मिर्जन किल्ल्यापासून निघाल्यावर गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याचा रस्ता सुंदर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती. वळण आले की मधूनच डोकावणारा समुद्र, नंतर सामोराच आला.
![]() |
| गोकर्ण |
![]() |
| गोकर्ण |
![]() |
| गोकर्ण |
![]() |
| गोकर्ण |
गोकर्ण महाबळेश्वरचा उल्लेख तर शतकानुशतके आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आढळतो. त्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते.
गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आपण शिरलो की शिव मंदिराकडे जाताना आधी लागते श्री महागणपती मंदिर. तर तिथे जाण्यासाठी आमची गाडी एका चिंचोळ्या रस्त्याने चालली होती. आता कोपऱ्यावर महागणपती मंदिर येणार म्हणून मी उत्सुकतेने पाहत होते. दोन्ही बाजूला घरे, दुकाने अगदी चिकटून चिकटून उभी होती. सगळ्याच जुन्या इमारती.
त्यातच अचानक मला पुण्यश्लोक श्री देवी अहिल्याबाई होळकर वाड्याची पाटी दिसली. श्री अहिल्या रेवाळेश्वर मंदिर!! खूप आनंद झाला.
![]() |
| पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर वाडा. |
पण तिथे गाडी थांबवता येण्याजोगी नव्हती. शिवाय पुढच्या दोन्ही मंदिरात किती रांग असेल माहिती नव्हते. महागणपती मंदिर आणि गोकर्ण मुख्य मंदिर दोन्हीही दुपारी बारा साडेबारा पासून चार साडेचार तास बंद असतात असे कळले होते. त्यामुळे आम्ही ठरवले की आधी दोन्ही मंदिरे पाहू या आणि मग परत ह्या वाड्यात येऊ या. त्यामुळे मध्ये न थांबता आम्ही आधी महागणपती मंदिरात गेलो.
शंकराचे आत्मलिंग, रावणाला मिळालेला वर आणि गणेशाचे गुराख्याच्या रूपात येणे ही गोष्ट तुम्ही आधीच्या ब्लॉग पोस्ट मध्ये वाचली आहेतच. तरी ज्यांनी तो भाग वाचला नसेल त्यांच्यासाठी इथे पुन्हा देते आहे. कारण गोकर्ण महाबळेश्वर हेच तर ते ठिकाण आहे जिथे ती कथा घडली.
रावणाने अमर होण्यासाठी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. काय हवे ते माग म्हटल्यावर रावणाने मागितले शंकराचे आत्मलिंग. भोळ्या शंकराने ते दिले. पण त्याचवेळी हे सांगितले की वाटेत कुठे हे खाली ठेवू नकोस.
आता अविवेकी रावणाला शिवशंकराचे आत्मलिंग मिळणे, तो अमर होणे म्हणजे सृष्टीत हाहा:कार माजला असता. त्यासाठी काहीतरी करायला हवे होते. .
वाटेत संध्याकाळ झाली. रावणाची सायंसंध्येची वेळ झाली. आता हे आत्मलिंग ठेवायचे कुठे? इतक्यात गणपती एका बाल गुराख्याचे रूप घेऊन समोर आला. त्याला रावणाने विनंती केली की तू थोडावेळ हातात धरून ठेवशील का?
गणपती म्हणाला, "ठीक आहे. पण मी तीनदा हाक मारल्यावर त्याच्या आत, तुला यायला पाहिजे. नाहीतर मी हे आत्मलिंग खाली ठेवून देईन. "
झालेही तसेच. गणपतीने तीन हाका मारल्या. रावण काही आला नाही. गणपतीने लिंग खाली ठेवले. नंतर रावण आला. क्रोधाने वेडापिसा होऊन ते आत्मलिंग जमिनीतून बाहेर काढू लागला. पण ते कसले निघणार? शंकराने तसेच सांगितले होते.
आपल्याला आत्मलिंग घेऊन जाता येणार नाही हे लक्षात आल्यावर रावणाने ते उपटून काढण्याचा प्रयत्न केला. त्या भरात आत्मलिंग ओढले जाऊन त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून गोकर्ण! जिथे गणपतीने आत्मलिंग ठेवले होते ती मूळ जागा म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. महा बलाढ्य अशा रावणालाही ते तिथून हलवता आले नाही म्हणून महाबळेश्वर!
असे सांगितले जाते की जिथे बाकी भाग उडाले, म्हणजे ते आत्मलिंग घालून आणलेला डबा, झाकण, त्याला बांधलेला धागा, त्याला गुंडाळलेले वस्त्र असे सगळे उडाले त्या जागा म्हणजे मुर्डेश्वर (वस्त्र), सज्जेश्वर (डबा), धारेश्वर (धागा) आणि गुणवंतेश्वर (झाकण). ह्याला (गोकर्ण महाबळेश्वरसह) म्हणतात पंचलिंग क्षेत्रे. भाविक लोक एका दिवसांत ह्या पाची ठिकाणांना भेट द्यायची अशी तीर्थयात्रा करतात.
