पैसाच्या खांबाचे मंदिर!
अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान!
खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले.
'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे.
'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो.
मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगरला कितीदा जाते! संभाजीनगर पासून इतक्या तर जवळ आहे हे मंदिर जिथे आहे ते नेवासा.
पण जोपर्यंत तुम्ही 'कधीतरी जाउ या' असे म्हणता तोपर्यंत जाणे होतच नाही! जेव्हा तुम्ही 'ह्या अमुक दिवशी जाउ या' असे नक्की ठरवता तेव्हाच जायला जमते!!
तर अखेर काल मी जायचे ठरवले. दादाने लगेच हो म्हटले आणि गाडी चालवली म्हणून जमले. किती वैभवाचा होता तो प्रवास!! कारण सत्तरी जवळ आलेला दादा गाडी चालवत होता आणि अवघी 90 वर्षे वय पूर्ण केलेली आईदेखील सोबत होती.
पाउस फार झालेला नसला तरी नाशिकला पाऊस झाल्याने ऎश्वर्यवती दिसणाऱ्या गोदावरी आणि प्रवरा आणि नुकताच पावसाळा संपल्याने सगळीकडे दिसणारी हिरवाई मन सुखशीतळ करत होती. अर्थात ह्या हिरवाईचे महत्व समजण्यासाठी आधी तुम्ही मराठवाड्यातील रुक्ष वैराण उन्हाळ्याचा फुफाटा पाहिलेला असायला हवा.
त्या दिवशी स्वच्छ, सुंदर निळे आकाश होते. त्यात पांढऱ्या ढगांचे विविध मनभावन आकार होते. अशा देखण्या दिवशी आम्ही पैसाचा खांब बघायला गेलो होतो.
![]() |
प्रवरा |
नवरात्र सुरु होते. अवघी जनता देवीच्या मंडपात असल्याने नेवाश्याच्या मंदिरात अगदी निवांत दर्शन झाले.
![]() |
आई,दादा आणि मंदिर |
![]() |
पैसाच्या खांबाचे मंदिर |
अर्धचंद्राकार दगडी पायऱ्या चढून आपण मंदिरात गेलो की समोर प्रशस्त सभागृह दिसते आणि ते पार केले की गाभारा आणि त्यातला पैसाचा खांब. मागे विठ्ठल रखुमाईच्या साजऱ्या मूर्ती. वर ज्ञानेश्वरांचा फोटो.
ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी', 'अमृतानुभव', 'हरिपाठाचे अभंग' हे सगळे इथे ह्या खांबाला टेकून बसून लिहिले असे समजतात. टेकू असलेल्या ह्या खांबाने जणू विशाल आकाशच तोलून धरले.
ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन 'त्रिभूवनैक पवित्र| अनादी पंचक्रोश क्षेत्र| जेथे जगाचे जीवनसूत्र| श्री महालया असे||'असे केले आहे.
![]() |
पैसाच्या खांबाचे मंदिर |
![]() |
पैसाच्या खांबाचे मंदिर |
मंदिरात नतमस्तक होऊनच आपण शिरतो. मन भारावलेले असते.
![]() |
पैसाचा खांब |
![]() |
पैसाचा खांब |
खांब अगदी ओबडधोबड, मराठवाड्यात, पंढरपुरात शोभण्याइतका काळा कुळकुळीत. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली, तिथे आपण आहोत ह्या जाणिवेने मन खरोखरच थरारून जाते. वारकऱ्यांच्या मनात तर 'पाषाण झाला चिंतामणी' अशीच भावना असते.
![]() |
१९६० मधील छायाचित्र |
त्या खांबावर शिलालेख कोरलेला आहे. ओनमः विरेश्वराय| पिता महेन यत पूर्व षटकं जगद्गुरो| अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं करोति दुष्ट: तस्य पूर्वे वर्ज्यत्यथ | मंगलमं महाश्री|' ज्यांनी मंदिराच्या अखंड दीपज्योतीसाठी देणगी दिली त्यांचा उल्लेख त्या शिलालेखात केलेला आहे.
![]() |
मंदिरातून साभार |
![]() |
मंदिरातून साभार |
मुळात ज्या मंदिरात पैसाचा खांब होता ते करविरेश्वराचे म्हणजे शंकराचे मंदिर काळाच्या ओघात नष्ट झाले. आताचे मंदिर खांबाभोवती बांधले गेले आहे. खांबासाठी मंदिर बांधले जाणे ह्याचेदेखील हे मंदिर हे एकमेव उदाहरण असावे कदाचित.
मंदिरात अगदी साधे वातावरण आहे. दर्शनाला येणारी मंडळी पण विठोबाशी नाळ जोडली गेलेलीच. कुठेही दिखाऊ वैभव नाही. लाल सोनेरी सजावट नाही. सोन्या चांदीचे पत्रे नाहीत.त्यामुळे हे मंदिर अधिकच मनाच्या जवळचे वाटते.
