मुख्य सामग्रीवर वगळा

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर!
अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान!
खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले.
'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे.
'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो.
मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगरला कितीदा जाते! संभाजीनगर पासून इतक्या तर जवळ आहे हे मंदिर जिथे आहे ते नेवासा.
पण जोपर्यंत तुम्ही 'कधीतरी जाउ या' असे म्हणता तोपर्यंत जाणे होतच नाही! जेव्हा तुम्ही 'ह्या अमुक दिवशी जाउ या' असे नक्की ठरवता तेव्हाच जायला जमते!!
तर अखेर काल मी जायचे ठरवले. दादाने लगेच हो म्हटले आणि गाडी चालवली म्हणून जमले. किती वैभवाचा होता तो प्रवास!! कारण सत्तरी जवळ आलेला दादा गाडी चालवत होता आणि अवघी 90 वर्षे वय पूर्ण केलेली आईदेखील सोबत होती.
पाउस फार झालेला नसला तरी नाशिकला पाऊस झाल्याने ऎश्वर्यवती दिसणाऱ्या गोदावरी आणि प्रवरा आणि नुकताच पावसाळा संपल्याने सगळीकडे दिसणारी हिरवाई मन सुखशीतळ करत होती. अर्थात ह्या हिरवाईचे महत्व समजण्यासाठी आधी तुम्ही मराठवाड्यातील रुक्ष वैराण उन्हाळ्याचा फुफाटा पाहिलेला असायला हवा.
त्या दिवशी स्वच्छ, सुंदर निळे आकाश होते. त्यात पांढऱ्या ढगांचे विविध मनभावन आकार होते. अशा देखण्या दिवशी आम्ही पैसाचा खांब बघायला गेलो होतो.
प्रवरा 
नवरात्र सुरु होते. अवघी जनता देवीच्या मंडपात असल्याने नेवाश्याच्या मंदिरात अगदी निवांत दर्शन झाले.
आई,दादा आणि मंदिर 
पैसाच्या खांबाचे मंदिर 
अर्धचंद्राकार दगडी पायऱ्या चढून आपण मंदिरात गेलो की समोर प्रशस्त सभागृह दिसते आणि ते पार केले की गाभारा आणि त्यातला पैसाचा खांब. मागे विठ्ठल रखुमाईच्या साजऱ्या मूर्ती. वर ज्ञानेश्वरांचा फोटो.
ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी', 'अमृतानुभव', 'हरिपाठाचे अभंग' हे सगळे इथे ह्या खांबाला टेकून बसून लिहिले असे समजतात. टेकू असलेल्या ह्या खांबाने जणू विशाल आकाशच तोलून धरले.
ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन 'त्रिभूवनैक पवित्र| अनादी पंचक्रोश क्षेत्र| जेथे जगाचे जीवनसूत्र| श्री महालया असे||'असे केले आहे.
पैसाच्या खांबाचे मंदिर 
पैसाच्या खांबाचे मंदिर 
मंदिरात नतमस्तक होऊनच आपण शिरतो. मन भारावलेले असते.
पैसाचा खांब 
पैसाचा खांब 
खांब अगदी ओबडधोबड, मराठवाड्यात, पंढरपुरात शोभण्याइतका काळा कुळकुळीत. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली, तिथे आपण आहोत ह्या जाणिवेने मन खरोखरच थरारून जाते. वारकऱ्यांच्या मनात तर 'पाषाण झाला चिंतामणी' अशीच भावना असते.
१९६० मधील छायाचित्र 
माझ्याकडे माझ्या जन्माच्याही आधी प्रकाशित झालेली माझ्या आजोबांची ज्ञानेश्वरीची प्रत आहे. मुंबई राज्य शिक्षणखाते, मुंबई ह्यांनी १९६० मध्ये प्रकशित केलेल्या ह्या प्रतीत पैसाच्या खांबाचे वरील छायाचित्र आहे. 
त्या खांबावर शिलालेख कोरलेला आहे. ओनमः विरेश्वराय| पिता महेन यत पूर्व षटकं जगद्गुरो| अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं करोति दुष्ट: तस्य पूर्वे वर्ज्यत्यथ | मंगलमं महाश्री|' ज्यांनी मंदिराच्या अखंड दीपज्योतीसाठी देणगी दिली त्यांचा उल्लेख त्या शिलालेखात केलेला आहे.
मंदिरातून साभार 
मंदिरातून साभार 
मुळात ज्या मंदिरात पैसाचा खांब होता ते करविरेश्वराचे म्हणजे शंकराचे मंदिर काळाच्या ओघात नष्ट झाले. आताचे मंदिर खांबाभोवती बांधले गेले आहे. खांबासाठी मंदिर बांधले जाणे ह्याचेदेखील हे मंदिर हे एकमेव उदाहरण असावे कदाचित.
मंदिरात अगदी साधे वातावरण आहे. दर्शनाला येणारी मंडळी पण विठोबाशी नाळ जोडली गेलेलीच. कुठेही दिखाऊ वैभव नाही. लाल सोनेरी सजावट नाही. सोन्या चांदीचे पत्रे नाहीत.त्यामुळे हे मंदिर अधिकच मनाच्या जवळचे वाटते.
