बुसान बघताना सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जरी स्पेलिंग Busan असे असले तरी त्याचा उच्चार पुसान असा होतो! पुसान हे दक्षिण कोरियामधील एक अत्यंत प्रगत आणि प्रभावी शहर आहे. इथे होणारे विविध फेस्टिवल्स आणि कॉन्फेरन्सेस ह्यासाठी पुसान प्रसिद्ध आहे. आशियामधील #MICE ( meetings, incentives, Conferences and exhibitions) हब सिटी होण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. तुम्हाला २००२ चे आशियाई खेळ स्पर्धा आणि फिफा विश्वचषक आठवत असेलच. पुसान मध्ये दर वर्षी, वर्षभर वेगवेगळे फेस्टिवल्स आयोजित केले जात असतात. पुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आशियामध्ये मानाचे स्थान आहे.
पुसान हे दक्षिण कोरियामधील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होणारे बंदर आहे. जगातील कोणत्याही आधुनिक आणि प्रगत शहरात असतील त्या सर्व व्यवस्था आणि सुविधा इथे उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती आणि चमत्कार दाखवणारे उड्डाण पूल आणि उंचच उंच इमारती विपुल प्रमाणात दिसतात.
आम्ही दक्षिण कोरियातील ज्येजू बेटावरून पुसानला जाण्यासाठी सकाळचे विमान पकडले. आधीच आरक्षित केलेली टॅक्सी पुसान विमानतळावर आमची वाट पाहत होती. आम्हाला दिवसभरात कुठे कुठे जायचे आहे ते आम्ही टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले व कोणत्या क्रमानुसार पाहायचे ते त्याला ठरवू दिले!
विमानतळावरून आम्ही गेलो #Songdo बीचवर. पुसानचे बीचेस फार सुंदर आहेत. तिथल्या केबल कार स्टेशनवरून आम्हाला #Amnam पार्क ला जाण्यासाठी केबल कार घ्यायची होती. जाताना रस्त्यात आम्हाला जुन्या पुसान शहराची झलक बघायला मिळाली.
आम्ही काचेचा तळ असणाऱ्या केबल कार चे तिकीट काढले. त्या पारदर्शक तळातून दिसणारा समुद्र, भोवतीचे डोंगर, लहान लहान बेटे, पाईन वृक्ष ह्या साऱ्यामुळे तो प्रवास कायम लक्षात राहण्याइतका सुंदर झाला.
तिथे तिकिटासोबत तुम्हाला चक्क लॉलीपॉप देतात! केबल कारच्या प्रवासात हवेच्या दाबामुळे त्रास होऊ नये म्हणून असेल!
|
केबल कार
|
|
केबल कार मधून दिसणारे दृश्य
|
Amnam पार्क ला उतरल्यावर खूप वेगवेगळी दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत. लोकांचे आवडते पर्यटन स्थळ असल्याने गर्दी असते. आम्ही एप्रिल २०१९ मध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे डायनोसार विषयी एक प्रदर्शन चालू होते. खूप शाळांच्या सहली तिथे आलेल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट आणि उत्साह सगळीकडे पसरलेला होता.
मला त्या डोंगरमाथ्यावर जावेसे वाटत होते. तो सुंदर रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला, तसेच डोंगराच्या उतारावर गच्च गर्दी करून उभे असलेले पाईन वृक्ष मला बोलावत होते.
|
डोंगरमाथ्यावर जाणारा रस्ता
|
|
उंच चढाचे लाकडी जिने
|
वरून पाहिल्यावर अगदी ३६० अंशातून पुसान पाहता येते. पण सर्वात चांगली जागा ह्या लोकांनी पटकावली होती!
|
Prime जागी चालू असलेला खेळ (Prime स्पोर्ट्स )
|
|
विहंगम दृश्य
|
|
परतीचा प्रवास केबल कारमधून दिसणारे दृश्य
|
आम्ही #Happycow.net वर पुसान मधील विगन रेस्टॉरंट्स शोधून ठेवली होती. त्यातल्या #VegeNarang ह्या शुद्ध शाकाहारी विगन रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी जायचे ठरवले. ९व्या मजल्यावर असलेल्या ह्या रेस्टॉरंट मधून समुद्र फार सुंदर दिसतो. अन्न तर इतके चविष्ट की तुम्ही खातच राहता. अर्थात नंतरच्या गोड पक्वान्नांसाठी पोटात जागा ठेवलीच होती आम्ही!
|
Vege Narang - all Vegan Restaurant
|
सुग्रास जेवणानंतर आम्ही गेलो, Hwangnyeongsan नावाच्या डोंगरावर. वळणा वळणांचा रस्ता आणि सगळीकडे चेरी ब्लॉसम ची झाडे! आम्ही पुसान ला एप्रिलच्या मध्यावर गेलो होतो. तिथला चेरी ब्लॉसम चा सिझन तर संपला होता. काही काहीच झाडांवर फुले उरली होती. पण फुलांचा ऋतू ऐन भरात असताना ते दृश्य कसे दिसत असेल, ह्याची आम्ही कल्पना करू शकलो. फुललेल्या चेरी ब्लॉसम्सनी आच्छादलेला डोंगर.. स्वप्न सत्यात येणेच जणू!
