काही ठिकाणे खरे तर फार सुंदर असतात. पण ती एखाद्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या जवळ असतील तर मग लोक त्या ठिकाणांकडे एका रात्रीचा थांबा म्हणूनच पाहतात. त्या मोठ्या स्थळांच्या कीर्तीमुळे ही लहान पण सुंदर असलेली स्थळे झाकोळून जातात. दिरांग हे असेच एक ठिकाण आहे. तिथे बरेच पर्यटक जातात, पण ते फक्त तवांग ला जाताना प्रवास खूप अवघड आणि लांबचा आहे, म्हणून विश्रांतीसाठी, एक रात्र मुक्काम करायला प्रवासी दिरांग ला थांबतात. काहीजण तिथे थांबतात ते तवांगला जाण्याआधी, इतक्या उंचीवर असलेल्या हवेची, कमी ऑक्सिजन ची, थंडीची शरीराला सवय व्हावी म्हणून.
थंड तवांग च्या तुलनेत जे समुद्रसपाटीपासून ३०४८मीटर उंचीवर आहे, दिरांग चे हवामान प्रसन्न आणि सुसह्य आहे. दिरांग समुद्रसपाटीपासून १५६० मीटर उंचीवर आहे. दिरांग पासून तवांगपर्यंतचे अंतर फक्त १३० किलोमीटर आहे. पण सगळा रस्ता पर्वतांतून जाणारा आहे. त्यामुळे कधी कधी गाडीत बसल्या बसल्या रोलर कोस्टर राईडचा आनंद आणि थरार पण अनुभवता येतो. जर का तुम्ही सुदैवी असाल, हवामानाची तुम्हाला साथ असेल तर मग फक्त चार तासांत देखील हे १३० किलोमीटर अंतर पार करता येते. पण कधी जर का बर्फवृष्टी, ढगफुटी किंवा दरड कोसळण्याचा प्रसंग घडलेला असेल तर मात्र हिमालयाच्या संगतीत तुम्हाला अनेक तास काढण्याची संधी मिळते!!
आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की दिरांग अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. अरुणाचल प्रदेश - ज्या पर्वतांवर सूर्य सर्वात आधी उगवतो असे पर्वत असलेली भूमी. अरुणाचल भारताची फळबाग म्हणून पण ओळखले जाते. तसेच जीव वैविध्यासाठी देखील अरुणाचल प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी अरुणाचल मध्ये आढळतात.
दिरांग मध्ये देखील ही सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत. स्वच्छ निळे आकाश, शुद्ध मोकळी हवा. प्रदूषण अगदी कमी आणि हे केवळ आकडेवारीत नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष देखील लगेच जाणवते.
आमचा दिरांग ला पोचण्या आधीच्या दिवशी खूप प्रवास झाला होता. गोहाटीपासून ते बोमडीला पर्यंतचा प्रवास आम्ही केला. त्यातला बराच भाग रस्ते चांगले आहेत. पण नंतर मात्र रस्ते चांगले असले तरी डोंगर, दऱ्या, वळणे असा प्रवास असल्याने वेळ लागतो. आम्ही बोमडीला येथे रात्री राहिलो आणि बोमडीला परतीच्या प्रवासात बघण्याचे ठरवून सकाळी दिरांग ला जाण्यासाठी निघालो.
बोमडीला -दिरांग हा प्रवास साधारण दोन तासांचा आहे. रस्ताभर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत राहतात. सगळी शिखरे पांढऱ्या ढगांनी वेढलेली असल्याने बर्फ कोणता आणि ढग कोणते ते समजतच नाही!
|
हिमालय पर्वतरांगा |
मला माहिती होते की अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर गोरीचेन आहे. त्यामुळे रस्त्यात कोणतेही उंच शिखर दिसले की मला वाटायचे की गोरीचेन दिसले! जरी गोरी चेन नसले तरी तुम्ही वरच्या फोटोत बर्फाच्छादित शिखर पाहू शकता.