शेजारची अगदी पैसाच्या खांबाला चिकटून असलेली दानपेटी ह्या त्या वातावरणात न शोभणारी एकमेव गोष्ट. ती तिथून हलवून गाभाऱ्याच्या प्रवेशाच्या जवळ ठेवली तर किती बरे होईल!
ह्या जगाने केवळ तापच दिले तरी ज्ञानेश्वरांनी मागणे मागितले ते विश्वकल्याणाचे! त्या विशालतेचा अंश अजूनही तिथल्या वातावरणात असणार अशी अनुभूती येते. आळंदीच्या अजानवृक्षाची आठवण येते. त्या माऊलीने तिथे घातलेल्या प्रदक्षणांची आठवण होते. त्या झाडाची मुळे तिथे आळंदीला आणि फळे इथे नेवाश्यात असा भास होतो.
ज्ञानेश्वरी माझ्यासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी केवळ अध्यात्म सांगणारा ग्रंथ नसतो तर माझ्या मातृभाषेला पुनरुज्जीवित करणारे अप्रतिम काव्य देखील असते. विलोभनीय शब्दसंपन्नता असते. म्हणूनच जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो पैसाचा खांब बघता येणे हे मला फार फार भाग्याचे वाटते. एक अलौकिक अनुभव वाटतो.
पैसाच्या खांबाच्या मंदिराचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांच्या विषयी लिहिले नाही तर ते वर्णन अपूर्णच राहील.
"त्या" ने आपल्या खंबीरपणावर ठेवलेला विश्वास सार्थ करत, परिस्थितीशी दोन हात करून, शिवाय इतरांच्या उपयोगी पडणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. डोळे उघडून पाहायला मात्र हवे.
स्वतः:चे मन किती विशाल होऊ शकते, ह्याचे एक उदाहरण तर नतमस्तक करणारेच. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे!
लहानपणीच आईवडील गेल्याने आलेले पोरकेपण. आईवडील असतानाच काही कारणांनी सहन करायला लागणारा आत्यंतिक सामाजिक विरोध आणि बहिष्कार आईवडिलांच्या मृत्यूनंतरही संपलेला नव्हताच. तसाच आणि नेहमीच तो विरोध सहन करायला लागला.
वाट्याला सतत आली अवहेलना, उपेक्षा आणि तिरस्कार. कितीदा प्रायश्चित्त घेऊन सुद्धा समाज-मान्यता नाहीच. अशा परिस्थितीत कोणीही कडवट, निराश, बंडखोर झाले असते. समाजाचा तिरस्कार करायला लागले असते. पण हे पाणीच वेगळे होते.
त्यांनी स्थापना केली, भक्तिमार्ग सांगणाऱ्या वारकरीसंप्रदायाची. शिकवले सगळ्यांना प्रेम करायला, सहृदय राहायला. शिकवले अद्वैत तत्वज्ञान. स्वतः ला आलेल्या अतोनात वाईट अनुभवांनंतरसुद्धा लिहिला तो अमृतानुभवच. संस्कृतातील गीतेचे तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे म्हणून प्राकृतात आणले.
समाजाने दिलेले सगळे विष पचवून, संत ज्ञानेश्वरांनी समाजाला परत दिला तो अमृत कुंभ, अमृतानुभव, भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी! विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले अशी मनोवस्था असल्याने, स्वतःसाठी काही न मागता, 'त्या'च्याकडे मागितले काय तर, "भूतां परस्परे मैत्र जडो" आणि "जो जे वांछील तो ते लाहो!". ज्ञानेश्वरांचे अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य मला एखाद्या अद्भुत चमत्काराप्रमाणे वाटते.
त्यांच्या आयुष्यातील पहिला भाग जणू सर्वसामान्यांना हे दाखवायलाच की हालअपेष्टा कोणालाच चुकल्या नाहीत आणि दुसरा भाग ह्यासाठी की सर्व दुःखांवर मात करून मन बुद्धी किती विशाल होऊ शकते! संपूर्ण विश्वाला जणू त्यांनी आपल्या कवेत घेतले. ज्ञान दिले ते देखील अत्यंत ऋजुतेने, कोमलपणे, प्रेमाने. उगीच नाही त्यांच्या नावापुढे ‘माउली’ हा शब्द जोडला जात!
आकाशाच्या पार जातानाही त्यांनी वर्षाव केला तो कैवल्याच्या चांदण्याचा! शांतीचे, विश्वकल्याणाचे मागणे मागणारे ज्ञानेश्वर विश्वास दृढ करतात दुःखावर मात करता येण्याचा, मन विशाल करता येण्याचा!
![]() |
पारायण प्रत |
#पैसाचाखांब# Newasa#Dnyaneshwari#SantDnyaneshw
🙏🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम! एकदा जायला हवं
ReplyDelete