काझीरंगा, मोठ्या पाचांचे घर!! कोण आहेत हे मोठे पाच? गेंडा, हत्ती, वाघ, हरीण आणि पाणम्हैस! काय आहे हे काझीरंगा? कुठे आहे हे काझीरंगा?
भारताच्या आसाम राज्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ४०० चौ. कि. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे उद्यान आसामच्या नागाव, गोलाघाट आणि कार्बी अँग्लोन्ग या तीन जिल्ह्यात पसरलेले आहे.
भारतीय एकशिंगी गेंड्यांसाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की जगातील दोन तृतीयांश एकशिंगी गेंडे ह्या राष्ट्रीय उद्यानात आहेत. युनेस्कोने हे उद्यान जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे.
ह्या उद्यानातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे ह्याला वाघांचे अभयारण्य म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.
ब्रह्मपुत्रेसह काही नद्या ह्या राष्ट्रीय उद्यानातून वाहतात. तसेच अजूनही अनेक तळी, तलाव ह्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. ह्यामुळे इथे घनदाट जंगल, उंचच उंच हत्ती गवत आणि दलदलीची जमीन आढळते. जवळपास वर्षभर हा परिसर हिरवा असतो.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस आणि पोबितोरा ह्या इतर दोन अभयारण्यांना नदीतल्या छोट्या छोट्या बेटांनी जोडलेले आहे. त्यामुळे वन्य जीव त्या मार्गाने एका उद्यानातून दुसऱ्या उद्यानात जाऊ शकतात. ह्यामुळे त्यातील प्रत्येकच अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानात जैव विविधता आढळून येते.
आसाम बील साठी प्रसिद्ध आहे आणि काझीरंगा ह्याला अपवाद नाही. ह्या राष्ट्रीय उद्यानात अनेक बील आहे. ज्यांना बील म्हणजे काय ते माहिती नाही त्यांच्यासाठी - बील म्हणजे तळ्यासारखी पाणथळ जागा. नदीला पूर आला आणि नंतर पुराचे पाणी ओसरले तरी काही खोल जागी पाणी साठलेलेच राहते आणि बील तयार होते. आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये गंगा आणि ब्रम्हपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात अशी अनेक बील आहेत. एकशिंगी गेंड्याना पाणी आवडते. त्यामुळे साधारणपणे ते ह्या बीलच्या आसपास दिसतात.
ही अशी पाणक्षेत्रे आणि उंच उंच हत्ती गवत काझीरंगाचे वैशिष्ट्य आहे. हत्ती गवत शाकाहारी एकशिंगी गेंड्यांसाठी अन्न म्हणून तर उपयोगात येतेच शिवाय इतर अनेक प्राण्यांनाही राहायला, लपायला आडोसा मिळतो.
काझीरंगामधील बील आणि तळ्यांच्या पाण्यात अनेक प्रकारच्या पाणवनस्पती, हायसिंथस दिसतात. संपूर्ण आसाम आणि आजूबाजूच्या राज्यात शिंगाडा पाण्यात वाढताना दिसतो. गेंड्याना ह्या वनस्पती खायला आवडतात.
दरवर्षी पावसाळ्यात काझीरंगात पुराचे पाणी शिरते आणि वन्य जीवन धोक्यात येते. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे पुराच्या पाण्याबरोबर सुपीक गाळाची माती वाहून येते ती काझीरंगात साठून राहते आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रदेशात वनस्पतींची वाढ उत्तम होते.
पुराच्या संकटकाळात गेंडे आणि इतर वन्य जीव कार्बी अँग्लोन्ग भागातल्या जरा उंचावर असलेल्या प्रदेशात जातात. जे जाऊ शकत नाहीत त्यांना मात्र जमिनीच्या उंचवटा असलेल्या छोट्याश्या भागात अडकून पडावे लागते. २०१७ मध्ये आलेल्या पुराने काझीरंगाचे अतोनात नुकसान केले. प्राण्यांना आसरा घेता येईल असे अनेक कृत्रिम उंचवटे भारतीय सैन्यदलाने तिथे तयार केलेले आहेत.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने आपला शतक पूर्ती महोत्सव २००५ मध्ये साजरा केला. असे म्हणतात कि १९०४ मध्ये तत्कालीन भारतीय व्हॉइसराय ची पत्नी मेरी कर्झन जेव्हा काझीरंगात गेंडे बघण्यासाठी गेली तेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही. ह्या जंगलाची अशी धोकादायक परिस्थिती, गेंड्यांची कमी होत जाणारी संख्या ह्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन १९०५ मध्ये काझीरंगा प्रस्तावित अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. पुढे वेळोवेळी त्या अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवले गेले आणि परिणाम म्हणून आज आपण असे भव्य राष्ट्रीय उद्यान पाहत आहोत. ह्या ठिकाणाचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असे नामकरण १९५० मध्ये केले गेले.
त्याचे नाव काझीरंगा कसे पडले त्याच्या अनेक लोककथा, कहाण्या सांगितल्या जातात. पण इतिहासकारांचे म्हणणे आहे की काझीरंगा हा शब्द आला काज़ीर - ओ - रोंग अशा कार्बी भाषेतील शब्दावरून. त्याचा अर्थ आहे काज़ीर नावाच्या मुलीचे घर. काज़ीर ही कोणे एके काळी त्या भागाची शासक होती.
जंगलाच्या अंतर्भागात जाण्यासाठी जीपच्या आणि हत्तीच्या सफारी उपलब्ध असतात. अर्थातच पर्यटकांना मर्यादित भागातच प्रवेश आहे आणि ठराविक मार्गानेच जावे लागते. फक्त वन खात्याचे अधिकारीच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील संपूर्ण अंतर्भागात हिंडू शकतात.
आम्ही जीप सफारी घेतली होती. जीप सफारीसाठी दोन वेळा असतात, एक अगदी लवकर सकाळी आणि दुसरी दुपारी साधारण अडीचच्या सुमारास असते. दोन्ही वेळी आपल्याला साधारण २-३ तास हिंडवून आणतात.
सफारीसाठी चार मार्ग आहेत. तुमच्याबरोबर असलेला गाईड/ ड्रायव्हर तुम्हाला कोणत्या वेळी कोणता मार्ग घ्यावा त्याचे मार्गदर्शन करेल. कोणत्या ठिकाणी सध्या कोणते प्राणी दिसत आहेत ते त्यांना साधारणपणे माहिती असते.
उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी अनुमतीपत्र मिळते. ते घेऊन मगच आत जाता येते. तुम्हाला तुमची वाहने घेऊन आत जात येत नाही. वन खात्याकडे नोंदणी केलेली वाहने असतील ती भाड्याने घेऊन, तिथलाच नोंदणीकृत ड्रायव्हर घेऊनच जाता येते.
आम्ही बागोरी मार्ग घेतला होता. काझीरंगाच्या पश्चिम क्षेत्रात फिरवून आणणारा हा मार्ग डोंगा कॅम्प मध्ये नेऊन आणतो. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेत ते सगळे फोटो ३ नोव्हेंबर २०१९ सकाळच्या बागोरी मार्ग जीप सफारीचेच आहेत. आम्हाला ह्या मार्गावर खूप एकशिंगी गेंडे दिसले.
ह्या क्षेत्रात खूप पक्षी दिसतात. गरुड, सारसपक्षी, पेलिकन्स, बदके, हंस हे त्यातील काही पक्षी. तुमच्याकडे जर का चांगला कॅमेरा असेल आणि तुमचा हात स्थिर असेल तरच तुम्हाला चालत्या जीपमधून, उडत्या पक्ष्यांचे फोटो काढता येतात.
एकशिंगी गेंड्यांच्या बाबत एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ते शी करायला त्याच ठरलेल्या ठिकाणी परत येतात. त्यामुळे सफारीच्या रस्त्यात बाजूला, अनेक ठिकाणी शी चे ढिगारे दिसतात. ते नैसर्गिक रित्या विघटित होऊन जाईपर्यंत तसेच ठेवले जातात आणि मग ते मातीत मिसळून मातीचा कस वाढवतात!
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अनेक वाघ असले तरी दाट जंगलामुळे आणि उंच हत्ती गवतामुळे ते दिसत नाहीत. त्यांचे अस्तित्व जाणवते ते त्यांच्या पायांच्या खुणांमुळे आणि त्यांनी खाल्लेल्या प्राण्यांच्या अवशेषांमुळे!
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप हत्ती आणि जंगली पाणम्हशीदेखील आहेत. दुपारच्या सफारीमध्ये आम्हाला त्या मोठ्या पाचांपैकी उरलेला पाचवा दिसला. ते म्हणजे हरीण. हरणांपैकी बारशिंगी, सांबर, भेकर हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सूर्यास्ताच्या सुमाराला आम्हाला पुष्कळ हरणे आणि हत्ती दिसले.
