मला माहिती आहे ते शून्याचा म्हणजे झीरोचा शोध भारतीयांनी लावला, पण झीरो कोणी पाहिले आहे का? ऑक्टोबर 2019 ला मी झीरो प्रत्यक्ष बघितले. जरा ह्या झीरोचे स्पेलिंग वेगळे होते एवढेच! हे Ziro होते!! झीरो ही अत्यंत सुंदर निसर्गरम्य आणि अद्भुत जागा आहे.
अरुणाचल प्रदेश मधील लोअर सुबान सिरी जिल्ह्यामधील झीरो हे छोटे शहर आहे. संपूर्ण अरुणाचल प्रदेशलाच नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न हवामान याची देणगी मिळालेली आहे. नयनरम्य निळे आकाश, उंच उंच पहाड आणि हिरवाई अरुणाचल प्रदेश मध्ये सगळीकडेच असतात. झीरो मध्ये हे सगळे तर आहेच शिवाय पाईन वृक्ष देखील खूप आहेत.
विकिमीडिया वरून साभार |
ऑक्टोबर २०१९ मध्ये असे दिसत होते. |
हवामान खूपच छान आहे. झीरोला जाण्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरमधला काळ. झीरो मध्ये डिसेंबर-जानेवारीत झीरोच्याही खाली तापमान जाऊ शकते! आयुष्यभर गरम हवेच्या ठिकाणीच राहिल्यामुळे मला तर 12 डिग्री झाले तापमान तरी हुडहुडी भरायला लागते.
इथे कधीही पाऊस पडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पोन्चोसकट तयारच राहायला हवे. हवा अगदी शुद्ध, प्रदूषणरहित अशी आहे. मला नेहमी वाटते ईशान्य भारतातली राज्ये म्हणजे भारताची ऑक्सीजन सिलेंडर आहेत.
झीरोला कसे जायचे? सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे इटानगरजवळचे नाहरलगुन. तिथून झीरोला जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी बुक करू शकता. नहार लागून हुन आम्ही खूप पहाटेच निघालो कारण आम्हाला एका दिवसात झीरोला जाऊन परत यायचे होते.
नहरलागुन पासून झीरोपर्यंतचे अंतर फार नसले, म्हणजे खरे तर जवळपास शंभर किलोमीटरच असेल, तरी रस्ता खूप डोंगराळ प्रदेशातील, खाचखळग्यांचा आणि अवघड आहे. तुम्ही जाऊन आलात की तुम्हाला तुमच्या शरीरात किती हाडे आहेत हे नीटच कळते! खूपदा ढगांमुळे समोरचा रस्ता दिसत नाही. म्हणूनच अंतर थोडे असले तरी आम्हाला जाताना पाच तास लागले आणि येताना अंधार पडायला लागल्यावर तर सात तास लागले.
रस्त्यात आम्हाला अगदी ताजे बनवलेले चवीष्ट, शाकाहारी अन्न मिळाले. पण अर्थात शाकाहारी अन्न मिळणाऱ्या खूप कमी जागा, कमी रेस्टॉरंट्स रस्त्यात आहेत.
ताजे, चविष्ट शाकाहारी अन्न! |
रस्त्याने जाताना तुम्हाला खूप मिथुन दिसतील. मिथुन हा अरुणाचल प्रदेशचा राज्यप्राणी आहे. हा खरेतर गाई-बैलांच्या जातीतला एक मोठ्या आकाराचा रानटी प्राणी आहे. पण तो पाळीव प्राणी म्हणून देखील आपण माणसाळवून ठेवू शकतो.
मिथुन |
झीरो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर डोंगर, सुंदर दऱ्या, भात शेती आणि भात शेतीत होणारी माशांची शेती यासाठी झीरो प्रसिद्ध आहे. ह्या प्रकारची माशांची शेती अतिशय विलक्षण आहे. बहुतेक ही भारतातली एकमेव जागा असेल, जिथे अशा प्रकारे भाताच्या शेतातच माशांची देखील शेती केली जाते. झीरो तिथे होणाऱ्या वार्षिक संगीत समारोहा साठी प्रसिद्ध आहे. संगीत समारोहाच्या वेळेला खूप जास्त संख्येने पर्यटक अरुणाचल प्रदेश मध्ये येतात, झीरोला येतात. झीरो हे विविध जनजातींच्या वसाहतींसाठी आणि त्यांच्या पारंपारिक घरांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
जनजातींचे पारंपरिक घर भातशेतातच मत्स्य शेती |
पण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते एकमेवाद्वितीय अशा शिवमंदिरात.
रस्त्यात दिसलेले स्वप्नातले घर!! |
विलक्षण असे हे स्वयंभू शिवलिंग पाहिल्यावर तुम्हाला पण माझ्यासारखेच वाटायला लागेल. जेव्हा मी तिथे त्या प्रचंड मोठ्या स्वयंभू शिवलिंग समोर उभी होते, तेव्हा माझे मला निश्चितपणे वाटून गेले की एखादी जागा मंदिर होण्यासाठी तिथे माणसांनी बांधलेल्या भिंती, सुंदर कोरीव काम, नक्षीकाम कशाचीही गरज नाही नसतेच.
श्री सिद्धेश्वरनाथ मंदिर, कार्दो, झीरो |
नंदी |
वीस फुटांहून अधिक उंचीचे, नैसर्गिक रुद्राक्ष माला असलेले स्वयंभू शिवलिंग |
एका मजुराला त्या जमिनीतली झाडे तोडत असताना या शिवलिंगाचा शोध लागला, ते 2004 मध्ये. जवळच पाण्याचा एक छोटा झरा वाहतो आहे. त्याला स्थानिक लोक, ही शिवाजवळची गंगा आहे असे म्हणतात. झीरोला जाण्याचा रस्ता जरी खूप अवघड असला तरी इथले नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला भुरळ पडेल असेच आहे आणि म्हणूनच झीरोही तुमच्या प्रवासातील एक नक्की भेट देण्याची जागा ठरते.
प्रवासात असे दृश्य दिसणार असेल तर मग खराब रस्त्यांची फिकीर कशाला? |
तळटीप: अरुणाचल प्रदेश संरक्षित प्रदेश असल्याने तिथे जाण्यासाठी सर्वांनाच इनर लाइन परमिट ची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही झीरो मध्ये असाल तेव्हा गुगल मॅप वर तुमची लोकेशन शानान, तिबेट चायना अशी दिसेल.
खूप छान माहिती दिलेली आहे
ReplyDeleteधन्यवाद!!
Delete