आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन!!
भारताच्या दक्षिणेकडे हिंदी (हिंद) महासागर, नैवृत्त्येला अरब समुद्र (सिंधुसागर) आणि आग्नेयेला बंगालचा उपसागर असे जलखंड आहेत. उर्वरित भूभागावर पाकिस्तान, अफगाणिस्थान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, ब्रम्हदेश हे देश आपल्या सीमेवर आहेत. इंडोनेशिया आणि थायलंड बरोबर आपल्या काही सागरी सीमा जोडलेल्या आहेत. आज मी तुम्हाला काही सीमावर्ती भागात घेऊन जाणार आहे.
भारत आणि शेजारी देश 📷 Wikimedia Commons |
भारत आणि बांगला देश जवळ जवळ ४००० किलोमीटर च्या सीमेने जोडलेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या पहिल्या पाच सीमारेषांपैकी ही एक आहे. इतकी मोठी सीमारेषा असणे स्वाभाविकच आहे, कारण १९४७ पर्यंत बंगला देश हा भारताचाच भाग होता. भारताचा नकाशा पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल, की कशी आणि किती सीमारेषा पसरलेली आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातून ही सीमारेषा जाते. इतकी मोठी, ४००० किलोमीटर पेक्षाही जास्त सीमारेषा असल्याने, तिकडून येणारे निर्वासित लोंढे थोपवणे, भारतासाठी फार अवघड झाले आहे. निर्वासित बांगला देशातून भारतात येत राहतात.
नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही जेव्हा मेघालयात गेलो होतो तेव्हा आम्हाला दावकी (Dawki) ची उमंगोत (Umngot) नदी बघायला जायचे होते. आसामातील काझीरंगाहुन आम्ही सकाळी लवकरच निघालो. वाटेत एका शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट मध्ये नाश्त्यासाठी थांबलो.
.
KBR शाकाहारी रेस्टॉरंट |
KBR च्या बाहेर! |
आम्ही दावकीला साधारण ११ च्या सुमारास पोचलो. तिथले रस्ते अगदी अरुंद. त्यात पर्यटकांची वाहने आणि सैन्याची वाहने रस्ता कायम गजबजलेला आणि वाहतूक तुंबलेली ठेवतात!
गाडी पार्क केल्यावर एक जिना उतरलात की तुम्हाला बोटिंग च्या ठिकणी जाता येते. तिथे बोटिंग करणे हा एक अत्यंत अविस्मरणीय अनुभव आहे. नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे की तुम्ही खरोखर तळ बघू शकता.
बोटीतून घेतलेला फोटो -नितळ पाणी |
तुम्ही गुगल किंवा इंस्टाग्राम वर शोधलेत तर तुम्हाला दावकी आणि उमंगोतचे सुंदर सुंदर फोटो बघायला मिळतील! बोटिंग करताना तुम्हाला दावकीचा सुप्रसिद्ध पूल देखील दिसतो.
दावकीचा सुप्रसिद्ध सस्पेन्शन पूल |
सस्पेंशन पूल |
निवांत गप्पा! |
तुम्ही जेव्हा सैर संपवून काठावर परत येता तेव्हा एक मोठेच आश्चर्य तुमच्या दृष्टीस पडते. इथेच भारत बांगलादेश सीमा आहे! बांगलादेशी नागरिकांचा एक घोळका तिथे फिरत होता. तेही दावकी आणि भारत बघायला आले होते. तिथे ना खांब होते, ना तारा होत्या, ना कुंपण होते. फक्त एक पाटी होती की ही भारत बांगलादेश सीमा आहे. कृपया ओलांडू नये!
भारत बांगलादेश सीमा! पलीकडचे बांगलादेशी नागरिक आहेत! |
दिसली का पाटी? हीच सीमा आहे! |
त्याच ईशान्य भारताच्या ट्रीपमध्ये आम्ही अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील परशुराम कुंडला गेलो होतो. खूपच विशेष ठिकाण आहे ते.
