गीताजयंती नुकतीच म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी साजरी केली गेली. जगातील हे एकमेव आणि अनोखे उदाहरण आहे, जिथे एका पुस्तकाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सध्या वातावरणात सगळीकडे कृष्ण भक्ती आहे, तेव्हा मला भगवान कृष्णाच्या महान भक्त संत मीराबाईंच्या गावाबद्दल, घराबद्दल लिहायला आवडेल.
महान कवी व कृष्णभक्त असलेल्या संत मीराबाई यांचे मूळ ठिकाण राजस्थानमधील मेडता हे आहे. त्यांचे जन्मस्थान हे मेडता जवळील एक छोटेसे गाव आहे आणि बालपणी त्या मेडता येथे राहिल्या होत्या.
संत मीराबाईंचा जन्म १४९८ मध्ये जोधपूर साम्राज्याचे संस्थापक राव जोधामल यांच्या कुटुंबात झाला. ते मीराबाईचे पणजोबा होते. बालपणी त्या आजोबा राव दुदामल यांच्याजवळ मेडता येथील राजवाड्यात राहिल्या होत्या. राव दुदामल हे मेडता राजपूत कुळाचे संस्थापक होते. मीराबाईंचे संगीत, धार्मिक ज्ञान, राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण घरीच झाले. त्या कृष्णाच्या महान भक्त होत्या आणि त्यांनी आपले जीवन कृष्णाला समर्पित केले होते.
त्यांचे लग्न चित्तोड येथील युवराज भोजराज ह्यांच्याशी झाले होते. त्या एक महान संत आणि भक्तिमार्गातील प्रसिद्ध कवियत्री होत्या. त्यांची गीते सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुष्कर, वृंदावन, द्वारका अशा अनेक ठिकाणी प्रवास केला होता आणि १५४६ मध्ये त्यांचे द्वारकेला निधन झाले. त्यांच्या मृत्यूविषयी रहस्यच आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला कोणाला माहिती नाही. असे म्हणतात की त्या द्वारका येथील कृष्णमूर्तीत विलीन झाल्या.
मेडता येथे त्यांचे वडिलोपार्जित घर, जिथे त्या लग्न होईपर्यंत राहिल्या होत्या ते आणि त्या कृष्णाची जिथे पूजा करायच्या ते मंदिर असे आपण पाहू शकतो.
Krishna Mandir, Merta. |
ह्या कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण चतुर्भुजनाथ रूपात म्हणजे चार हात असलेली अशी मूर्ती आहे. चतुर्भुजनाथांच्या मूर्तीच्या अगदी समोरच मीराबाईंची मूर्ती आहे. असे वाटते की ते दोघे एकमेकांकडे पहात आहेत.
हे मंदिर मीराबाईंचे आजोबा राव दुदामल यांनी बांधले होते आणि तिथे मीराबाई कृष्णाची पूजा करायच्या! आणखी एक छोटी पंचधातूची कृष्ण मूर्ती दाखवली जाते. मीराबाई लहान असल्यापासून त्या मूर्तीची पूजा करायच्या असे म्हटले जाते.
मंदिराच्या आतील भागात सगळीकडे काचा आणि आरसे लावलेले नक्षीकाम आहे. मीराबाईंच्या आयुष्यातील प्रसंग एकतर पेंटिंग्ज किंवा कोरलेल्या काचकामाच्या रूपात दाखवलेले आहेत.
शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मेडताच्या मुख्य बाजारपेठेत आहे. येथे आपल्याला स्थानिक जीवनाची झलक बघायला मिळते. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेले असे पार्किंग नसल्यामुळे मंदिराच्या मागच्या गल्लीत गाडी पार्क करावी लागते.
हे मंदिर केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इतिहासाचा एक भाग आहे म्हणूनही बघायला हवे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ नसले तरी बघायला हवे. मंदिर अजूनही नांदते प्रार्थनास्थळ आहे. अनेक भक्त ह्या मंदिरात येत असतात. मेडता नगरातले बरेच रहिवासी ह्या मंदिरात रोज येतात.
