आजदेखील सफरच आहे ... पण पक्षीराज्याची. हे सगळे पक्षी टिपायला कुठे जंगलात किंवा पक्षी अभयारण्यात जावे नाही लागले. हे आहेत भर मुंबईत, नागरी वस्तीत दिसलेले पक्षी.
तसे तर आपल्या सगळ्यांनाच पक्षी दिसतात. पण त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा लक्षात ठेवून, कॅमेरा सज्ज ठेवून त्यांची छायाचित्रे घेणे काही प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी पारखी नजर आणि आवड हवी. ह्या सर्व सुंदर छायाचित्रांचे छायाचित्रकार आहेत डॉ. प्रफुल्ल चितळे.
प्रत्येक छायाचित्र सुंदर आणि बारकावे टिपणारे. साधारणपणे, ' वा! छान!!" म्हणून आपण थांबतो. पण शब्दांचे ज्यांना वरदान असते ते जणू त्या छायाचित्रातील भाव शब्दात उतरवतात. प्रत्येक छायाचित्राला समर्पक ओळी लिहिल्या आहेत अंजली चितळे ह्यांनी.
चला तर मग पक्षीजगताच्या प्रवासाला. मी म्हटले की हा पक्षीजगताचा प्रवास.. पण हा तर ठरला कलाजगताचा प्रवास. छायाचित्रकाराने काढलेली पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे, ती पाहून कवयित्रीला सुचलेले शब्द आणि तेच पाहून कलावंतांना काढावीशी वाटलेली रांगोळी. आता ह्या पोस्टमध्ये काही रांगोळ्या पण समाविष्ट झाल्या आहेत! रांगोळ्या काढणाऱ्या शुभदा बर्वे आणि प्रज्ञा खरे ह्या काही प्रशिक्षण घेतलेल्या किंवा व्यावसायिक रंगावलीकार नाहीत. पण अंगात असलेली कला आणि सत्तरी पंचाहत्तरीच्या वयात देखील असलेला अपार उत्साह त्यांच्या रांगोळीत दिसतो. तेव्हा आता पक्ष्यांच्या रांगोळ्यांचादेखील आनंद घेऊ या!
हळद्या |
रंगावली - शुभदा बर्वे |
हळद्या
पिवळे अंग, काळे पंख
डोळ्यांत काजळ, लाल चोच
किती रे तुला रंगांचा सोस?
कोकिळा |
कोकिळा
ठिपक्या ठिपक्यांची पांघरून शाल
लाल डोळ्यांनी किती पहाल?
यायचाय अजून आंब्याला मोहर
कोणत्या झाडावर बसाल तंवर?
लाल डोळ्यांनी किती पहाल?
यायचाय अजून आंब्याला मोहर
कोणत्या झाडावर बसाल तंवर?
फुलचूखी |
फुलचुखी
एवढंसं पाखरू,
लागलं भिरभिरु
प्रत्येक फुलात खुपशी चोच
मधाचा याला भारीच लोभ
एवढंसं पाखरू,
लागलं भिरभिरु
प्रत्येक फुलात खुपशी चोच
मधाचा याला भारीच लोभ
कबुतर |
रंगावली - शुभदा बर्वे |
कबुतर
काँग्रेसचा दिलाय राजीनामा,
करतात सगळे खाणाखुणा
पण कोणीच राजरोस पक्षात घेईना!
साळुंकी |
साळुंकी
तू तर आमची चित्रनेत्रा
मेक अप केलाय काय
भरतनाट्यमकरिता!
साळुंकी जोडी |
साळुंकी जोडी
थंडीचा पडलाय कडाका,
ऊन खायाला येताय् का?
कोतवाल |
कोतवाल
मी आहे कोतवाल,
नजर माझी भारी
लहान लहान पाखरांवर
करतो दादागिरी.
सुतार पक्षी |
सुतार पक्षी
पिवळे केशरी घातले टोपडे
काळे पांढरे माझे झबले
लांब करडी मोठी चोच
लाकडात खुपसू बघतोय बघ.