परशुराम कुंड |
परशुराम कुंडाविषयी मी परत कधीतरी लिहीन. आज मला तुम्हाला काही वेगळेच सांगायचे आहे. परशुराम कुंडाला जाण्यासाठी शेकडो पायऱ्या आणि त्याही पावसात, गारठवणाऱ्या वाऱ्यात चढल्या उतरल्यावर आम्हाला चक्क गरमागरम, ताजे तयार केलेले शुद्ध शाकाहारी चविष्ट अन्न मिळाले. जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला.
खूप वेळ पावसात चालल्यावर गरमागरम भजी -आsss हा! |
अरुणाचल प्रदेश मध्ये शाकाहारी जेवण मिळायला नशीबच लागते! |
टी सेट आणि मस्त लेमन जिंजर टी! |
जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला. टी सेट खूपच वेगळा दिसला म्हणून मी तिला विचारले की कुठून आणला? तर तिने सांगितले की ब्रम्हदेशाच्या बाजारातून! कसे काय विचारताच ती म्हणाली, हा जो मागे डोंगर दिसतो आहे ना? तो पार केला की ब्रम्हदेश आहे!
मला जे तिच्या बोलण्यातून समजले ते असे, की जानेवारीत तिथे एक विशेष जत्रा असते. काही जनजातीच्या लोकांना तिथे जायला किंवा तिकडून इथे यायला परवानगी आहे. अर्थात सीमेवर एक बॉर्डर पोस्ट आहे पण ते दूर आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ह्या चार राज्यात भारत ब्रम्हदेश सीमाभाग आहे. जवळपास १५०० किलोमीटर ची ही सीमा आहे.
तिसरी सीमा आम्ही पहिली ती भारत चीन सीमा. इथे मात्र व्यवस्थित बॉर्डर पोस्ट, नो मॅनस लँड आणि लाईन ऑफ कंट्रोल पण आहे. ही सीमा अरुणाचल प्रदेश च्या तवांग जवळील बुमला पास येथे आहे.
बुमला पास बॉर्डर पोस्ट. |
चौथी सीमावर्ती भागातील बॉर्डर पोस्ट आम्ही पाहिली ती साधारण २० वर्षांपूर्वी. ती जागा, तिथे रोज संध्याकाळी होणाऱ्या लोअरिंग ऑफ फ्लॅग्स सेरिमनी साठी खूप प्रसिद्ध आहे. ती आहे अटारी बॉर्डर जी पाकिस्तानच्या वाघा येथे जोडली गेलेली आहे. पंजाब मधील अमृतसरपासून साधारण २८ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. रोज संध्याकाळी होणार रोमहर्षक सोहळा अनुभवण्यासाठी दोन्ही बाजूला हजारो प्रेक्षक जमलेले असतात.
अटारी बॉर्डर कवायत (📷 Internet) |
अटारी येथील फ्लॅग डाऊन सेरिमनि (📷 Internet) |
पाकिस्तान १९४७ पर्यंत भारताचा भाग असल्याने, साहजिकच खूप मोठी ३००० किलोमीटरच्या जवळपास लांब सीमारेषा आहे. गुजराथ, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर इथून ही सीमारेषा जाते.
आपल्या देशाच्या सीमावर्ती भागात जाणे हा एक अगदी वेगळाच भावना कल्लोळ असतो. त्यातल्या काही भावना ओळखता आणि नाव घेऊन सांगता आल्याच तर त्या असतात, अत्यंत दुर्गम भागात, कसोटी पाहणाऱ्या हवामानात आपल्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आदर, अभिमान आणि कृतज्ञता! मला अजून काही सीमावर्ती भागात जायचे आहे..कधीतरी नक्की जाईनच. निघून जा रे बाबा कोरोना..आम्हाला घरात कोंडून ठेवू नकोस!
वंदे मातरम्!!!
ReplyDeleteतुझ्या बरोबर जाऊन आल्यासारखे वाटले ☺
Bharatmata ki jay!!
DeleteExcellent friendly writing and stunning Photos. Thanks a Zillion for this.
ReplyDeleteThanks for reading!! I really appreciate that you do read all the posts thoroughly!
Delete