नंतर मला कळले की त्या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कामते आहे. झाले.. त्या नंतर दिसणारे प्रत्येक उंच शिखर कामते वाटायला लागले!!
अरुणाचल प्रदेशचे पहाटे उजळणारे पर्वत किंवा उगवणारा सूर्य ज्या पर्वतांवर सर्वप्रथम दिसतो अशा पर्वतांचा प्रदेश हे नाव सार्थ आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये सूर्य खरोखरच लवकर उगवतो आणि संध्याकाळी सात वाजता पार रात्र झालेली असते. अर्थात भारताचा अवाढव्य भूभाग आणि त्या सर्वांची मिळून एकच भारतीय प्रमाण वेळ असल्याने आपल्याला लवकर आणि उशिरा वाटते.
ह्या संपूर्ण प्रवासात तुम्ही वाहनाच्या आत बघूच शकत नाही. पूर्ण वेळ तुमचे डोळे खिडकीबाहेर खिळलेले असतात. हिमालयाची सूर्याच्या किरणांनी चमचमणारी शिखरे हे तर अविस्मरणीय दृश्य आहे. कधी कधी भीतीदायक दरी, कधी कधी खाच खळगे आणि तीव्र वळणे असलेला असा हा प्रवास.. पण हे सगळे असले तरीही अद्भुत सुंदर आणि अवर्णनीय असाच आहे.
|
बर्फाच्छादित शिखर
|
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग हे लहानसे शहर, खरे तर गाव आहे. कामेंग नदीच्या तीरांजवळ हे गाव वसलेले आहे.
|
गावाची झलक
|
दिरांग मधील भेट देण्याजोगी ठिकाणे म्हणजे कालचक्र गोम्पा हा पाचशे वर्षे जुना बौद्ध मठ, दिरांग झोन्ग हे जुन्या किल्ल्याचे अवशेष आणि गरम पाण्याचे झरे ही ठिकाणे आहेत. त्यातील दिरांग झोन्ग मध्ये आता निवासी भाग आहे. तिथे आता लोकांची घरे आहेत.
|
दिरांग झोन्ग 📷Girish Tilak
|
आम्ही ही सगळी पर्यटन स्थळे टाळायचे ठरवले. त्या ऐवजी आम्ही LDL बौद्ध मठ आणि सांगती व्हॅली ला जायचे ठरवले. ह्या दोन्ही ठिकाणी, त्या वेळी, आमच्या खेरीज क्वचितच कोणी आलेले होते. आम्ही ह्या ठिकाणांचे सौंदर्य आणि शांती मनसोक्त उपभोगली.
|
जर का कोणाच्या लक्षात आले नाही तर!!
|
प्रवेशद्वाराच्या पुढचा रस्ता थोडा चढणीचा आहे. जरी चढाचे अंतर फार नसले तरी विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन ह्यामुळे असे वाटते की आपण एखादी टेकडी चढून गेलो आहोत!!
|
चढणीचा रस्ता
|
ही खरोखरच खूप शांत निवांत जागा आहे. नवीन बांधकाम आहे. खूप चांगल्या प्रकारे निगा राखलेली बाग आणि इमारत पाहून सुद्धा खूप ऊर्जादायी वाटते.
जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा मठात कोणीच नव्हते. फक्त माळी होता. त्यांनी आनंदाने फोटोसाठी पोज दिली.
|
हे बघा, आम्ही अशी पोज देतो! |
|
काम चालू आहे!
|
|
काम चालू आहे!!
|
बागेची पण खूप सुंदर निगा राखलेली आहे. संपूर्ण परिसरात अजिबात कचरा नव्हता, अगदी कागदाचा एखादा कपटाही नाही. थोड्या वेळाने तिथे दोन महिला आल्या. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की रोज पूजेसाठी आणि प्रार्थनेसाठी तिथे परिसरातले लोक येऊन जातात.
निळेशार आकाश, शुभ्र पांढरे ढग, सभोवतालचे डोंगर, जागेतील प्रगाढ शांतता आणि बुद्ध मूर्ती हे सगळे ह्या जागेला एक अध्यात्मिक व्यक्तिमत्व प्रदान करते. ह्या ठिकाणी, अगदी तुम्ही इकडे तिकडे भटकत असलात तरी तुम्हाला आपण ध्यान साधना करत आहोत असेच वाटते. त्या शांततेला, आपल्या बोलण्याने धक्का लावू नये असे वाटते.
|
LDL मठ 📷Girish Tilak
|
|
मठाचा परिसर |
|
ओम मणी पद्मे हं!
|
|
अजून एका वेगळ्या बाजूने फोटो
|
|
सुंदर बाग |
हा फोटो म्हणजे माझे मागच्या वर्षीचे दिवाळी शुभेच्छापत्र होते. कारण मागच्या वर्षी दिवाळीत आम्ही ह्या ठिकाणी होतो. दिवस होता, २८ ऑक्टोबर २०१९.
नव्याने रंग दिलेला असल्याने मठ अगदी चमकत होता. मठाच्या आतल्या भागाचा मी फोटो काढला नाही. आत खूप शांतता होती. सर्व काही जाणणाऱ्या बुद्धाचा पुतळा होता. पूजा, प्रार्थनेसाठी, ध्यान धारणेसाठी फारच उत्तम जागा आहे.
|
किती सुंदर दिवस! स्वच्छ निळ्या आकाशाचा!!
|
मी मध्यंतरी एक वाक्य वाचले होते, "स्वच्छ निळे आकाश पाहून जर का तुम्हाला खूप आनंद होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा आत्मा अजून जिवंत आहे!!!" अरुणाचल प्रदेश ह्या अर्थाने, तुमच्या आत्म्याला जागे करणारा प्रदेश आहे.
दिरांग मध्ये अजून एक दडलेले रत्न आहे, ते म्हणजे सांगती व्हॅली. सुदैवाने अजून ते पर्यटन स्थळ बनलेले नाही. फार लोकांना माहिती नाही त्यामुळे त्या ठिकाणाची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिलेले आहे. सांगती व्हॅली ट्रेकर्स आणि कॅम्पर्स ना चांगली माहिती आहे. पण मला भीती वाटते, की अजून काही वर्षांनी ही जागा जेव्हा सर्व पर्यटकांना माहिती होईल, तेव्हा तिथे भरपूर गर्दी व्हायला सुरुवात होईल आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याला धक्का लागेल.
सगळ्या बाजूनी हिमालयाच्या पर्वतरांगा, शेजारून वाहणारी स्वच्छ नितळ पाण्याची नदी हे सगळे तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.
सांगती व्हॅली दिरांग पासून साधारण १५ किलोमीटर वर आहे. रस्ता निसर्गसुंदर आहे. जाताना अनेक फळबागा दिसतात. तुम्ही जर का योग्य मौसमात तिथे असाल आणि सुदैवी असाल तर किवीज, संत्री,सफरचंदे ही फळे देखील लगडलेली पाहायला मिळतील.
रस्त्यांवर, पुलांवर, जिकडेतिकडे तुम्हाला रंगीबेरंगी पताकांच्या माळा वाऱ्याबरोबर झुलताना दिसतील. सगळे दृश्य त्या झुलणाऱ्या पताकांनी अगदी जिवंत होऊन जाते. त्यावर बहुधा काही मंत्र लिहिलेले असावेत. बारीक अक्षरात खूप मजकूर लिहिलेला दिसतो.