|
Cherry Blossom
|
गाडीने वर पोचल्यावर फारच सुंदर दृश्य दिसते. तुम्ही आणखी थोड्या पायऱ्या चढून वर गेलात तर तुम्ही 'बिकन फायर स्टेशन' ला जाता. तिथून दिसणारे डोंगर, झाडे, समुद्र, उड्डाणपुलाचे जाळे, अवाढव्य इमारती..सारेच दीर्घकाळ लक्षात राहण्याजोगे.
|
Hwangnyeongsan Mountain Beacon Fire Station mound
|
|
उंचावरून दिसणारे पुसान
|
नैसर्गिक सौंदर्य तसेच तंत्रज्ञानातील प्रगती अनुभवून झाल्यानंतर आम्हाला जायचे होते एका ऐतिहासिक तसेच अध्यात्मिक महत्वाच्या ठिकाणी, Haedong Yonggungsa येथे. हे साधारण ६०० वर्षे जुने बुद्ध मंदिर आहे. काळाच्या ओघात, विविध कारणांनी आत्तापर्यंत अनेकदा उध्वस्त झाले, परत परत बांधले गेले. कितीदा नावेही बदलली गेली. मंदिराचा परिसर भव्य आहे. एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्र असणारे हे दक्षिण कोरियातील एकमेव मंदिर आहे असे सांगितले जाते.
|
Haedong Yonggungsa Temple.
|
लोकांच्या कल्याणासाठी, भरभराट व्हावी म्हणून हे मंदिर बांधले गेले. दोन्ही बाजूला सुंदर दगडी कंदील असलेल्या रस्त्याने शंभर एक पायऱ्या गेलात की तुम्ही मुख्य मंदिराशी पोचता.
|
मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता
|
|
मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता
|
मंदिराच्या समोर एक उंच पॅगोडा आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने आणखी काही पायऱ्या चढून गेल्यावर गॉडेस ऑफ मर्सी - दया देवतेचा पुतळा आहे. हा शुभ्र पुतळा खूप लांबवरून दिसत राहतो.
ह्या मंदिराबद्दल अनेक कहाण्या ऐकायला मिळतात. मला खरे तर अधिकृत मार्गदर्शकाकडून ह्या मंदिराची माहिती जाणून घ्यायला आवडले असते, पण तशी काही सोय उपलब्ध नव्हती.
|
मंदिराच्या आतील परिसर
|
|
शैक्षणिक यशासाठी पूजिल्या जाणाऱ्या बुद्धमूर्ती
|
|
मुख्य मंदिराचा गाभारा
|
|
गाभाऱ्यासमोरील ओम
|
|
अजून एक मंदिर आणि ओम
|
पॅगोडा च्या मागील भागात असलेल्या भव्य दगडी घंटांसारख्या रचना बघून, इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील पुरातन बौद्ध मंदिरांची आठवण होते.
|
पॅगोडाच्या मागे असलेल्या दगडी घंटासारख्या रचना
|
आमचा तो दिवस खूप लवकर सुरु झाला होता ज्येजू बेटावर. त्या दिवसात विमान, कार, केबल कार प्रवास झाला. शेकडो पायऱ्या चढलो उतरलो. चविष्ट अन्नाने पोट आणि सुंदर दृश्यांनी मन तृप्त झाले होते. आता त्या दिवसाचा कळसाध्याय देखील साजेसाच हवा होता. तसा तो झाला Haeundae बीच वरील फेरफटक्याने!हा दक्षिण कोरियातील सर्वात प्रसिद्ध व एका अर्थी जगप्रसिद्ध बीच आमच्या हॉटेलपासून चालत अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होता. लांब रुंद किनारा लाभलेला आणि रुपेरी वाळूचा हा बीच स्थानिकांचा आणि पर्यटकांचा अत्यंत आवडता आहे. पुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील काही कार्यक्रम इथे होतात. तसेच इतरही अनेक महोत्सव इथे साजरे होतात.
|
लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध!!
|
मावळत्या सूर्याचे किरण उंच उंच इमारतींच्या काचेत प्रतिबिंबित होत होते. लाटांची गाज किनाऱ्यावर खेळणाऱ्या मुलांच्या किलबिलाटात मिसळत होती. रात्र किनाऱ्यावर उतरली होती. जोपर्यंत थंडी सहन होण्या इतपत होती तोपर्यंत आम्ही किनाऱ्यावर रेंगाळत होतो. नंतर हॉटेलमध्ये परतलो, ते दुसऱ्या दिवशी पहाटे भेटण्याचे वचन समुद्राला देऊनच!
#BusanInternationalFilmFestival #SouthKorea #MICE #Asiangames2002 #FIFAworldcup #Sakura #ilovecherryblossom #CherryBlossomInKorea #OneDayInBusan
खूप सुंदर माहिती, फोटो....! भाषा एकदम लालित्यपूर्ण...मजा आली वाचतांना ....!
ReplyDeleteशैलजा धन्यवाद!! तुझ्यासारख्या उत्तम भाषा जाणणाऱ्या लेखिकेकडून दाद मिळणे हि मोठी गोष्ट आहे!! मनःपूर्वक धन्यवाद!
DeleteNice to see your blog. enjoyed reading!
ReplyDeleteThanks Devdatt!! Please keep reading all posts and let me know your opinion!
Delete