoda #Roing #WhereToStayInNamsai #PlacesToVisitInArunachal #Buddha #Thailand
#BurmeseArchitecture #Tinsukia #GoldenPagodaEcoResort #Naharlagun
खूप सुंदर निसर्ग, देखण्या बुद्ध मूर्ती, अणि सुंदर फोटो. तितके समर्पक लेखन.
ReplyDeleteखूप सुंदर !!!!
ReplyDeleteखूप सुंदर प्रवास झाला तुमच्या शब्द आणि छायाचित्रणातून !!! धन्यवाद वृंदाकाकू 🙏
ReplyDelete