सध्या सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या, माझ्या आवडत्या गणेशउत्सवात मनात काय येत असेल, तर फक्त गणपती! मग विचार केला तुम्हाला पण एका गणपती मंदिरातच का नको घेऊन जायला? चला तर मग!
गणेश मूर्ती- ९ वे शतक- प्रम्बनन, इंडोनेशिया 📷 आंतरजाल |
हे मंदिर बांधले गेले आहे ९व्या शतकात आणि मी ह्या मंदिराला भेट दिली होती १३ वर्षांपूर्वी - २००७ मध्ये. हे बहुतेक सर्वात मोठे शिवमंदिर असू शकेल.
हे मंदिर आहे इंडोनेशिया मध्ये, योग्यकर्ता किंवा जोगजकार्ता जवळ. असे म्हणतात की योग्यकर्ता हे नाव आले भारतातल्या अयोध्येमुळे. लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. त्या काळी श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचे किती आकर्षण जगभर होते! इंडोनेशिया मध्ये योग्यकर्ता आहे, थायलंड मध्ये अयुत्थ्या आहे.
योग्यकर्तापासून जवळपास २० किलोमीटरवर हा हिंदू मंदिरांचा प्रचंड समूह आहे, नाव आहे प्रम्बनन.
इंडोनेशियाच्या नकाशात प्रम्बनन. 📷 आंतरजाल |
रकाई पिकतान नावाच्या हिंदू संजय राजवटीच्या राजाने पहिले मंदिर बांधायला सुरुवात करून नवव्या शतकाच्या मध्यात पूर्ण केले. ह्या समूहातील बाकी मंदिरांची भर घातली ती राजा लोकपाल आणि बळीतुंग महा संभू नावाच्या मातरम राज्यातील राजांनी.
३० स्क्वेअर किलोमीटरच्या भव्य परिसरात हा मंदिर समूह आहे. मूळ नाव आहे शिवगृह -शिवाचे घर किंवा शिवालय -शिवाचे वसतिस्थान, राज्य.
कॅण्डी- बहासा इंडोनेशिया मध्ये -मंदिर |
जेव्हा तुम्ही ह्या मंदिर समूहात प्रवेश करता किंवा खरे तर काही अंतरावरूनच ह्या मंदिरांचे उंचच उंच, निमुळते कळस तुम्हाला दिसू लागतात. ते दृश्य इतके सुंदर आणि संस्मरणीय आहे की आयुष्यभरात तुम्ही विसरू शकणार नाही. मला नेहमी वाटते की प्रम्बनन हा शब्द संस्कृत ब्रम्हानंद ( परम आनंद) ह्या शब्दाचे रूप असेल!
पहिली झलक |
तुम्ही आवारात प्रवेश करताच तुम्हाला ब्रम्हा, विष्णू, शिव मंदिरांचे कळस दिसतातच पण सगळीकडे दगडांचे ढिगारेच्या ढिगारेदेखील दिसतात. कोसळलेल्या मंदिरांचे हे दगड आहेत.
प्रम्बनन मंदिर समूह 📷 आंतरजाल |
ह्या मंदिर समूहाला वेढणारी एक भिंत आणि आवार होते जे आता नाही. त्या भिंतीच्या आत पूर्वी एकूण २४० मंदिरे होती. त्यातील २२४ मध्यभागात होती. ही मंदिरे समकेंद्री चौकोनात बांधली गेलेली आहेत. त्यांना म्हणतात कॅण्डी पेरवारा ( प्रवर असणार). मध्यभागी जात जात ही संख्या कमी कमी होत जाते. ६८, ६०,५२, ४४ अशी ही समकेंद्री मंदिरांची रचना आहे.
मंदिर समूहाचा नकाशा 📷 आंतरजाल |
दुर्दैवाने ह्या भागातली बरीच मंदिरे कोसळलेली आहेत. नुसते दगडाचे ढिगारे उरलेले आहेत. आम्ही प्रम्बननला जून २००७ मध्ये गेलो होतो. त्या आधी २००६ मध्ये इंडोनेशियाला एक मोठा भुकंप, तीव्र धक्का देऊन गेला होता. त्यामुळे ह्यातील बरीच मंदिरे पडली होती.
ढासळलेली मंदिरे |
सर्वात आतल्या भागात आहेत उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्यांच्या देवांची, ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्यांची मंदिरे. ह्या शिवाय त्या तिघांच्या वाहनांची, अनुक्रमे हंस, गरुड आणि नंदीची पण मंदिरे आहेत.
मंदिर समूहाचा मध्य भाग |
शिवमंदिर सर्वात उंच म्हणजे १५४ फूट उंच आहे आणि सर्वात जास्त कोरीवकाम केलेले आहे. त्यात चार मूर्ती आहेत. शंकर गुरुरूपात आहे, शिवपत्नी पार्वती आहे, मुलगा गणेश आहे आणि अगस्त्य ऋषी अशा चार मूर्ती आहेत. आम्ही २००७ मध्ये गेलो, तेव्हा तिथे दुरुस्तीचे काम चालू असल्याने आम्हाला मंदिरात आत, गर्भगृहात जाता आले नाही, दिलेले माहितीपत्रक बघून समाधान मानावे लागले.
शिव मंदिरातील मूर्ती |
त्रिमूर्ती मंदिरांच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत कथा शिल्पकृतींद्वारे चित्रित केली आहे. आम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाऊ शकलो नाही तरी ही शिल्पे मात्र पाहू शकलो.
भिंतींवरील कोरीव काम |
बारीक कलाकुसरीची भित्तीशिल्पे |
कोरीवकाम |
प्रम्बनन मंदिरे |
प्रम्बनन मंदिरे |
ह्या मंदिरांचे स्थापत्य, उत्तुंग उंची, भव्य आवार, अप्रतिम भौमितिक रचना, ज्या उत्साहाने हे प्रचंड बांधकाम केले गेले ते, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाही म्हणजे नवव्या शतकात देखील मानववंश किती प्रगत होता हेच दाखवते.
मला तर वाटते, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रम्बनन मंदिरे बघायलाच हवीत. ती पाहून इंडोनेशियातील ज्या हिंदू राजांनी हे भव्य स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणले त्यांच्या विषयी प्रचंड आदर वाटतो.
ता. क.
१. काही लोकांच्या मते प्रम्बनन हा शब्द परब्रह्म या संस्कृत शब्दावरून आला आहे. परब्रम्ह याचा अर्थ आहे सर्वोच्च तत्व, सर्वोच्च सत्य.
२. प्रम्बनन येथे सापडलेल्या शिलालेखानुसार या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 12 नोव्हेंबर 856मध्ये झाली होती
३. आता नोव्हेंबर 2019 मध्ये म्हणजे त्याच्या उद्घाटना पासून ११६३ वर्षांनी तिथे पूजा, अभिषेक आणि प्रार्थना असा तीन दिवसांचा कार्यक्रम करण्यात आला. हे सगळे पूजा विधी तिथे सापडलेल्या हस्तलिखितानुसार केलेले होते
४. तुम्हाला प्रम्बननचे चांगले फोटो घ्यायचे असतील तर कृपया दिवसा उजेडी प्रम्बननची भेट ठरवा. जर का योग्यकर्ता ला राहत असाल तर तिथून सकाळी लवकर निघा आणि प्रम्बननला भेट द्या.
५. तिथे प्रांगणात संध्याकाळी रामायणावर आधारित नृत्यनाट्य सादर होत असते.
Comments
Post a Comment