रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होतो आणि विशेष म्हणजे तो सर्वांसाठी फुकटात उपलब्ध असतो! तेव्हा तो चुकवू नका. प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर प्रवासात मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. तुम्ही हे दोन्ही,आधी कधी ऐकले होते का?
मोरबे |
त्या दिवशी सुखद गार हवेने आमचे स्वागत केले. डोंगर, जंगल, तलावातील पाणी आणि ताजी हवा ..दिवसाची प्रसन्न सुरुवात व्हायला अजून काय हवे? माझी खात्री आहे, सूर्यदेखील इथे उगवताना मनात असेच म्हणत असेल!!
मोरबे धरणाच्या बांधावरून |
आम्ही मोरबे धरणाच्या बांधावर होतो. चालण्यासाठी, धावण्यासाठी हा उत्तम रस्ता आहे. इथे दिवसभर पर्यटकांना परवानगी नाही. फक्त सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांसाठी सकाळी साधारण ८ वाजेपर्यंत हा परिसर सार्वजनिक वापरासाठी खुला असतो. आम्ही तिथे सकाळी खूप लवकरच पोचलो होतो.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ धावरी नदीवर बांधलेले हे धरण आहे. मोरबे हे तसे अलिकडच्या काळात बांधले गेलेले भारस्थायी धरण आहे.
आधुनिक युगातील नोंदी बघितल्या तर लक्षात येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. धामापूर धरणाचे बांधकाम १५३० मध्ये सुरु झाले आणि १६०० मध्ये ते पूर्ण क्षमतेने काम करत होते. पण ते मातीचे धरण होते. धामापूर म्हटल्यावर सुनीताबाईंची आठवण होते. सुनीताबाई देशपांडे ह्यांनी एका पुस्तकात धामापूर धरणावर लेख लिहिला आहे. ते चित्र डोळ्यांपुढे उभे राहते.
प्राचीन काळातल्या, भारतातील सर्वात जुन्या धरणाचा उल्लेख सापडतो तो चोला राजांनी बांधलेल्या कल्लनाई धरणाचा. ह्या धरणाचे बांधकाम इ.पूर्व १०० मध्ये सुरु झाले. पहिल्या शतकाच्या अखेरीस हे धरण बांधून पूर्ण झाले होते. तंजावर जवळ कावेरी नदीवर बांधलेले हे धरण अजूनही कार्यक्षम आहे. कावेरी नदीचे पाणी अडवून शेतीसाठी वापरले गेले व तो सर्व भूभाग समृद्ध झाला.
आधुनिक काळातील जुने भारस्थायी धारण आहे ते तुळशी धरण. मुंबईजवळील तुळशी नदीवर हे धरण १८७९ मध्ये बांधले गेले.
मोरबे धरण २००६ मध्ये कार्यान्वित झाले. भारस्थायी धरण बांधायचे तर तिथे पाया भक्कम व मजबूत होण्यासाठी, विशिष्ट संरचनेची, खडकाळ जमीन आवश्यक असते. त्यावर मग दगडांच्या राशी व दगड, काँक्रीटचे बांधकाम केले जाते. मोरबे येथे पण आपल्याला दगडांच्या राशी व दगडी बांधकाम दिसते. अशी भारस्थायी धरणे ही स्वतःच्या वजनामुळे व विशिष्ट रचनेमुळे पाण्याच्या धडका वर्षानुवर्षे सहन करू शकतात.
मोरबे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करते. ह्या धरणाची मालकी नवी मुंबई महानगर पालिकेकडे आहे. एक धरण मालकीचे असणारी अशी, मला वाटते, ही एकमेव महानगर पालिका असेल.
धरणाची सविस्तर माहिती 📷 Wikimedia Commons |
चंद्रास्त 01/11/20 |
कोजागिरीचा पूर्ण चंद्र मावळण्याच्या तयारीत होता. हा फोटो सकाळी ६ . २६ ला घेतलेला आहे. ह्या फोटोत तुम्हाला धरणाचा दगडी बांध दिसेल. दुसऱ्या बाजूला दिशा उजळू लागल्या होत्या. सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. ती नक्कीच एक अप्रतिम सुंदर सकाळ होती.
सूर्योदय 01/11/20 |
ते सुखद सुंदर वातावरण कोणत्याच कॅमेऱ्याने टिपता येणार नाही. तरीही मी माझ्या साध्या मोबाईल कॅमेऱ्याने टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
हे पहाटेचे दृश्य अनुभवण्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच जवळच्या वावर्ले गावात जाऊन राहिलो होतो. मोरबे धरणापासून कारने दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले ते एक छोटेसे गाव आहे.
खालापूर जिल्ह्यात चौक कर्जत रस्त्यावर ह्या वावर्ले गावात आम्ही राहिलो होतो साठे फार्म वर. खूप मोठाली झाडे असलेली ही शांत जागा जणू ऑक्सिजन बँकच आहे. प्रशस्त आवार असल्याने, सध्याच्या दिवसात आवश्यक असणारी 'दो गज की दूरी' पण सहज शक्य होते.
साठे फार्म वरील फुले |
हिरवाई |
ऊन सावल्या इथे खेळती, झाडांसंगे त्याही हिरवळती! |
रस्त्याची सुरुवात आमराईतून होते आणि रानातील वळणवाटांनी आपण तलावापाशी पोचतो. इतकी शुद्ध मोकळी हवा शहरांत नक्कीच मिळत नाही.
जेव्हा तुमच्या नजरेला असे विस्तीर्ण मोकळे रान, डोंगर आणि पाणी दिसते तेव्हा एका अवर्णनीय स्वातंत्र्याचा अनुभव येतो.
जवळच एक लहानसे गणेश व शिवमंदिर आहे. जरी मंदिराचे बांधकाम नवे असले तरी शिव पिंडी आणि गणपती मात्र अनेक दशके पाहिलेले जुने जाणते दिसतात. काळाच्या धडका सोसून, त्या खुणा अंगाखांद्यावर वागवत आहेत.
स्वादिष्ट व्हीगन अन्नाचा आस्वाद घेता घेता कोजागिरीचा उगवणारा पूर्ण चंद्र दिसणे हा अपार आनंद होता.
तलावाचे विहंगम दृश्य |
जेव्हा तुमच्या नजरेला असे विस्तीर्ण मोकळे रान, डोंगर आणि पाणी दिसते तेव्हा एका अवर्णनीय स्वातंत्र्याचा अनुभव येतो.
वाऱ्याने हलते रान, बाकी सुनसान, जग हे सारे! |
जवळच एक लहानसे गणेश व शिवमंदिर आहे. जरी मंदिराचे बांधकाम नवे असले तरी शिव पिंडी आणि गणपती मात्र अनेक दशके पाहिलेले जुने जाणते दिसतात. काळाच्या धडका सोसून, त्या खुणा अंगाखांद्यावर वागवत आहेत.
उगवता पूर्ण चंद्र दिसणे ह्यापेक्षा वेगळी, अशी एखाद्या दिवसाची काय सुंदर अखेर असू शकते?
रिसॉर्टच्या जेवणघरातून दिसलेला उगवता पूर्ण चंद्र! 31/10/20 |
स्वादिष्ट व्हीगन अन्नाचा आस्वाद घेता घेता कोजागिरीचा उगवणारा पूर्ण चंद्र दिसणे हा अपार आनंद होता.
जवळच सोंडाई किल्ल्याचा ट्रेक करता येतो. मध्यम अवघड असा हा दोन तासांचा ट्रेक आहे. कोंढाणे बुद्ध लेणी देखील साठे फार्म पासून कार ने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. ही दोन्ही ठिकाणे पुढच्या ट्रीपला जाण्या साठी राखून ठेवली आहेत.
जसे मी सुरुवातीला म्हणाले तसे, प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. घरापासून साधारण ५० किलोमीटर वर असणाऱ्या ठिकाणाची दीड दिवसाची एक लहानशी ट्रिप देखील तुम्हाला ताजेतवाने करून टाकते!
#ShortTripFromMumbai #ShortTripFromThane #ShortTripFromPune #SatheFarmsSatishSathe07738342820 #PlacesToVisitNearKarjatKhopli
अप्रतिम पुढच्या वेळी आम्हाला पण घेऊन चल😍
ReplyDeleteफोटो खूप छान 👌👌👌
नक्की जाउ या!
Delete