शिंपी |
शिंपी
मी आहे शिंपी,
करतोय गणती,
'Mask' शिवायला
पानं लागतील किती?
पोपट |
पोपट
लाल टोपी, हिरवा कोट,
गळ्यात बांधलाय काळा गोफ
पाहून घ्यावा नोक,झोक
उणे काढायला नाहीच स्कोप.
तांबट
निळी चोच,पोपटी गळा
खाली,वर केशराचा मळा
हिरवे पंख,करड्या अंगी
पायांना लावलीय चुटुक मेंदी
रंगीबेरंगी माझे पिवळे अंग
सांगा,कोणता उरलाय रंग?
नुकतेच कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू |
नुकतेच कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू
चिकटलेले पंख चिमुकले
प्रकाशात येता झगमगले
फुला फुलांवर राहीन विहरत
आनंदाने वेचिन मधुकण
जन्माची तयारी |
जन्माची तयारी
एवढासा जीव,पण म्हणतोय कसा
जाताना सोडून जाईन ठसा
रंगांची नाजुक नक्षी
ठेवीन मी बाळांसाठी.
इतके पक्षी आपल्या अवतीभोवती असतात. त्यांना पाहण्याची दृष्टी मात्र हवी.
पक्ष्यांकडून आपल्याला खूप शिकतादेखील येईल. इथे आठवते आहे बालकवींची कविता -आनंदी पक्षी.
आनंदी पक्षी
केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली.
आनंदाचे फिरती वारे। आनंदानें चित्त ओसरे,
आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी!
हिरवें हिरवें रान विलसतें। वृक्षलतांची दाटी जेथें,
प्रीती शांती जिथें खेळते । हा वसतो तेथें.
सुंदर पुष्पें जिथें विकसलीं। सरोवरीं मधु कमलें फुललीं
करीत तेथें सुंदर केली । बागडतो छन्दें.
हासवितो लतिकाकुंजांना। प्रेमें काढी सुंदर ताना,
आनंदाच्या गाउन गाना । आनंदें रमतो.
जीवित सारें आनंदाचें । प्रेमरसानें भरलें त्याचें;
म्हणोनिया तो रानीं नाचे । प्रेमाच्या छन्दें!
आम्हांकरितां दुर्धर चिंता। नाना दु:खें हाल सभोंता,
पुरे! नको ही नरतनु आताम । दु:खाची राशी!
बा आनंदी पक्ष्या, देई । प्रसाद अपुला मजला कांहीं,
जेणें मन हें गुंगुन जाई । प्रेमाच्या डोहीं.
उंच भरार्या मारित जाणें । रूप तुझें तें गोजिरवाणें!
गुंगुन जाइल चित्त जयानें । दे, दे तें गाणें!
- बालकवी
# birds #Birdwatching #BirdsInMumbai # Balkavi #Happybirds
फोटोज आणि आोळी दोन्ही सुंदर 👌
ReplyDeleteकबुतर जास्त आवडल 🙂
Wonderful!
ReplyDeleteखूपच मजा आली...
ReplyDeleteसुंदर फोटो व कविता
ReplyDeleteफारच छान सफर झाली पक्षांच्या आणि काव्याच्या दुनियेची.
ReplyDeleteचारोळ्यांसह पक्षी जगताची मौजदार सफर
ReplyDeleteप्रफुल्लची पक्ष्यांची फोटोग्राफी तसेच अंजलीवहिनींची साजेशी कविता व नेमके रंग व गुणांचे चपखल वर्णन.खूप अभिनंदन दोघांचे.
ReplyDeleteडॉक्टर प्रफुल यांनी काढलेली सर्व छायाचित्रे अप्रतिम तर आहेतच पण अंजली यांनी प्रत्येक पक्षांची काव्यातून करुन दिलेली ओळख खूपच छान आहे.दोघांचेही अभिनंदन!
ReplyDeleteWonderful and hilarious.
ReplyDeleteफारच सुंदर
ReplyDeletePhoto baghoon and kavita wachoon chan waTla - Vrunda T, Prafull Chitale.
ReplyDeleteमस्त फोटो
ReplyDelete