गणपतीला गोकर्ण महाबळेश्वरमध्ये विशेष महत्व आहे. तसेही आपण कोणत्याही मंदिरात जाण्याआधी गणेशाला नमस्कार करतो. इथे देखील मुख्य शिवमंदिराला भेट देण्याआधी महागणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
बाहेर हार, फुले, बकुळीचे वळेसर, पत्री, दुर्वा विकणाऱ्या अनेक मावश्या असतात. त्यांच्या पोषाखावरून विविध स्थानिक जमातींची ओळख होऊ शकते. आपल्याला त्यांची भाषा कळत नसतानाही शिताफीने त्या आपल्याला फुले, गजरे विकतात!
मंदिर अतिशय जुने आहे. मूर्ती तर जवळपास दीड हजार वर्षे जुनी आहे. फोटो काढायला अर्थातच आत अनुमती नाही.
श्री गणेशाची उभी मूर्ती आहे. दोन हातांची मूर्ती पाहायला वेगळी वाटते. मोठ्ठे पोट आणि अगदी लहानसे पाय अशी मूर्ती आहे. पाय लहान असल्याने की काय माहिती नाही, नुकत्याच उभ्या राहू लागलेल्या बाळासारखी गोंडस वाटते मूर्ती! गणेशाच्या मस्तकावर खड्डा असल्यासारखा खोलगट भाग आहे. रावणाने रागावून गणपतीच्या डोक्यावर काहीतरी मारले अशी आख्यायिका आहे.
![]() |
| महागणपती मंदिर |
![]() |
| महागणपती मंदिर |
महागणपती मंदिरात दर्शन अगदी शांतपणे घेता येते. त्यानंतर आम्ही गेलो गोकर्ण महाबळेश्वरच्या शिवमंदिरात.
शतकानुशतके जुने असे हे मंदिर आहे. मंदिराच्या बाह्यभागावर देवीदेवता तसेच काही पौराणिक प्रसंग ह्यांची शिल्पे आढळतात.
मंदिरात आत गणेश व देवी ह्यांच्या डाव्या उजव्या बाजूला मूर्ती आहेत. मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात शंकराची पिंड आहे.
![]() |
| गोकर्ण शिवमंदिर |
![]() |
| गोकर्ण शिवमंदिर |
![]() |
| गोकर्ण शिवमंदिर |
मंदिराच्या आत फोटो काढायला अनुमती नाही. आम्ही गेलो तेव्हा कोणीतरी घरी आईवडिलांना दर्शन घडवण्यासाठी म्हणून विडिओ कॉल लावला होता. त्यांचा बोलण्याचा आवाज होता. दर्शनासाठी आलेले लोक, पूजा सांगणारे गुरुजी ह्यांचे आवाज गाभाऱ्यात घुमत होते. त्यातच 'मंदिरात बोलू नका, शांतता राखा, पटापट दर्शन घ्या' असे अगदी गाभाऱ्यात उभे असलेले गुरुजी सतत आणि मोठमोठ्याने ओरडून सांगत होते! सगळा कोलाहलच होता. काही वर्षांपूर्वी शांततेत घेतलेले राजस दर्शन आणि ह्या वेळचे दर्शन ह्यात फार फरक जाणवला.
महादेव तर शतकानुशतके तोच आहे, तिथेच आहे आणि तसाच आहे. बदलते आहे ती माणसांची वृत्ती आणि दर्शन घेण्यामागील भावना.
ह्या मंदिरात प्रवेश करताना स्त्रियांनी भारतीय पोशाखात असावे आणि पुरुषांनी शर्ट काढून प्रवेश करावा अशी मंदिर व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. मंदिर दुपारी चार तास बंद असते.
मंदिराच्या आसपासचा सर्वच परिसर जुन्या काळची घरे असलेला असा आहे. आम्ही गेलो त्या दिवशी तरी रस्त्यावर अनेक गायी गुरे होती.
दोन्ही मंदिरातील दर्शन वेळेत झाले होते. मग येताना जो होळकर वाडा दिसला होता तिथे आम्ही गेलो. महागणपती मंदिर, गोकर्णचे शिव मंदिर आणि हा होळकर वाडा हे सगळे अगदी जवळ जवळ आहे. चालत गेल्यावर पाच मिनिटे सुद्धा लागणार नाहीत असे.
![]() |
| शिक्का |
![]() |
| होळकर वाडा |
![]() |
| होळकर वाडा |
![]() |
| पुण्यश्लोक अहिल्यादेवी |
![]() |
| होळकर वाडा |
![]() |
| रेवाळेश्वर महादेव |
![]() |
| होळकर वाडा |
त्यांच्या अनेक पिढ्या इथे गोकर्णमध्येच रेवाळेश्वराची व्यवस्था पाहण्यासाठी राहिल्या असणार. दारावरच्या पाटीवरच तीन पिढ्यांची नावे होती.
![]() |
| तीन पिढ्या |
नंतर समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. त्या बाजूला गोकर्ण मुख्य मंदिराचे आणखी एक प्रवेशद्वार आहे.
![]() |
| गोकर्ण |
गोकर्णमध्ये बघण्यासाठी इतर अनेक मंदिरे आहेत, सुंदर समुद्रकिनारे आहेत. वरून पाहिल्यावर ह्याचा आकार ओम सारखा दिसतो असा ओम बीच, मंदिराजवळचा गोकर्ण बीच हे दोन विशेष प्रसिद्ध आहेत.
ओम बीचला जाण्यासाठी मात्र साधारण शंभर पायऱ्या उतरून जावे लागते.
![]() |
| ओम बीच |




















टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा