मागच्या पोस्टमध्ये आपण होतो नुरानंग फॉल्स आणि तवांग मठात .
आज आपण जाणार आहोत तवांग मधील आणि आजूबाजूच्या काही ठिकाणांना भेट देण्यासाठी.
जसे मी आधी सांगितले आहेच, त्याप्रमाणे अरुणाचल मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला इनरलाईन परमिट लागते. ते प्रत्यक्ष जाउन तुम्हाला गुवाहाटी विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळू शकते. त्यासाठी तुमचे फोटोज, ओळखपत्र, आणि निवासाचा दाखला लागतो. इनरलाईन परमिट ऑनलाईन देखील घेऊ शकता.
तवांग शहरात तुम्ही कुठेही फिरलात, तरी तुम्हाला तिथून, बुद्धाचा प्रचंड मोठा पुतळा दिसत राहतो. स्थानिक लोक त्याला बिग बुद्ध म्हणतात. ते तसे नवेच बांधकाम आहे, २०१५ मध्ये बांधले गेलेले. एका छोट्याशा टेकडीवर बसून बुद्ध, शाक्यमुनी सगळ्या परिसराकडे पाहत आहेत. त्या पुतळ्याच्या खाली मंदिर आणि प्रार्थना स्थळ आहे.
मंदिरात गुरु पद्मसंभव ह्यांची मोठी मूर्ती आहे. त्यांना तिबेटियन बुद्ध धर्माचे, इतिहासाने सिद्ध करता येतील, असे संस्थापक म्हटले जाते. मंदिरात तसे लिहिलेले होते.
बुद्धाच्या जीवनातील प्रसंग मंदिरांच्या भिंतींवर चित्रित केलेले आहेत. सिद्धार्थाचा बुध्दापर्यंतचा प्रवास देखील आपल्याला ह्या चित्रात दिसतो. ह्या चित्रातील सिद्धार्थ आणि यशोधरा खूपच खास आहेत, सुंदर आहेत. बुद्ध आपण नेहमी पाहतो तो वैराग्याचे, शांतीचे प्रतीक म्हणून. इथे रंगवलेला सिद्धार्थ आयुष्यातील तारुण्याचे, जीवनेच्छेचे प्रतीक वाटतो. त्यामुळेच नंतर वैराग्य धारण केलेला बुद्ध, विरोधाभासामुळे जास्त उठून दिसतो.
प्रचंड बुद्ध मूर्ती, तवांग
बुद्ध मूर्ती - जरा जवळून अशी दिसते!
गुरु पद्मसंभव मूर्ती आणि दलाई लामा फोटो
प्रकाश
बोधी स्तूप
सर्व जाणणारा बुद्ध
फोटोसाठी पोज देताना!
ह्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. तुम्हाला सुंदरतेचे आणि भव्यतेचे जे जे विशेषण माहिती असेल त्यापेक्षाही हिमालयाच्या पर्वत रांगा सुंदर आहेत. निळेशार आकाश, शांत वातावरण आणि ह्या भागाचे विशेष असणाऱ्या पताका हे सगळे मिळून मनात एक शांती, एक तृप्तता अनुभवता येते.
तवांग शहरातील बाजारात तर ह्या पताकांचा जणू मांडवच असावा तसे दिसत होते.
तवांग बाजारपेठ
१९६२ च्या भारत चीन युद्धातील एका घनघोर संग्रामाचे ठिकाण म्हणजे तवांग. तवांग युद्ध स्मारक शहरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक भावनांना आणि मान्यतांना साजेशी अशी ही स्तुपासारखी इमारत आहे. त्या संग्रामात, भारतभूमीच्या रक्षणासाठी, स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सैनिकांची नावे इथे लिहिलेली आहेत. २४०० हुन अधिक नावे... वाचताना तुम्ही आदराने नतमस्तक होऊन जाता.
युद्धाचा इतिहास, तसेच सैनिकांच्या वापरातील वस्तू, काही शस्त्रे तुम्हाला तेथील संग्रहालयात पाहायला मिळतात. ह्या भागाची, मॅकमॅहॉन रेषेसकट, केलेली एक प्रतिकृती तिथे आहे. सैन्यातील अधिकारी तुम्हाला हे सगळे कसे कसे घडले, युद्ध का झाले, युद्धाचा परिणाम काय झाला हे सगळे नीट समजावून सांगतात.
सर मॅकमॅहॉन ह्यांनी नकाशावर ही रेषा काढली होती ती भारत आणि तिबेट मधील अधिकृत रेषा म्हणून. सर मॅकमॅहॉन हे ब्रिटिश राजवटीतील परराष्ट्र सचिव होते. त्यांनी काढलेली रेषा भारत आणि तिबेट ला मान्य होती. पण नंतर हीच रेषा भारत आणि चीन मधील विसंवादाचे कारण बनली. कारण चीनच्या मते तिबेटला असे परस्पर काही मान्य करण्याचा अधिकार तेव्हाही म्हणजे १९१४ साली देखील नव्हता. अरुणाचल मधील बराचसा भाग आपला आहे असा चीनचा दावा असतो.
युद्ध स्मारकाच्या जवळ तुम्हाला काही तोफा बघायला मिळतील. इथे फोटो आहे हा बोफोर्स ४० M L/ Light anti air craft gun चा. ही लाईट म्हणजे अगदीच लाईट आहे, अवघे २,४०० किलो वजन आहे! ह्या प्रकारच्या तोफा दुसऱ्या महायुद्धात पण अत्यंत परिणामकारक ठरल्या होत्या.
बोफोर्स
जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
शिवाजी महाराज की जय
अरुणाचल प्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून फार आनंद आणि अभिमान वाटतो. तवांग युद्ध स्मारक बघणे ही तर आगळीच भावना आहे. आदर, अभिमान, दुःख, अपराधीपण ..सर्वच भावनांचा कल्लोळ मनात उसळतो. असे म्हटले जाते की तेव्हा इतके भारतीय सैनिक गेले, त्यांच्या रक्तामुळे तवांग जवळून वाहणारे झरे देखील लाल झाले होते. सगळे भारतीय नागरिक सुरक्षित राहावे म्हणून ते सैनिक शत्रूशी लढले आणि धारातिर्थी पडले, अमर झाले.
तवांग युद्ध स्मारक
तवांग युद्ध स्मारक
तवांग युद्ध स्मारक
संध्याकाळी, सूर्यास्तानंतर युद्ध स्मारकाच्या परिसरात एक ध्वनी प्रकाश कार्यक्रम होतो. खरे म्हणजे ही एक फिल्मच आहे, १९६२ च्या युद्धासंबंधी, भारतीय जवानांसंबंधी माहिती देणारी.
वर छप्पर असले तरी बाकी मोकळे मैदान आहे. त्यामुळे थंडीसाठी योग्य ते कपडे सोबत ठेवा. शो बहुतेकदा हाऊसफुल असतो, त्यामुळे थोडे लवकरच तिथे पोचा. सोबत एक टॉर्च अवश्य ठेवा. शो संपतो तेव्हा अगदी गडद अंधार झालेला असतो. पार्किंग लांब असल्याने तो रस्ता दिसण्यासाठी टॉर्च उपयोगी पडतो. पण शो मात्र नक्की बघा.
Before the show
दुसऱ्या दिवशी आम्ही बुमला पासला जाण्यासाठी निघालो. बुमला पास ला जाण्यासाठी तुमची गाडी उपयोगाची नाही. त्या रस्त्यांवरून जाऊ शकतील अशाच गाड्या हव्यात. पण त्या गाड्या आणि वाहनचालक तवांग शहरात सहज मिळतात. आधी बुकिंग मात्र करायला हवे. तुमच्या हॉटेलचा स्टाफ देखील तुम्हाला ह्या व्यवस्थेत मदत करू शकेल.
बुमला येथे फक्त भारतीय नागरिकच जाउ शकतात. त्यांनादेखील एक विशेष परवानगी घेऊन मगच जाता येते. हे परवानगीपत्र तवांगमधून घ्यायला लागते. मिलिटरी चेक पोस्ट वर ते तपासले जाते आणि मगच तुम्ही बुमला च्या रस्त्यावरून जाउ शकता.
रस्ता एकतर डोंगराळ भागातला आहे आणि अतिशय खड्ड्या,खळग्यांचा आहे. गाडीत बसून जातानादेखील रस्ता किती अवघड आहे याची जाणीव तुमची सगळी हाडे ठेचकाळून तुम्हाला देतील. पण स्वतःला सुदैवी समजा की आता रस्ता आहे, जाण्यासाठी गाडी आहे. आपले सैनिक १९६२ मध्ये शेकडो किलोमीटर, ते देखील, पाठीवर आपापले सामान घेऊन, डोंगर-दऱ्या तुडवत, खायला मिळाले तर मिळाले, नाही तर उपाशी पोटी.. अशा अवस्थेत बुमला ला पोचले आणि लगेच लढले देखील. आपल्याला तर काय, नुसता गाडीत बसून प्रवास करायचा आहे.
बुमला पास ला पोचल्यावर एन्ट्री गेटच्या बाहेर गाडी पार्क करायला लागते. हे ठिकाण समुद्र सपाटी पासून 15200 ft उंचीवर आहे. . ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत हुडहुडी भरते. तुमचे सगळे सामान, अगदी फोन, पर्स,पाकिटे सगळे तिथे ठेवून घेतले जाते आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष बॉर्डर जवळ जाता येते. तिथे फोटोग्राफी करायला परवानगी नाही.
तिथे पोचायला खरे तर अगदी थोडेच चालायला लागते. पण अतोनात थंडी आणि ऑक्सिजन चे अल्प प्रमाण ह्यामुळे आपण किती चाललो आहोत असे वाटते. काही सामान नसताना, नुसते चालण्यासाठी देखील आपल्याला कष्ट होतात. सैनिक इथे कसे लढले आणि लढत असतील?
तिथे पोचल्यावर एक सैन्य अधिकारी युद्धाच्या वेळी काय काय झाले, कुठे सैनिक होते, युद्ध कसे झाले ते सगळे निवेदन करतात. चीनची सीमा लांबवर दिसत असते. तुमच्या तोंडून आपोआपच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा निनादत राहतात.
प्रत्येकाने एकदा तरी बुम ला पास ला जायलाच हवे. आपले हात पाय काम करेनासे होतात अशा वातावरणात सैनिक जीवावर उदार होऊन युद्ध करत असतात.. ते कोणासाठी? कशासाठी? आपण काय जाणीव ठेवतो त्यांची? आपण त्यांच्यासाठी काय करतो? इथे जाऊन आल्यावर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडायला लागतील आणि कदाचित त्यांच्या योग्य उत्तरांच्या दिशेने वाटचाल होईल.
बुमला पास
मिलिटरी चेकपोस्ट
अभिमानचिन्ह
बुमला पास आणखीही एका गोष्टीसाठी स्मरणात राहते. चीनच्या अत्याचारांमुळे दलाई लामांना, तिबेटमधून निर्वासित होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला, तेव्हा त्यांनी ह्याच मार्गाने भारतात प्रवेश केला होता.
बुमला पासहून तवांगला परतताना, जरी अगदी वाटेत नसले तरी, थोडा वळसा घेऊन सुप्रसिद्ध माधुरी लेक ला जाता येते. ह्या तलावाचे मूळ नाव आहे सांगेत्सर तलाव. इथे कोयला ह्या सिनेमाचे चित्रीकरण झाले. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या नावावरून ह्या तलावाला माधुरी लेक असे नाव पडले.
१९५० मध्ये झालेल्या भूकंपाने आणि ढगफुटीमुळे हा तलाव तयार झाला. हे ठिकाण खूपच निसर्गरम्य आहे. बर्फाच्छादित पर्वत, तलाव आणि आजूबाजूचे वृक्ष सगळेच सुंदर दिसते.
त्या वादळामुळे तलावातील झाडांची नुसती खोडे उरली आहेत. पण ती देखील खांबांप्रमाणे भासतात आणि तलावाला आगळेच सौंदर्य प्रदान करतात. तलावाभोवती चालण्यासाठी नयनरम्य रस्ता आहे. तसेच देखावा बघण्यासाठी आच्छादित व्यू पॉईंटस पण आहेत. एकूणच फोटो काढण्याच्या शेकडो जागा आहेत!!!
हा भाग वर्षभर थंड असतो. खूपदा बर्फ असते. कधी कधी तर तलावाच्या पाण्याचे पण बर्फ झालेले असते! आम्ही गेलो होतो तेव्हा सुदैवाने तळ्यात पाणीच होते!
आम्ही बुमला पास पासून माधुरी लेक पर्यंत प्रवास केला. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर २०१९. हा देखील रस्ता चांगला नाहीच. त्या रस्त्यावरून प्रवास करायला खूप वेळ लागतो. म्हणून अंतर कमी असले तरी काही तास प्रवास करून आम्ही माधुरी लेकला पोचलो. आम्ही पोचल्यावर पाच मिनिटातच अचानक हवा बदलली. चेहऱ्यावर थंडगार वाऱ्याचे सपकारे बसू लागले. अंगात भरपूर गरम कपडे असूनही थंडी सहन होईना. आभाळ भरून आले. तिथे उभे राहणे देखील कठीण झाले. तिथे जितके पर्यटक आलेले होते ते सर्व आपापल्या वाहनांकडे पळाले.
हवेत असे अचानक बदल होणे हे अरुणाचल प्रदेशात नित्याचे आहे. जरी आम्ही प्रवासासाठी काही तास घालवले तरी तळ्याच्या जवळ आम्हाला पाच मिनिटेच थांबता आले. कधी कधी असे होणे हा देखील प्रवासाचाच अटळ भाग आहे. आपण काही योजना आखतो, पण ती यशस्वी होईल की नाही हे मात्र आपल्या हातात नसते. खूपदा त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही..आयुष्यासारखेच!
घरी राहा, सुरक्षित राहा. आता थोडेच महिने आणि मग कोरोना गायब होईल!! तोपर्यंत ट्रॅव्हल ब्लॉग वाचण्याचा आनंद अनुभवत राहा!!
#BomdilaTawangRoute #OneDayTourFromTawang #IndiaChinaBorder #1962IndiaChinaWar #WhatToDoInTawang
#14thDalaiLama
छानच 👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteजय हिंद
ReplyDeleteजय हिंद
ReplyDeleteजय हिंद! भारतमाता की जय!
Deleteजय हिंद!
DeleteMast.
ReplyDelete