मीराबाईंच्या आजोबांचा, राव दुदामल यांचा हा राजवाडा आहे. युवराज भोजबरोबर लग्न होईपर्यंत मीराबाई येथेच राहत होत्या. मीराबाईंच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रण आणि फलक येथे पाहायला मिळतात. येथे देखील मीराबाईंची मूर्ती आहे आणि एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा असे वाटले की १९ व्या शतकात, काही वर्षे या जागेचा उपयोग मुलींची शाळा म्हणून केला जात होता. मागच्या अंगणात एक छोटी बाग आहे आणि तेथे राधाकृष्ण मूर्ती आहे.
Radha Krishna |
आजुबाजूची इतर बरीच राजपूत राज्ये मुघलांच्या समोर नमली होती आणि त्यांनी मुघलांना मुलगी देऊन सामंजस्याचे करार केलेले होते. मेडता आणि मेवाड, विशेषतः चित्तोर हे दोनच वंश असे होते की ज्यांनी मोगल राजांना आपल्या मुली देण्यास नकार दिला.
मेडता पासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर नागौर किल्ला आहे. किल्ल्याचे मूळ नाव 'अहिछत्रगड' असे आहे. नागौर परिसराला महाभारत काळात जंगलदेश म्हणून संबोधले जायचे. अहिछत्रगढ ह्या नावाचा अर्थ 'नागफणीचा किल्ला' असा आहे. प्राचीन काळातील नागवंशी क्षत्रियांनी हा मूळ किल्ला बांधला होता.
१२ व्या शतकापासून नागौर किल्ला मुख्यत्वे मुस्लिमांच्या ताब्यात होता. सध्याचा किल्ला हे जाट मुघल वास्तुशास्त्राचे उदाहरण आहे.
गेल्या ४० वर्षात गडावर जीर्णोद्धाराची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे आता किल्ला बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे.
किल्ल्याचा परिसर विशाल आहे, जवळजवळ ३६ एकर परिसर आहे. ह्या परिसरात अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आहेत. अनेक चौक, बागा आणि कारंजी आहेत. आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये नागौरला गेलो होतो, तेव्हा मात्र अनेक हौदातील पाणी आटलेले असल्यामुळे त्यात कारंजी उडत नव्हती!
काही इमारतींच्या भिंतींवर तर आहेतच पण छतावर देखील सुंदर पेंटिंग्ज आहेत. काही इमारती आणि अगदी काही स्नानगृहेसुद्धा आपल्याला किल्ल्याच्या शासकांच्या वैभवशाली जीवनशैलीच्या कहाण्या सांगतात!
नक्षीदार कमानी आणि जाळ्यांमुळे ह्या वस्तू वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर दिसतात. सांस्कृतिक वारसा संवर्धन उत्तम प्रकारे करण्यासाठीचा युनेस्को पुरस्कार नागौर किल्ल्याला मिळालेला आहे.
नागौर शहरात सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन यांचे शिष्य वास्तव्य करीत होते आणि त्यातील एका प्रमुख शिष्याचा, हमीनूद्दीन चिस्ती ह्यांचा दर्गा अजूनही तेथे आहे. दरवर्षी जागतिक सूफी संगीत महोत्सव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नागौर किल्ल्यात भरतो.
नागौर येथून बिकानेर अंदाजे १२० कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही राजस्थानात आलात की बरेच किल्ले आणि हवेल्या पाहायला मिळतात. राजस्थान शाकाहारी अन्नासाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी लोकांना इथे कोणतीही अडचण उद्भवणार नाही, त्यांना कुठेही सहज शाकाहारी भोजन मिळेल. मात्र भाज्या शिजवताना बरीच हॉटेल्स शुद्ध तूप वापरतात, म्हणून व्हीगन लोकांना त्याबद्दल विशेष चौकशी करावी लागेल. पण व्हीगन ग्राहकांसाठी ते तेलात केलेल्या भाज्या आणि काही पक्वान्नेदेखील नक्की बनवतील.
राजस्थानमध्ये बरीच चांगली हॉटेल्स आहेत. काही हवेल्या आणि राजवाडे हॉटेलमध्ये रुपांतरित केलेले आहेत. जर आपल्याला ऐतिहासिक काळाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अशा हॉटेल्स मध्ये राहू शकता. आमच्या राजस्थान ट्रिपमध्ये आम्हाला अशा काही हॉटेल्समध्ये राहण्याची संधी मिळाली.
#MeerabaiResidence #MereToGirdharGopal #SufiMusicFestival #MartiaRathors #Chittorgadh
खूप छान 👌👌
ReplyDelete