शेजारची अगदी पैसाच्या खांबाला चिकटून असलेली दानपेटी ह्या त्या वातावरणात न शोभणारी एकमेव गोष्ट. ती तिथून हलवून गाभाऱ्याच्या प्रवेशाच्या जवळ ठेवली तर किती बरे होईल!
ह्या जगाने केवळ तापच दिले तरी ज्ञानेश्वरांनी मागणे मागितले ते विश्वकल्याणाचे! त्या विशालतेचा अंश अजूनही तिथल्या वातावरणात असणार अशी अनुभूती येते. आळंदीच्या अजानवृक्षाची आठवण येते. त्या माऊलीने तिथे घातलेल्या प्रदक्षणांची आठवण होते. त्या झाडाची मुळे तिथे आळंदीला आणि फळे इथे नेवाश्यात असा भास होतो.
ज्ञानेश्वरी माझ्यासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी केवळ अध्यात्म सांगणारा ग्रंथ नसतो तर माझ्या मातृभाषेला पुनरुज्जीवित करणारे अप्रतिम काव्य देखील असते. विलोभनीय शब्दसंपन्नता असते. म्हणूनच जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो पैसाचा खांब बघता येणे हे मला फार फार भाग्याचे वाटते. एक अलौकिक अनुभव वाटतो.
पैसाच्या खांबाच्या मंदिराचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांच्या विषयी लिहिले नाही तर ते वर्णन अपूर्णच राहील.
"त्या" ने आपल्या खंबीरपणावर ठेवलेला विश्वास सार्थ करत, परिस्थितीशी दोन हात करून, शिवाय इतरांच्या उपयोगी पडणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. डोळे उघडून पाहायला मात्र हवे.
स्वतः:चे मन किती विशाल होऊ शकते, ह्याचे एक उदाहरण तर नतमस्तक करणारेच. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे!
लहानपणीच आईवडील गेल्याने आलेले पोरकेपण. आईवडील असतानाच काही कारणांनी सहन करायला लागणारा आत्यंतिक सामाजिक विरोध आणि बहिष्कार आईवडिलांच्या मृत्यूनंतरही संपलेला नव्हताच. तसाच आणि नेहमीच तो विरोध सहन करायला लागला.
वाट्याला सतत आली अवहेलना, उपेक्षा आणि तिरस्कार. कितीदा प्रायश्चित्त घेऊन सुद्धा समाज-मान्यता नाहीच. अशा परिस्थितीत कोणीही कडवट, निराश, बंडखोर झाले असते. समाजाचा तिरस्कार करायला लागले असते. पण हे पाणीच वेगळे होते.
त्यांनी स्थापना केली, भक्तिमार्ग सांगणाऱ्या वारकरीसंप्रदायाची. शिकवले सगळ्यांना प्रेम करायला, सहृदय राहायला. शिकवले अद्वैत तत्वज्ञान. स्वतः ला आलेल्या अतोनात वाईट अनुभवांनंतरसुद्धा लिहिला तो अमृतानुभवच. संस्कृतातील गीतेचे तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे म्हणून प्राकृतात आणले.
समाजाने दिलेले सगळे विष पचवून, संत ज्ञानेश्वरांनी समाजाला परत दिला तो अमृत कुंभ, अमृतानुभव, भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी! विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले अशी मनोवस्था असल्याने, स्वतःसाठी काही न मागता, 'त्या'च्याकडे मागितले काय तर, "भूतां परस्परे मैत्र जडो" आणि "जो जे वांछील तो ते लाहो!". ज्ञानेश्वरांचे अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य मला एखाद्या अद्भुत चमत्काराप्रमाणे वाटते.
त्यांच्या आयुष्यातील पहिला भाग जणू सर्वसामान्यांना हे दाखवायलाच की हालअपेष्टा कोणालाच चुकल्या नाहीत आणि दुसरा भाग ह्यासाठी की सर्व दुःखांवर मात करून मन बुद्धी किती विशाल होऊ शकते! संपूर्ण विश्वाला जणू त्यांनी आपल्या कवेत घेतले. ज्ञान दिले ते देखील अत्यंत ऋजुतेने, कोमलपणे, प्रेमाने. उगीच नाही त्यांच्या नावापुढे ‘माउली’ हा शब्द जोडला जात!
आकाशाच्या पार जातानाही त्यांनी वर्षाव केला तो कैवल्याच्या चांदण्याचा! शांतीचे, विश्वकल्याणाचे मागणे मागणारे ज्ञानेश्वर विश्वास दृढ करतात दुःखावर मात करता येण्याचा, मन विशाल करता येण्याचा!
पारायण प्रत 


#पैसाचाखांब# Newasa#Dnyaneshwari#SantDnyaneshw

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...