रस्त्याने दिसलेली घरे छोटी आणि डोंगर उतारावर बांधलेली होती. त्यामुळे खूपदा रस्त्यावर असलेला भाग हा दुसरा मजला होता आणि पहिला मजला अगदी नदीच्या शेजारी!! प्रत्येक घराच्या छतावर काही भाज्या वाळवत ठेवलेल्या होत्या. हिवाळ्याची बेगमी करत असावेत. मक्याच्या कणसांच्या दोरीने केलेल्या माळा वाळवण्यासाठी, खिडक्यांना किंवा छताला लटकवलेल्या दिसल्या. छतांवर भले मोठे भोपळे देखील उन्हात पहुडलेले होते. हो, आणखी एक गोष्ट दिसते ती म्हणजे मिरच्या पण वाळत ठेवलेल्या असतात. बहुधा अरुणाचल प्रदेशाच्या सुप्रसिद्ध भूत जोलोकिया मिरच्या असाव्यात.
प्रत्येक घरासमोर, किंवा खिडकीत किंवा छतावर रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. तुम्हाला कोणी भेटले तर ताबडतोब स्मितहास्य करतात आणि तुमच्याशी बोलायला तयार असतात. मवाळ आणि सुस्वभावी लोक वाटले.
|
पूल आणि पताका!
|
|
स्वच्छ नितळ नदी, पर्वत रांगा आणि पताका
|
|
फळबाग मालकाचे घर
|
|
तुम्ही फोटो काढायचे थांबूच शकत नाही.
|
|
किवीज
|
|
भोपळे!
|
|
मिरच्या, बहुतेक भूत जोलोकिया
|
आम्हाला एक स्थानिक घर बघता आले. पुढच्या मोसमात ते लोकांना होम स्टे उपलब्ध करवून द्यायचा विचार करीत होते. त्या साठी त्यांची तयारी चालू होती.
|
स्थानिक घर.
|
हा होम स्टे नक्कीच खूप छान असणार आहे. नदी आणि डोंगराच्या इतक्या जवळ राहणे किती आनंदाचे असेल! तिथे मला अजून एक खास गोष्ट पाहायला मिळाली. जे काय घर मालकिणीने सांगितलेले मला समजले त्यावरून, सीवीड वाळवत होते. वर्षभराच्या साठवणीचे काम चालू होते.
|
प्रसन्न घरमालकीण
|
|
सी वीड
|
हा संपूर्ण परिसर पर्यटनासाठी अजून तयार होतो आहे. तोपर्यंत, जर तुम्हाला अत्याधुनिक सुविधा हव्या असतील, तर अरुणाचल तुमच्यासाठी नाही. हॉटेल्स मध्ये लिफ्ट्स नाहीत, रेस्टॉरंट्स अगदी साधी आहेत, रस्ते कुठे कुठे अगदी खाच खळग्यांचे असतील. जिथे तुम्ही राहत असाल त्या हॉटेलमध्ये तुम्ही आधी सांगितलेत तर तुम्हाला साधे पण ताजे बनवलेले आणि सुग्रास शाकाहारी अन्न मिळू शकते. बाहेर शाकाहारी अन्न मिळणे थोडे त्रासाचे होऊ शकते.
आम्हाला पर्यटकांचा एक गट भेटला, ते सगळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वैतागलेले होते. जिथे तुम्ही ट्रीप ला जाण्याचा विचार करीत आहात, तिथला नीट अभ्यास करा. आपल्या अपेक्षा त्याप्रमाणे ठेवा असेच मी सांगेन!! अरुणाचल तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, अत्याधुनिक सोयी सुविधांसाठी नाही, इतके लक्षात ठेवा.
आणि हे सगळे सांगून झाल्यानंतर, मी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला अरुणाचलला भेट द्यावी असेच सुचवेन, अरुणाचल ला भेट द्या, भारतीय निसर्गाचे वैभव बघा. भारतातील विविधता बघा.
आता आपल्यासमोर येत आहे, अरुणाचल चा सुप्रसिद्ध सूर्योदय!
|
अरुणोदय झाला!! 📷Pradnya Sathe |
फोटो अप्रतिम आहेत प्रत्यक्ष किती छान असेल 😍😍
ReplyDeleteअतीव सुंदर आहे!
Delete