आम्ही दुपारच्या जीप सफारीला दुपारी अडीचच्या सुमाराला सुरुवात केली. जेव्हा साधारण अडीच तास फिरून आम्ही परत आलो तेव्हा गडद अंधार झाला होता! त्या दिवशी सूर्यास्त साडेचारच्या सुमाराला झाला. आम्ही मध्य भागाची सफारी घेतली होती. दफलांग डिफओलू नदीच्या किनाऱ्याजवळ आम्ही सूर्यास्ताच्या वेळी होतो.
Water body |
Beel |
Surroundings |
Watch Tower |
पाण्याजवळ चरणारी हरणे! |
मी काढलेल्या सर्वात चांगल्या फोटोंपैकी एक!! |
Water body |
pugmarks and mounds of poop! |
When the road is beautiful, who would want the journey to end! |
Watch tower near the Diffolu river bank. |
Jeeps and too many people |
About to set! |
Last few minutes..and ..gone |
Their day starts when the sun sets. |
Out for a walk!!! |
Must be the Safari elephants. |
सूर्यास्तानंतर जंगलात प्रवास करणे खूपच अनोखा अनुभव आहे. सगळे जगच चंद्रप्रकाशात वेगळे दिसते. खूप आनंददायी आणि मन शांत करत जाणारा अनुभव असतो तो. वाऱ्याने हलकेच हलणारी झाडांची पाने, पाण्यात चमकणारे चंद्राचे किरण, मध्येच उडत जाणारे पक्षी, आजूबाजूला प्राण्यांच्या चाहुलीचा भास आणि आपण सुरक्षित जीपमध्ये असल्याने हा आनंद उपभोगता येण्याजोगी स्थिती!!
प्राणी पाणी पिण्यासाठी बाहेर पडलेले होते. सगळीकडे शांतता. जीपच्या इंजिनचा अगदी हळू येणारा आवाज पण खूप मोठा आहे असे वाटत होते.
काझीरंगाच्या पर्यटनाची सुरुवात १ नोव्हेंबर ला होते. आम्ही तेथे ३ नोव्हेंबरला होतो. जंगलात खूप लोक जीप सफारी घेतलेले फिरत होते. त्यांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज जंगलातल्या शांततेवर ओरखाडे उमटवत होता.
प्राण्यांच्या घरात एकतर आपण त्यांना न विचारता येतो, फिरतो. मग निदान काही नियम तरी पाळायला हवेत.
अगदी शांतता पाळायला हवी. अत्यावश्यक असेल तेव्हाच आणि तेवढेच बोलावे. मातकट रंगाचे, जंगलाशी, झाडांशी, मातीशी सुसंगत असतील असे कपडे घालावे. भडक रंग जसे लाल, पिवळा, केशरी, गडद निळा असे घालू नये. प्राणी बिचकतात. उग्र वासाची अत्तरे, रासायनिक वासांचे किडे पळवणारे स्प्रेज मारून जंगलात जाउ नये. हे नियम तर अगदी सहज कोणालाही सुचतील आणि पाळता येतील असेच आहेत.
हे नियम पाळले तर प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला देखील जास्त प्राणी बघायला मिळतील.
संध्याकाळी ऑर्किड गार्डन जवळचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला विसरू नका. आसामची आणि एकूणच पूर्वांचलाची लोकगीते, लोकनृत्ये बघणे आनंददायी आहे.
तिथे समोरच एक बाजार आहे. तिथे हस्तकलेच्या, विणकामाच्या वस्तू, शाली, ओढण्या,स्टोल्स विकत घेणे हे आद्यकर्तव्य आहेच!! खूप सुंदर, मनमोहक वस्तू, कापडे तिथे मिळतात.
#OneHornedRhino #Naturalreserve #JeepSafari #HowToTravelInKaziranga #MustVisitPlacesInIndia #SanctuaryInIndia #TouristPlaceInAssam
वाहवा नक्की एकदा भेट द्यायला हवी. फोटो खूप सुंदर आले आहेत.
ReplyDeleteधन्यवाद! नक्कीच भेट द्यायला हवी!
Deleteफोटो अप्रतिम 👌👌
ReplyDeleteधन्यवाद अरुंधती!
Deleteसुंदर लेख अप्रतिम फोटो. माझी काझीरंगा भेट आठवली.
ReplyDeleteधन्यवाद!! पुन: प्रत्ययाचा आनंद!
DeleteThanks for this lovely tour of Kazeeranga .
ReplyDeleteThanks Aparna!!
Delete